Saturday, August 28, 2021

माझ्या आयुष्यात असं का घडतं?

माझ्या आयुष्यात असं का घडतं?
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आयुष्यात घडणाऱ्या घटनांमागील रहस्यांचा उलगडा.

या जगातील प्रत्येक सजीव- निर्जीव गोष्टीचा एक निश्चित उद्देश आहे. असं असेल तर मग *माझ्या जीवनाचा उद्देश काय?* 
या प्रश्नाने लेखक 'माझ्या आयुष्यात असं का घडतं?' या पुस्तकाची सुरुवात करतात.
पुस्तक जसं जसं पुढे जातं तसतसा लेखकांनी दिलेल्या सोप्या उदाहरणाने आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना मागील रहस्यांचा उलगडा होत जातो.
     ‘माझ्या आयुष्यात असं का घडतं?’, हे पुस्तक आपल्या आयुष्याचा जीवनपटच आपल्यासमोर उलगडून दाखवतं. हे पुस्तक वाचताना असं वाटतं की, माझं आयुष्य माझ्या समोरच मांडलं आहे. या पुस्तकात आपल्याला, 
‘हेच लोक माझ्या आयुष्यात का? 
याच लोकांमुळे मला त्रास का होतो? 
माझ्याच बाबतीत असं का घडतं? 
समस्या मलाच का भेडसावतात?...’, 
अशा प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि त्यापेक्षा महत्त्वाचं आपल्याला त्यांचं कारण कळतं आणि आपलं मन ऊर्जेने भरून जातं.जेव्हा आपल्याला आपल्या जीवनाचा उद्देश्य कळतो, निसर्गाची पद्धत समजते तेंव्हा आपल्या आयुष्यात उर्जा निर्माण होते.

     हे पुस्तक मुख्यतः तीन भागात विभाजित आहे. 
एक, प्रत्येक क्षणाला आपल्याला संकेत मिळत असतात, मेसेज मिळत असतात. हे संकेत, हे मेसेज डिकोड करणं आवश्यक आहे. हे संकेत डिकोड केले तर जीवन किती सरळ आहे हे समजतं आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्याला आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटनेचं कारण समजतं. 
या पुस्तकाचा दुसरा भाग सांगतो, तुमच्या जीवनाचा उद्देश्य काय? तुमच्या जीवनात घडणार्‍या प्रत्येक गोष्टी तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जातात?
या पुस्तकाचा तिसरा भाग सांगतो की, वर्तमानात जगताना तुमच्या प्रत्येक कार्याचा आनंद कसा घ्यायचा. 
   काही जणांना सकाळी उठून कामाला जायचं जीवावर येतं तर काही जणांना मात्र त्यांचं काम आठवून ऊर्जा येते. कधी एकदा मी माझ्या कार्याला सुरुवात करतो असं होतं... या मागचं रहस्य काय? हे समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवं.
या पुस्तकातील पहिली पाच प्रकरणं आपल्या जीवनात असं का घडतं, यावर प्रकाश टाकतात तर पुढची तीन प्रकरणं, त्यासाठी मी काय करायला हवं ते सांगतात. तर शेवटची दोन प्रकरणं आत्मिक समाधानबरोबरच बाह्य जगातील, भौतिक जगातील सर्व गोष्टी सहजतेने मिळवत घटनांचा आनंद कसा घ्यावा हे सांगतात. यासाठी मार्गक्रमण करत असताना आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे, आपल्या जीवनाकडे, घटनांकडे आपण कसं पाहावं हेही आपल्याला या अनुभवावरून कळून येतं.
या पुस्तकातील काही मुद्दे
📍मी का आहे?
📍जीवनाकडून मिळणाऱ्या संकेतांचा अर्थ
📍 भावनिक युद्ध कसे जिंकाल?
📍 आयुष्यात त्याच त्याच गोष्टी परत का घडतात?
📍 विचारांना पाहण्याची कला

या पुस्तकामुळे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमागील रहस्यांचा उलगडा होईलच, त्याचबरोबर पुस्तकात दिलेल्या सात रहस्यांमुळे आपल्या जीवनाचा उद्देश कळण्यासाठी मदत होईल.

लेखक: मनोज अंबिके
किंमत: १७५/-
Mahesh sakunde

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know