परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
पुस्तक क्रमांक-८८
पुस्तकाचे नांव--मंतरलेले दिवस
लेखकाचे नांव--ग.दि.माडगूळकर
प्रकाशक-साकेत प्रकाशन, औरंगाबाद
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-डिसेंबर २०२१/ प्रथमावृत्ती
एकूण पृष्ठ संख्या-१८४
वाड्मय प्रकार--आत्मचरित्रपर लेख
मूल्य--२५०₹
📖📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
८८||पुस्तक परिचय
मंतरलेले दिवस
लेखक:ग.दि.माडगूळकर
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
ग.दि.माडगूळकर हे मराठी साहित्यसृष्टीला व चित्रपटसृष्टीला पडलेले एक अभिजात स्वप्न.या स्वप्नाने मराठी माणसांच्या आयुष्याला सोन्याचा मुलामा चढविला.'गदिमा'हे मराठी संस्कृतीने जपलेले एक अनमोल अलौकिक साहित्य संस्कार आहे. घराघरांमध्ये, मनामनांमध्ये आणि ओठा- ओठांवर हा संस्कार मोठ्या मनाने जपला आहे.गीत रामायणाने रसिकांच्या हृदयात अढळस्थान मिळविले आहे.
ज्यांची कला लोकजीवनाशी विलक्षण समरस झाली. असे महान साहित्यिक 'गदिमा' होते. एकशे पन्नास पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटात त्यांनी कथा पटकथा संवाद आणि गीते लिहिली आहेत. काही मोजक्याच मराठी सिनेमात त्यांनी प्रारंभी अभिनयही केलाआहे. त्यांच्या 'मंतरलेले दिवस'या आत्मचरित्रपर कथा पुस्तकास महाराष्ट्र शासनाने साहित्यातील पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.तसेच त्यांच्या साहित्याचा गौरव भारत सरकारने १९६९साली 'पद्मश्री'किताबाने सन्मानित केले आहे.१९७३साली यवतमाळ येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे ते सदस्यही होते.तसेच ते विधानपरिषदेचे सदस्यही होते.
‘सुधीर फडके (बाबूजी)- ग.दि.माडगूळकर’ या जोडीचं ‘गीतरामायण’आणि चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या श्रवणीय गाण्यांचे गीतकार, गायक आणि संगीतकार म्हणून रसिक चाहत्यांच्या हृदयात सिंहासनाधीश्वर झालेले लाडके आणि सुप्रसिद्ध अशी ही दोन थोर व्यक्तिमत्त्वं एक आदरणीय सुधीर फडके ( बाबूजी) आणि दुसरे ग.दि.माडगूळकर. 'गदिमा'.'महाराष्ट्राचे वाल्मीकी'ही तमाम सृजन मराठी रसिक चाहत्यांनी स्वयंस्फूर्तीने साहित्यमहर्षी गजानन दिगंबर माडगूळकर अर्थात 'गदिमा' यांनी बहाल केलेली गौरवास्पद बिरुदावली आहे. गदिमांची 'गीतरामायण'ही साहित्यकृती म्हणजे त्यांच्या साहित्यातील किर्तीचा कळस आणि सुवर्णपान आहे.असे दिग्गज प्रतिभासंपन्न साहित्यमहर्षी 'गदिमा'यांचे 'मंतरलेले दिवस' या आत्मकथनात्मक पुस्तकात रसिकांना रसग्रहण करायला लेखसंग्रह उपलब्ध करून दिला आहे.
'गदिमा’ हे अष्टपैलू कलाकार होतेच,मात्र त्यांचं व्यक्तिमत्त्व बहुपेडीहोतं.अभिनेता,कथालेखक,लेखक,कवी, पटकथाकार, संवादकार, गीतकार या त्यांच्या विविध छटा चिमटीत पकडून ठेवणं शक्यच नाही.अनेक कलाप्रांतात एकाच वेळी लीलया संचार करणारे ग.दि. माडगूळकर होते. त्यांची जगावेगळी प्रतिभा व त्यांचा कलाविष्कार असणारी साहित्यसंपदा आपणास मोहित करत राहते.
"गदिमांच्या या आत्मपर लेखांचे स्वरूप स्मरण रंजनात्मक; परंतु ललितरम्य आहे. पूर्वायुष्यातल्या आठवणी जागवताना त्या सगळ्याच घटनांत एक आगळी मौज होती. असे गदिमांनी म्हटले आहे.ते सारे दिवस मंतरलेले होते. अवघड असले तरी उभारीचे होते. संस्कारांचे होते, जडणघडणीचे होते, उत्साह आणि उमेद वाढवणारे होते, असा भाव या संग्रहातल्या लेखातून व्यक्त होतो. निवेदनातला ऐसपैसपणा, खुलेपणा आणि साधेपणा त्यांच्या उमद्या स्वभावावर प्रकाश टाकतो.ग. दि. माडगूळकर यांचे लेखन विलोभनीय असून त्यातला ताजेपणा,भाषेचा मराठमोळा सुगंध मनाला मोहवतो. त्यांच्या भाषेतली चित्रमयता, ओढा आणि नादमधुरता वाचकाला गुंगवून टाकते.व्यक्ती,प्रसंग,घटना जिवंत करणारी सर्जक प्रतिभा मनाला भावते. ''
गतकाळातील स्वतःच्यामन:स्थितीचे अचूक वर्णन करताना त्यांचीलेखणी विलक्षण संयम धारण करून व्याकूळ भावस्पंदने उमटवते. चराचरातील अमूर्त किंवा जड भौतिक तत्त्वांनाही ग.दि. माडगूळकरांच्या लेखणीतल्या वीजेचा स्पर्शही लाभला की, तत्त्वे सजीव-समूर्त होऊन वाचकांसमोर अवतरतात"असं अविनाश सप्रे या 'मंतरलेल्या दिवसांचा' परामर्श व्यक्त करतात.
'मंतरलेले दिवस'हे गदिमांचे आत्मचरित्र आहे.त्यांच्या बालपणात भेटलेल्या आप्तस्वकिय ,स्नेही आणि मैतरांची व्यक्तीचित्रे अस्सल ग्रामीण शैलीत रेखाटली आहेत.बालपणी दोस्तांच्या सहवासात माडगूळे, कुंडल ,औंध किन्हई (पंतांची) ही गावे आणि परिसरातील घटना प्रसंगांचे हुबेहूब वर्णन त्यांनी घडविले आहे.वाचताना अनेक प्रसंगी आपण भावना प्रधान होतो. अनेक घटना प्रसंगांचे वर्णन मनाला स्पर्शून जाते.ते चित्रण आणि व्यक्तींचे चित्रण डोळ्यासमोर उभे राहते.
गीतकार गदिमांच्या अनेक गीतांमध्ये जगण्याचं तत्त्वज्ञान सोप्या शब्दांत मांडलेलं दिसतं. ‘दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा’ या पंक्ती मानवी जीवनाचं सार आहेत.‘जगाच्या पाठीवर’ची गीते तर पराकोटीच्या तत्त्ववेत्त्याने लिहिल्यासारखी वाटतात. ‘एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे, जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे’......
त्याचप्रमाणे त्यांच्या आत्मचरित्र लेखातून करुण विदारक सामाजिक चिंतन गदिमांनी शब्दातून व्यक्त केले आहे. माणसात माणुसकीचे नाते त्यांनी बालवयातच जोडलेले होते. पुस्तकाच्या प्रवासात त्यांना अनेक प्रकारची माणसे भेटली. त्यातील काहींशी घनिष्ठ सहवास घडला, तर काहींशी दोस्ती तर काहींशी विचित्र व कटू अनुभव आले. प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागले. कलेच्या ध्यासात मार्गक्रमण करत राहिले.श्री अनंत अंतरकर यांनी 'भूमिका' लेखात पुस्तकाचा आलेख आणि गदिमांचे लेखन याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. आत्मचरित्राच्या निवेदनाच्या ओघात त्यांनी कितीतरी व्यक्तिचित्रे नेमक्या शब्दात आणि सहज शैलीने रेखाटली आहेत.
अकरा जून १९६२साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती निघाली होती.ती अवघ्या अकरा महिन्यांत संपली होती. अनेक जाणकारांनी पत्रे पाठवून अभिप्राय कळविले होते.ते म्हणतात की,"मराठी भाषेतील या जागल्या रसिकतेने मी आनंदित झालो होतो." या आत्मचरित्र संग्रहात अकरा लेखमालिका आहेत.हाही निव्वळ अकरा संख्येचा मणिकांचन योग होयअकरा लेखांचे आत्मचरित्र,ते अकरा तारखेस प्रकाशित, अन् अकरा महिन्यांत आवृत्ती संपणे.
'मंतरलेले दिवस'या आत्मचरित्रपर पुस्तकात मंतरलेले दिवस, एक अज्ञात अंगुली लिहिते, मोहोरलेला कडुनिंब,माझा यवन मित्र,बामणाचा पत्रा,पंतांची किन्हई,वेडा पारिजात, औंधाचा राजा, लुळा रस्ता,नेमल्या आणि अरे, दिवा लावा कोणीतरी आणि शेवटी गदिमांच्या चित्र- जीवनपट आहे. त्यांनी मराठी व हिंदी भाषिक कोणकोणत्या चित्रपटात कथा,पटकथा, संवाद, गीते आणि अभिनय साकारला त्या चित्रपटांची वर्षनिहाय व निर्मीती संस्थेसह माहितीचा सारीपाट आहे.
मंतरलेले दिवस या शिर्षक आत्मकथेत त्यांच्या बालपणीच्या सवंगड्यासह केलेल्या स्वातंत्र्य लढ्याची गोष्ट आहे.तसेच दोस्तांच्या करामतीचे आणि गमतीजमतीचे खुमासदार शैलीत वर्णंन केले आहे. माणसाला दु:खासारखेच सुखही अनेक वेषांतरांनी माणसाच्या आयुष्यात येऊन जाते.एकांतवेळी अशासुखाचे तोंडावळे दिसतात.मन स्मृतीत रमून जाते.त्यावेळचा काळ डोळ्यासमोर तराळतो.त्यांनी औंध संस्थानातील कुंडल गावातील स्वातंत्र्य पूर्व काळातील घडामोडींचे वर्णन अत्यंत बारकाईने केले आहे. खादी, स्वदेशी, स्वावलंबन आणि अस्पृश्योध्दार या चळवळीचे प्रतिध्वनि तेथे हमखास उमटत राहतो.
१९३६साली गणित विषयात टांग मारल्याने मॅट्रिक अनुत्तीर्ण त्यामुळे घरच्या सर्वांसाठी काहीतरी व्यवसाय करणे गरजेचे असल्याने मी पहिल्यांदा उदबत्ती विकायला सुरुवात केली. मेणासारख्या कोवळ्या मेंदूवर भलत्याच विचार रेखा फैजपुर येथे मुद्रित झाल्या.घरचं सगळं विसरून आपण देशासाठी काहीतरी केलं पाहिजे.बलिदान दिलं पाहिजे म्हणून सेवा संघाच्या आश्रमात गेलो.तिथं मन रमेनाम्हणून गुपचूप कुंडलला आलो.मग तिथंच मित्रांसोबत ''गृहप्रपंच सारेच करतात.मला हुतात्मा व्हायचे आहे!'' हा विचार मनात पक्का ठासला होता. मी फक्त घरी जेवून गावात भटकत होतो. अवलिया पणामुळे शहाणी माणसं आमच्यावर प्रेम करु लागली.आमच्या सवंगड्यात शंकर निकमचा आवाज गोड व भारदस्त आवाज होता.तो शाहिरी कवनं व लावण्या कानावर हात ठेवून टेचात म्हणायचा..
मी गाणी पोवाडे लिहून त्याला द्यायचो.गावात 'स्वार्थत्याग' नावाचे नाटक लिहून त्याचा प्रयोगही सादर केला होता.इकडं घरची परिस्थिती भयंकर चिघळलेली होती. घरातल्यांना उपासमारी घडू लागली. त्यामुळे ते चाकरीच्या शोधात बाहेर पडले.मंतरलेले मस्तीचे दिवस संपले.अन् ते नेम्याच्या घरातून परस्पर कोल्हापूरला पोहोचलो. सिनेमासारख्या वेगळ्या क्षेत्रात पडलो.लिहिण्याच्या नादाने गाणी लिहायला लागलो.पंधरावीस रुपये पगार मिळायचा.त्यातलेच पाच रुपये ते घरी पाठवित होते.
कविता आणि गाणी लेखनातून बरे दिवस येत होते.ग्रामोफोन कंपनीने गदिमांच्या रचना विकत घेतल्याने पैसे मिळत होते. काहीवर्षांनी ते कुंडलला आले.राष्ट्रीय सभेच्या प्रचारासाठी निकमला पोवाडा रचून दिला.याच काळात ते लग्नाच्या बेडीत अडकले.अनेकवेळा निकमला पोवाडे लिहून देत होतो. भाऊ व्यंकटेश क्रांतिकारकात मिसळून फरारी झालेला असतो त्यामुळे आमच्या बिऱ्हाडाशी पोलिसांची येरझार वाढू लागली. क्रांतिकारकही घरी येऊन जात असत.पत्नीही आजारी पडली होती. त्यावेळी जी.डी.लाड यांनी माझ्या हातीपैश्याचे पुडके सरकावले होते.
तदनंतर गदिमा आपल्या क्रांतिकारक मित्रांच्या विवाहासाठी कुंडलला येतात.त्यावेळच्या कुंडलचे आणि लग्नाच्या सोहळ्याचे वर्णन बहारदारपणे केले आहे.कुंडल गावावर आधारित रचना समर्पकपणे मांडली आहे.
'एक अज्ञात अंगुली लिहिते' या कथेत अचानक एकाएकी सुखदुःखाच्या घटना अशाकश्या घडतात.त्याचा आपल्याशी काय संबंध लागतो याचा उहापोह त्यांनी या कथेत केलाय. 'एकदा गदिमा पत्नीला तपासण्यासाठी दवाखान्यात घेऊन जातात. अचानकपणे पत्नीचे पोट वाढत असते.कोणतातरी आजार असल्याने तपासणी साठी जातात.तदनंतर अनाकलनीय संकटाने तिला गाठल्याने तिला भयंकर रोग झाल्याची जाण नव्हती.त्यामुळे तिला सुख देण्याचा मी प्रयत्न करत होतो.' असे ते या आत्मकथेत स्पष्ट करताना पुढे सांगतात.तपासणी नंतर गदिमांना, 'तुमच्या पत्नीला कोणताही आजार नसून तिला मूल होणार आहे.'असे डॉक्टर सांगतात. ती दोघेही पुढे चालले असतात.
त्यावेळी मागून एक सायकलवाला पाठमोऱ्या आकृतीवरुन गदिमांना ओळखतो,आणि थांबून अभिनंदन करतो.यामुळे ते भांबावून जातात. आणि कशाबद्दल अभिनंदन विचारतात. तेव्हा तो सांगतो, 'मघाशीच मी रेडिओवर न्यूज ऐकली की, आपणास बक्षीस मिळाले आहे. 'हे ऐकल्याने त्यांच्या पत्नीचा चेहरा उजाळतो. ती गदिमांशी प्रसन्नतेने संवाद करते.
दिल्लीच्या नाटक अकादमीने या वर्षीचा श्रेष्ठ चित्रकथाकार म्हणून निवड केलेली असते.ते पारितोषिक स्विकारण्यासाठी उभयता दिल्लीला जातात.तिथं एका खासदाराच्या निवासस्थानी अभ्यागत म्हणून मुक्काम करतात.तिथं त्यांचा एक स्नेही असतो.त्याच्या उपाहारगृहात जेवणाची सोय केलेली होती. आसामी खासदाराच्या निवासस्थानी एक म्हातारी असते.सुखदु:खाच्या नात्याप्रमाणे गदिमांची पत्नी आणि ती वृध्दा गप्पा मारत असतात.तिचं व्यक्तिचित्रण अप्रतिम अक्षर वैभवात गदिमांनी लिहिलेले आहे.ती छानपैकी गदिमांचे आणि त्यांच्या पत्नीचे आदरातिथ्य करत असते. अचानकपणे एका दुपारीच ती घरात आत्महत्या करते.
''त्या वृध्द स्त्रीने आत्महत्या का केली असेल?''ते कुणालेच कळले नव्हते. तिच्या आयुष्याचा चित्रपट आगाऊ कोणी लिहिला होता.त्या म्हातारीचा आणि आमचा परिचय का झाला? माझ्या पत्नीची शस्त्रक्रिया अयशस्वी का ठरली?त्याच वेळी मी दिल्लीला पारितोषिक स्विकारण्यासाठी का गेलो.आणि आनंदाच्या प्रसंगात हे दु:खाणे विरजण का पडले.हे सारे आहे तरी काय.कुणा तरी अज्ञात अनामिक हातांनी या घटना आगाऊ लिहून ठेवल्या असल्या पाहिजेत. अशी ही आनंद आणि दु:खाची झालर असणारी 'एक अज्ञात अंगुली लिहिते' आत्मकथा आहे.
'मोहोरलेला कडुनिंब'या कथेत त्यांनी माडगूळ गावातील निसर्ग सौंदर्याचे,स्थळ ठिकाणांचे, खंडोबाच्या माळरानाचे वर्णन अस्सल ग्रामीण बोलीत खुलविले आहे.
"वाट मज ती आवडे,ग वाट मज ती आवडे…
बाभळीला बहर पिवळा, वरुन बोले कावळा
आज काना लागतो का साथ त्याचा वेगळा''
या सुंदर गीतांची बांधणी त्यांनी माणदेशी माडगूळ खेड्यातील बाभळीसारखं रुक्ष झाड बघूनच सुचली. आणि त्यातून गाणं तयार केले आहे.माळरानाबद्दलच्या अनेक दंतकथा असल्याचे ते आवर्जून सांगतात.एकाला पैक्याचा गडवा सापडलेला असतो.त्यात तांब्याचे पैसे असतात. त्यातील नाणं निरखून पाहिल्यावर लेखकाला ते नाणं म्हणजे 'शिवराई' असल्याचे लक्षात आले.वीजनावाच्या लघुकथेत त्यांनी खंडोबाच्या माळाचे वर्णन केलेले आहे.गावातील गावकुसाबाहेरील वस्त्या,वाडे आणिगावाचा उल्लेख छानच शब्दसाजात मांडलेला आहे.याच गावच्या स्थळकाळावर त्यांनी अनेक गाणी रचली आहेत. त्या गावाचं आकर्षण त्यांना वाटते.ते त्यांनी,"माझा पिंड माझ्या गावच्या वातावरणानं घडला आहे.तसच माझं लेखन माझ्या गावाच्या संस्कारानं मढलेलं आहे. स्वत:इतकाच मला माझ्या गावाचा अभिमान आहे.अनुभवांनी कडवट झालेलं माझं मन, गावाकडच्या आठवणींनी म्हणूनच मोहरुन येतं."अशा शब्दांत त्यांनी गावाचे गावपण टिपकागदासारखं टिपलयं…
'माझा यवन मित्र'या कथेत नजम नकवी या कथालेखक मित्राच्या स्वभावाची गोष्ट सांगितली आहे. त्याने गदिमांनी कथा लेखनाचा एकत्र करार केलेला असतो.त्याचे वर्णन छानच रंगविले आहे.तो अचानक कसा देश सोडून जातो. आणि एकत्र लिहिलेल्या कथेचा सिनेमा काढतो आणि पटकथालेखक म्हणून स्वत:चे नाव लावतो.त्यासाठी पत्र पाठवून अखत्यारपत्र पाठवून द्यायला सांगतो.अशी 'माझा यवन मित्र'ही आत्म कथा आहे.
मला सर्वात आवडलेली आणि अनेकवेळा फेसबुकवर वाचायला मिळालेली कथा म्हणजे 'बामणाचा पत्रा'होय.नाव वाचवेकी वाचनाचे कुतूहल वाढतच जाते.निर्मात्याला सिनेमासाठी नवीन कथा पाहिजे असेलतर तो गदिमांना आर्जव करत असतो.काकुळतीला येतो.मग नवी कथा लिहिण्यासाठी,कथाबीज आठवण्यासाठी, कथेचे बीज पेरण्यासाठी आणि ती तयार होण्यासाठी मला एकांत हवा असतो.त्यासाठी माझी पाऊले गावाकडे वळतात.
मग पुना ते कुर्डुवाडी आगगाडीचा प्रवास सुरू होतो.तदनंतर माडगूळे गावापर्यंतच्या प्रवासाचे आणि प्रवासात भेटलेल्या माणसांचे व्यक्तिचित्र अप्रतिम अक्षरवैभवात मांडलेले आहे.ते रसग्रहण करताना आपलाही प्रवास होतोय. इतके आपण वाचतात गुंगून जातो.तेथील गावांची वैशिष्ट्ये,भेटणाऱ्या माणसांबरोबरच्या होणाऱ्या गप्पा,माण नदीचे, पीकांचे वर्णन अप्रतिम केले आहे.'बामणाचा पत्रा'ही झोपडी माडगूळ गावातील गदिमांच्या गावंदरी मळ्यातील पाव नावाच्या रानातील आहे.तिला गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने वरील नाव दिले आहे.गांधी हत्येच्या दंगलीत गावातील सर्व ब्राह्मणांची घरे जळाली होती.गावात नांदायला पुन्हा घर बांधणे आवश्यक होते.त्यांच्या धाकट्या भावाने पुन्हा घर बांधले. त्या सामानातून उरलेल्या साहित्यातून ही झोपडी गुरं बांधायला बांधली.पण गुरांच्या झोपडीचे मानवी निवासस्थान झाले होते.
माझ्यासोबत अनेक प्रसिद्ध प्रतिभासंपन्न कलाकारांनी या झोपडीत मुक्काम केलाय.ते म्हणतात की,"दळणाऱ्या बायांच्या गीतांनी उजाडणारी सकाळ आणि जनावरांच्या घुंगर नादाने झेपावत येणारी संध्याकाळ आम्हाला अत्यंत रमणीय वाटते."इथं अनेक चित्रपट कथांचे कथाबीज निर्माण झाले.हे माझे निवासस्थान नसून ते माझे स्फूर्तिस्थान आहे. तिथच मला प्रतिभाशक्ती मिळते.
तीनच बाजूला भिंती असल्याने झोपडी धर्मशाळेसारखी दिसते. अनेक शेतीच्या वस्तू लटकत असतात.कोनाड्यातील बियांची गाडगी मृगाची वाट पाहत थांबलेली असतात. मी तिथं गेल्यावर सगळ्या वस्तू अदृश्य होतात.खुंट्यावर सदरे कोट जाकिटे लटकू लागतात. बियाणांच्या जागा संदर्भ ग्रंथ घेतात. गोठ्यात गादी तक्क्यांची शुभ्र बैठक ठाण मांडते. तसूतसूने वाढत असलेल्या पिकाला आणि उगवत्या- मावळत्या नारायणाचा साक्षी ठेवून गदिमा लेखनाला सुरुवात करतात..
कथाबीज लेखन,पिकांचे वर्णन,तिथं झोपायला येणाऱ्या माणसांचे वर्णन, न्याहरी,भोजन मेनू आणि रानातल्या मेव्याचा बेत.यांचं खुमासदार शैलीत वर्णंन केलंय. शहरातील धबडग्याचा कंटाळा आला.जीव आंबला की लिहायला काही सुचेनासे होते. कोऱ्या कागदावर अक्षरे उमटत नाहीत.मग माझ्या समोर अभावितपणे रेखाचित्र उतरु लागते. तीन भिंती,वर पत्रा, मागेपुढे गुलमोहराची झाडे, अवतीभवती वाढणारी शेती.असं चित्र तराळले की मला त्या झोपडीत मुक्काम रहावे वाटते.
'पंतांची किन्हई'या आत्मकथेत या गावातील सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या आठवणींची ओळख करून दिली आहे.काही नावे, काही गावे,काही वास,काही सहवास, काही साथ आणि काही नाद माणसाच्या मनात आयुष्यभर हृदयात घर करून राहतात.विसरु म्हटले तरी त्यांचे विस्मरण होत नाही.अशीच किन्हई पंतांची हे गाव आहे.भूतकाळातील अनेक आठवणी गावचं नावं उच्चारलं की डोळ्यासमोर उभ्या राहतात.
त्यांचे वडील औंध देवस्थानचे कारकुन ते वहिवाटदार म्हणून सेवेत होते.सुट्टीच्या काळात गदिमा औंधवरुन या गावी शाळेला सुट्टी पडल्यावर येत असत.इथं त्यांना भेटलेले माणदेशी संस्थानचे राजे पंतप्रतिनिधी,रनर, हवालदार ,भंपक बाबूराव,कुलकर्णी,लिमयेमास्तर ,
पराडकर पंत आदी व्यक्तिची शब्दचित्रे अक्षरवैभवात उभारली आहेत.संस्थानच्या राजवाड्याचे, बाजारपेठेचे, बागेचे,नाटकाच्या प्रयोगाचे आणि सुगंधी गावाचे वर्णन प्रवाही भाषेत केले आहे.
तिथली माणसे,एकवीरेश्वराचा घाट, टेकडीवर सोने उधळणारी सकाळ,तसेच बुक्कागुलालात न्हालेली संध्याकाळ, नदीच्या डोहाच्या पाण्यात विझवलेली जळती दुपार आणि निष्पाप ग्राम कन्यकांचे वेडे कटाक्ष हे सारेच त्यांना आठवते. सुगंधी गावाचे रहस्य उदबत्तीच्या कारखान्याचे वर्णन, साखरगडनिवासिनी कुलस्वामिनी देवीची टेकडी आदी स्थळांचे वर्णन मनाला भावते.
'वेडा पारिजात' या आत्मचरित्रपर लेखात त्यांच्या एककल्ली तात्यांच्या स्वभावलहरींची कथा रेखाटली आहे.वडिलांच्या शब्दाखातर गावदरीच्या रानातल्या झोपडीत एकटाच मुक्काम करणाऱ्या तात्याची कथा.मोठी रंजक तितकेच भावस्पर्शी कथानक आहे.त्यांचे जित्रांबावर आणि लहान मुलांवर लय लळा जिव्हाळा आहे.पण तात्याला एखाद्या वेळी कश्याची सनक येईल याचा काही नेम नाही.
गदिमा झोपडीला सिमेंट प्लॅस्टरिंग कर म्हणून भावाला सांगतात.पण यातल्या काय करुन देत नाही.पण भाव चिडीला पेटून गड्याकरवी सामान हुसकण्यास सुरुवात करतो. या घटनेने तात्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते.तो तडक वळकटी घेऊन पुण्याला गदिमांकडे नसांगता जातो.तिथं बागेत काम करत असतो.एकदा बागेतल्या आवळी व डाळिंबाच्या मधले पारिजातकाचे रोप अलगद उपटून परसदारी लावतो.त्या पारिजात आणि त्यातल्या यांची कथा आहे.
'औंधाचा राजा' या आत्मकथेत श्रीमंत राजे भवानराव पंडित पंतप्रतिनिधी यांच्या शैक्षणिक कार्याविषयी माहिती या कथेतून प्रकर्षाने लक्षात येते.राजे आणि गदिमा यांच्यात बालपण ते प्रौढपणात घडलेल्या सहवासाचे हितगुज अत्यंत समर्पक शब्दांत गुंफले आहे.नाटकातील काम पाहून बक्षीस समारंभात पारितोषिक देताना ,राजे यांनी काढलेले उद्गार
"हा मुलगा हास्याचे डोंगर उत्पन्न करील.बाळ तू टाकीत जा,शिकला नाहीस तरी चालेल.'' टाकी म्हणजे सिनेसृष्टी. तिथंच प्रथम अभिनय आणि गाणी लेखन करणारे गदिमा. श्रीमंत प्रजाहितदक्ष राजे पंतप्रतिनिधी यांचे व्यक्तिचित्रण उत्तुंग राजे ऐश्र्वर्या सारखे, व्यक्तिमत्त्वासारखे शब्दालंकारात वाचायला मिळते.गदिमाही राजाश्रयाने औंधमध्ये शिक्षण घेत होते.
"दो आॅंखे बारह हाथ'या हिंदी सिनेमाची बीजकथा औंधसंस्थानात पंतप्रतिनिधी यांनी राबविलेल्या गुन्हेगारांना माणुसकीने वागविण्याचा प्रयोग माझ्याच एका मित्राच्या सांगण्यावरून बाबांनी केला होता."हेऔंधचे राजे यांचे चिरंजीव बॅरिस्टर अप्पासाहेब पंत यांनी गदिमांना पत्थर लिहून कौतुक केले होते.
'लुळा रस्ता'या कथेत मुंबई-पुणे रस्त्यावरील सखूबाई मावशीचे व्यक्तिचित्रण रेखाटले आहे. कजाग, डेरिंगबाज, फटकळ आणि बोलकी असणारी मावशी.तिचा त्या परिसरात चांगलाच वट असतो.ती झाडाखालीबसून भाजीपाला विकत असते.मुलगा गोपाळ हॉटेल चालवत असतो.रोजगारी बायकांची ती भिशी चालवित असते.
गदिमा आणि सखुबाई यांच्या संभाषणाचे किस्से सुंदर शब्दात मांडले आहेत.सखुबाईची गजघंटा पहाटेपासून ते मध्यरात्रीपर्यंत वाजत असायची.घर ते हॉटेल व हॉटेल ते वडाखालचे दुकान अश्या सतत फेऱ्या चालू असायच्या.
एकेदिवशी तिच्या घरात चोरी होते.पण पोलिस काय तपास लावत नाहीत.त्या धक्क्याने ती खचून जाते.त्यातच पक्षाघाताचा झटका येतो. जोडलेल्या नात्याची सारी माणसं तिच्या मदतीला धावतात. त्यातून ती वाचते पण, तिला बोलायला सुधरत नाही.पायाने लंगडत राहते.
स्वभावाने अत्यंत कनवाळूअसणारा गदिमांच्या बालपणीचा सवंगडी स्नेहमित्र नेमिनाथ बलवंत उपाध्ये उर्फ 'नेम्या' याची ही चित्तरकथा आहे.मोत्याच्या दाण्यासारखे सुंदर हस्ताक्षर असणारा गदिमांच्या लाडका नेम्या,कच्च्या कविता फेअर करून ठेवण्यात वाकबगार होता. त्यांच्या घरचे हरेक काम तो करायचा.पण सनक आलीकी न सांगता निघून जायचा. चित्रविचित्र असंबंध्द बोलायचा वागायचा... त्याची कथा 'नेम्या' ते म्हणतात की,''नेम्याचे माझे नाते वेगळे आहे.
त्या नात्याला नांव नाही.दगडाला देवत्व देणारे संत आणि माणसासारखाच मातीच्या पोटी जन्मलेला दगड,यांच्यातील नात्याला नांव काय? तसेच आमचे निनावी नाते आहे."
'अरे, दिवा लावा कोणी तरी'या आत्मकथेतून वडीलांच्या स्वभाव पैलूंचे दर्शन घडते. वडिलांच्या अंत्यसमयी घडलेल्या प्रसंगाचे चित्रण भावस्पर्शी शब्दांनी व्यक्त केले आहे.
जाताना त्यांचे वडील म्हणाले होते,''कुणी तरी दिवा लावा,''तो आता लागला होता.ते पाहून मला भडभडून आले.वडील गेल्याने निराधार झालो.त्यांच्या अवजड जबाबदाऱ्या पेलाव्या लागणार होत्या.स्नेह आणि तेजाची झळाळी नाहीशी झाली होती.त्यांच्या इच्छेचा मान म्हणून मी दिवा लावलाहोता…..
गदिमांच्याहातून अजाणतेपणी त्याचदिवशी काळोखात कोपऱ्यात काहीतरी हालचाल झाली.म्हणून लाकडाचा फाळ त्या दिशेने भिरकावला.अन् जागीच त्यांचा लाडका श्र्वान टाळल्या गतप्राण झाला.अविचाराने त्यांच्या हातून हत्या झाली.एकाच विचाराची वेडीवाकडी आवर्तने त्यांच्या मस्तकात घुमत राहिली.त्याच वेळी कवडशा बरोबर तो कुत्रा आत आला.त्यावेळी त्यांना वाटले,आपला कुत्रा माघारी आला.ते पिल्लू काळ्याच्याच जातकुळीतलं होतं.
अशा एकापेक्षा एक सरस आणि वास्तव चित्रण ग.दि. माडगूळकर गदिमा यांनी आत्मचरित्र कथा कसदार लेखणीने कथानकाची उंची वाढविली आहे.गीत रामायणा इतकीचं याही लेखांचा परीघ आणि क्षितीज विशाल आहे. गदिमा पटकथाकार आणि गीतकार कसे घडत गेले. लेखनाची ऊर्जा प्रतिभा आणि कथाबीज कुठे आहे.कथानक कसे लिहिले.तसेच जीवनाच्या वाटेवरून जाताना त्यांना जवळच्या लांबच्या नात्यातल्या माणसांची माणूसकी कशी लाभली यांचा उलगडा 'मंतरलेले दिवस'या आत्मचरित्रपर गाथेतून होतो. आदरणीय ऋषीतुल्य शब्दमहर्षी गदिमा आपल्या लेखणीस प्रणाम आणि त्रिवार वंदन!!!
श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
लेखन दिनांक- २० नोव्हेंबर २०२१
#############################
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know