Thursday, December 9, 2021

पुस्तकाचे नांव--मी माणूस शोधतोय!

वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
 परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
 पुस्तक क्रमांक-८५
पुस्तकाचे नांव--मी माणूस शोधतोय!
लेखकाचे नांव--व.पू.काळे
प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण फेब्रुवारी, २०२१
एकूण पृष्ठ संख्या-१४०
वाड्मय प्रकार ---कथासंग्रह

मूल्य--१३०₹

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
              ८५|पुस्तक परिचय
               मी माणूस शोधतोय!
              लेखक: व.पु.काळे
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
 वपुंच्या लेखनामागचा हेतू काय असेल?
त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर---माणूस नावाचा प्राणी अनेकदा भेटला. नाना स्वरूपात भेटला.कधी खऱ्या स्वरुपात,कधी खोट्या स्वरुपात, तर कधी संपूर्ण स्वरुपात; पुष्कळदा तो निसटलाही. या माणसानं मला  कधी रडवलं,कधी हसवलं, कधी भुलवलं,कधी हरवलं, कधी पुरवलं,कधी थकवलं,कधी बैचेन केलं,तर कधी अंतर्मुख….
तरीही माझा शोध चालूच आहे. आणि चालूच राहणार; माझा 'पेशन्स'दांडगा आहे.याचं श्रेयही पुन्हा माणसांनाच आहे.वाट पाहत राहण्याची माझी ताकद माणसांनीच वाढवली आहे.प्रत्येक शोधाचा काही निष्कर्ष असतो. सिद्धांत असतो माझा शोध पूर्ण झालेला नाही; पण निष्कर्ष सापडला आहे.जगात चांगल्या माणसांची संख्या जास्त आहे.वपुंना भेटलेल्या या माणसांच्या कथा आणि व्यथा खास वपु 'स्टाइल'मध्ये 'मी माणूस शोधतोय!' 

हा कथासंग्रह रसिक वाचकांना माणसांची अनेकविध व्यक्तिरेखा साकारतो.अन् अशीही स्वभाव गुणांची माणसं असतात.याचा मनात विचार प्रगटतो.आपल्या अवती भवती अशी माणसं काहीअंशी आपणाला भेटलेली असतात. याच्याही स्मृती वाचताना लक्षात येतात.सामान्य माणसाच्या मनाला भिडणारी भावस्पर्शी कथा, कादंबरी व विचार वैभवांचे लेखन करणारे जेष्ठ प्रतिभावंत लेखक वसंत पुरुषोत्तम काळे,तथा रसिक वाचकांचे लोकप्रिय 'वपु काळे'. त्यांच्या विचारधनाचे वेचे हल्लीच्या सोशल मिडीयाचा काळातही मनाचा ठाव घेऊन विचार करायला लावतात.अनेकजण स्टेटस् अथवा फेसबुकवर शेअर करतात.पेशाने वास्तुविशारद असणाऱ्या वपुंनी अनेक शब्दांचे राजवाडे आणि महाल उभारुन आपल्या भावस्पर्शी कथांनी रसिक वाचकांच्या मनावर गारूड केले आहे. 

व्यक्तींच्या आचार विचारांच्या पद्धतीला वपु 'पॅटर्न' म्हणायचे. अनेक कथांमध्ये त्यांनी 'पॅटर्न्स' मांडले आहेत. आपल्या बरोबरच आपल्या अवतीभवती दिसतात, असतात म्हणूनच ते पॅटर्न वाचताना वाचक दाद देतात.कथांमधून हसवता-हसवता एक शल्य भिडत राहतं आणि मनाला चटका लावून जातं.ही अशीचजीवनाची तऱ्हा सहज सोप्या शब्दातून त्यांनी अनेक कथांमधून मांडलेली आहे.व.पु. काळे उत्कृष्ट लेखक, कथाकार, व्हायोलिन वादक , हार्मोनियम वादक,उत्तम फोटोग्राफर आणि उत्तम रसिक होते .त्यांच्या सुंदर कथा मनावर व विचारावर आधारीत आहेत.हे मनाचे कंगोरे उत्तम  निरीक्षणामुळे त्यांच्या कथा वाचताना आपणाला पुढे काय घडेल? याची उत्कंठा लागत असते. वपु काळेंनी साहित्यातील अनेक क्षेत्रे काबीज केली आहेत.
कथा कादंबरीतून रसिकांना आनंद वाटला.ही वाट एकटीची,ठिकरी, वपूर्झा,गुलमोहर,पार्टनर ,मोडेन पण वाकणार नाही,गोष्ट हातातली होती, मी माणूस शोधतोय! सखी आणि वपु सांगे वडिलांची कीर्ती आदी अक्षरशिल्पांचे विपुल लेखन त्यांनी केलेले आहे.अमेरिका येथील मराठी साहित्य संमेलनाचे 'अध्यक्षपद' त्यांना बहाल करून साहित्यिक म्हणून सन्मान केला होता.तसेच महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा पु.भा.भावे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले होते.

अनेकजण 'रंग मनाचे' दाखवणाऱ्या वपुंना आपला पार्टनर मानतात. आणि हा पार्टनर आणि त्यांचे लेखन रसिकांच्या मनात अगदी खोलवर विराजमान झाले आहे. हा असाच दोस्ती निभावणारा रसिक वाचकांचा लेखक कथेच्या पॅटर्न मधून भेटत राहिले.असा एक पॅटर्न दाखविणारा 'मी माणूस शोधतोय!' हा कथासंग्रह आहे.यातील माणुसकी जपणाऱ्या व्यक्तिंच्या कथा वाचताना काळजाला भिडतात.

या कथासंग्रहात अकरा कथांची अवीट मेजवानी रसास्वादासाठी आहे.यातील प्रत्येक कथानकात माणसाच्या अंतरंगातील आणि व्यक्तिमत्त्वातील इतरांपेक्षा वेगळे स्वभावगुण टिपून त्यांची शब्दचित्र कथा खुमासदार शैलीत मांडलेली आहे.प्रत्येक कथा वाचताना आपले कुतूहल शिगेला पोहचविते.पुढं का? नेमकं काय झाले असेल? असं वाटतं ,त्यामुळे वाचनाची उत्कंठा वाढते.आणि समारोपात त्या कथेचा खरा आशय लक्षात येतो.इतकं आपण कथा वाचताना त्यात रंगून जातो. खास वपु स्टाईल कथांची वेगळीच खासियत आहे.याचा प्रत्यय प्रत्येक कथेचे रसग्रहण करताना लक्षात येतो.
'मी माणूस शोधतोय!'या कथा समुदायात मी माणूस शोधतोय, हप्ता,अंतर, हुतात्मा,रमी, मुहूर्त, टाहो, टेरिलिन, शोध,ऋतू बसंती रुठ गया, आणि नालायक अशा अकरा कथांचा समावेश आहे.लेखकाच्या प्रत्येक कथासंग्रह प्रकाशनानंतर हमखास शुभसंदेश पाठविणारा अवलिया कौतुक सप्तर्षी.पण पत्रावर पत्ता न लिहिणारा पठ्ठ्या. कादंबरी प्रकाशनासाठी निमंत्रण पत्रिका पाठविताना याचं नांव डोळ्यासमोर येते.पण त्याचा तो पत्ता, कसा मिळवितात.तो मिळविल्यावर ते त्याच्या लालबागच्या वस्तीतील खोलीपर्यंत जाऊन त्याच्या बरोबर गप्पा मारुन आणि केलेल्या निरीक्षणाची कथा म्हणजे.'मी माणूस शोधतोय'.

कौतुक सप्तर्षी हा अवलिया माणूस आहे. त्याचे विविध क्षेत्रात सध्या आघाडीवर असलेल्या व्यक्तींसोबत फोटो आहेत.त्याचं वर्तमानपत्रा विषयीचे विचार मनात घर करून जातात. "वर्तमानपत्र असं आपण म्हणतो खरं,पण खरं तर सगळी वर्तमानपत्रं भूतकाळ छापतात. तिसरं आणि चौथं पान मात्र भविष्यकाळ किती उज्ज्वल आहे हे सांगतात.भविष्य घडवायला निघालेले कितीतरी चेहरे त्या पानांवर दिसतात.किती माणसं ते विक्रम वाचतात.

"शाळेत असताना शिस्तप्रिय प्राचार्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्र देऊन सुरू झालेला पत्र प्रवास गेली बावीस वर्षे निरंतर व अव्याहतपणे सुरू आहे.लेखक कवी,गायक, नाटककार,आघाडीचे कलाकार अशा सर्वांना तो शुभसंदेश पाठवून कलाकार आणि त्यांच्या साहित्यावर निस्सीम प्रेम करणारा कलारसिक कौतुक सप्तर्षीची कहाणीअप्रतिम शब्दांकनात आहे. त्याचा संपूर्ण जीवनकार्याचा रंगमंच उलगडून दाखवला आहे.शेवटी कथाकार म्हणतात की,एका खारीची म्हणजेच कौतुक सप्तर्षीची अंत्ययात्रा पाहून मी दिपलो.मुग्ध झालो.यात्रेबरोबर चालत होतो. एक माणूस सापडता सापडता हातून निसटला होता.."

'हप्ता' कथेत त्यांच्याच कार्यालयातील कर्ज देणाऱ्या कृष्णाजी विष्णू दोंदे याची कहाणी मांडलीय.त्याच्या जीवन जगण्याच्या पध्दतीचे आणि व्यक्तीचे वर्णन खुमासदार शैलीत केले आहे.अति पैसा मिळविण्यासाठी माणसं कशी जगतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे दोंदे होय.

'अंतर' या कथानकात नियती माणसाला "एखाद्या दालनात शिखरावर नेऊन बसविते.आणि त्याचा, त्या दिलेल्या उंचीचा हिशोब साधण्यासाठी, जीवनाच्या दुसऱ्या दालनात त्याच माणसाला अगदी सामान्य,अगदी क्षुद्र करुन सोडते. "हेच अंतर सोदाहरण स्पष्ट केले आहे.

'हुतात्मा' ही कथा वस्तीत गुंडगिरी करणाऱ्या रतनची आहे.मेजर नाबर रतनला त्याच्याच अड्यावर व घरी जाऊन मारतात.आणि नंतर त्याचे हृदयपरिवर्तन करून त्याला सैन्यात भरती व्हायला सांगतात.ती कथा छानच रंगविली आहे.कथेची सुरुवात वेगळ्या घटनेतून करून खरंपण शेवटी कळतं.इतकी कथा उत्कंठावर्धक आहे.

रमी नावाच्या मुलीसोबत जोकर नावाचा मुलगा लहानपणापासून ते 'रमी'चे लग्न होईपर्यंत एकत्र असतो.रमी प्रसादतुल्य वाड्यात वडिलां सोबत तर जोकर आईसोबत आउटहाऊस मध्ये रहात असतो. रमीच्या लग्नात जोकर बरोबर न बोलणारा तिचा पती कॅप्टन गोगटे मात्र आठच दिवसात फोन करून बोलावतो.ती कथा 'रमी'अतिशय सुंदर शब्दात मांडली आहे.

मुहूर्त पाहून कार्य सिद्धीस नेणारे बंडोपंत भिडे यांचे व्यक्तीचित्र म्हणजे सहकार्य आणि मदत कशी करावी याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे 'मुहूर्त'कथा आहे.अगोदर त्यांचं वागणं कोडं वाटतं.पण काळवेळ प्रसंगी आपण कसे वागावे याचा आदर्श वास्तूपाठ या कथेतून प्रकर्षाने जाणवतो.

केशव गाडगीळ जेवत्या ताटावर रुदन करणारा.कारण ताटातील अन्नपदार्थ पाहून त्याला त्याच्या बहिणीची आणि आईची आठवण येते.आणि तो रडतच राहतो.कारण त्याची आई आणि बहीणीचा मृत्यू उपासमारीने त्याच्या देखत झालेला असतो.त्यामुळे तो उपाशीपोटी राहण्याचा प्रयत्न करत असतो. अशी हृदयद्रावक आणि भावस्पर्शी कथा'टाहो'आहे.वाचताना मन हेलावून जाते.

'टेरिलिन' ही कथा  माणसाच्या बाह्यांगापेक्षा त्याच्या अंतरंगाचे कवाडं उघडून दाखविणारी आहे. त्याची कृतीच खरं सौंदर्य आहे. मनमोहन आणि त्याची पत्नी यांची कथा.कुरुपता आणि सौंदर्य यांचं अचूक माहिती या कथेत आहे. टेरिलिन कापडाच्या शर्टासारखं मार्मिक उदाहरण असलेली कथा 'टेरिलिन'कथा.

अनु मनोनिग्रह करून स्वत:ची पाच वर्षे एकटीपणाने आयुष्य जगण्यासाठी मुंबईत येते.आणि के.ई.एम.मध्ये नर्सिंगची नोकरी मिळविते.अत्यंत प्रामाणिकपणे काम करत राहते.तिला एका आजारी मुलीनं ती तिच्याशी चांगली वागते म्हणून खाऊसाठी घेतलेली एक रुपयाची नोट आईजवळ निधनापूर्वी देते. तीची आठवण म्हणून अनु ती एक रुपयाची नोट टेबलाच्या काचेखाली आठवण म्हणून ठेवते. तीच नोट सुट्टे पैसे देण्यासाठी भिड्यांना मुक्तता देते.

त्याच एक रुपयाच्या नोटेची कथा. माणसाच्या स्वभावाचे पैलू उलगडून दाखविणारी 'शोध'कथा. हातातून निसटलेल्या सगळ्याच गोष्टी पुन्हा मिळत नाहीत.नर्सिंग आणि रिक्षाचा व्यवसाय या सेवा समानच आहेत. असं रिक्षाचालक अनुला सांगतो. कारण त्याची मुलगी तर कायमची त्याला सोडून गेलेली असते.तर अनुला तिची नोट भिडे काका- रिक्षाचालक- हाॅटेल मालक शंकर असं करत करत मिळते. त्या शोधाची 'शोध'कथा अप्रतिम आहे.

लहान मुले म्हणजे वसंतऋतूच. कथाकाराला  शेजाऱ्यांच्या लहान मीनाचा लळा लागलेला असतो. शेजाऱ्यांच्यात भाच्याचे लग्न असते. त्यामुळं बरेच पाहुणे आलेले असतात.कार्यालयात लवकर जाण्याच्या गडबडीमुळे ते त्यांच्यातील एका पाहुण्या महिलेला मीनाला लग्नाला घेऊन येण्याचं सांगतात.पण अचानक मीना घरातून नाहिशी होते.ते रोमांचक आणि भावस्पर्शी कथानक 'ऋतू बसंती रुठ गयी' आहे.

'नालायक'ही गोष्ट मास्तर आणि भुतपूर्व विद्यार्थ्यांच्या वर्तनाची कथा आहे.तीन वेगवेगळे विद्यार्थी मास्तरांच्या घरी येतात. दोघेजण आमचं करिअर तुमच्या त्या शब्दांमुळे कसं बरबाद झालं याचा लेखाजोखा मांडतात.तर तिसरा विद्यार्थी एम.ए.होऊन पुढील शिक्षणासाठी परदेशी निघालेला असतो. तेंव्हा आशिर्वाद घेण्यासाठी आलेला असतो.तो म्हणतो. "ज्यांच्या नालायक,नालायक या शेऱ्यांनी माझ्या मनात असल्यास करण्याची इच्छा व ईर्षा निर्माण होऊन मी मनापर्यंत पोचलो.ते पहिले यश माझ्या गुरुचरणी."त्याच वेळी मास्तरांच्या डोळ्यात आनंदाश्रु जमतात.अशी कथा.

 'मी माणूस शोधतोय'या कथासंग्रहातील सर्वच कथा रसपूर्ण, भावपूर्ण आणि माणुसकीचे पैलू दर्शविणाऱ्या आहेत.त्या वाचताना कुतुहलाने उत्कंटा वाढते. नातेसंबधातील वीण आणि वागणं,कृती आणि वृत्ती,सहकार्य आणि मदत  यांचं कथेचा रसास्वाद घेताना वपुंची विचारशील शैली, इत्यंभूत वर्णन आणि चपखल शब्दांनी रसिकांना मंत्रमुग्ध करते.

अप्रतिम!लेखणीस आणि शब्दमहर्षी साहित्यिक वपु अर्थात वसंत पुरुषोत्तम काळे यांस त्रिवार वंदन!!!
श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई

लेखन दिनांक- ९ नोव्हेंबर २०२१

🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾🍂🍃

🍀🌿

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know