Thursday, December 9, 2021

पुस्तकाचे नांव--आत्मप्रेरणा

वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
 परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
पुस्तक क्रमांक-८७
पुस्तकाचे नांव--आत्मप्रेरणा
लेखकाचे नांव--लक्ष्मण जगताप
प्रकाशक-परिस पब्लिकेशन्स, सासवड
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-फेब्रुवारी २०२०
एकूण पृष्ठ संख्या-१५२
वाड्मय प्रकार --ललित
मूल्य--१६०₹

📖📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚

  ८७||पुस्तक परिचय
       आत्मप्रेरणा
लेखक:लक्ष्मण जगताप

#############################

वाचनयात्री पुरस्काराने सन्मानित झालेले लेखक गणेश तांबे, फलटण यांनी वाचन साखळी समूहातील सदस्य शिक्षक मित्रवर्य लेखक लक्ष्मण जगताप लिखित 'आत्मप्रेरणा' पुस्तकाचा परिचय माहे डिसेंबर २०२०मध्ये करून दिलेला होता.तो परिचय वाचून पुस्तक वाचण्याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती.

तदनंतर माझ्या मुलाचे लग्न २७ डिसेंबर ला छोटेखानी समारंभात आयोजित केले होते.लग्नसमारंभात उपस्थित शिक्षकमित्रपाहुणे व निमंत्रितांचे स्वागत शाल-बुके ऐवजी बुक (पुस्तकं) देऊन करण्याचामानस होता.म्हणून गणेश तांबे सरांमार्फत लेखक जगताप सरांनी संपर्क साधून संवाद साधला.पुस्तके देण्याची विनंती केली.त्यांनी त्वरीत तांबे सरांकडे पाठविली.त्याच्याकडून आत्मप्रेरणा पुस्तकाच्या आवृत्या घेऊन,आणि इतर नामवंत लेखकांची मिळून एकंदर ७५ पुस्तकांची सन्मानाने लग्नप्रित्यर्थ पुस्तकभेट उपस्थित सन्माननिय स्नेहीजण व पाहुण्यांना दिली.त्यामुळे 'आत्मप्रेरणा'या पुस्तकाशी आमच्या संपूर्ण कुटूंबियांचा भावनिकओलावा आहे.ऋणानुबंध जुळले आहेत. म्हणूनच आदरणीय लेखक सन्मित्र लक्ष्मण जगताप लिखित 'आत्मप्रेरणा' या पुस्तकाचा परिचय करून देणं,माझं परम कर्तव्य आहे.  परंतु माझ्याकडे एकही आवृत्ती उपलब्ध नव्हती.
योगायोगाने १०नोव्हेंबर २०२१ मध्ये धार्मिक कार्यक्रमाचे निमित्ताने फलटणला गेलो होतो.लेखक राजेंद्र वाकडे यांचीही अचानक भेट झाली. त्यावेळी आमचे परमस्नेही वाचकयात्री श्री गणेश तांबे यांनी घरी नेऊन आदरातिथ्य केले.गप्पांची मैफिल रंगली.तदनंतर निरोप घेताना सरांनी प्रेमाने मला शाल व श्रीफळ दिले.आणि पुस्तक भेट देताना नकळतपणे मी बोलून गेलो. 'सर , आत्मप्रेरणा पुस्तक असेल तर द्या, किंवा उपलब्ध करून पाठवून द्या.' त्वरीत सरांनी त्यांच्या सेल्फमध्ये शोधायला सुरुवात केली.अन्  हवे ते पुस्तक गवसले. ते मला आठवण म्हणून सरांनी भेट दिले.आणि परिचयासाठी मला 'आत्मप्रेरणा' पुस्तक मिळाले.
लेखक लक्ष्मण जगताप हे पेशाने शिक्षक असून वाचन संस्कृती रुजविण्यासाठी,अभिरुची वाढविण्याचे कार्य करणाऱ्या 'वाचनसाखळी' फेसबुक समूहाचे सदस्य आहेत.त्यांचा लेखन हा व्यासंग आहे. महाराष्ट्रातील नामवंत दैनिक सकाळमध्ये त्यांनी विपुल लेखन केले आहे.विशेषतः दैनिक सकाळमधील मुक्तपीठ, आधारवड, मोकळे व्हा आणि गुदगुल्या आदी सदरामध्ये त्यांनी लेखन केले आहे.
औरंगाबाद येथील जीवन गौरव सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंध लेखनाचा पुरस्कार प्रदान करणेत आला होता.तसेचपावनभूमी चॅरिटेबल ट्रस्ट, डोंबिवली यांनी सामाजिक कार्याबद्दल 'समाज सेवा' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.बारामती येथे संपन्न झालेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य संमेलनात'आत्मप्रेरणा'पुस्तकास उत्कृष्ट ललित साहित्य सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सुप्रसिद्ध कवी हनुमंत चांदगुडे, लेखक व संपादक दैनिक सकाळचे (यिनबझ) संदीप काळे आणि मान्यवरांच्या शुभहस्ते बारामती येथे संपन्न झाला होता.
लक्ष्मण जगताप यांनी लिहिलेलं 'आत्मप्रेरणा'हे पुस्तक मागण्यांचे मांगल्य आहे.दुसऱ्याला सतत काहीतरी देण्याची वृत्ती जेव्हा बळावते. तेव्हा माणसाची खऱ्या अर्थाने चांगुलपणाकडे वाटचाल सुरू झालेली असते. जगताप यांनी आपल्या या पुस्तकाच्या माध्यमातून सामाजिक ऋण फेडण्याचं काम केलय.प्रत्येक लेखात त्यांनी नव्यापिढीला आपला अनुभव आणि चांगुलपणा देण्यात कोणतीही कसर सोडली नाही.व्यक्तिमत्त्व विकास आणि संस्कार किती महत्त्वाचे असतात,यासाठी या पुस्तकाच्या माध्यमातून व्यक्त झालेले विचार प्रेरणादायी ठरतीलच.हे पुस्तक तरुणाईसाठी आणि विशेष करून शालेय मुलांसाठी महत्त्वाचे ठरणारआहे. त्यांनी जागल्याची भूमिका पार पाडली आहे.

जसे दुसऱ्यांच्या कल्याणासाठी सतत मागणी करणारे कैवल्याचे मांगल्य संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आजही जगताप यांच्यासारख्या शिक्षकांमध्ये आपले काही अंश ठेवून जातात. अशाच देणेकरांच्या भावनेतून हे पुस्तक साकारलय."

अशा अप्रतिम शब्दांत लेखक व संपादक श्री संदीप काळे यांनी प्रस्तावना दिली आहे.ती वाचतानाच पुस्तकाची आशयगर्भता लक्षात येते.

मराठी साहित्याची सेवा करणारे अनेक नवे लेखक अन् कवी येत आहेत.पण त्यांचे लिखाण कथा, कादंबरी आणि कविता याच भोवती सिमीत असते.लक्ष्मण जगताप सरांसारखे फार कमी असे लेखक आहेत,की जे वैचारिकदृष्ट्या काहीतरी सकस आणि दर्जेदार लिहिण्यासाठी पुढं येतात.नव्याने बदल घडावा या भावनेने लिहितात. संत ज्ञानेश्वर- तुकोबा यांच्यापासून चालत आलेल्या तत्वज्ञान आणि व्यक्तिमत्त्व विकासाची कल्पना व परिभाषा अशीच पुढे स्वामी  विवेकानंद ते भारत रत्न डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या पर्यत एक सुसंस्कारीत व वैचारिक पायंडा पडला आहे.तरुणाईला त्यांच्या स्वप्नांची पुर्ती करण्यासाठी त्यांचे पुस्तक आदर्श पथदर्शक आहे.याचा प्रत्येक पुस्तकाचा आनंद घेताना लक्षात येते.तसेच हा पुस्तकातील प्रकरणे वाचत असताना त्यातील विचार आणि कृतीयुक्त अनुभव मनाला स्पर्शून जातात.असे प्रोत्साहनात्मक पुस्तके देणारे लेखक विरळेच असतात.  

'आत्मप्रेरणा'पुस्तकास शुभेच्छा देताना प्रसिद्ध लेखक उमेश मोहिते म्हणतात की,"या पुस्तकातील लेख उमलत्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी दिशा-दिग्दर्शन करण्याच्या हेतूने लिहिलेले आहेत. पालकांचे वैचारिक मंथन या लेख वाचनातून होईल.उद्याचे विश्वाचे आधारस्तंभ वाढत्या वयात वास्तवाच्या कोलाहलात निराश होऊन कोमेजून न जाता चारित्र्यवान व गुणसंपन्न व्हावीत.भावी पिढीचे भविष्य प्रकाशमान व्हावे ,हीच लेखकाची खरी तळमळ आहे.

"ध्येयाप्रती पोहोचण्याची प्रबळ भूक आणि मनाची शक्ती तुमच्याबरोबर असल्यास या विश्वात तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. जीवनाची उत्कर्ष करण्याची आस असलेल्या प्रत्येक मुलाला उपयोगी पडते,ती फक्त आत्मप्रेरणा, मनगटातील ताकद आणि अपयशाला तुडवत यशाचा रस्ता धुंडाळण्याची शक्ती,आकाशाला गवसणी घालण्याची जिद्द. आजच्या तरुणाईवर माझा खूप विश्वास आहे. फक्त त्यांना प्रोत्साहन आणि प्रेरणेचीखऱ्या अर्थाने गरज आहे.म्हणूनच लेखनप्रपंच मांडला आहे." असे मनोगतात या पुस्तकाचे लेखक लक्ष्मण जगताप तळमळीने व्यक्त होतात. 

'आत्मप्रेरणा'यापुस्तकात एकूण ३९लेखआहेत.प्रत्येक लेख विचारांचा वास्तूपाठ आहे.लेखाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या लेखातील आशययचे सार चौकटीत अधोरेखित केले आहेत.विचार ,सुविचार आणि उदाहरण देऊन लेखाची सहज सुंदर सोप्या ओघवत्या शैलीत समजून देण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. याची प्रचिती पानोपानी चाळताना लक्षात येते. त्याच लेखमालिकेतील वैचारिक अमृतकुंभातील आशयगर्भता प्रस्तुत करणारी रचना केली आहे. वैचारिक शब्दसागर काव्यरचनेत गुंफण्याचा प्रयत्न केलाय...

         आत्मप्रेरणा

शब्दांच्या गोडव्याने परीघ ओळखत
मनमोकळा निर्भेळ संवाद साधूया
आत्मप्रेरणेने जिगरीचे झरे शोधत
व्यक्तीमत्त्वाचा विकास साधूया…

तरुणाईत चांगुलपणा शोधण्याची
त्यांच्या स्वप्नांनासत्यातउतरविण्याची
कष्टाच्या पूजेने गगनभरारी घेण्याची
कौतुकाने प्रोत्साहन व प्रेरणा देण्याची…

राग तुलना अहंकाराला द्या मूठमाती
प्रेमळ वर्तनाने बनतील सुखाची नाती
सकारात्मक विचारांची पेरुया भक्ती
सुयशाला प्रयत्नांची इच्छाशक्ती……

मुलांची सातत्यपूर्ण सर्वांगीण  गुणवत्ता
आकड्यांच्या फूटपट्टीने मापू नका 
आवडीच्या क्षेत्रात करीअर करायला 
त्यांच्या पंखात आत्मप्रेरणेचे बळ द्या…

सगळेच लेख वाचनिय आहेत. शब्दबंबाळ करणाऱ्या संज्ञा, आकलनापलीकडील कठीण शब्द आणि जीवनाचे तत्त्वज्ञान सहज सोप्या भाषेत उलगडून दाखवले आहे.रसाळ मधाळ भाषेतील लेख वाचताना बोजडपणा जाणवत नाही. शिषर्काशी समरसता साधणारा घटक त्याचे सुंदर स्वरुपात विवेचन. सोप्या शब्दात अर्थ उलगडण्याची पध्दत छानच आहे.यातील संस्मरणे, वेचे,कोटेशन्स विचारचक्रच फिरवितात. मंथन करायला प्रवृत्त करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यातील गुणदोषांचा उलगडा होतो.मग सकारात्मकता कशी निर्माण करावी.याची माहिती यातील लेखांचा रसास्वाद घेताना लक्षात येते.याच लेखातील वेगळेपणा आणि पालक शिक्षक आणि बालकांना विचार करायला प्रवृत्त करणारी काही वेचे,सुविचारमौक्तिके आणि शब्दअमृत...
'आपल्या क्षमता व कौशल्य जगापुढे मांडण्यासाठी तुम्हाला आत्मप्रेरणाच उपयोगी ठरते.आपल्या मनात दडलेली प्रचंड शक्ती आणि ऊर्जा आपल्याला घडवत असते.'

'शालेय वयात मुलांना खऱ्या मानसिक आधाराची गरज असते. आपण सगळ्यांनाच गुणदोषाच्या तराजूत तोलत असतो.चांगले काय, वाईट काय हे लवकर त्यांच्या लक्षात येत नाही.त्याची जाणीव आपल्याला करुन द्यावी लागते. माणसातील चांगुलपणा आधी पहावा मग दोष, कारण चांगुलपणा पाहिल्याने तो माणूस आपल्याला आवडायला लागतो. विचारांची बैठक कळते.मैत्री निर्माण होते.आणि त्यातूनच स्नेहाची आपुलकी निर्माण होते.' 

'जशी दृष्टी तशी सृष्टी'अतिशय अर्थगर्भित असा उपदेशात्मक सुविचार आहे.चांगल्या नजरेने आणि निर्मळ भावनेने जगाकडे बघितले तर जग निश्र्चितच चांगले वाटते.आणि प्रत्येक माणूसहीचांगला वाटू लागतो.'अप्रतिम भावविभोरता या विचारात सामावली आहे.

'सुंदर अक्षर हा दागिना आहे.'हा विचार सापेक्षपणे व्यक्त करणारा हा लेख आहे.हस्ताक्षर म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे.ते तपासण्याचा हा लेख.
माणसाचा स्वभाव हस्ताक्षरावरुन कसा असेल?याची प्रचिती हा लेख वाचताना येतो.
'कोणतेही काम करताना मनावरील दडपण आणि भीती झुगारून टाकली पाहिजे.मग आपल्यात सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत तयार होतो.जो शेवटपर्यंत आपल्याला पूर्णत्वाकडे आणि यशाकडे घेऊन जातो.धावण्याच्या शर्यतीत धावणारे स्पर्धेत अंतिम रेषेपर्यंत मी जिंकणारच असे मनाला वारंवार सांगून, शेवटच्या क्षणाला विजयश्री खेचून आणतात.ते शक्तीशाली मनामुळेच…' 

आपले मन प्रसन्न आणि आनंदी ठेवायचे असेल तर सतत सकारात्मक विचारांचे चिंतन केले पाहिजे.आपले मनच आपल्यासाठी शक्तीशाली आणि प्रेरणादायी असते. अशक्य गोष्ट शक्य करण्याची किमया आपल्या मनात असते. म्हणनूच म्हणतात की,'' इतनी शक्ती हमे देना दाता,मन का विश्वास कमजोर हो ना.'' मनाची शक्तीच आपली कायापालट करु शकते.

 तुम्हाला यश मिळविण्यासाठी कष्टाची पूजा कशी घालावी.कोणत्या पथावरुन मार्गक्रमण करीत जावे. भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल  कलाम विद्यार्थ्यांना संदेश देताना म्हणतात त्याप्रमाणे,"झोपेत पडतात ती स्वप्ने नव्हेत. तुम्हाला झोपूच देत नाहीत ती खरी स्वप्ने.'' स्वप्नांचा पाठलाग करा, कष्टाशिवाय पर्याय नाही.जबाबदारी खांद्यावर घ्या. इतरांना संगतीला घ्या.त्यांच्या गुणांची व कल्पनांची कदर करा. नावीन्यतेने आणि सर्जनशीलतेने नवर्या कल्पनांना जन्म द्या.यासाठी मळलेल्या वाटेने न जाता वेगळी तुमची वाट तयार करा.स्वप्न सत्यात उतरुन तुम्ही यनस्वी व्हाल!"

संवाद-संभाषण कौशल्य म्हणजे बोलण्यातून समोरच्या व्यक्तीच्या अंत:करणात प्रवेश करण्याचेप्रभावी माध्यम म्हणजे संवाद.नातील विचार प्रकट करण्याचे माध्यम 

"ईश्वराने माणसाला जीभ दिली, त्या जिभेची दोन कार्ये असतात.एक ताटातले अन्न पोटात टाकणे आणि दुसरे पोटातले शब्द ओठातून बाहेर टाकणे.संवादातील शब्दांना मांगल्याचा स्पर्श असेल तर शब्दांची ओवी होते.पण त्या शब्दांना क्रौर्याचा स्पर्श असेल तर त्या शब्दांची शिवी होते.आपण ठरवायचे ओवी गायची की शिवी द्यायची.लागट बोलायचे की लगट करायचे.संवाद माणसांना जिंकण्याची, हरलेल्या माणसांना उभारी देण्याची कला आहे.बोचरे जीवन हसरे करण्याची किमया संवादातूनच साधता येते.संंवादातील कटुता शक्यतो टाळून, गोडवा जपला तर हृदयाहृदय एक होतात नि तिथेच मग जगणे एक आनंदाचे गाणं होतं."

प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे जेष्ठ विचारवंत सातारा यांच्या 'चंदनाचे हात'या पुस्तकातील संवाद कौशल्य पहिला प्रभाव..संभाषण' या लेखातील वरील विचारांची  आठवण येते.
जगतगुरु संत तुकोबाराय शब्दालाच देव मानतात..' शब्दां नाही धीर| ज्याची बुद्धी नाही स्थिर| त्याचे न व्हावे दर्शन|
'शब्दांच्या दुनियेत'हीशब्दमाला म्हणजे शब्दरुपी गंधित फुलांची परडीच वाटते.धीराचा एकच शब्द आयुष्याला उभारी देतो.शब्दांची उत्तम किमया या लेखातून स्पष्ट होते.शब्दार्थ आणि उच्चारण यांचा सुंदर मेळ घातला आहे.शब्दांचे मधाळ निवेदन सोहळ्याचा मंत्रमुग्ध माहोल बनविते.म्हणूनच म्हणतात की,'शब्द हे शस्त्र आहे.'जपून वापरा. .. कारण शस्त्राने अंगावर जखम होते.पण शब्दाने मनावर घाव बसतो. अंगावरची जखम बरी होते.पण मनाची जखम काळजात शिरून भळभळत राहते.यास्तव प्रेमळ शब्दांनी दुसऱ्याच्या हृदयात अढळस्थान मिळविता येते..

"मनमोकळ्या गप्पा मारल्याने मन मोकळे होते. गैरसमजुतीतून काही गोष्टी झाल्या असतील तर एकमेकांना समजतात.चर्चा हे माणसं जवळ आणण्याचे खूप मोठं माध्यम आहे. समर्थक साधकबाधक चर्चेतून प्रश्न सुटण्याच्या दिशेने पावलं पडतात.जीवनातील आनंद आपल्या विचारात आहे."

एकदा का आपले कर्तृत्व आणि धमक दिसली की, दूर गेलेली माणसे हळूहळू आपल्या जवळ यायला लागतात. आजच्या जगात आपलं नाणं खणखणीत वाजलं की माणसांचा मेळा आपल्या भोवती जमतो.

"आपण पेरतो तेच उगवते.दुसऱ्याचे चांगले झालेलं पाहण्याची ज्यांची वृत्ती असते.त्यांना कधीच कशाची कमतरता भासत नाही.ज्यांचं मन मोठं असतं त्यांच्या आयुष्यात आनंदाचे कारंजे बरसणार."

" तसं पाहिलं तर सवयी  माणसाला घडवितात आणि बिघडवितात. माणूस सवयीचा गुलाम आहे. आपल्याला सन्मानाचे आणि आनंदाचे आयुष्य जगायचे असेल तर आपल्या सवयी ही तितक्याच चांगल्या आणि उपयुक्त असलेल्या पाहिजेत.''

आपल्या मनात विचारांचा ओघ सतत प्रवाहीत असतो.एका मागोमाग एक विचार मनात येत असतात.सकारात्मक शुभ विचार येणे हे चांगले लक्षण आहे. विचारांनीच माणूस घडतो."

मोठी माणसे मोठी का होतात?हा लेखही वाचनीय आहे. महान माणसं कशी घडली याचा चढता आलेख विषद केला आहे.'चांगले मित्र,उत्तम आहार, नियमित व्यायाम आणि सर्वांनी चांगले संबंध यातूनच खऱ्या अर्थाने जगण्याला मजा येते.तेच खरं जगणं आनंदी होतं.'
'ज्यांना फुलायचं,बहारायचं आणि स्वच्छंदीपणे आयुष्य जगायचंय, अशा मुलांना मोबाईलपासून सांभाळण्यासाठी सावध आणि सजग होण्याची वेळ आली आहे.कारण वेळ निघून गेल्यावर उरेल फक्त पश्र्चाताप….'

प्रत्येक कामात सुख मिळते फक्त आपली दृष्टी तशी पाहिजे. टिपकागदासारखे सुखाचे क्षण टिपता आले पाहिजेत.दृष्टी सकारात्मक असलीकी सुखाचे क्षण ओंजळीत ओतप्रोत येतील..इतकं अप्रतिम  रसभरीत प्रवाही रुचेल आणि पटेल असं वर्णन सर्वच लेखांचे केले आहे. 

किशोरवयीन शाळकरी मुले व महाविद्यालयीन तरुणांसाठी आहे. सकारात्मक संस्काराचा पथदर्शी दीपस्तंभ 'आत्मप्रेरणा'हे पुस्तक आहे.अत्यंत अनमोल ठेवा संग्रही असावा असे हे पुस्तक आहे.लेखक श्री. लक्ष्मण जगताप यांच्या लेखणीस सलाम आणि दिसामाजी लिहिते राहण्यासाठी हार्दिक शुभेच्छा!!!

@#श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई

लेखन दिनांक- १३ नोव्हेंबर २०२१

*"*"*"*"*"*""*"*"*"*"*"*"*"*"*"*"

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know