Sunday, July 4, 2021

पुस्तकाचे नाव :- झपूर्झा

📗✒️
पुस्तकाचे नाव :- झपूर्झा 
लेखक :- अच्युत गोडबोले 
पृष्ठ संख्या :-414
मूल्य :-280
पुस्तकाचे एकूण 3 भाग आहेत. 

          पुस्तकांसारखा प्रामाणिक, सच्चा, निस्वार्थी,  निर्मळ असा मित्र या जगात दुसरा कोणीच नाही. पुस्तकांची सोबत असेल तर आपण कितीही मोठे दुःख असू देत त्यातून बाहेर पडू शकतो. पुस्तके ही आपल्या आयुष्यात मार्गदर्शकाप्रमाणे असतात. एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे ठाम आपल्या पाठीशी उभे राहून नव्हे,  आपला हात हातात घट्ट धरून जीवनाचा मार्ग दाखवतात. नुसताच मार्ग नाही तर आपली वाट ज्ञानमयी  प्रकाशाने उजळून टाकतात !
          'पुस्तके ही जगण्याची हिंमत वाढवतात आणि प्रेरणा देतात',' पुस्तके ही मानवी जीवन आनंदी व अर्थपूर्ण करतात', ' जगातील सौंदर्यपूर्ण वस्तू म्हणजे पुस्तक'! ही सारी विधाने लेखक अच्युत गोडबोले यांच्या 'झपुर्झा' या पुस्तकाला तंतोतंत लागू पडतात. 
         अतिशय विस्तारलेल्या या मराठी साहित्याच्या प्रांतातील एक नावाजलेले लेखक म्हणजे ' अच्युत गोडबोले 'यांचे अगदी अचानक पणे झपूर्झा नावाचे पुस्तक माझ्या हाती पडले. वाचनाची अतिशय आवड असलेल्या मला शब्दात वर्णन करता येणार नाही इतका आनंद झाला. आणि अगदी असाच आनंद तुम्हाला व्हावा म्हणून त्यांच्या या पुस्तक वाचून माझ्यात निर्माण झालेले भावतरंग तुम्हाला सांगावे असे वाटले.
         अद्वितीय, अद्भुत, आणि चमत्कारिक जगाची ओळख करून देणारे हे पुस्तक माझ्या हाती येताच  माझ्या कल्पनेच्या पलीकडे जगाची ओळख या पुस्तकाने मला करून दिली. या पुस्तकाचे एकूण तीन भाग आहेत. 
         एक पुस्तक वाचल्यावर दुसरा भाग वाचण्याची माझी भूक वाढतच गेली. या जादूगाराच्या पोटलीत  आणखी कोणकोणते चमत्कार आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता मनात निर्माण झाली. 
         त्यांचे हे पुस्तक पाश्चात्य विदेशी इंग्रजी साहित्यावर  आधारलेले आहे. या खजिन्यातील मोत्यांप्रमाणे  असलेल्या अगदी मोजक्या लेखकांची फक्त नावे मी ऐकून होते. पण कुबेराचा खजिना हाती लागावा त्याप्रमाणे एक एक अलंकार साहित्यिकांच्या रुपाने डोळे दिपवून टाकणारे अशी एक एक कलाकृती घेऊन माझ्या पुढ्यात येऊ लागले. आपल्या मराठी साहित्यातील लेखकांनाही या साहित्याची भुरळ न पडावी हे तर शक्यच नव्हते !
         आपल्या मराठी साहित्यविश्वाला प्रसिद्धीच्या उंच शिखरावर नेऊन ठेवणारी  साहित्य मंडळी सुद्धा या साहित्याने वेडावली आणि त्यांनी या साहित्यापासून प्रेरित होऊन अजरामर अशा साहित्याची निर्मिती केली. 
         या पुस्तकातील इंग्रजी साहित्यिकांची आयुष्ये  अंगावर काटा आणणारी आहेत. या पुस्तकात आपल्याला त्यांची वादळी आणि आश्चर्यजनक आयुष्य तर वाचायला मिळतातच पण त्यांच्या साहित्यकृतींचा आढावा यात घेतलेला आढळतो इंग्रजी साहित्य आणि साहित्यिक यांचा आढावा घेणे हा 'झपूर्झा' चा हेतू असला तरी त्या त्या लेखकाचा आणि लेखनाचा इतिहास रंजकपणे मांडण्याचा प्रयत्न यात लेखकाने केलेला आहे. या पुस्तकाला दिलेला 'झपुर्झा 'हे नाव केशवसुतांच्या एका कवितेवरून लेखकाला सुचले. 
         साहित्य म्हणजे हे त्या त्या लेखकाच्या आयुष्याचे अनुभवांचे प्रतिबिंब तर असतेच !तत्कालीन समाज तसेच सामाजिक, राजकीय,  सांस्कृतिक,  आर्थिक या अंगांचे दर्शन घडवणारे एक चलचित्र देखील असते !औद्योगिक क्रांती आणि दोन महायुद्धे यांचा बराच परिणाम ह्या साहित्यिकांच्या जीवनशैलीवर आणि त्यांच्या साहित्यावर देखील झालेला आढळून येतो. इंग्रजी साहित्याचा इतिहास मला सर्वप्रथम जाणून घेताना तो या पुस्तकामुळे साहित्यिकांची नावे आणि त्यांचे गाजलेले साहित्य यांची  अगदी मुळापासून ओळख झाली. हे पुस्तक भारावून टाकणारे आहे! विचारांना चालना देणारे आहे !आणि नवा दृष्टिकोन देणारे आहे! इंग्रजी साहित्यिकांच्या आयुष्याची आणि साहित्याची रसयात्रा आपण येथे अनुभवू शकतो. 
         सर्व कलांमध्ये साहित्य हे एका बाबतीत इतर कलांपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे! याचं कारण साहित्य आपल्याला एकाच वेळेला इतिहास आणि भूगोल या दोन्हींमध्ये खोलवर डुबकी मारू देतं ! आयुष्यातले अनुभव जितके समृद्ध आणि खोलवर तितके ते साहित्यातही सच्चेपणाने उतरतात. डोस्टोव्हस्की,काफ्का,कामू, हेमिंग्वे अशा अनेकांची स्वतःचे आयुष्ये प्रचंड वादळी होती. त्यांचे आयुष्याचे अनुभव जिवंत होते आणि त्यामुळे त्यांचं साहित्य रसरशीत आणि जिवंत वाटत होतं. 
         नाहीतरी साहित्य म्हणजे तरी काय असतं? "सामान्यामधलं असामान्यत्व ओळखणं आणि नंतर सामान्य शब्दात काहीतरी असामान्य लिहिणे म्हणजे साहित्य" असं बोरीस पास्तरनाक म्हणायचा." हेच अनुभव मनात साठलेले असताना त्याचे तुकडे जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्याचे सुंदर शब्द होतात "असं  खलिल जिब्रान म्हणतं असे !
         या पुस्तकात या सगळ्या लेखकांचे आयुष्य विस्ताराने आली आहेत. हे सगळे लेखक त्यांच्या लेखनाशी प्रामाणिक होते. या लेखकांना जे मांडायचे ते मांडताना ते कधीच कचरले नाहीत. 
         झपुर्झा या पुस्तकाच्या पहिल्या भागात लेखकाने विल्यम शेक्सपिअर,चार्ल्स डिकन्स, लिओ टॉलस्टोय, जॉर्ज बर्नाड शॉ, या साहित्यिकांची आयुष्यावर आणि त्यांच्या साहित्यावर विस्तृतपणे प्रकाश टाकला आहे.
         हे सगळे वाचताना मात्र चकित व्हायला होतं. आणि आपण एखाद्या गूढ आणि स्वप्नवत जगत आहोत असे भास व्हायला होतात. कुठल्याही कलेवर सामाजिक भौतिक परिस्थिती आणि कौटुंबिक अनुभव यांचा जसा परिणाम होतो त्याप्रमाणे साहित्यही कित्येक वेळा समाज परिवर्तनास कारणीभूत ठरतं.  चार्ल्स डिकन्स च्या कादंबऱ्या मुळे कामगार वस्त्यांमध्ये आणि तुरुंगाच्या परिस्थितीत खूप सुधारणा करणं सरकारला भाग पडलं होतं !
         शेक्सपियर म्हणजे इंग्रजी साहित्यातील एक विलक्षण अजब थरार होऊन गेला, यात शंकाच नाही ! त्याच्या नाटकाचे जगातल्या सगळ्या भाषांमध्ये भाषांतर झाले आणि तेही अनेकदा !
         शेक्सपिअरचं गद्य आणि पद्य या दोघांवर तितकच प्रभुत्व होतं. अतिशय तीव्र भावना व्यक्त करताना काव्याचा वापर होतो." सर्वोत्तम नाटक हे काव्यमय नाटकच असतं"  हे टी एस एलियटचे उदगार  शेक्सपिअरच्या बाबतीत तंतोतंत खरे होतात. कुठल्याही उत्तम कलाकृती मागे वेदना आणि दुःख यांचे पाठबळ असते असे म्हणतात. शेक्सपियर सुद्धा याला अपवाद कसा असेल! 1596 साली शेक्सपिअरचा हॅम्नेट हा मुलगा प्लेग चा बळी ठरला. त्यामुळे शेक्सपियर खूप खचून गेला आणि याच काळात त्यांना 'मॅकबेथ' ' किंग लियर' 'ऑथेल्लो ' या शोकांतिका लिहिल्या. पुढे या सगळ्या जगप्रसिद्ध झाल्या. यानंतर त्याने मागे वळून बघितलंच नाही आणि 37 उत्तमोत्तम नाटकं जगाला दिली !
         महादेव शास्त्री कोल्हटकरांनी केलेल्या ऑथेल्लो च्या भाषांतरावर आधारलेलं ' झुंजारराव' हे नाटक गो. ब.  देवल यांनी लिहिले त्यात बाबुराव पेंढारकर,  राजा परांजपे वगैरे मंडळी काम करत. यात त्यांनी कमळजेच्या   तोंडी चक्क गाणी घातली होती. आणि त्यांना संगीत देणारे पु. ल. स्वतः ऑर्गन वर बसत.
         वि वा शिरवाडकर यांच्या ' नटसम्राट 'वर किंग लिअर या नाटकाचा खूप मोठा प्रभाव होता विंदा करंदीकर यांनी किंग लिअर चं अतिशय सुरेख भाषांतर केलं होतं.
        ' एक फुलले फूल आणि फुलून  नुसते राहिले त्या कुणी ना पाहिले' हे गदिमांचं गाणं एमिलीच्या आयुष्याची कहाणी सांगतं. एमिली जिवंत असताना तिच्याकडे खरोखरच कुणाचं लक्ष गेलं नाही. एमिली एक महान अमेरिकन कवयित्री समजले जाते. तिच्या एकांतवासातल्या आयुष्यामुळे तिचं जीवन चरित्र उलट-सुलट चघळलं गेलं.  तिच्या आयुष्याभोवती  एक गूढ वलय निर्माण केलं गेलं.  मात्र तिचं आयुष्य हे रहस्य नव्हतं तर तिच्या कविता हे गुढ होतं. एमिलीचं शब्दांवर असणारा विलक्षण प्रेम ! शब्द या शब्दा वरच एमिलीची   कविता आहे :-
                       A WORD is dead 
                       when it is said, 
                       some say.
                        I say it just 
                        Begins to live 
                        That day. 
         पुस्तकांचे तिन्ही भाग मिळून एकूण 49 साहित्यिक आणि त्यांच्या साहित्य जन्माविषयी च्या रंजक, गूढकथा त्यांचे जीवन,  त्यांचे जगणे,  संकट,  अनुभव त्यांच्यात होत जाणारे बदल या सगळ्या गोष्टींचे विस्तृत विवेचन त्यांनी आपल्या या पुस्तकात फारच ओघवत्या आणि प्रवाही शब्दात साकारलेले आहे,  मांडले आहे. एक अद्भुत,  चमत्कारिक साहित्याच्या विश्वाची सफर घडवून आणणार असं हे आगळेवेगळे पुस्तक होय.
         या पुस्तकाचे तीनही भाग म्हणजे पाश्चिमात्य साहित्यिकांची लखलखणारी आपल्या स्व तेजाने डोळे दिपवणारी असंख्य हिर्‍यांची खाण होय! कोळशाच्या खाणीत हिरा सापडावा त्याप्रमाणे त्या त्या  कालखंडाच्या धूसर,  विषमतेने,  तर्‍हेवाईक परिस्थितीच्या काळ्याकुट्ट अंधारात असंख्य तारे चमकावे आणि तो काळोख उजळून निघावा त्याप्रमाणे हे लकाकणारे हिरे होत.

         असे हे इंग्रजी साहित्याची अगदी जवळून ओळख करून देणारे, आपल्या पुस्तक कोशात भर घालणारे, आपल्या ज्ञानाच्या भांडारात भर घालणारे, नव्या जगाची, विश्वाची, तर्हेवाईक माणसांची ओळख करून देणारे हे पुस्तक खरेदी करून तुम्ही नक्की वाचाल ! अशी अपेक्षा करते. आणि माझ्या पुस्तक परिचयाला विराम देते ! 

सौ. मृगा मंदार पागे 

😊🙂🙏🙏

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know