लेखक - पाउलो कोएलो
अनुवाद - डॉ. शुचिता नांदापूरकर
लेखकाविषयी :
लहानपणापासून साहित्यावर प्रेम करणारा शब्दांचा जादूगार म्हणजे पाउलो कोएलो.
घरच्यांची इच्छा होते की त्याने इंजिनिअर व्हावे पण त्याच्या साहित्यक्षेत्रावरील अतिरेकी प्रेमामुळे तो बंड करून उठला तर घरच्यांनी त्याला मनोरूग्ण समजायला चालू केले, विजेचे चटकेही दिले पण नंतर त्याला समजून घेतले.
स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता म्हणून हुकुमशाही राजसत्तेला विनोदी मालिकेच्या माध्यमातून आव्हान दिले , पर्यायाने तुरूंगवास छळछावणीत काही दिवस घालवल्यावर मनोरूग्णाप्रमाणे स्वतःला अपाय करत सुटका करून घेतली.
वयाच्या 26 व्या वर्षी सामान्य जीवन जगावे हयासाठी आधी कँसेट आणि मग रेकॉर्ड कंपनीत काम केले.
१९८८ साली त्यांनी अल्केमिस्ट लिहिली
इंग्रजी अनुवाद झाल्यापासून हे पुस्तक जगभरात पोहचले
आजवर जगभरातील ५५ भाषेत अनुवाद झालेले हे बेस्टसेलिंग पुस्तक
पुस्तकाविषयी :
अल्केमिस्ट म्हणजेच किमयागार
वेगवेगळे शास्त्रीय प्रयोग करून लोखंडापासून सोने बनवणारा...
सँन्तियागो हा असा माणूस असतो ज्याला जगभर भटकंती करायची असते, निरनिराळया ठिकाणचे किल्ले पाहायचे असतात
त्यामुळे शिकलेला असूनही तो शेती घरसंसार हया सार्यात न अडकता मेंढपाळ होणं पसंत करतो.
मेंढ्या सांभाळत असतानाही आपला वाचनाचा छंद तो जोपासत असतो. एका रात्री तो एका पडक्या चर्चजवळ मेंढ्यासह मुक्काम करतो तिथे त्याला खजिन्याचे स्वप्न पडते आणि मग स्वप्नाचा अर्थ जाणून घेतल्यावर खजिना मिळवायच्या जिद्दीने तो पेटून उठतो.
काही मेंढ्या मित्राला विकून तो पिरँमिडच्या दिशेने रवाना होतो.
वाटेत भाषेच्या अडचणी येतात, पैसे लुटले जातात, तो अगदी कफल्लक होतो. वर्षभर काचसामानाच्या दुकानात काम करून पुन्हा पैसे उभे करतो.
जमलेल्या पैश्यात मेंढ्या घ्यायच्या की पुन्हा खजिन्याची वाट धरायची हयाबाबत त्याच्या गोंधळ असतो
काचसामान, शेती, मेंढपाळ असे विविध पर्याय असूनही
शेवटी आपल्या ह्रदयाची हाक ऐकून खजिन्याच्या मागावर जायचे ठरवतो.
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमी असूनही जिवावर उदार होऊन तो वाळवंटातला खडतर प्रवास पूर्ण करतो.
मरूद्यानात त्याला त्याच्या प्रेमाचे माणूस मिळते
तिला सोडून पुन्हा पुढच्या प्रवासाला जाणे त्याला जड जात असते पण तरीही तिच्या पाठबळावर तो पुढील प्रवासाला निघतो.
यात त्याला किमयागाराची साथ लाभते आणि शेवटी अनपेक्षितरीत्या खजिना लाभतो.
हया प्रवासात सँन्तियागो जे काही शिकला ते खालीलप्रमाणे
▪️ काही माणसं फक्त अन्नपाण्यासाठीच जगतात त्यांना स्वप्ने ,ध्येय वगैरे काही नसते
▪️स्वप्नं म्हणजे अर्थात देवाची वाणी असते तीच माणसाच्या जीवनाला अर्थपूर्ण बनवतात
▪️माणसं बदलाची अपेक्षा फक्त दुसऱ्या कडून ठेवतात पण स्वतः मात्र बदलत नाही.
▪️प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असा एक काळ असतो जेव्हा सर्व काही शक्य असते, आयुष्य घडवण्याची इर्ष्या असते
पण तो काळ उलटून गेला की भीती माणसाचा ताबा घेते.
▪️जी गोष्ट आपल्याला हवीहवीशी वाटते ती आपली इच्छाशक्ती बनून आपल्याला प्रेरित करण्याचे काम करते।
▪️प्रत्येक स्वप्नाची किंमत असते ती मोजायची तयारी असेल तरच स्वप्ने पाहावीत
▪️खिशात एकवेळ पैसा नसेल तरी चालतो पण डोळयात स्वप्ने आणि मनात विश्वास असायलाच हवा
▪️आपल्या चांगल्या गुणांकडे आपलेच दुर्लक्ष होणे म्हणजे शापित जीवन जगणे
▪️माणसाला दुसऱ्याची भाषा बोलता येत नसली तरीही उत्साहाची भाषा मात्र यायलाच हवी.
▪️प्रत्येकाला गमावण्याची भीती वाटतेच मग तो जीव असो, आयुष्य असो किंवा मिळकत असो
▪️वर्तमानातील क्षणं न क्षण जगणे हेच खरे जीवन असते.
▪️प्रत्येक दिवस एकतर जगण्यासाठी असतो किंवा जगाचा निरोप घेण्यासाठी
त्यामुळे मरणाची भीती बाळगायची गरज नाही.
▪️माणसाच्या तोंडात जाणारी कुठलीही गोष्ट वाईट नसते उलट तोंडातून बाहेर पडणारी गोष्ट त्यापेक्षा वाईट असते.
▪️शिकण्यासाठी सर्वात उत्तम मार्ग असतो तो म्हणजे "कृती"
▪️आपल्या भवितव्य आणि आनंदाकडे जाणाऱ्या मार्गावर फारच थोडे लोक चालतात बाकीचे सारे हयाला धोकादायक समजतात.
▪️माणसाच्या डोळयात त्याच्या आत्म्याची ताकद असते.
▪️जो माणूस स्वतःला आणि जगाला ओळखतो तोच स्वतःमध्ये बदल करतो आणि तोच किमयागार ठरतो.
▪️शूर लोक भेकड लोकांचा द्वेष करतात
▪️ भीती माणसाला बंदिस्त करतात , त्याचे विचार, तर्क काम करेनासे होतात
भित्र्या माणसाचे ह्रदय त्याच्याशी प्रामाणिकपणे बोलू शकत नाही
▪️प्रेम ही आपल्याला बदलू शकणारी, प्रेरित करणारी शक्ती आहे ती कधीच आपल्याला भवितव्य घडवण्यापासून अडवत नाही
▪️ उद्दिष्ट साध्य झाल्याशिवाय संपते ती मोहीम नसतेच
समाप्त
Nilesh Shinde