Thursday, December 9, 2021

पुस्तकाचे नांव--मोडेन पण वाकणार नाही

वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
पुस्तक क्रमांक-९४
पुस्तकाचे नांव--मोडेन पण वाकणार नाही
लेखकाचे नांव--व. पु. काळे
प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण आॅक्टोंबर,२०२१ 
एकूण पृष्ठ संख्या-११२
वाङ् मय प्रकार ---कथासंग्रह
मूल्य--१२०₹
📖📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚   
   ९४||पुस्तक परिचय
मोडेन पण वाकणार नाही
लेखक-व.पु.काळे
🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭
' वपु' या दोन अक्षरांनी महाराष्ट्राला परिचित असलेल्या कथामहर्षी वसंत पुरुषोत्तम काळे यांचा वाचकविश्वात स्वतंत्र रसिक चाहता वर्ग आहे.वपुंचे नाव कुणाला माहीत नाही,मात्र त्यांचेविचार अनेकदा आपल्याला व्हाट्सअप,फेसबुकवर,स्टेटसवर गुडमॉर्निंग गुडनाईटच्या संदेशात वाचायला मिळतात.'वपु'म्हणजे शब्दांचे महाल बांधणारे वास्तुविशारद.वपुंचे साहित्य वाचणारा माणुसतर त्यांच्या लिखाणाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही.त्यांचे लिखाण आयुष्याला प्रेरणा देते.अन् मरगळलेल्या मनाला नवी ऊर्जा देते.असे कथानक प्रतिभासंपन्न साहित्यिक व कथाकार व.पु.काळे यांचे आहे

सर्वसामान्य माणसांचे राग, लोभ, मत्सर,प्रेम,करुणा यांचे आविष्कारही साधारण असतात. 
परंतू त्यातीलच काहींचे चेहरे त्यांच्या विक्षिप्त,हेकेखोर,तापट,सडेतोड,
बेडर आणि वास्तव स्वभावाप्रमाणे वागण्यातून ठळक दिसतात. त्यांचा चेहरा आणि मुखवटा एकच असतो. जे हात ते हाय!आणि नाय ते नाय असे काहीजण वागणारेही असतात. त्यांना स्वतंत्र चेहरानसतो.परंतु काही माणसं मात्र वेगळी दिसतात. स्वाभिमान तळहाताच्याफोडाप्रमाणे जपणारी असतात.त्यांची भावना विचार व्यक्त करण्याची पद्धतही सर्वांहून वेगळी असते. स्वाभिमानामुळे स्वता:चे नुकसान झाले तरी हरकत नाय! अशा माणसांना आपण म्हणूनच  विक्षिप्त म्हणतो.
''जगाला विक्षिप्त वाटतील अशा स्वत:च्या एखाद्या महत्त्वकांक्षेपोटी, तसेच एखाद्या मतप्रवाहाच्या पूर्ततेसाठी,हट्टामुळे नामशेष होऊन जाणाऱ्या,पण माघार न घेणाऱ्या अशा विक्षिप्त हेकेखोर तापट सडेतोडपणे भाष्य करणाऱ्या तऱ्हेवाईक इसमांच्या कथा 'मोडेन पण वाकणार नाही'या कथासंग्रहात शब्दमहर्षी आणि लेखणीचे जादुगार कथाकार व.पु.काळे यांनी खास 'पॅटर्न' शैलीत खुमासदारपणे रंगवल्या आहेत.

नामशेष होण्याचा धोका असतानाही माघार न घेणार्‍या बंडखोरव्यक्तींच्या या कथा आपल्या मनात घर करतात.त्यांचा विचारापुढे सार्‍या जगाला झिडकारण्याचं, ठोकरण्याचं धाडस या व्यक्तींमध्ये दिसते.प्रत्येक व्यक्तीचं स्वत:चं असं एक तत्त्वज्ञान असतं.म्हणूनच आपण 'व्यक्ती तितक्या प्रकृती आणि त्यांच्या प्रवृत्ती' असं आपण म्हणतो. हरेक माणसाची जगण्याची पद्धत अजब असते.स्वत:चे नियम, मतप्रणाली असते. मनानं स्विकारलेल्या मतांप्रमाणे माणसं बिनधास्त आयुष्य जगत असतात.वागत असतात. 

"जगाला विक्षिप्त वाटतील अशा आणि स्वताची विशिष्ठ मते असणाऱ्या व व्यक्तीची वेगवेगळ्या तऱ्हा असणाऱ्या व्यक्तींच्या या कथा" पण या सर्व कथाही आपल्याला कुठे तरी अंतर्मुख व्हायला लावतात,हट्ट करताना कुठं थांबावं हे शिकवतात,आपला अहंकार आपल्याला किती आंधळं बनवतात हे शिकवतात.खास वपुंच्या शैलीतले माणसाच्या मनाचा खरा वेद घेणारे हे पुस्तक ज्ञानात आणि विचारात भर घालणारे आहे. 

फाय फाउंडेशनने या संस्थेने आदरणीय वपुंच्या साहित्याची दखल घेऊन अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले होते.महाराष्ट्र शासनाने त्यांचा 'उत्तम लेखक' म्हणून गौरव केला आहे.वपु व्यक्तिंच्या मनाचे अनेक रंग उलगडून दाखवितात.त्याकथांचे रसग्रहण करताना त्यातील पार्टनर, नायक अनेक जणांच्या मनात खोलवर विराजमान झाला आहे. व्यक्तींच्या स्वभावाचा अक्षरठसा मनाला भुरळ घालतो.

'मोडेन पण वाकणार नाही'या कथासंग्रहात आठ कथांची खास मेजवानी रसास्वादासाठी आहे.'सुंभ जळतो,पीळ उरतो'या कथेत धाकटा कार्यालयात काम करताना दररोज वेळत उपस्थित असतो.पण एके दिवशी लेटमार्क पडतो.त्यामुळे तो बैचेन होऊन,बॉसला सवलतदेण्याची विनंती करतो.पण एकदाच तर लेटमार्क पडलाय म्हणून बॉस नकार देतो.यामुळे धाकटा लेटमार्क पुसण्याच्या हट्टापायीकार्यालयासमोर उपोषणाला बसतो.त्यातच त्याचा २१व्या अंत होतो.त्याचे कुटुंब प्रामाणिकपणे जगत असते.मित्राने लेखकाला ऐकविलेली ही कथा दोन भावांच्या पैलूंचा उलगडा करणारी आहे.अप्रतिम विचार अधोरेखित या कथेतून प्रकर्षाने जाणवतो.
"नको असताना घरात येणारा पैसा विषय असतो.आता मी दारिद्रय पचवले आहे; तेव्हा असा पैसा नको.माणूस मरणाला भितो,कारण नंतरचा प्रवास माहित नसतो. दारिद्याचं पण तसचं.पण दारिद्रय कसं उपभोगायचं हे मला आणि तुमच्या पुतण्याला चांगलंसमजलंय."

हेकेखोर आणि पाहिजे ते मिळविण्यासाठी माणूस कोणती पायरी गाठतो.हेतू साध्य करण्यासाठी जंग जंग पछाडतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे 'निगेटिव्हज'ही कथा होय. अप्रतिम अक्षरवैभवात ही कथा साकारली आहे."जे घडून गेलं ते बरं वाटलं. वाटत होतं म्हणून घडलं.मी घडू दिलं.त्यावर आता चर्चा नको. त्यातली रंगत नाहीशी होत आहे."

एकेकाळचे दोन मित्र पण हल्ली दुरावा आलेल्या मित्रांची कथा. एकानं नकार दिलेल्या मुलीशी त्याच मित्रांचे लग्न ठरते.आणि साक्षीदार हा मित्रच असतो.काहीवेळा सगळं खरं सांगितलं की अडचण अशी येते.ती व्यक्त होणारी 'पंगू'कथा."मोह मला एकट्यालाच नाही झाला, तिलाही झाला.तरी तू बोलणार असलास तर मी म्हणेन की,ज्या माणसाला पावसात भिजायची हौस आहे, त्यानं नंतर होणारी सर्दी भोगायलाच हवी."
"मोहापुढे वाकायची वेळ आली तेव्हा वाकलो, असं सांगणारा पुरुष मला भेटला आज.त्याच्या जवळ लपवालपवी नाही.पड्विकारांच्या बलवत्तर शक्तीपुढं माणूस पंगू बनतो हे तो जाणतोय, आणि म्हणूनच त्याच्याजवळ क्षमा करण्याची अमाप आहे.तुम्ही मला नकार दिलात तेच चांगलं झालं.त्यामुळे तुम्ही मनानं पंगू आहात हे मला समजलं.

शहरातील फुटपाथवर वस्तू विक्री करणाऱ्या परराज्यातील पंकज नावाच्या मुलाची ही एक हृदयस्पर्शी कथा'पराधीन आहे जगती.'तो वस्तू गिऱ्हाईकाने खरेदी करावी म्हणून मोठ्याने आरोळीदेत जाहिरात करत असतो.त्या आवाजाने कृष्णाजीपंत गाडगीळ यांचे पित्त खवळत असते. त्या कोलाहलाने ते अस्वस्थ होतात. त्याच्यावर डाफरतात, चिडतात. त्यादिवसापासून मन:शांतीला नवा सुरुंग लागतो.त्यामुळे केजी पंकज तिथून हलावा म्हणून अनेक अडसर पंकज भोवती निर्माण करतात.पण तोच त्यांच्यावर परोपकार करत असतो.त्यांच्या पत्नीला सरोजिनीबाईंना हरेक कामात तोच मदत करत असतो. त्यामुळे सगळेच त्याला घरातील मानायला लागतात. पण केजी नेहमीच त्याचा दुश्वास करतात. कृष्णाजीपंत कामानिमित्त बाहेरगावी गेल्यावर तिथेच केजींचा मुक्काम वाढत जातो.इकडं तर पावसाने घराचे छप्पर गळायला लागते.त्यामुळे ते पंकजच्या पैशातून सरोजिनीबाई दुरुस्त करुन घेतात. त्याबदली घराच्या व्हरांड्यात एका कोपऱ्यात 'पंकज स्टोअर्स'सुरु होते.हे दृश्य केजींनी बघितल्यावर त्यांचा जळफळाट होतो.ते अस्वस्थ होतात.तेव्हा हाच पंकज धावत जाऊन डॉक्टरांना घेऊन येतो.तरीही केजी त्याचा सतत पाणउतारा करत असतात. त्याच्या उपकाराची परतफेड करण्याचा प्रयत्न करत असतात.

पंकजचे एक छान वाक्य आहे. "माताजी,दिलसे दिलं दिया तो हम जान देते है, और दुष्मनके बारेमें उनकी जान देते है."शेवटी कुटूंबातील सर्वांना उद्देशून केजी  म्हणतात,"जातो मी. पाहताय् काय असं? मूक स्तंभांनो,सामान द्या माझं मला.हे घर माझं राह्यलं नाही.ह्या फूटपाथवरच्या माणसानं माझ्यावर छत्र धरावं! मला इथं झोप यायची नाही.ह्या पोराकडे गहाण पडायला मी तयार नाही.मी कायमचा जातो.'' आता नुसती तगमग! न संपणारी तगमग! थांबवता न येणाऱ्या  कोलाहलात आणखी एकाची भर. सुंदर शब्दातील ही कथा वाचताना आपणास भावनांचे मोहोळ चेतवित राहते.

गरीबीतही सुखाचा संसार करणारी स्वाभिमानी माणसं असतात.ती माणसं कधीच कुणाच्या उपकारावर जगत नाहीत.आहेत त्यात समाधानी राहून पुढे वाटचाल करीत असतात.
पण काही पैश्यांने सारं काही मिळतं याच घमेंडीत राहणारेही काही चेहरे असतात.त्यांचा बुरखा कधी पाडेल यांचा नेम नसतो. 'खेळणी' कथेतून सरोज-माधव या जोडप्याचा स्वाभिमान आणि बाणेदारपणा सुंदर शब्दात मांडलेला आहे.खरचं पैसा म्हणजे सर्वस्व नाही याचा उलगडा छानच अक्षरवैभवात उभारला आहे. "माझं एक मन त्या बाणेदारपणाचं कौतुक करायला लागलं,तर दुसरं मन माझ्या बाणेदारपणाला आव्हान देऊ लागलं,की हाच बाणेदारपणा तुला जिंकायचा आहे.सरोजचं ते हत्यार होतं.मला ते बोथट करायचं होतं.त्याला जालीम उपाय एकच होता,पैसा!!!

कॉलेजलाईफ मधील प्रेममय घटना प्रसंगातून उलगडत जाणारी 'जलधारा' ही कहाणी रमेश आणि मंदा यांची बिनधास्त आयुष्य कसं जगावे.याची ओळख करून देतात. सुरेख वर्णन समर्थपणे समर्पक शब्दांत केले आहे. तसेच नात्यातील ऋणानुबंध जपणाऱ्या विक्षिप्त व हेकेखोर व्यक्तिंची शब्दचित्रे 'पाळणा'या कथेतून व्यक्त केली आहे.

तर 'पपा'या कथेतून लक्षाधीश असणाऱ्या नानासाहेब देशमुख यांचा जीवनवृत्तांत मांडलेला आहे. जन्मदात्या आई-बापाबद्दलमुलाला अपत्याला जे वाटते.त्याला वात्सल्य म्हणायचं हे खरंच प्रथम कोणी ठरवलं असेल?
त्यांची छोटीशी इच्छा अपुरी राहिली होती.पपा म्हणून हाक मारण्याची.. 'पपा'या शब्दाचा अर्थ सांगण्याचा छान प्रयत्न या कथेतून समजत जातो.भावस्पर्शी हृदयस्पर्शी कथा वाचताना सहृदयता निर्माण होते. अनाथालयात, आश्रमात वाढणाऱ्या मुलीला अठरा वर्षांत एक गृहस्थ वडील या नात्याने भेटतो.आणि काहीही विचार म्हणतो…..एक हृदयस्पर्शी आणि त्यागी पित्याची ही कथा आहे….

प्रत्येकानं जरूर वाचावा असाच कथासंग्रह आहे.अप्रतिम 'मोडेन पण वाकणार नाही' विक्षिप्त, बंडखोर, बाणेदार आणि स्वाभिमानी व्यक्तींची शब्दचित्रं लेखणीने अप्रतिम रेखाटली आहेत.आदरणीय कथाकार आणि वपूर्झाकार व.पु. काळे यांच्या लेखणीस त्रिवार वंदन!!!!

परिचय कर्ता-रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
लेखन दिनांक- २ डिसेंबर २०२१
*****************************************

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know