Saturday, December 4, 2021

पुस्तक नाव- आयुष्यातील वादळवाटा

*वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य.

*परिचय कर्ता नाव - दिपाली जोशी
*पुस्तक क्रमांक - ४४
*पुस्तक नाव- आयुष्यातील वादळवाटा
विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या जीवनातील कसोटीचे प्रसंग.

*लेखक नाव ( संपादन) - नीलिमा करमरकर 
छात्र प्रबोधन , पुणे
*प्रकाशन वर्ष व आवृत्ती  -छात्र प्रबोधन मासिकांत इ.स. १९९९ यावर्षी प्रकाशित केलेले लेख या पुस्तकात  प्रकाशित केले आहेत. 
 ( प्रथमावृत्ती २००२ / पुनमुद्रण २०११)

*एकूण पृष्ठ संख्या -११२

प्रत्येक क्षेत्रातील आव्हाने निरनिराळी असतात , ते स्विकारण्याचे आणि निर्णयाचे स्वरूप देखील वेगळे असते. असेच मुक्त चिंतन येथे वाचण्यास मिळते.  आपल्या क्षेत्रात मोठया स्थानावर असलेल्या व्यक्ती त्यांचे कसोटीचे क्षण येथे मांडताना दिसतात. हे अनुभव खूपच बोलके आहेत आणि खूप प्रेरणा देऊन जातात...कुमारवायतील मुलांनी तर नक्की वाचावेत आणि सर्वच पालकांनीही. मुलांना भावनिक आणि बौद्धिक दोन्ही कसरतीमधून कसा मार्ग काढावा हे नक्की समजेल.
एकूण २१ व्यक्तींचे लेख समाविष्ट करण्यात आहेत.
काही नावे येथे नमूद करत आहे त्यांच्या छोट्या अनुभवासाहित...
१) डॉ. जयंत नारळीकर - नारळीकर सर शाळेत वर्गाचे नायक होते. एक दिवस  शिक्षक रजेवर असल्याने शेवटचा तास झाला नाही. तर वर्गनायक म्हणून यांनी वर्ग सोडला आणि मुले घरी पाळली. दुसरे दिवशी मुख्याद्यापकांचे बोलावणे आले , सरांनी ओरडा दिला नाही पण सांगितले की" जितका अधिकार जास्त तितकी जबाबदारी वाढते..मी वर्गात आलो होतो पण तुम्ही सगळे गायब ,इतर मुलांनाच दोष नाही तितका तुझा आहे."
मुख्याध्यापकांनी सौम्य शब्दात समज देत जबाबदारीची जाणीव करून दिली.
पुढे एक पुष्कळ वाद असणाऱ्या सिद्धांतावर सरांना संशोधन करायचे होते पण मार्गदर्शकांनी सल्ला दिला की नवसंशोधकांनी वादांपासून दूर राहावे पण जेमतेम पुढील ८ महिन्यातच पूर्ण  आत्मविश्वासाने याच विषयावर चर्चा आणि वादविवादास स्वतः सामोरे गेले. 

२) प्रवीण दवणे -
अखंड कविता करायचे पण फिल्म साठी गाणी बनवण्याची त्यांची खुप इच्छा. ते सुद्धा दिवस दिवस संगीतकरांच्या घराबाहेर दिवस दिवस बसलेत आणि नकार पचवलेत.एकदा तर लता दिदींकडून गाण्यासाठी बोलावणे आले एका रात्रीत ४० गाणी लिहून तयार केली पण काही उपयोग झाला नाही. पण पहिल्यांदा दिदींनी गाणी हातात घेतली याचा किती आनंद , पुढे तो स्वर लाभलाच .अथक प्रयत्नांची कास न सोडता केलेले कष्ट.
असेच अचानक हृदयनाथ मांगेशकरजी याच्या कार्यक्रमात निवेदक आजारी पडल्याने निवेदनाचे आव्हान स्वीकारले तेही कार्यक्रमाची कोणतीही माहिती नसताना आणि समोर १० हजार श्रोते..
संघर्षाचा क्षण कधी कोणत्या रुपात येईल हे माहीत नशीब, या क्षणांसोबत मैत्री करावी मग हेच क्षण आपल्या जगण्याला धार निर्माण करतात. 

३) डॉ.प्र. ल. गावडे-
आदर्श शिक्षक म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त.
शाळेचे मुख्याद्यापक असताना विद्यार्थ्यांच्या त्यांनी भारताच्या शेजार राष्ट्रांमध्ये सहली नेल्या. त्यातीलच श्रीलंका सहलीमधील काही कसोटी क्षण येथे दिले आहेत..दोन शिक्षकांच्या व्हिसावर अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नव्हती आणि बोटीवार साठवलेले थंड पाणी पिण्यामुळे मुलांना इन्फेक्शन झाले उलट्या सुरु झाल्या..रात्री जंगलातून बस प्रवास असल्याने थांबता येईन ..सोबतची औषध मुलांना दिली.कोलंबोत आल्या आल्या सर्वांना सलाईन लावले पूर्ण बरे झाल्यावर श्रीलंका दर्शन पूर्ण केले. 

येथे पं. भीमसेन जोशी, शरद दांडेकर, डॉ. व.सी.ताम्हणकर. भाई वैद्य,  सुचेता चापेकर, अरुण फिदोरीया, जयंतराव टिळक, डॉ.नितु मांडके, मोहन जोशी, वीणा सहस्त्रबुद्धे, विलास चाफेकर, शांताराम जाधव , वामन प्रभुदेसाई असे अनेक मोठे व्यक्तित्व तुम्हास भेटतील.
जेव्हा प्रश्न निर्माण होतात तेव्हा उत्तर ही येतातच , अनेक वेळा पूर्वतयारी करून ही कामे होत नाहित ती अश्या कसोटीच्या क्षणी नक्की होतात, फक्त आपण संपूर्ण मनोभावे, आत्मप्रेरणेने , स्वतः ला झोकून देऊन केले पाहिजे..
डॉ. ताम्हणकर तर बोलतात, कसोटीच्या क्षणांणी माझं आयुष्य समृद्ध केलं. आणि भाई वैद्य तर सांगतात की, शिस्त आणि मनोधैर्य असेल तर आपण प्रत्येक गोष्टीचा निर्धारपूर्वक सामना करू शकतो. 

खुप दिवसांनी एक स्वयंप्रेरणा देणारे पुस्तक वाचले.
छोट्या गोष्टी मोठा लाभ. 

@दिपाली जोशी

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know