Thursday, December 9, 2021

पुस्तकाचे नांव--भीमपर्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्रस्मृतीस विनम्र अभिवादन!!

वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
पुस्तक क्रमांक-९३
पुस्तकाचे नांव--भीमपर्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
लेखकाचे नांव--शांताराम शंकर रेगे
प्रकाशक-सुगावा प्रकाशन,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथमावृत्ती १४एप्रिल १९९१
एकूण पृष्ठ संख्या-१००
वाड्मय प्रकार---ललित आत्मचित्र
मूल्य--३०₹
📖📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚

९३||पुस्तक परिचय 

               भीमपर्व
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
लेखक: शांताराम शंकर रेगे

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

एकोणिसशे वीस सालापासून तब्बल छत्तीस वर्षे आपल्या वाणी अन् विचाराने आणि व्यवहाराने भारतीय समाजकारणात आणि राजकारणात सातत्याने वादळे उठविणारे, प्रदीर्घकाळ व अविवाद्यपणे समाजाला जागृत करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणारे एकमेव नेते.. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी,'शिका,संघर्ष करा आणि संघटित वर्मा! 'हा प्रेरक मंत्र आपल्या समाजबांधवांना दिला... अशा आदरणीय  ज्ञानोपासक विचारवंत व तत्त्वज्ञ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरयांच्या अलौकिक कार्याचा ग्रंथ,'भीमपर्व' आहे.

कर्तृत्वाच्या उज्ज्वल आणि दैदिप्यमान कालखंडात त्यांनी भारतीय राजकारणात आणि समाजातील व  सार्वजनिक जीवनात आपल्या प्रकांड पांडित्याने, परखड वाक् चातुर्याने आणि धीरगंभीर व्यक्तिमत्त्वाने आपला विलक्षण दरारा प्रस्थापित केला होता..

"भारतीय घटनेचे शिल्पकार, मंत्रिमंडळाचे सदस्य, राज्यसभेचे सदस्य, उच्चविद्या विभूषित,एक महान समाजसुधारक,मानवी हक्कांची आधारस्तंभ असणारी  पराक्रमी व्यक्तीभारतीय नागरिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर."असे कोलंबिया विद्यापीठाने बहुमानाची 'डॉक्टर आॅफ लॉज्'पदवी वितरणावेळी बाबासाहेबांचे केलेले मूल्यमापन अलौकिक आणि यथार्थ आहे.

'सिम्बाॅल आॅफ नॉलेज'म्हणून विश्वविख्यात लौकिक असलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथप्रेमाचा इतिहास 'भीमपर्व ' या ग्रंथात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभलेले सिध्दार्थ महाविद्यालय, मुंबईचे ग्रंथपाल श्री शांताराम शंकर रेगे यांनी १४ एप्रिल १९९१ या जन्मशताब्दी वर्षानिमित्त  या ग्रंथाचे प्रकाशन केले.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे परमस्नेही म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत पर्यंत जवळीक साधली,त्या ग्रंथांच्या विश्वाची ज्ञानवैभवाची राजगृहाची अपूर्वाई अप्रतिम शब्दांकनात मांडली आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथप्रेमाची आणि ग्रंथवेडाची परिसीमा म्हणजे या समृद्ध आणि प्राणप्रिय ग्रंथालयासाठी मुद्दाम उभारलेले 'राजगृह'.त्यांनी समाजासाठी आणि देशहितासाठी केलेले प्रत्येक कार्य भव्य,अपूर्व आणि संस्मरणीय होते. सर्वोच्च शिक्षणातील प्राविण्य, दलितोध्दाराची चळवळ भारताची राज्यघटना आणि बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन ह्या त्यांच्या उत्तुंग चतुरस्त्र कर्तृत्वाचे मूल्यमापन केले तरी त्यांच्या प्रभावाच्या विशाल व्यापतीची जाणीव होऊ शकते. त्यांचे 'राजगृह' आकर्षक व सर्वार्थाने अद्वितीय होते.ते आपल्या अनमोल आणि सर्वस्पर्शी ग्रंथांसाठी खास बांधलेले होते.सहज, सुंदर,सोप्या व प्रवाही शैलीत तेरा लेखमालिकांचा 'भीमपर्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर'हा अनमोल ग्रंथ लेखक शांताराम शंकर रेगे यांनी साकारला आहे.

या ग्रंथाचे लेखक श्री शांताराम शंकर रेगे हे सिध्दार्थ महाविद्यालय मुंबई येथे ग्रंथपाल सेवेत कार्यरत होते. सेवेत रुजू होण्याचा मंगलदिनी होता.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिनी १४एप्रिल सन १९४६.ते ३५ वर्षांची सेवा करुन जून १९८१साली सेवानिवृत्त झाले. ते १९४६ ते १९५६ अशा अकरा वर्षाच्या कालखंडात मंतरलेले दिवस असे संबोधतात.कारण याच काळात त्यांना बाबासाहेबांचा सहवास लाभला.कारण नुकत्याच स्थापन होणाऱ्या सिध्दार्थ महाविद्यालय या कॉलेजच्या कारभारावर त्यांचे सर्वत्र लक्ष होते. हे त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील पहिले पाऊल.ही आदर्श शिक्षणसंस्था निर्माण करणे हे त्यांचे स्वप्न होते.ते साकार करण्यासाठी बाबासाहेब सतत महाविद्यालयात येत असत.
लेखक शांताराम शंकर रेगे बाॅम्बे लायब्ररी असोसिएशन माजी संचालक,ग्रंथपालन पदविका वर्गाचे सदस्य.पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे संचालक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समग्र साहित्य प्रकाशन समितीचे सदस्य आणि ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स या संस्थेचे रजिस्ट्रार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (अमर चित्र कथा)या पुस्तकाचे लेखक, कथाकार आणि भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे अनुवादक आहेत.तसेच आकाशवाणी व दूरदर्शनवर व्याख्यान व परिसंवाद सहभागी झाले असून त्यांनी वृत्तपत्रे व नियतकालिके ह्यात साहित्य व्यक्तिचित्रण आणि ग्रंथपालन विषयक विपुल लेखन केले आहे.हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निष्ठावंत सहकारी कमलकांत चित्रे, मनोहर चिटणीस आणि 'बी'कद्रेकर यांना अर्पण केला आहे.

बाबासाहेबांच्या ग्रंथसानिध्यातील अनेकाविध  आठवणींच्या स्मृतींचा ठेवा'भीमपर्व' या ग्रंथात वाचायला उपलब्ध करून दिलेला आहे. पुस्तकांच्या नित्य निकटतम साहचर्य यासाठी सदैव तळमळणारे बाबासाहेब.व्यावहारिक धनापेक्षा विचारवंतांना मोलाचे श्रेष्ठत्व बहाल करणारे बाबासाहेब. त्यांचे अनेक पैलू उलगडून दाखवले आहेत.या ग्रंथात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल १९६१ते १९९० सालात नियतकालिकातून प्रकाशित झालेल्या लेखांचा समावेश या ग्रंथात केला आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी राजगृह उभारले.त्या वास्तुच्या परिसरात ज्ञानसमाधी लाभती.तीच ही पवित्र 'आळंदी!' ज्या वास्तूवर महात्म्याच्या देहाचे अखेरचे दर्शन झाले तेच हे 'देहू!' जिथे गेली अनेक वर्षे जयंतीच्या दिवशी दिंड्या जातात.आणि ज्ञानमंदिराचे पवित्र दर्शन घेत असतात तीच खरी 'पंढरी!'आपल्या असंख्य भक्तांना स्फूर्ती , समाधान आणि पावित्र्याचा लाभ देणारे हेच खरे तीर्थक्षेत्र…"प्रज्ञा,शील आणि करुणेचे" श्रध्दास्थान. विद्याउपासक महामानवाने अगाध ग्रंथसंग्रह जमविला त्याच्या ज्ञानलालसेचे , हौसेचे आणि वैचित्र्यपूर्ण व्यासंगाचे पहिले- वहिले दुर्मिळ संग्रहालय दीपस्तंभ व अनमोल ठेवा आहे.

या ग्रंथात तेरा लेखमालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथप्रेम, ग्रंथलेखन,राजकीय आणि शैक्षणिक कार्य या पैलूंचे दर्शन घडवितात. ग्रंथलेखक शांताराम शंकर रेगे यांना बाबासाहेबांचा लाभलेल्या सहवासामुळे त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलूंचे त्यांनी  सुक्ष्मनिरीक्षणाने बारकाईने यथार्थ वर्णन केले आहे.ती वाचताना नवीन माहिती समजतजाते. त्यांनी आपल्या जीवनात प्रत्येक कार्य भव्य दिव्य,अपूर्व आणि संस्मरणीयकेलेले आहे.

बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथालयात सुमारे बावीस हजार ग्रंथ होते.ते ज्ञानाच्या सर्व कक्षांशी निगडित होते.सर्वंच विषयांचे ग्रंथ होते.विश्वव्यापी आणि त्रिकाल ज्ञानाचे भांडारच होते.बहुतांश ग्रंथ इंग्रजी असलेतरी संस्कृत, हिंदी, मराठी,उर्दू,पर्शियन भाषेतील दर्जेदार आणि उपयुक्त वाड़्मयही त्यांच्या ग्रंथालयात होते. प्रत्येक ग्रंथाला बाबासाहेबांचा सहवास आणि स्पर्श झालेला आहे.ते ग्रंथ लेखकास हातात घेतल्याचे सद्भाग्य लाभले. 'राजगृह' ग्रंथालय उभारणी आणि ग्रंथ खरेदी कशी केली ?पुस्तकांची काळजी व निगा कशी घेत?आदी माहिती लेखकांनी प्रवाही शब्दात मांडली आहे. बाबासाहेबांचे ग्रंथप्रेम वाचून आपण खरोखरच भावनाविवश होतो.तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विपुल ग्रंथसंपदा प्रकाशित झाली आहे. एकोणीस ग्रंथ आणि दहा पुस्तिका प्रकाशित झालेल्या आहेत.

दलित मागासवर्गीय व आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणाला वंचित झालेल्या विद्यार्थ्यांना आदर्श उच्च शिक्षण सुलभ उपलब्ध करून देण्यासाठी 'पीपल्स एज्युकेशन सोसायटीची' स्थापना केली.संस्थेची बालमंदिर ते उच्चमहाविद्यालय स्तरापर्यंत ज्ञानसंस्था आहेत.
'भीमपर्व'या ग्रंथातील अनेक घटनाप्रसंग वाचताना त्यांतील वेचक वेधक वेचे मनाला स्पर्शून जातात. आणि हृदयाच्या गाभाऱ्यात संचित होत जातात.अशा ज्ञानधनी, क्रांतिसूर्य विद्याव्यासंगी, महानायक उच्चविद्याविभूषित, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथप्रेमास त्रिवार वंदन!! आणि हृदयस्थ अभिवादन!!!! 

श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई

लेखन दिनांक १७नोव्हेंबर २०२१
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know