Sunday, July 4, 2021

पुस्तकाचे नाव -माझे मातीतले पाय

पुस्तक क्रमांक-📗93...🖋️
 पुस्तकाचे नाव -माझे मातीतले पाय
 लेखक-प्रा.अरुण कांबळे

 "माझे मातीतीले पाय"हा काव्यसंग्रह कवीने अत्यंत दर्जेदार व आशयरूप कवितेतून वाचकासमोर आणलेला दिसून येतो.तसेच सदर काव्यसंग्रहाचे हे शीर्षक हृदयाला भिडून जाते.

"माझे मातीतले पाय"या काव्यसंग्रहमध्ये एकूण 61 कवितांचा समावेश या ठिकाणी असून सर्व कविता वेगवेगळ्या विषयावरती असून त्या कवितामधील शब्दफेक, कवितातील मर्म, काव्यपंक्ती यातून कवीचे प्रतिभावंत मन आपल्याला दिसून येते. या सुंदर अशा काव्यसंग्रहाला प्रस्तावनाही सुंदर शब्दबद्ध  केलेली आहे, त्या स्वतः एक उत्कृष्ट लेखिका व कवयत्री,आदर्श व उपक्रमशील शिक्षिका सौ.अंजली शशिकांत गोडसे यांनी प्रस्तावनामध्ये अत्यंत समर्पक ,हृदयस्पर्शी शब्दांमधून काव्यसंग्रहाचा संपूर्ण सारच वाचकासमोर मांडलेला दिसून येतो. या दर्जेदार प्रस्तावनामुळे त्यातील शब्दांच्या गुंफणमुळे या काव्यसंग्रहातील कविता वाचण्याची ओढ वाचकाला लागून राहत असल्याचे आपणास दिसून येते.

"माझे मातीतले पाय" या कवितेने या काव्यसंग्रहाची कवीने केलेली सुरुवात सुंदर आहे.

 माझ्या मायेच्या मातीचा,
         टिळा मस्तकी भाळला
 तिच्या परिसस्पर्शाने, 
         आसमंत गंधाळला.

मातीचं आणि मानवाचं नातं हे खूप अतूट आहे. शेतकरी राजा या मातीतूनच जणू सोने पिकवत असतो. या मातीची जादूच वेगळी असते. एखादे बियाणं मातीमध्ये रुजवलं तर त्याच बियाणांपासून टिच्चून भरलेलं कणीस तयार होते.आणि त्या मातीचा टिळा ज्यावेळेस कवी आपल्या कपाळाला लावतो त्यावेळेस त्याच्या स्पर्शानेच जणू त्याला स्वर्गसुख मिळाले असाच त्याला भास होतो.

"हिरवळ दाटे मनी" या कवितेमध्ये कवीने केलेले वर्णन मनामध्ये गारवा व ओलावा तयार करते.

        आसमंती दूर रानी
                शालू पांघरून घेते 
        हिरवळ शालूची या 
                  भूल मनाला पडते,
        धरतीच्या रुपाची या 
                प्रित मनाशी जडते 

लेखकाला जमिनीवरती ज्यावेळेस हिरवागार गालीचा दिसतो. त्यावेळेस तो जणू हिरवा शालूच आहे असं मनाला भासते. त्या शालूची मनाला भूल पडते आणि या जमिनीच्या रुपाची जवळीकता कवीच्या मनाला लागते.

"बैलपोळा" या कवितेमधून ग्रामीण भागातील या लोकप्रिय सणाचे अत्यंत सुंदर चित्रण कवीने या ठिकाणी केलेले दिसून येते. वर्षभर रानात काबाडकष्ट करणारे बैल म्हणजे शेतकऱ्यांचा जणू मित्र,सखा असतो. या दिवशी बैलांना गोड नैवेद्य दाखवला जातो. त्याची मिरवणूक काढली जाते. हा एक दिवस म्हणजे काबाडकष्ट करणाऱ्या बैलजोडीच्या ऋणातून उतराई होण्याचा एक छोठासा प्रयत्न बळीराजा करत असतो.

" पूर " या कवितेमध्ये प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतर आलेल्या पुरामुळे किती नुकसान होते. हे यातून कवीने व्यक्त केले आहे.

     पूर आला वाहून गेला
            भरल्या माझ्या घरामध्ये              
     आठवडाभर राहून गेला
            सुखाचं घरटं माझं
     काडीकाडीन उभारलेलं 
            पाण्याचं आक्रीत पाहून
      मन माझं ढगाळलेले..

पावसाच्या पुरामुळे अतोनात नुकसान झालेले आपणास दिसून येते.अशा वेळेस मात्र संकटकाळी माणुसकीचं दर्शन मात्रआपल्याला दिसून येते.

"शाळा" ही अतिशय सुंदर अशी शैक्षणिक घडामोडीवर आधारित कविता...

पाटीवरती गिरवता अक्षर       
        पेन्सिलीचा लागतो लळा 
मग्न होऊन गिरवत जाता
        फुलून येतो अक्षर  मळा.....

पाठीवरती अक्षर गिरवता गिरवता आणि आपले ज्ञान वाढवत असताना कधी पाटीची जागा आता मोबाईलने घेतली. परंतु अशा अवस्थेत ही शिकून-सवरून भविष्याची रंगीत स्वप्न आणि त्या स्वप्नांमध्ये रंग भरण्यासाठी आणि आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे धडे गिरवावेच लागणार आहेत.अत्यंत प्रेरणादायक वर्णन या ठिकाणी केलेले आपणास दिसून येते.

"माऊली" या कवितेतील वर्णन हृदयाला हळुवार स्पर्श करून जाते,व ते हृदयाला भिडते.

खांद्यावरती घेऊन मजला
       राब राब राबला होता 
बाप माझा विठूराया 
      माऊली होऊन लाभला होता.

आभाळाएवढा बाप नावाचा देवमाणूस ज्यावेळेस आपल्या मुलांच्या भविष्यासाठी काबाडकष्ट करत असतो. चिंब घामाने भिजत असतो. त्यावेळेस तो साक्षात माऊलीचेच रूप वाटत असतो.

"लेक वाचूया" कवितेमधून मुलीचे महत्त्व अत्यंत समर्पक शब्दात कवीने या ठिकाणी वर्णन केलेले आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने कार्य करताना आपणास दिसून येते.ती दुर्गेचे रूप आहे,आदिशक्ती आहे. जिजाऊ, सावित्री, रमाबाई यांचा वारसा त्यांना लाभलेला आहे. या कवितेत शेवटी कवी एकच म्हणतो.....

लेक वाचवू घराघरातील           
     स्त्री भ्रूणहत्या रोकूया 
क्षितिजावरील नवक्रांतीची 
       ज्योत अबाधित राखूया.....

असा अत्यंत मोलाचा संदेश कवीने या कवितेच्या शेवटी दिलेला आपणाला दिसून येतो.

"पिकले पान" या कवितेमधून कवीने मानवाच्या आयुष्याच्या संध्याकाळी ज्यावेळेस आपण वयोवृद्ध होत असतो. त्यावेळेस आपण हसत हसत व उर्वरित आयुष्य आनंदाने जगले पाहिजेत असाच जणू संदेश देतो.

मोजून-मापून जगता-जगता     
        आयुष्याचे सजणे झाले, 
चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांचे
         खुलून येता विझणे झाले
भाळावरल्या ललाट रेषा       
        हसता-हसता बघणे झाले,
पिकले पान वार्धक्याचे 
          खुलून येता जगणे झाले.

कवीने या कवितेतील प्रत्येक शब्द आणि त्याचा अर्थ हा उर्वरित जीवनाचा जगण्याचा जणू सारच सांगितलेला दिसून येतो.

अशाप्रकारे "माझे मातीतीले पाय"हा काव्यसंग्रह जणू काही सप्तरंगी इंद्रधनुष्य भासतो वाचकाला कधी चिंब पावसात भिजवतो..... तर कधी अश्रुंचा अभिषेक घालतो,तर कधी मनात हिरवेगार वातावरण तयार करतो. असा हा उच्च दर्जाचा काव्यसंग्रह सर्वांनी आवश्य वाचवा.

पृष्ठ संख्या-72
 मूल्य-120
अभिप्राय शब्दांकन
          -  सिंधुसूत...🖋️

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know