परिचय कर्ता-प्रा.मीनल येवले
पुस्तक क्र.--2
पुस्तकाचे नाव--देहमूठ
डॉ.पल्लवी परुळेकर बनसोडे
कविता संग्रह
बाईपणाची मूठ उलगडणारी --देहमूठ
सध्याच्या भयग्रस्त दिवसात सामाजिक संपर्क कमी झाला. सभा,संमेलने थांबली. सामाजिक अंतराच्या अटींनी माणूस माणसाला टाळू लागला. वर्ष लोटूनही संकट टळलं नाही. भयाची तलवार डोक्यावर टांगून असली तरी मात्र माणूस नावाच्या बुद्धिमान प्राण्याने त्यावर विविध उपाय शोधून काढले.ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान- संगणकीकरण-जनसंपर्क माध्यमांची सहज उपलब्धता यामुळे माणसाला एकमेकांशी जुळून राहणे शक्य झाले आहे.व्यक्त होण्यासाठी, आपल्या आतल्या सृजनाला वाट करून देण्यासाठी त्याने जनसंप्रेषण माध्यमांचा पुरेपूर वापर करून घेतला आहे. त्यामुळे दूरदूरच्या माणसांना भेटता येतं, बोलता येतं,ऐकता येतं. वेगवेगळ्या उपक्रमातून,कवितांच्या कार्यक्रमातून एक धडपडं, हरहुन्नरी,सुस्वभावी व्यक्तिमत्व जे कायम प्रकाशात असतं त्याच्याशी कवितेनं स्नेह जुळवून आणला.चार वर्षापूर्वी वसईच्या डॉ. पल्लवी परूळेकर-बनसोडे यांच्याशी नागपूर ग्रामीणच्या मृदगंध मराठी साहित्य संमेलनात धावती भेट झाली होती."इवल्याशा जाणिवेने" नंतरचा त्यांचा "देहमूठ"हा चौथा कवितासंग्रह त्यांनी स्नेहपूर्वक पाठवला.
कवितेतील अनेकार्थामुळे ती जुनी होत नाही. तिच्यात प्रत्येक पिढीकडून नव्यानं भर पडत असल्याने, कवींकडून वेगवेगळे प्रयोग होत असल्याने तिचे स्थान वरचे आणि अढळ असते. कमीत कमी शब्दात जगण्याचा,जीवनाचा अनुभव साकारण्यासाठी कविता हे महत्त्वाचे माध्यम असल्याने कवितेतून व्यक्त होणाऱ्या भावनेशी,अर्थच्छटांशी म्हणूनच वाचक एकरूप होत असतो.कायम मुठी सारख्या आवळलेल्या स्त्री-देहाच्या आतली खदखद,स्त्रियांच्या मनाची तगमग,जगतानाची तडफड "देहमूठ"संग्रहातील कवितांमधून डॉ.पल्लवी परूळेकर-बनसोडे यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.समस्त स्त्री जातीच्या दुखर्या भावतरंगाची आर्त लय अष्टाक्षरी या छंदात पकडून त्यांनी एक अभिनव प्रयोग केला. या संग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण कविताच अष्टाक्षरी छंदातील आहेत.
स्त्रीच्या जगण्याचे
कष्टाचे,सोसण्याचे, मूक हुंदक्यांचे,तिच्या हळव्या मनाचे, राबण्या-झिजण्याचे,वेगवेगळ्या भूमिकांतून गुरफटत जाण्याचे,व्याकुळ मनाचे,मनाविरुद्ध पचवण्याचे अनेक कंगोरे या संवेदनशील मनाच्या कवयित्रीने "देहमूठ" मधील कवितांमधून उलगडून दाखवले आहेत.आई-बाई-मुलगी-आजी -सून-बहीण अशा अनेकविध नात्याने बांधलेली ती शहरातील,गावखेड्यातील वा वस्ती पाड्यावरील कुठलीही असो तिच्या जगण्याच्या मुळाशी असलेले भोग संपता संपत नाहीत.
थोडे तुझे थोडे माझे
वेदनेचे सैल धागे
गर्भ काळी पोत अन्
कोरे काजळ गं मागे
असा तिच्या भोगवटयाचा समान धागा या कवितांमधून गुंफण्याचा "देहमूठ" मधील हा प्रयत्न मला कौतुकाचा वाटतो.
मुलीचा मासिक धर्म सुरू झाला की, बालपण संपून तिचं बाईपण सुरू होतं. अल्लडपण टाकून तिने समजदार व्हावं अशी तिच्याकडून अपेक्षा केली जाते. तिच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते. पारंपारिक विचारधारेच्या कुटुंबात,गावखेड्यात अजूनही पाळीच्या त्या चार दिवसात तिला दूर ठेवलं जाते.एकाएकी होणार्या या आघाताने ती अस्वस्थ होते, गोंधळून जाते.
कुजबुजे पाणवठा
झाला विटाळ विटाळ
तुही सोसलास ना गं
असा कानोस्याचा काळ
या काळात मन मोकळ करण्याचं विश्वासाचं ठिकाण म्हणजे आई ! ती आपल्या आईलाच थेट प्रश्न करते.आईकडून लेकींकडे चालत आलेली ही अळीमिळी गुपचिळी ची शिळी पत्रावळी, जिनं भातुकलीचे क्षण संपविले अन् बाईपण लादलं ही नि:शब्द उलघाल व्यक्त करणारी "जन्माची शिदोरी" कविता मुलींच्या मनातली घालमेल संवेदनशीलतेने टिपते.
बाईपणाचे निसर्गदत्त भोग वाट्याला आलेल्या वयापासून आई मुलीला जपते.आईच्या जिवाला लागला घोर ती कुणाला दिसू देत नसली तरी तिचं आईपण अधिक सजग होतं.ती लेकीला कळत-नकळत समजदारी चे धडे द्यायला लागते. तिला घर-संसार,भाकरी-टाके,आवरसावर शिकवण्याच्या तयारीला लागते.
जन्मजन्माची तू खूण लडिवाळ तू पैंजण
झुला झुलवी श्रावण
दारी ओले गं शिंपण
आई- बापाला लेक कितीही प्रिय असली,त्यांच्या काळजाचा तुकडा असली,हृदयाचं कोंदण आणि प्रेमाचं गोंदण असली तरी तिची सासरी पाठवणी करण्याचं प्राक्तन टाळता येत नाही. मग तिला सुखासमाधानात ठेवणारा,तिच्यावर भरभरून प्रेम करणारा जोडीदार मिळावा,नांदतं, समजदार सासर मिळावं म्हणून मायबापाच्या जिवाचा आटापिटा सुरू होतो.पण साऱ्यांच्याच इच्छा पूर्ण होतात का ? मनात सुखी संसाराचे स्वप्न घेऊन लेक सासरी येते, माहेरच्या माणसांकडून दूर या नव्या घरात रुजण्यासाठी ती धडपडते तर इथल्या माणसांचा अहंकार, परकेपण बऱ्याच नवविवाहितेची स्वप्न चुरगाळून टाकतं.
कुढकुढ कुढताना
कोंडमारा बोजवारा
रांध रांध रांधताना
सारा सारा रिता भारा
रोज घेते पाखडून
गारगोटे फोलपटं
घाटदार चाकावर
उगा होते फरपट
अशी उपेक्षा,फसगत वाट्याला येऊनही आसवं लपवून, दुःख पचवून संसाराचा गाडा ओढत नेणाऱ्या कितीतरी माय बहिणींचा संघर्षमय संसार आपण उघड्या डोळ्यांनी भवताल पाहत असतो.या भोगण्यातून दोन दिवस तरी सुखाचा वारा लाभावा,मनाचं आभाळ मोकळं करण्यासाठी कुणी विश्वासाचं असावं म्हणून की काय प्रत्येक सासुरवाशिणीला दोन दिवसासाठी का होईना माहेर हवंहवंसं आणि प्रिय वाटतं. सासरी सुख असाे वा उणीवा,कितीही वर्षाचं संसारी नांदणं असो तरीही तिला माहेराची ओढ असतेच.
देव्हाऱ्यात एकलीच
तेवतसे गंधवात
माहेरची सय येता
सय सय देहांगात
माहेरच्या आठवणीने असा तिचा जीव हळवा होतो. काही कारणांमुळे माहेर पारखं झालं असेल आणि सासरी कितीही सुख असलं तरी जगण्याचा एक कोपरा कायम रिताच राहतो. ज्या अंगणात बालपण गेलं,सख्यांसोबत खेळ रंगले ते अंगण, त्या हिरवळलेल्या पाऊलवाटा, पाठशिवणीचा खेळ, पंचमीचा झुला, ते रुसवे-फुगवे,अंगणातली तुळस सारं काही आठवतं.
माझे माहेर आठव
सदाफुलीचे ताटव
जाई जुई मोगराले
कर्दळीचा झुले देह
असा माहेराबद्दलचा अभिमान तिच्या मनात दाटून येतो.
आईला सुद्धा सासरी गेलेल्या लेकीच्या आठवणी अस्वस्थ करतात.लेकीचे ते उनाड, खोडकर दिवस, तिच्या बाहुलीचा थाट, तिचे बालहट्ट आठवून तिचा जीव लेकीच्या भेटीसाठी कासावीस होतो. पण आपली लेक तिथेच रमावी म्हणून "तुझ्या स्वप्नपाखरालाच सांग आता तुझ्या मनीचे गुज" म्हणून आणि लेकीला धीर देते.
"देहमूठ" मधील अनेक कविता बाईपणाचं हळवं,कातर,सोशिक असं भावविश्व अधोरेखित करतात तसाच तिच्या वाट्याला आलेल्या वेदना, तिचा भोगवटाही मांडून जातात.दुष्काळ, नापिकीला कंटाळून कुंकवाचा धनी मृत्यूला मिठी मारतो पण जिवंतपणी घरादारासाठी, लेकरांसाठी, म्हाताऱ्या सासू-सासऱ्यासाठी ती आयुष्य जाळत,हिंमत एकवटून उभी होते --
नाही मारत कधीही
मिठी ती रे मरणाला
जगण्याचा शाप भाळी
तिच्या मुक्या प्राक्तनाला
आई-बाई अशा वेगवेगळ्या भूमिकेतून परिस्थितीशी दोन हात करत ती संसाराचा गाडा ओढत नेते.इवल्याश्या चोचीत धागा धागा आणून पक्षिण घरटं विणते.पिलांना जन्म देते.दाणे टिपून आणते.पाखराला पंख फुटले की ते मुक्त मोकळ्या आकाशात उडून जातं.
इवलुशा पंखालाही
फुटतील दोन पाय
लेकराची होई पुन्हा
एकलीच देहमाय
हे वास्तव ठाऊक असूनही ती आपलं कर्तव्य निभवत राहते."पुण्याई" कवितेत सारे विठ्ठलाचा धावा करतात.रूक्मिणीचा मान नंतरचा --
आधी धावा त्याचा त्याचा म्हणे विठ्ठल बरवा
टिळा टिळा चंदनाचा
म्हणे अनंत केशवा
अशी पुरुषप्रधान व्यवस्थेची झळ रुक्मिणीलाही पोहचलीच ना ! समर्थ रामदासांची शिष्या वेण्णाई ही बालविधवा होती. तिला जननिंदा सहन करावी लागली. हरिकथा,प्रवचने,रामनामात तिने स्वतःला वाहून घेतले.आख्यान,ओव्या,पंचकांडी रामायण,सीतास्वयंवर अशी ग्रंथसंपदा निर्माण करणारी वेण्णाई उपेक्षित जीवन जगली. जननिंदेला सामोरा गेली --
अखेरीस मृत्युलाही
देऊनिया शुद्ध काया
उपासना अध्यात्माची लावुनिया गेली माया
अशी संवेदना कवयित्रीने "वेण्णाई" कवितेतून तिच्याप्रती व्यक्त केली आहे.
पदरात आलेलं जगणं सावरत, अडथळ्यांवर मात करीत,उद्याला सुसह्य करण्यासाठी बाई झटत राहते.ती दुःखाचं भांडवल करत नाही की भोगणं नाकारत नाही. आपली भूमिका ती सकस आणि समरसतेने निभवत नेते.जोगतीण,डोंबारीण,वडारीण, तमासगिरीण,कातकरी,पोतराजाच्या संगतीनं ढोलक बजावणारी, भटकंतीचं प्राक्तन वाट्याला आलेली,उन्हातान्हात मणीमाळा विकणारी, देवदासी,नर्तकी,वेश्या,किन्नर,नवऱ्याच्या आत्महत्येनंतर उध्वस्त झालेला संसार सांभाळणारी बळीराणी, एकटेपण वाट्याला आलेली विधवा,वृद्धा अशा विविध स्तरातील स्त्रियांचं जगणं मांडत त्यांच्या धुमसत्या उद्गारांना वाचा देण्याचा प्रयत्न "देहमूठ" मधून डॉ.पल्लवी परूळेकर-बनसोडे यांनी केलेला आहे.स्त्री- जाणिवांची असंख्य स्पंदने कवयित्रीने आपल्या खास शैलीतून चपखलपणे टिपली आहेत.
तुझा भुकेला संसार
झाला जगाचा बाजार
उभ्या देहाची मालकी
नित्य नवा दरबार
मंदिराच्या पायरीशी उगवलेल्या तुळशीच्या मंजिऱ्याप्रमाणे उपेक्षित जीवन वाट्याला आलेल्या, मंदिरात वाहिलेल्या जोगतिणीचं दुःख कवयित्री मांडते.
गर्दी फाटक्या दिलाची
गर्द वासना मोकाट
ठेव जपुनिया बाई
उभ्या इभ्रतीचा काठ..
अशी डोंबारीणीच्या जगण्याला कवयित्री वाचा देते तर --
मातीचाच रंग माझा मातीचीच चूल माझी
मातीमाती जगताना
छिन्नीछिन्नी मुलं माझी..
असं वडारीणच्या जगण्यातील जीवटपण आणि चिवटपण कवयित्री कवितेतून मांडते.
अंगभर गोंदण,कर्ण फुलांचं ओझं,जखडून टाकणारे हातभर जाडजूड कंगण,पायघोळ घागरा, लखलखती काचभरल्या ऐन्याची चोळी असा युगायुगापासून परंपरा सांभाळत आलेल्या लमाणी,राजस्थानी स्त्रियांच्या साजशृंगारामागची घुसमटही कवयित्रीच्या नजरेतून सुटत नाही.
सुशिक्षित-अशिक्षित,आधुनिक-पुरातन, सुरक्षित-पोटासाठी वणवण भटकंती करणारी अशा विविध स्तरातील स्त्रियांच्या मनतळातलं दुःख शब्दांच्या चिमटीत पकडणं जिकरीचं आणि अवघडच असतं. डॉ.पल्लवी परुळेकर-बनसोडे यांनी स्त्री विश्वाच्या वेदनांचे किनारे समजून- उमजून घेत कवितेची नदी प्रवाहीत ठेवली आहे.
विशाल पाटील यांचे बोलके मुखपृष्ठ, कवीवर्य अशोक बागवे यांची समर्पक प्रस्तावना यांनी कवितासंग्रह अधिक देखणा झालेला आहे. कवयित्रीला पुढील लेखनासाठी माझ्या भरभरून शुभेच्छा.
###############
* कवितासंग्रह- "देहमूठ"
* कवयित्री - डॉ.पल्लवी परूळेकर-बनसोडे
* प्रकाशन - परिस पब्लिकेशन , पुणे
* मो.नं. 9923030101
प्रा. मीनल येवले , नागपूर .
मो. नं. 7774003877
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know