पुस्तक क्रमांक : 29.
पुस्तकाचे नाव : पावसाळी कविता.
कवी : ना. धों. महानोर.
पृष्ठसंख्या : 62.
प्रकाशन : पॉप्युलर प्रकाशन.
स्वागतमूल्य : 125 रुपये.
पुस्तक परिचयकर्ता : श्री. मनोज अग्रवाल.
पदमश्री पुरस्कार विजेते रानकवी ना. धों. महानोर यांनी रचलेल्या आशयघन, निसर्गाच्या सौंदर्याचे विलोभनीय दृश्य वर्णीनाऱ्या वाचनीय, श्रवणीय कवितांनी सुसज्ज कवितासंग्रह म्हणजे 'पावसाळी कविता' होय.
पावसाळी कविता हा एकच विषय घेऊन लिहिलेल्या 50 कवितांचा हा कवितासंग्रह आहे.
महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व सौ. वेणूताई चव्हाण यांना समर्पित केलेला हा कवितासंग्रह कवीच्या मनातील महाविभूतींच्या प्रती असलेला आदरभाव दर्शवतो.
सुरवातीलाच कवी लिहितात ,
मी माझ्या मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा
इथल्या मातीमध्ये रुजवल्या चैतन्यच्या बागा
इथले रानोमाळ सघन घन पसरीत हिरवी द्वाही
झुलत झुलत मस्तीत बुडाले गाणे आणिक मीही
एका तऱ्हेने पावसाचे मनाेगतच वाटते अशी आपणास प्रचीती येते .
पाऊस आल्यावर झाडांची, पानांची ,पक्ष्यांची ,कशी स्थिती होते, हे कवी अतिशय छान रीतीने असतात
पानांमधली धूळ झाडीत पक्षी उठून झाडांतून रानोमाळ भरकटताना पंखांवरती पिवळे ऊन
उन्हाचे अतिशय सुंदर निरिक्षण कवींनी येथे केलेले आहे.
केळीच्या भावनांबद्दल कवी लिहितात ,
केळीच्या बनात चांदणं उतरलंय कमळणबाई
जरा अंगावर पांघर.
पानांना मानवी भावनांचे कोंदण लावून कवी रचतात ,
पानं कानात सांगतात
पानं पांगतात
पानं शरमिंदे होतात
आपसात डोळेझाक करतात
अंगभर चांदणे
जवानीचे
तिचे जडभर बोलणे
लाखाचे
डोळे आंधळे होतात
तिच्या डोळ्यात
कवीच्या भावनांचे विविध कंगोरे या ओळींमधून आपणास प्रकर्षाने दिसून येतात .
सन्नाट दुपारी पावसाळ्याच्या दिवसांत नेमकं काय घडतं, हे कवी अतिशय सुंदर पध्दतीने लिहितात .
झाडांच्या सावल्या
पाण्यात उतरतात
उन्हाच्या पारी
वेंधळ्या डोळ्यांचे
पक्षी चुकारतात
कडेकपारी
नागव्या उन्हाची
देखणी दृश्य काय सांगतात हे कवी अप्रतिम रीतीने रचतात -
दांडाच्या पाण्यात
चिमण्या न्हातात
पंखभर
उडाल्या
थेंबांच्या
जास्वंदी
चांदनी बनात
आषाढ निखळ पंखांनी
रानात उतरल्यावानी
पानात पिकांच्या
निळे कवडसे
सांजसावळे कोणी
पावसाळ्याच्या दिवसांत सांजवेळ ही किती नयनरम्य असते हे कवी अतिशय अद्वितीय पध्दतीने रचतात .
पावसाळ्याच्या दिवसांत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे संसारीन ही नेमकी कशा पध्दतीने वागते ,हे कवी कवितेच्या माध्यमातून व्यक्त करतात.
संसार पाठीशी बांधून निघाली गरिबी दुष्काळात
प्रत्येक गावकोसात वाळल्या झाडांचे वैराणपण ,
एकले नशिबाहूनही.
कोणीही पदरात देणारे नाही दान कष्टाचे सुद्धा.
फाटक्या गोधडीचे गाठोडे बांधून लेकरांसाठी
वैशाखी उन्हात रानात रडणारी दुपार एकटी.
ग्रामीण जीवनाची वास्तविक विदारकता कवींनी या कवितेतून प्रांजळपणे व्यक्त केली आहे .
कवी पुढे व्यक्त होतात ,
बाई जन्माचे धिंडवडे सांगू कसे
झाकू कसे चुलीतल्या गौरीला चुलीमध्ये जाळायचे
पान गळल्या झाडांचे दु: ख सांडले आकाशी माझ्या घरटय़ाच्या दारी माझे पाय वनवासी
पिकल्या पानाला घरातच किती वाईट वर्तणूक मिळते हे कवीला या कवितेतून म्हणायचे आहे .
आजचा समाजवाद किती पोकळ आहे हे कवीपुढे उच्चारतात ,
या शपथा, हे विश्व यांना काही नवे नाही
समाजवादी शब्दांमधली उडून गेली सगळी शाई
कठड्यामधले हे लोक चष्मे पुसून गोड हसतात
यांचे डोळे घुमटा मधल्या पातळीचे यंत्र असतात .
ना धों महानोरांचे प्रसिद्ध गीत या कवितासंग्रहात आहे ,
मी रात टाकली
मी कात टाकली
मी मोडक्या संसाराची बाई लाज टाकली
या पंखावरती मी
नभ पांघरती
मी मुक्त मोरणी बाई, चांदण्यात न्हाती
अंगात माझिया
भिनलाय ढोलिया
मी भिंगर भिवरी त्याची वो मालन झाली
मी बाजींदी, मनमानी ,
बाई फुलात न्हाली.
ना.धों. महानोर यांचे आणखी एक प्रसिद्ध गीत या कवितासंग्रहात आहे ,
आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखरं
या झाम्बऱ्या गर्दीत मांडून इवले घरं .
या डोंगरवस्तीवर
भोळ्या संभूची पाखरं
त्याच्या पंखात पंखात नांदतोय संसार
या पिकल्या शेतांवर
त्याच्या आभाळाचा जर
चांदण्या गोंदवून धरलीया झालर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखरं
बहिणाबाई चौधरींच्या कवितांचा वारसा एकप्रकारे पुढे नेणारे ना .धों .महानोर हैराण कवी आहेत.
कवीही लिहितात ,
कोण्या राजान राजान शेवडी खंदली
कोणा राणीनं राणीनं पाणीज भरलं
कोणा राणीचे राणीचे तोडेज हरवले
कोण्या राजानं राजानं उचलून घेतले
कोण्या राणीनं राणीनं तोडेज मांगले
कोण्या राजानं राजानं तोडेज दिधले
कोण्या राजाच्या राजाच्या डोळ्यात भरली
कोण्या राणीला राणीला दिठज लागली
यावरून बहिणाबाई चौधरींच्या लेखनाचा प्रभाव ना धों महानोरांच्या लेखणीवर अप्रत्यक्ष रीतीने पडलेला आहे हे आपल्याला लक्षात येते .
पावसाळी वातावरणाचा, सौंदर्याचा ,लावण्याचा सर्वंकष वेध घेणाऱ्या कविता या कवितासंग्रहात आहेत. आपल्या संग्रही असावा एक उत्तम कवितासंग्रह म्हणजेच पावसाळी कविता होय.
शेवटी मला पृष्ठावर प्रसिद्ध लेखिका विजया राजाध्यक्ष यांनी अतिशय महत्त्वपूर्ण मत व्यक्त केले आहे .
ना .धों .महानोरांच्या इतर कवितांप्रमाणेच चैतन्य हा या कवितांमध्ये ओतप्रोत भरलेले आहे ,असे मत विजया राजाध्यक्ष मांडतात .
या महाकवीस विनम्र नमन!
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know