Saturday, July 9, 2022

साबुदाणा खिचडी

*साबुदाणा  खिचडी               
                  पोर्तुगीज भारतात आले म्हणून आपल्या उपवासाची सोय झाली*

*संकलन-- आनंद महाजन*              
                 *अमरावती*                     
                                                          
 आपल्या पैकी अनेकांनी उपवास केला असेलच. 
बऱ्याचजणांनी श्रद्धेपोटी केलाय तर काहीजणांनी फक्त साबुदाण्याची खिचडी खायला मिळावी म्हणून उपवास केलाय. 

आज सगळ्यांच्या डब्ब्यात खिचडी हमखास आढळते.

साबुदाण्याची खिचडी हा आपल्या भारताचा राष्ट्रीय उपवासाचा पदार्थ.

 पण याचा आणि उपवासाचा काय संबंध हा प्रश्न आपल्याला कधी पडलाय काय?

साबूदाणा खिचडीचा  इतिहास आपण जाणूनच घेतला नाही.

भगवान भोलेनाथ शंकराचा वाढदिवस होता. माता पार्वतीने सगळी तयारी केली पण गणपतीने ते सगळ जेवण संपवलं. भगवान शंकराना उपवास घडला. पार्वती देवीनी आयडिया केली. झटपट साबुदाने भिजत घातले आणि त्याची मस्त खिचडी बनवली. भोलेनाथाला ती खिचडी आवडली तेव्हा पासून त्यांनी जाहीर केलं की इथून पुढे माझ्या प्रत्येक वाढदिवसाला जो कोणी भक्त उपवास करेल आणि साबुदाणा खिचडी खाईल त्याच्यावर मी प्रसन्न होईन.

सॉरी बॉस. अशी कुठलीही स्टोरी पुराणात नाही. स्टोरी जाऊ द्या आपल्या पुराणात साबुदाणाच नाही.

आता तुम्ही म्हणाल पुराणातली वांगी पुराणात. तर ही वांगी सुद्धा पुराणात नाहीत. असो.

 तर रामायण महाभारत सोडा अगदी परवा परवाच्या पेशवाईमध्ये सुद्धा बाजीराव पेशव्यांनी मोहिमेला जाण्यापूर्वी साबुदाण्याची खिचडी खाल्ली होती असा उल्लेख नाही.

मग ही साबुदाण्याची खिचडी आली कुठून??

तर दिल थांम के बैठीये, भारतीय उपवासाची सोय लावणारा साबुदाणा आणला पोर्तुगीजांनी.

 विश्वास ठेवू वाटत नसला तरी हे खरं आहे.

साबूदाणा बनतो ते टॅपिओका झाड मुळचे दक्षिण अमेरिकेचे. याच्याच कंदापासून साबुदाणे बनवले जातात.

 साबुदाण्याचा पहिला उल्लेख १२२५ मध्ये , झाओ रुकोव यांच्या “झू फॅन झीही “, या पुस्तकात आढळतो. या पुस्तकात त्यांने विविध देश आणि त्यांचे विशिष्ट अन्नपदार्थ यांचे वर्णन केले आहे. यात तो ब्रुनेई मध्ये १२व्या शतकात साबुदाणा वापरला गेल्याची नोंद करताना दिसतो.

व्यापाराच्या निमित्ताने युरोपियन देशांनी जगभर वसाहती उभ्या केल्या व इकडची खाद्यसंस्कृती तिकडे अशी सर मिसळ करून टाकली.

 यातूनच सतराव्या शतकात हे साबुदाणे भारतात आले. केरळच्या मलबार भागातील उष्ण दमट हवामान सूट झाल्यामुळे टॅपिओकाची लागवड तिथे होऊ लागली.

आता हे साबुदाणे उपवासाच्या पदार्थात कसे घुसले हा संशोधनाचा विषय आहे. 
तरी काही जाणकारांच्या मते ही गुजराती दुकानदारांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती. 

आपल्याकडे उपवासात कंद खावे असे सांगितलेले आहे आणि साबुदाणा कंदापासून बनतो मग तो उपवासाला चालतो असा विषय झाला.
 त्याची चव देखील भारी होती. 

मग काय हळूहळू लोक आवडीने हा साबुदाणे खाऊ लागले. पण गंमत म्हणजे साबुदाण्याची खिचडी बनवायला लागणारे साबुदाणे, शेंगदाणे, बटाटे, मिरच्या हे सगळं पोर्तुगीजांनी भारतात आणलंय.

भारतात साबुदाण्याचे कारखाने सुरु होण्यासाठी १९४३-४४ साल उजाडावे लागले.

तामिळनाडूच्या सेलम मध्ये भारतात साबुदाण्याची निर्मिती सुरु झाली.

 याचा परिणाम असा झाला की भारतातकाश्मिर ते कन्याकुमारी सगळीकडच्या दुकानात साबुदाणे मिळू लागले. 
गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक इथे  घराघरात साबुदाण्याची खिचडी बनू लागली.
आणि आता तर आषाढी एकादशी असो की श्रावण सोमवार प्रत्येक उपवासाला आपण खिचडीशिवाय राहू शकत नाही. 
हे सगळ पुण्य जातं पोर्तुगीजांना....

😉😄 संकलित संग्रहीत कापी पेस्ट