Thursday, December 9, 2021

पुस्तकाचे नांव--चंदनाचे हात

वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
 परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
 पुस्तक क्रमांक-८०
 पुस्तकाचे नांव--चंदनाचे हात
 लेखकाचे नांव--लेखक - प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे
प्रकाशक-संस्कृती प्रकाशन,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-जून २०१८/तृतीय आवृत्ती
एकूण पृष्ठ संख्या-१२४
वाङमय प्रकार --ललित
मूल्य--१४०₹

📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚 ८०||पुस्तक परिचय
         चंदनाचे हात
लेखक - प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे 

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
"एखादा एखादा गुणधर्म सांगण्यासाठी आपण प्रतिकांचा वापर करतो. जे चिरंतर आहे त्याला 'अमृत' म्हणतो.जे अखंड आहे त्याला'आकाश' म्हणतो.आणि जे स्वतः झिजून इतरांना सुगंध देते. त्याला 'चंदन' म्हणतो. चंदन हे त्याग,प्रेम मांगल्य, करुणा, सेवा अशा मूल्यांचे प्रतीक आहे. ही मूल्य देणारे हात ज्ञानोबा-तुकोबा, विवेकानंदांसारख्या संतमहंतांना लाभले होते.अशी दातृत्वाची धन्यता ज्या हातांना लाभते त्यांनाच'चंदनाचे हात' म्हणतात.हे हात आम्हाला दातृत्वाचा सुगंध आणि सुसंस्कृत मानव्याचा प्रकाश देतात." हे विचार सुगंध 'चंदनाचे हात' या वैचारिक ग्रंथातील प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे यांच्या लेखणीच्या अक्षर प्रकाशाने...आपण सगळेजण या प्रकाश किरणांत मन उजळून घेऊया.विवेकदीप प्रज्वलित करूया!

जीवन उन्नत करणारे साहित्य आकाराने छोटे-मोठे असो ते काळाच्या उदरात गडप होत नाही. जीवनाला उन्नत करणाऱ्या या साहित्य कृतींना समाजाच्या विस्मृतीचा शाप नसतो.रसिक वाचकांच्या अंत:करणात पिढ्यान पिढ्या सत्ता प्रस्थापित केलेल्या साहित्यकृती आणि त्यांचे वाचक हे सदैव चिरतरुणच राहतात. निदान आपले उमदेपण जपण्यासाठी एकमेकांना समजून घेण्यासाठी, मनव्यापक उदार होण्यासाठी अंतर्यामी हे साहित्याचे झरेखळाळले पाहिजेत.हे झरे जीवनाला प्रवाही ठेवतात.जगण्याला नाद देतात.

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते वाचण्याची तृष्णा भागवून मनाला तृप्त करतात.मनाचे बळ वाढवायला असे काही ग्रंथ असावेत.त्यापैकीच एक वैचारिक प्रबोधन करणारा ग्रंथ 'चंदनाचे हात' हा ख्यातनाम साहित्यिक व्याख्याते म्हणून नावलौकिक असलेले प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे यांचा आहे.

गेल्या तीन दशकांपासून मानवतेचा अखंड जागर मांडणारे साध्या सरळ विचारांचे जागरण करणारे,समाज सुधारकांना दैवत मानून सुधारणांचे विचारवैभव लोकांपर्यंत अमोघ वाणी आणि लेखणीने पोहचविणारे प्रभावी प्रसिध्द व्याख्याते प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे यांचा हा ग्रंथ आहे.त्यांना अनेक पारितोषिके आणि पुरस्कार देऊन  सन्मानित केले आहे.महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार व उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या साहित्यकृतिसही अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

 'चंदनाचे हात'हा ग्रंथ साहित्य वाचनाचा आस्वाद घेऊन, आपण जीवनात आनंद कसा मिळवावा याची जाणीव करून देतो.असे विचारधन डॉक्टर यशवंत पाटणे यांनी ललित प्रबोधनात्मक लेखातून व्यक्त केले आहे.या ग्रंथांत प्रतिभावंत साहित्यिक वाणीचे माधुर्य आणि विचारांचे ऐश्वर्य लाभलेले प्राचार्य यशवंत पाटणे यांची,वैचारिक पुष्पे उद्याच्यापिढीला ऊर्जा,प्रेरणा,भक्ती शक्ती आणि करण्याची प्रेरणा आणि संस्कार देतील.

संतसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक ज्येष्ठ आणि सन्मित्र कीर्तनकार हरिभक्त परायण श्री प्रमोद महाराज  यांच्या स्नेहसंवाद आणि सात्त्विक सहवासामुळे 'चंदनाचे हात'हा ग्रंथ साकारला यांचा आवर्जून उल्लेख केला आहे.

जगतगुरु संत तुकाराम महाराजांचे जीवन कार्य म्हणजे चंदनी वृक्ष असल्याची प्रचिती'चंदनाचे हात'हा वैचारिक अमृतकुंभ ग्रंथाचा रसास्वाद घेताना  येते. संकटाच्या महाभयानक सर्पांनी वेढलेले असताना आपल्या अभंगातून सात्त्विक गंध देणाऱ्यांचे जीवनव्रत त्यांनी निष्ठेने जपले.आणि मराठा सारस्वताला ज्ञानाचा अमृतकुंभ बहाल केला.त्यांचे अभंग जगण्याचे आत्मभान देतात. अंतकरणातल्या माणुसकीला ईश्वराची साद घालतात.वैचारिक लेखांचे रसग्रहण करताना अखंड वाचनदीप तेवत ठेवावा वाटतो.

'चंदनाचे हात'हा सुविचारांचा प्रबोधनात्मक ग्रंथ असून यात जगतगुरु संत तुकोबारायांचे अभंग, ओवींचे निरुपम  विविध उदाहरणे दाखले गोष्टी सुविचार चरण कथा आदी शब्दांच्या सात्त्विक सौंदर्यातून गुंफले आहे.संपूर्ण लेखमालिका
जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंग व ओवींचा अर्थ सांगणारी आहे.संत सज्जन थोर व्यक्तींची लक्षणे आणि सद् वर्तन यांचीमाहिती लेखाचे वाचन करताना पानोपानी लक्षात येते.

लेख वाचतानाच लेखणीची खासियत आणि प्रतिभा तर लेखकांच्या संतसाहित्य अभ्यासाची व प्रगल्भतेची ओळख अधोरेखित होते.इतकं प्रवाही रुचेल आणि पटेल अशा मधाळ रसदार ओजस्वी भाषेत ३४ लेखांचे निरुपण आणि प्रवचन असल्याची अनुभूती येते.

यातील 'वैचारिक अवतरणे' वाचताना मनस्वी आनंद मिळतो. लिखित संग्रह करण्याचा मनात येते.वास्तव,यथार्थ व समर्पक विवेचनातून जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या आदर्श जीवनाचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. कारण जीवन कार्य आणि अभंगवाणीचे चित्रण म्हणजे 'चंदनाचे हात'हा प्रबोधनात्मक ग्रंथ वाटतो. इतका निर्मळ,सकस व सात्त्विक विचारांचा अक्षरदीप आहे. निवेदक तथा सूत्रसंचालनकरणेसाठी या पुस्तकातील उपयोगी संस्मरणे व परिच्छेद वेचक व वेधक आहेत. संग्राह्य असणे अत्यंत आवश्यक वाटते.इतकं अवीट,मधाळ व रसाळ शैलीत संस्कारातील अभंगांचे निरुपम केले आहे. बहुसंख्य अभंग, ओवी,संस्मरणे आणि वेचे विचार प्रवर्तक आहेत.'एक तरी ओवी अनुभवावी' या अभंगवाणीने 'अनुभवाचे भावमहात्म्य' या लेखाने पुस्तकाचे अंतरंग प्रथमतःउलगडते.
'छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात, पण घेतलेल्या अनुभवांचे वाचक,लेखक आपणच असतो. आपला जीवनग्रंथ नानाविध अनुभवातून सिध्द होत असतो. 'शाळेतल्या धड्यापेक्षा अनुभवातून मिळालेला धडा सदैव उपयोगी पडतो.
'वेळेचे महत्त्व' सांगताना संत ज्ञानेश्वरांच्या ओवींचे ममत्त्व उलगडतात.'तो जात वेल्हाळ| ज्ञानाचे वेळाऊळ|हे असो निखळ|ज्ञानचि तो||
बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व हे मानवी जीवनातील तीन महत्त्वाचे टप्पे.तसे तीन गोष्टी आयुष्यात महत्त्वाच्या असतात.वेळ, ऊर्जा आणि पैसा (संपत्ती).बालपणात वेळ व ऊर्जा पुष्कळ असते.तेथे पैसा दुय्यम.तारुण्यात ऊर्जा भरपूर ,त्या जोरावर पैसा कमविता येतो.पण कुटुंबाने कुठं फिरायला जाऊया म्हटले तर वेळ नसतो.वृद्धवात गाठीला वेळ व पैसा पण ऊर्जा कोठून आणायची? म्हणून जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात ऊर्जा आवश्यक आहे.ती विचारातून येते. जीवनाचे सोने करते.म्हणून, "आयुष्यात येणारे क्षण आनंदाने, उत्साहाने आणि वृत्तीच्या प्रसन्नतेने उजळून टाकते.हाच खराजीवनगौरव होय.

संवाद कौशल्य म्हणजे बोलण्यातून समोरच्या व्यक्तीच्या अंत:करणात प्रवेश करण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे संवाद. संवादातील शब्द कोरडे नसतात.शब्दांना भावार्थ असतात.  संवादात कधी मृदू भावनांचे पाझर असतात, तर कधी उद्रेकाचे कठोर प्रहार असतात. शब्दांना फुलांचा गंध असतो तर कधी शस्त्राची धार असते. शब्द दुवा असतात, दवा असतात. तर कधी शब्दच उभा दावा निर्माण करतात. शब्द जीवाचे जीवन असतात. संत तुकोबाराय शब्दालाच देव मानतात..
' शब्दां नाही धीर| ज्याची बुद्धी नाही स्थिर| त्याचे न व्हावे दर्शन|

ईश्वराने माणसाला जीभ दिली, त्या जिभेची दोन कार्ये असतात.एक ताटातले अन्न पोटात टाकणे आणि दुसरे पोटातले शब्द ओठातून बाहेर टाकणे.त्या संवादातील शब्दांना मांगल्याचा स्पर्श असेल तर शब्दांची ओवी होते.पण त्या शब्दांना क्रौर्याचा स्पर्श असेल तर त्या शब्दांची शिवी होते.आपण ठरवायचे ओवी गायची की शिवी द्यायची. लागट बोलायचे की लगट करायचे.संवाद माणसांना जिंकण्याची, हरलेल्या माणसांना उभारी देण्याची कला आहे.बोचरे जीवन हसरे करण्याची किमया संवादातूनच साधता येते. संंवादातील कटुता शक्यतो टाळून,गोडवा जपला तर  हृदयाहृदय एक होतात नि तिथेच मग जगणे एक आनंदाचे गाणं होतं.

संत म्हणजे समाजाच्या प्रांगणातील मानवतेची वृंदावने.माणूस हाच संतांच्या चिंतनाचा विषय असतो. मराठी संस्कृतीवर जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा खोलवर अक्षरठसा उमटविला आहे. वाळवंटात झरा भेटावा तसे संत भेटतात.झरा हा निसर्गनिर्मित असतो.पण संतांच्या अंतरंगातील मानवतेचा झरा हा स्वनिर्मित असतो. तहानलेल्या जीवांनासुखावण्यासाठी यांचा जन्म असतो.त्यांचे अवघे जीवन परोपकारी असते. वंदनीय असते.

उमलते फुल उगवता सूर्य आणि उगाळलेले चंदन यातले सौंदर्य आणि सुगंध सार्‍या मानव सृष्टीला मोहवून टाकते.या सौंदर्याची आणि सुगंधाची जाहिरात करावी लागत नाही.संत तुकोबा हे सांगतात,' ना लगे चंदना पुसावा परिमळ| वनस्पती मिळेल हाकारूनी||'सुगंध सृष्टीला बहाल करण्यातच चंदनी वृक्षाची सार्थकता असते.पावसाची सर पडली की, मयूर मातीच्या गंधाने धुंद होतो आणि पिसारा फुलवून नाचू लागतो. मेघाला हे सांगावे लागत नाही,' हे मयुरा, मी कोसळलो रे…आता नाच.' सूर्याला सांगावे लागत नाही, मी प्रकाशलो... आता जागे व्हा.' चंदनाचे आणि सुगंधाचे, मेघाचे आणि मयूराचे, सूर्याचे आणि प्रकाशाचे नाते अतूट असते.असे नाते माणूस आणि माणुसकीचे, ईश्वरी भक्तीचे आणि सात्विक शक्तीचे असते.जगतगुरु संत तुकोबांचे अभंग या अशा नात्याला बळकटी देतात.त्यांचे उपदेश मनाचे उन्नयन आणि सत् प्रवृत्तीचे संवर्धन करणारा आहे.मानवी स्वभावातील विसंगतीचे मजेशीर दर्शन वाचकांना घडत जाते.

दातृत्वाची धन्यता ज्या हातांना लाभते त्यांनाच 'चंदनाचे हात' म्हणतात.हे हात आम्हाला दातृत्वाचा सुगंध आणि माध्यमांचा प्रकाश देतात.समाजात बाभळीची झाडे पुष्कळ आहेत.पण चंदनाची झाडे मात्र शोधावी लागतात.तर  महामानवांच्या रुपाने ती इतिहासाच्या पानांवर विराजमान आहेत.त्याग, सेवा, प्रेम अशा मूल्यांमुळे ती संस्कृतीला प्रकाशमान करतात.'तमसो या ज्योतिर्गमय'हा संस्कृतीचा मंत्र आहे.

'काय सांगू संतांचे उपकार| मज निरंतर जागवती||' आमचा प्रत्येकदिवस गोड करणाऱ्या, आम्हाला जागविणाऱ्या जगतगुरु संत तुकोबारायांचे अभंग सदैव जगाच्या कल्याणासाठीअंत:स्फूर्ती  देत राहतील.आपण या संत विभुतीला विनम्र वंदन करुया. अनुभव, व्यावहारिक शहाणपण आणि दूरदृष्टी यांचे घट्ट नाते जगतगुरु तुकाराम महाराजांच्या अभंगात दिसते.मायमराठीला विश्वपातळीवर विराजमान करण्याचे कार्य ज्ञानोबा-तुकोबाच्या ओवी- अभंगांनी केले आहे.

लेखक प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे यांनी अत्यंत सुंदर शब्दांत अभ्यासपूर्ण लेखमालिकारसाळ शैलीत प्रवाही केली आहे.'चंदनाचे हात' या पुस्तकातील मौलिक विचारधन रसिकांना वाचायला निश्चितच आवडतील. संग्रही असावे असे हे पुस्तक आहे.

परिचयकर्ता-श्री रवींद्ररकुमार लटिंगे ओझर्डे वाई

लेखन दिनांक -३०ऑक्टोंबर २०२१
 🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know