Saturday, October 16, 2021

पुस्तकाचे नांव--बाजिंद

वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
 परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
 पुस्तक क्रमांक-५८
 पुस्तकाचे नांव--बाजिंद
 लेखकाचे नांव--पै.गणेश मानुगडे
प्रकाशक-मेहता पब्लिकेशन्स हाऊस,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२०१८ पुनर्मुद्रण
एकूण पृष्ठ संख्या-१५८
वाङमय प्रकार ( कथा, कादंबरी, ललित ई. )--
ऐतिहासिक कादंबरी
मूल्य--१८०₹

-----------------------------------------------

महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीमहाराज, यांच्या स्वराज्यातील शिलेदार गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या थरारक,साहसी, अतुलनीय पराक्रम आणि बुध्दीचातुर्य व हजरजबाबीपणाचा इतिहास.
त्यांनी मर्दुमुकी गाजवलेले अनेक उत्कंठावर्धक घटना प्रसंगाचे वर्णन अप्रतिम शब्दसाजात केलेले आहे.

सुवर्णाक्षरांनी कोरलेला जाज्ज्वल्य इतिहास मल्लविद्या जोपासणारे लेखक पैलवान गणेश मानुगडे यांनी 'बाजिंद' या कादंबरीत गुंफून अनेक ऐतिहासिक घटनांची रहस्यमय कथा वाचताना लेखकांच्या लेखणीची ताकद लक्षात येते.

अप्रतिम स्थळ काळ, व्यक्तिंचे चेहरे त्यांचे संभाषण आणि घटनाप्रसंग वर्णंनाचा रसास्वाद घेताना प्रत्यक्ष जीवंत नाटकाचा प्रयोग चालू आहे असं दिसतं. दमदार आणि रोमांचकारी वर्णंन अफलातून लेखनशैलीत केले आहे.

पुस्तक वाचताना तहानभूक विसरून आपण वाचण्याच्या आहारी जातो.
प्रत्येक वेळी पुढं काय घडतंय ?  याची कुतूहल व उत्सुकता वाढत जाते.इतकं रसभरीत वर्णने केलेली आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे जनतेचे सुराज्य कसे झाले याचे दर्शन ही कादंबरी वाचताना होते.प्रखर राष्ट्रप्रेम,
युध्दाचा थरार आणि भावभावनांची गुंतागुंत यांची अलौकिक मांडणी म्हणजे बाजिंद साहित्य कृती होय.

स्वराज्याशी फंदफितुरी करणाऱ्यांचा चौरंग करून ,हात कलम करून रायगडाच्या टकमक टोकाच्या सुळक्यापासून खाली फेकले जायचे.त्याचा अक्षरशःचिखल व्हायचा.कोल्ह्या- कुत्र्यांची  मेजवानी व्हायची पण त्यामुळे जंगली श्वापदांचा सुळसुळाट झाला.एखादे वेळी टकमकावरुन मढं आलं नाही तर भुकेने कासावीस झालेली जनावरे टकमक टोकाच्या खाली असणाऱ्या धनगरवाडीतील जित्रांबावर हल्ले करुन लागले. त्यामुळे वाडी भयभीत झाली.गावचा कारभारी सखाराम व सोबतीला  मल्हारी,सर्जा,नारायण हे गाऱ्हाणे घेऊन रायगडावर दफ्तरी खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना फिर्याद सांगायला निघाले होते.

तेथून पुढं जंगलातील वाट तुडवत जाताना घडलेल्याअनेक रहस्यमय प्रसंगांचे,घडामोडींचे वर्णन कादंबरीकार पैलवान गणेश मानुगडे यांनी अप्रतिम शैलीत केले आहे. 

धनगरवाडीच्या कारभारी सखाराम व त्याच्या साथीदारांची गुप्तहेर बहिर्जी नाईकांचा चेला असलेला मल्ल व समशेर बहाद्दर खंडोजी सरदेसाईयाच्याशी नाट्यमयरीत्या झालेली भेट,रायगडावर प्रवेश मिळवून द्यायचं खंडोजीचं आश्वासन,सावित्री(साऊ)-खंडोजीची प्रेमकथा,महाडचे राजे येसाजीराव राजेशिर्के यांचा यशवंतमाचीतील  काळभैरव यात्रेतील कुस्तीचा आखाडा, राजेशिर्के-कदंब यांचे हाडवैर,बहिर्जी नाईकांनी शिर्क्यांवर केलेला हल्ला,चंद्रगडचे राजे चंद्रभान देसाई व जंगलाचे अद्भूत रहस्य बाजी आणि मुघल सरदार हुसेनखानची रहस्यमय कथा, बाजीला अवगत असलेली पशुपक्ष्यांची सांकेतिक भाषा, आपल्या वंशजाला 'बाजिंद'ला त्या भाषेचा दिलेला वारसा अशा थरारक,नाट्यमय आणि अद्भुत घटनांनी वळण घेत 'बाजिंद'कादंबरी पुढे सरकत रहाते.

या कादंबरीत बहिर्जी नाईक यांची रयतेचे राजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रति असणारी स्वामिनिष्ठा वाचताना अंगावर शहारे उभे राहतात.

स्वाभिमानाचा ''जरीपटका भगवा ध्वज मनात अभिमानाने डौलत राहत होता.''अहो नशीब काय काका, या भणंग भिकाऱ्या बहिर्जीच्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या परिसाचा स्पर्श झाला.आणि आयुष्याची सोने झाले.नाहीतर गावोगावच्या यात्रेजत्रेत सोंगं करत भिका मागत हिंडलो असतो.जे काय माझे सर्वस्व आहे.ते श्रेय केवळ शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याला आहे.वस्ताद काका तुम्हाला इथंवर आणणं,खंडोजीकडून शिर्क्यांना स्वराज्यात आणणे.त्यांच्याकडून छोटीछोटी शंभर राज्ये स्वराज्यात घेणे.याचे खरे सुत्रधार आहेत त्याचे नांव आहे.छत्रपती शिवाजी महाराज.त्यांच्या आदेशा शिवाय हा बहिर्जीच काय  स्वराज्यातला अणुरेणु सुद्धा निर्णय घेऊ शकत नाही. बाजींद हे सारं ऐकताना त्याच्याही अश्रुंचा बांध फुटला होता.

आजवर या बाजिंदने जगाला घाबरवून फुशारकी मारली. त्यालाही उमजले की खरे बाजिंद तर  छत्रपती शिवाजी महाराज आहेत.स्वराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक कार्यावर  प्रेम करणाऱ्या  समस्त मावळ्यांनी ही कादंबरी आवर्जून वाचावी.

# परिचयकर्ते श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know