Friday, October 15, 2021

पुस्तकाचे नांव--बनगरवाडी

पुस्तक परिचय बनगरवाडी

वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
 परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
 पुस्तक क्रमांक-५६
 पुस्तकाचे नांव--बनगरवाडी
 लेखकाचे नांव-- व्यंकटेश माडगूळकर
प्रकाशक-मौज प्रकाशन गृह, मुंबई
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२०१९ सत्ताविसावी
एकूण पृष्ठ संख्या-१३२
वाङमय प्रकार ---कादंबरी
मूल्य--१५०₹
------------------------------------------------
तालमीचे बंद दार औंध संस्थानचे राजे यांनी आपल्या हाताने उघडले.
पुन्हा शिंगे वाजली.वाजंत्रीवाल्यांनी गजर केला.ती मोठी तालीम, हौदा, लाल माती बघून राजाला आनंद झाला.त्यांनी मास्तरांचे नांव विचारुन प्रशंसा केली.ते मास्तरला म्हणाले,
उत्तम आहे!'ज्ञानाबरोबर बलोपासना पाहिजेच!'मग राजेसाहेबांचे छोटेसे भाषण झाले.ते म्हणाले,"माझ्या या मेंढपाळ मुलांनी या एवढ्याशा वस्तीत अशी सुंदर तालीम बांधली, हे बघून माझा ऊर आनंदाने , अभिमानाने भरून आला आहे. 

बलोपासना आणि ज्ञानसंवर्धन हे माझ्या संस्थेचे ध्येय आहे. संस्थानातील विद्यार्थी म्हटला की, त्याची छाती रुंद असावी, बाहू पिळदार असावेत, बुद्धी तल्लख असावी, असा माझा आग्रह आहे.तो आग्रह मी सतत बोलून दाखवीत असतो. माझे बोलणे इथल्या धनगरांपर्यत पोहोचले असेल याची मला कल्पना नव्हती. आता ते पोहोचले आहे आणि प्रत्यक्षात ते उतरते आहे. हे बघून मी चकित झालो आहे. तुमच्या या राजाची छाती दोन इंच जास्त फुगली आहे. जगदंबा तुम्हाला सद्बुद्धी देवो. देव तुमचे कल्याण करो."

 ही कर्तृत्ववान कार्याची पोचपावती आहे.प्राथमिक शाळेचे गुरुजी (मास्तर) नायक प्रधान असलेली ग्रामीण व्यक्तिंचे चित्रण करणारी कादंबरी. ऋषीतुल्य प्रतिभावान कथा, कादंबरीकार तात्यासाहेब व्यंकटेश माडगूळकर यांच्या 'बनगरवाडी' या अजरामर साहित्य कृतींतील गुरुजी आणि बनगरवाडीतील गावकऱ्यांच्या कार्याचा गौरव करणारे भाषण आहे.हे भाषण खरचं मनाला फार भावते.

मराठी साहित्यात कथा-कादंबरीच्या प्रांगणात अनेक नामवंत लेखक आणि वक्त्यांनी लेखणी आणि वाणीने नवा आयाम दिला आहे.
त्यापैकी जेष्ठ साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांनी माणदेशी परिसराचे चित्रण बनगरवाडीत केले आहे.ही कादंबरी १९५५ साली प्रकाशित झाली आहे.या कादंबरीस महाराष्ट्र राज्य सरकारने सन्मानित केले आहे.सन्माननिय तात्यासाहेब म्हणतात की,''मराठी कथा साहित्यात आता चांगल्या माहितीची 'बनगरवाडी' माझ्या माडगुळे जन्मगावाजवळ आहे.वाडीचं नांव लेंगरवाडी अन्य मी दिलेलं नांव 'बनगरवाडी'.माझ्या मनातल्या खडकावर वसलेलं.

  त्यातील सगळी पात्रं मनाच्या वाडीत जन्मलेली.लेंगरवाडीचा परिसर,प्रसंग आणि पात्रे धागे धागे होते.ते मनाच्या मागावर विणून शब्दांचे अक्षरलेणं बनगरवाडीत उठावदार दिसत आहे."सर्जनात्मक काम दृश्य स्वरुपात दाखवणं कठीण असतं.वेलाला कलिंगड दाखवावं तसं एकच पुस्तक मी दाखवीन : बनगरवाडी !चौदाव्या आवृत्तीत माडगूळकर आवडत्या कादंबरी विषयी व्यक्त होतात.

  औंधच्या पंत प्रतिनिधी सरकारनी बनगरवाडी च्या सरकारी शाळेत राजाराम मास्तरची नेमणूक तीन वर्षांसाठी केलेली असते.तिथं हजर होण्यासाठी विभूतवाडीतून भल्या पहाटे माहित नसलेल्या माळरानातील गाडीवाटेने अनवाणी पायाने धुळीत पावलांच्या नक्षीकामाचे ठसे उठवत निघाले होते.पहाटं ते डोक्यावर उन्ह यायच्या वेळेपर्यतच्या माळरानावरील सौंदर्याचे वर्णन अस्खलित केले आहे.प्रत्येक वाक्यात परिसरातील नजरेत भरणाऱ्या नवलाईचे वर्णंन खुमासदार शैलीत ग्राम्य बोलीभाषेत चितारलयं.अगदी माशी ते पक्षी अन् वाटेतील धुळ ते कुडाच्या घरात पेटलेल्या चुलीचा धूर असं इथपासून ते तिथपर्यंत अप्रतिम शब्दात वेचक वेधक वर्णनाची मोहर उठविली आहे.

सपाट मोकळा माळ,बाजरीची तांबडी राने आणि गबाळे पडावे अशी तीस-पस्तीस घरे,अशी बनगरवाडी आहे.कथेचा आस्वाद घेताना वाचक रममाण होऊन जातो.ते प्रसंग घटना आपल्या समोरच पिंगा घालतायत असं वाटतं.नजरेसमोरुन प्रसंग हटत नाहीत.इतके आपण रसग्रहणात गुंगून जातो. 

 ही कादंबरी मला भावली ती यातील माणदेशी व्यक्तीचित्रणामुळे ,पात्रांचे हुबेहूब अस्सल वर्णन वाचताना पात्रातील जिवंतपणा नजरेस भरतो.राजाराम गुरुजी बनगरवाडीत आल्यावर पहिल्यांदा ते लिंबाच्या झाडाखाली पारावर गार सावलीत बसले.तदनंतर पहिल्यांदा भेटलेला भालाईत दादु बालट्या मास्तरचा पेहराव बघून अंडीवाला ठरवतो.ते ओशाळवाणे हसून मी मास्तर आहे म्हणतात.
हाच दादु बालट्या नंतर मास्तरच्या घरी येऊन 'पोरं शाळेत आली तर त्यांना शिकवं, गावाला शिकवायच्या भानगडीत पडू नकोस! अशी
धमकीवजा सक्त ताकीद देतो.
त्याच्या चेहऱ्याचे, बोलण्याचे,चिलीम ओढण्याचे आणि धमकीचे वर्णन अफलातून केले आहे.टिवल्या बावल्या करत जगणारा वजनदार माणूस.

   तर सोशिक आणि सहकार्याला सदोदित पुढं असणारा,शाळेत मुलं आणण्यासाठी प्रयत्न करणारा ,घर बघून देणारा,तालीम बांधायला एक पाऊल पुढे असणारा म्हातारबाबा कारभारी.नातीच्या चोळी प्रकरणात खरं खोटं न करता अबोला धरतो.
त्याची चूक त्याला उमगल्यावर मास्तरशी बोलायला लागतो.
शेवटात त्याला वाईट स्वप्न पडतं.ते खरं मानून सगळ्यांची गाठभेट घेतो.अन् अचानक दुसऱ्या दिवशी ढाळवांत्या होऊन मृत्यू पावतो.
सगळ्या वाडीला दु:ख होते.आणि वाडीवर दुष्काळाचे संकट कोसळते.

शाळेतील मुलांना शिकविण्याची काम हळूहळू सुरू होते.मुलंही येतात.आपण भलं आणि आपलं काम भलं या भावनेने मास्तर मुलांना शिकवित असतात.त्यावेळची शाळा सकाळी व दुपारी भरायची.मुलांना अक्षरांची घटवणूक करतच कारभाऱ्या सोबत गावातील लोकांना ही फावल्या वेळात मदतीचा हात देतात.
आठवड्‍याला गावाकडे जाताना लोकांची कामे तो करायला लागतो. लोकांची लिहून दिलेली पत्रे पोस्टात टाकणे, मनिऑर्डरी करणे अशा प्रकारची तो कामे करतो.जगण्याच्या प्रकरणात तंटा सोडवायला गावाला मदत करणे.अंजीला तिच्या पैशातून कारभाऱ्याला न समजता चोळीशिवून आणून देणे. गावात रहायचे तर गावकर्‍यांना होईल तेवढी मदत करायला हवी.अस त्याला नेहमी वाटायचं.

  शाळेतल्या पोरांबरोबर सदा शाळेत असणारी त्रिमुर्ती म्हणजे आयबु मुलाणी,आनंदा रामोशी आणि रामा बनगर .हे तिघे रोज काहीही न बोलता मास्तरचे व मुलांची तोंड बघत शाळेत बसायचे.रिकामटेकडे पणाचे ज्वलंत नमुने.वेळ घालवणे हाच यांचा जीवनाचा एककलमी कार्यक्रम होता.त्यातला आनंदा रामोशी पोटापाण्यासाठी भाकरीसाठी चोरी करणारा. दिवसा शिवारात टेहळणी करुन रात्रीचा कुणाच्या मळ्यातील कणसं खुडणार, वांगी लांबवणार, मिरच्या तोडून आणणार. दहा-पंधरा दिवसांनी त्यांच्या शेतात जाऊन कुणी नसेल असलं हो असं मळेकऱ्याला विचारणार? 

मागून कोणी देत नाही म्हणून मुकाट्याने नेहणार.आणि मीच नेली होती असं कबूल करणार.मास्तरकडे भाकरी मागायला घरी आल्यावर ते झोपलेत म्हणून भाकरीच्या गटुळ्यासोबत पैशाची थैली लंपास करणारा आनंदा.ते बघून वासना झाली.पण तुमची चोरी करायला तुम्ही काय सावकार का जहागीरदार आहेत का! तुमच्यासोबत असून तुम्हाला दगा देणं खरं न्हाई.म्हणून रुपयेआणून दिले.आणि फिर्यादही करायला सांगितलं.असा आनंदा प्रामाणिकपणे तीन रुपये दहा आणे पोटासाठी खर्च केले सांगून उरलेले आणून देणारा.

 बाहेरच्या काळोखातून दांडगादुडगा वीस- बावीस वर्षाचा माणूस पोटासाठी गावोगावी हिंडतो.'मला कोणीही नाही.आज हितं आलो.
शाळेपुढं लोकांनी सांगितले,मास्तर हाय एकलाच,ज्या त्याच्या सोबतीला,म्हणून आलोय.
'एखतपूरचा मळक्या अंगाचा अन्य मळक्या कपड्याचा आयबू मुलाणी हे पात्रं मास्तर सोबतीला नेहमी वाडीत असतं.घराची शाळेची साफसफाई करणारा.मास्तरच्या मागं सावली सारखा शेवटपर्यंत राहिला. 

त्याकाळातील सामाजिक आर्थिक दारिद्र्याच्या  विदारक परिस्थितीचे आयबू आणि आनंदा हे प्रतिनिधित्व करतात याचे मर्मबेधक विवेचन या कथेत गुंफले आहे.तिसरा सतत चेहरा म्हणजे राम बनगर शांतपणे निर्विकार चेहऱ्याने शाळेत येणार.
सतत अबोल कामधंदा काहीही नाही.

बाप मेंढरं राखणार आणि हा शांतपणे वेळ घालवत बिनदिक्कत राहणार.पण याच्याकडे जुन्या काळातील बुचड्याचे रुपये (चांदीचा रुपया)इतरांच्या मानाने बक्कळ होते.तो मास्तरला त्यांची मोड करूनआणायला गळ घालतो.
मास्तरही त्याला या कामात मदत करत होता.
  व्यंकटेश माडगुळकरांनी कादंबरीत वाडी आणि शाळा याशिवाय इतर व्यक्तिंची स्वभाव वैशिष्ठ्ये आणि विक्षिप्तपणाच्या गोष्टी अफलातून चितारलेल्या आहेत.सताचे लांडगा मारणे, जगन्याचे प्रेमप्रकरण, शेकू-अंजीचे प्रेमप्रकरण, आनंदा रामोशी आणि आयबु यांचे मास्तरांच्या प्रेमासाठी बालट्याला गुपचूप जायबंदी करणं, रामा बनगराच्या बुचड्याच्या रुपयांच्या चिल्लरच्या थैलीची चोरी,बाळा धनगराचा हेकेखोर व आडमुठेपणा, काकुबाचं मेंढरांची संतती शोधण्याचा तोडगा, तालीम बांधणं अशा अनेक प्रसंगांनी धनगरांच्या विविध स्वभावाचे चित्रण केलेले आहे. 

याच बरोबरीने धनगरांचे आणि शेतकऱ्यांचे खडतर जीवनातील चढउतार आणि तिन्ही ऋतू चक्रातील निसर्ग, पीकपाण्याचे वर्णंन,मावल्याईची यात्रा, चावडीवरची सभा,सण उत्सव, मेंढपाळांचे जीवनचक्र ,सुगीच्या काळातले त्यांचे जगणे आणि अवर्षणग्रस्त झाल्यावर पाण्याचं दुर्भिक्ष झाल्याने गाव सोडणाऱ्या गावकऱ्यांची वाताहत कादंबरीत अनुभवायला मिळते.शेवटी तर गावात फक्त काकुबा त्यांची सून, आयबू,मास्तर आणि काकुबाची दोन मेंढरचं उरतात.मुलं नसल्याने शाळा बंद करून तालुक्यातील शाळेत हजर होण्याचा आदेश येतो.उजाड बनगरवाडीला मागे ठेवून मास्तर आयबूच्या सोबतीने गाव सोडतात.

गावाबरोबर गुरुजी म्हणून जपलेले ऋणानुबंध कादंबरीचे रसग्रहण करताना पानोपानी लक्षात येतात.याच कादंबरीवरुन अमोल पालेकर यांनी मराठी सिनेमा काढलेला आहे.यात राजाराम मास्तर श्री चंद्रकांत कुलकर्णी यांनी ताकदीने उभा केला आहे. 
या कादंबरीचे अनेक भाषेत अनुवाद केला आहे.
अशी ही ग्रामीण भागातील सामाजिक,आर्थिक  परिस्थितीचे दर्शन घडविणारीवाचनीय साहित्य कृती आहे.

परिचयक-- श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
लेखन दिनांक १५ मे २०२१

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know