Friday, October 15, 2021

पुस्तकाचे नाव : ठिकरी

वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक क्रमांक : 30.

पुस्तकाचे नाव : ठिकरी.

लेखक : व.पु. काळे.

प्रकाशन संस्था : मेहता पब्लिशिंग हाऊस.

पुस्तक पृष्ठसंख्या : 76.

स्वागतमूल्य : 80 रुपये .

पुस्तक परिचयकर्ता : श्री . मनोज
                            अग्रवाल.

     थोर साहित्यिक ,कादंबरीकार, फोटोग्राफर, व पु काळे  यांची गाजलेली ठिकरी ही कादंबरी  वाचली.  ज्याप्रमाणे एखाद्या रहस्यमय  कथांचा समावेश असलेला चित्रपट बघताना आता पुढे काय होईल असे जिज्ञासेने भरलेले प्रश्न मनात उभे राहतात   त्याप्रमाणेच अतिशय रहस्यमय पद्धतीने ही कादंबरी व पु यांनी लिहिली आहे  
  या कादंबरीमधील सोना नावाची मुलगी कशाप्रकारे ठिकरी होऊन जाते आणि वेगवेगळ्या चौकटींमध्ये ती फेकली जाते हे वपुंनी अतिशय  अतिशय भावोत्कटतेने रेखाटले आहे . 
     चैत्राली नावाची एक सुंदर मुलगी मुंबईला येते. तिचा मित्र रमण तिला घ्यायला येणार असतो ; पण रमन विमानतळावर येतच नाही .एकटी असणारी चैत्रालीची ओळख सोनालीशी हाेते . अपरिचित असणाऱ्या लोकांमध्ये ,अपरिचित असलेल्या शहरामध्ये चैत्रालीला, सोनाली राहायला जागा देते  चैत्रालीला खूप दु :ख होतं, कारण रमण तिला घ्यायला येत नाही .  चैत्रालीला सोनाली एक गोष्ट सांगते .  सोनाली चैत्रालीला एक सत्य दीर्घकथा सांगते.
    ती अशी की सोना नावाची एक मुलगी होती .ती तीन वर्षांची असताना तिच्या वडिलांचे छत्र हरवले.  तिच्या वडिलांचं नाव राजा असतं. हे राजा यांचा मित्र काका आणि सोना हिची आई विजयाबाई यांच्यामध्ये विवाह होतो . काका सोनाला तिच्या वडिलांची उणीव मुळीच भासू देत नाही . सोना देखील वडिलांचं दु: ख विसरून जाते.  विजयाबाई आणि काका हे गुण्यागोविंदाने नांदतात आणि सोना देखील अतिशय आनंदित असते . मात्र एकेदिवशी काकांना विजयाबाई म्हणतात की माझ्या मनात अजूनही  राजा आहे. त्यामुळे ते दुखावले जातात.  नंतर काका हे विजयाबाईंना कधीच स्पर्श करत नाहीत. काही वर्षांनंतर विजयाबाई आजारी पडतात आणि अंथरूणाला खिळून राहतात  .अनेक वर्षे काका स्वत: ला विजयाबाईपासून  आईपासून वेगळे ठेवतात, मात्र त्यांची शुश्रूषा करायला ते विसरत नाही . विजयाबाई आणि त्यांच्यासोबत यशोदाबाई देखील तिथे असतात.  सोना आता मोठी झालेली असते आणि सोनाचं वय उंच भरारी घेण्याचं असतं .मात्र एकेदिवशी असा प्रसंग घडतो, त्या प्रसंगाने सोना पूर्णतः उद्ध्वस्त होऊन जाते .काकांकडून एक अनपेक्षित कार्य घडतं . काका हे सोनाचा बलात्कार करतात .  ज्या व्यक्तीने आपल्याला लहानाचं मोठं केलं आणि एका रोपाचं एका उमद्या वृक्षात रूपांतर केलं अशा व्यक्तीकडून आपल्यावर बलात्कार झाला  हे सर्व सोनाला असह्य होतं.  सोना काका, विजयाबाई आणि यशोदाबाई यांना सोडून मुंबईला येते.  मुंबईला महेश हा सिंधी माणूस तिला आश्रय देतो.  सोना ही बलात्कार झाल्यामुळे गरोदर राहिलेली असते.  तिला लहानपणापासून मोठे होईपर्यत जीव लावणाऱ्या प्रेम करणार्या काकांकडून अनपेक्षित असं कार्य घडतं . मात्र बलात्कार पीडित झाल्यामुळे ती त्या मुलाला जन्म देऊ इच्छित नाही.  महेश सोनाला पुरेपूर सहकार्य करतो.  सोनाला गाडी घेऊन घेतो .तिचं ऑफिस थाठतो. पासपोर्टचा बिझनेस ती अतिशय यशस्वीपणे करते.  पुढे महेश आणि सोना यांचं लग्न होतं . हनिमून दरम्यान ते भारतभर फिरतात.  नंतर हनीमूनला खर्च झालेला पैसा कसा परत मिळवायचा याबद्दल महेश सोनाला बोलतो.  लग्नानंतर एक महिना गुण्यागोविंदानं नांदणार हे दाम्पत्य यांच्यामध्ये धुसफूस सुरु होते.  महेश हा पैसापिपासू आहे असं सोनाच्या लक्षात येतं.महेशला फक्त पैसा हवा आहे हे तिला समजतं..  मनी इज एव्हरिथिंग हे ब्रीदवाक्य घेऊन महेश  जगत असतो . सोनाला हे लक्षात येतं की आपण वापरल्या जात आहे . सोना जेव्हा मुंबईला येते तेव्हा तिचा मित्र बबन देखील तिच्यासोबत येतो.  मात्र बबनला जेव्हा कळतं की सोनाच्या काकांनी तिचा बलात्कार केलेला आहे तेव्हा तो पळून जातो . महेशला सोडून सोना निघून जाण्याच्या बेतात असते . माधुरी नावाच्या एका तरुण मुलीला फ्लॅटमध्ये महेशने आणलेलं असतं.  माधुरीच्या  आईला पाच हजार रुपये देऊन महेश तिला मुंबईला घेऊन येतो.  हे जेव्हा सोनाला समजतं, तेव्हा त्याला खूप दु :ख होतं.  माधुरी प्रमाणेच खुर्शीद ,लक्ष्मी इतर चार, पाच मुली देखील तेथे असतात. त्या वाईट वळणाला लागलेल्या असतात . पुढे सोना महेशला सोडून निघून जाते .माधुरीला ती सोबत घेते . माधुरीला घेऊन ती बंगलोरला जाते. मात्र आईवडील माधुरीचा स्वीकार करत नाही . नंतर ती माधुरीला मुंबईला परत घेऊन येते आणि पैसे जमा करून तिचा संसार थाटून देते.  सोना जी असते ते दुसरे कोणी नसते तर चैत्राली च्या समोर बसलेली सोनालीच असते . चैत्रालीला हे जेव्हा  कळतं त्यावेळेस ती हमसून रडते . सोनालीला हे लक्षात येतं की आपण आता ठिकरी झालो आहे . ठिकरी प्रमाणे आपण इतस्ततः विखुरले गेलो आहोत ,फेकल्या गेलो आहोत . माधुरीबरोबरील पाच मैत्रिणी असतात त्यांना सोनाली स्वत: च्या मुलींप्रमाणे वागवते व तिचा सांभाळ करते.  स्वत: च्या फ्लॅटमध्ये सोनाली त्या सहाजणी ना सांभाळते . विपरीत परिस्थिती स्त्रीला किती मजबूत बनवू शकते हे या कादंबरीवरून दिसून येतं.  सोनाली हे व्यक्तिमत्त्व किती अफाट आणि दुर्दम्य इच्छाशक्तीने भरलेले आहे हे लक्षात येतं. 
ठिकरी या कादंबरीवरून एक समजले की व पु काळे हे अतिशय महान लेखक होते . त्यांच्या लेखनाचा दर्जा एवढा अत्युच्च आहे की वाचकाला त्यांची कादंबरी पूर्ण होईपर्यंत सोडावीच वाटत नाही.  अशा या महान साहित्यिकास विनम्रपूर्वक अभिवादन!

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know