Sunday, June 13, 2021

प्रेरणा द साउंड ऑफ सायलेन्स


प्रेरणा 
द साउंड ऑफ सायलेन्स 

वयाच्या सहाव्या महिन्यात पक्षाघातामुळे अर्ध्या शरीरातील शक्ती गेलेली मुलगी, त्यामुळे आलेले कर्णबाधिर्य, इथपासून ते राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त भरतनाट्यम् नर्तिका.
हा चमत्कार कसा घडला, याची कथा,
प्रेरणा, आणि तिचे शिल्पकार पालक यांची कथा, म्हणजे हे पुस्तक.
पाच वर्षांत याच्या तीन आवृत्या निघाल्या.
तसंच मानाचा राज्य पुरस्कारही याला प्राप्त झाला. 
या जीवनकथेतील अनेक अविस्मरणीय क्षणांच्या छायाचित्रांनीही हे पुस्तक सजले आहे.
नियतीबरोबरच्या संघर्षाच्या या खेळाची सुरुवात होते, ती प्रेरणाच्या जन्माच्याही खूप आधीपासून. उज्ज्वला व केशव यांच्या विवाहापासून. 
जातीबाहेर प्रेमविवाह केला, म्हणून सासर आणि माहेर दोन्हीकडचा आधार सुटलेला, शिक्षण, नोकरी, पैसा, राहण्याची जागा सगळ्याच गोष्टींचा अभाव. अशी परिस्थिती. खऱ्या अर्थाने शून्यातून सुरुवात. 
नंतर असेच खाच-खळगे खात खात अनुभवाने टणक बनत बनत अंतिम ध्येय कसे गाठले हे खरोखर वाचण्यासारखे आहे.
शब्दात सांगण्यासारखे आणि शब्दांच्या पलीकडले असे खूप काही या पुस्तकातून आपल्याला मिळते.
मनाला चटका लावणारे, अस्वस्थ करणारे, वेगळ्याच दिशेने विचार करायला लावणारे असे अनेक प्रसंग आपल्याला इथे वाचायला मिळतात. किंबहुना अशा सगळ्या घटनांची साखळी म्हणजेच हा जीवन प्रवास आहे.
परिस्थितीने यांना अडचणीत आणण्यासाठी एकामागून एक प्रश्न टाकत जावे, आणि यांच्या जिद्दीला, हिम्मतीला आणि मेहनतीला सलाम करत देवाने त्याच्यावरची उत्तरेही त्यांना पुरवावीत असं यांच्या आयुष्यात सतत घडत आलेलं आहे.
संस्थेतील आणि शाळेतील राजकारण, सडक्या मनोवृत्तीची माणसे, या दोघांच्या सहजीवनाबद्दल उगाचच आकसाने वागणे, त्यांचा प्रेरणाकडे बघण्याचा विचित्र दृष्टीकोण, मुद्दाम त्रास देण्यासाठी केल्या गेलेल्या सततच्या बदल्या, या सगळ्यांतून वाट काढून बाहेर पडून आपल्या कर्तृत्वाने आणि अथक मेहनतीने कितीतरी उंच पोचले आहे हे कुटुंब. अंगभूत तेजाने झळकत आहे.
यातल्या दोन प्रसंगांचा मला मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो 
सहा महिन्यांच्या मुलीला अचानक पक्षाघाताचा झटका आल्यानंतर आधुनिक वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञ मंडळी स्पष्टपणे सांगतात की आयुष्यभर ती आपल्या पायांवर उभी राहू शकणार नाही, चालू शकणार नाही.
त्यानंतर काहीच दिवसात आयुर्वेदिक उपचारांनी तीच मुलगी आपल्या त्याच पायांवर ताठ उभी पण रहाते, एवढंच नव्हे, तर भरतनाट्यम् नर्तिका बनते, एकटीचे कार्यक्रम करते, आणि पुढे जाऊन ' रोल मॉडेल' राष्ट्रीय पुरस्कारही मिळविते.
प्रेरणाचे शालेय शिक्षण सांगत असताना उज्ज्वलाताईंचं शिक्षणपद्धती वरील एक चिंतन खरंच विचार करायला लावतं. 
कर्णबधिर किंवा अपंग मुलांच्या बाबतीतच नाही, तर तथाकथित नॉर्मल मुलांचीही शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातील उमेदीची काही वर्षे अशा गोष्टी शिकण्यात फुकट जातात, की ज्यांचा पुढच्या आयुष्यात त्यांना काहीही उपयोग नसतो. 
जगाच्या कुठल्या तरी एका कोपऱ्यातील लोक कसे राहतात, काय खातात यात ज्याला गोडी असेल त्याने जरुर त्याचा अभ्यास करावा. पण आपण आपलं आयुष्य कसं उभारू शकतो, सुधारू शकतो हे शिकणं जास्त महत्त्वाचं नाही का ?
कर्णबधिर अपत्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या अडचणींशी अगदी जवळून परिचित असल्यामुळे या दांपत्याने अशा मुलांसाठी बरेच काही समाजकार्य ही केले आहे. अगदी वधू-वर सूचक मंडळांपर्यंत.
प्रेरणाचे भरतनाट्यम् मधील खडतर प्रशिक्षण, रियाज, मेहनत त्यातील परीक्षा, अरंगेत्रम्, यातले तिच्या गुरू शुमिता महाजन यांचे मौलिक योगदान,
भरतनाट्यम् चे जाहीर कार्यक्रम, अनेक मानसन्मान, मध्यंतरीच्या काळात तिचा अनुरूप वराशी विवाह,
असा हा सगळा प्रवास राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत जाऊन पोहोचतो, आणि याच सर्वोच्च बिंदूवर हे पुस्तक संपते.
वाचून संपले तरी वाचकांच्या मनात त्याने एक दिवा लावलेला असतो.
पुस्तकाच्या मुखपृष्ठावरचा भरतनाट्यम् मुद्रेतील प्रेरणाचा शांत, समाधानी, दैवी भाव दाखविणारा फोटो जणू या सगळ्या यज्ञाची फलश्रृतीच सांगत असतो.
अशा प्रकारच्या अनुभवातून गेलेल्यांनी स्वतः संघर्षाची कथा लिहिणे हे मराठीत खूप कमी आहे. अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच पुस्तके अशी आहेत. या पार्श्वभूमीवर 'प्रेरणा' या पुस्तकाचे मोल अधिकच वाढते. अशा मुलांकडे पहाण्याची आपली दृष्टी हे पुस्तक वाचल्यानंतर बदलते. हे याचे यश आहे.
सर्वांनीच, विशेषतः दिव्यांग बालकांच्या पालकांनी तर मुद्दाम वाचावे व आपल्या घरी संग्रही ठेवावे, असे हे पुस्तक आहे. 
खाली फोन नंबर दिलेला आहे. त्यावरून आपण लेखिकेशी या पुस्तकासाठी संपर्क साधू शकता.

पुस्तकाचे नाव - 
प्रेरणा - द साउंड ऑफ सायलेन्स 
लेखिका - डॉ. उज्ज्वला सहाणे
फोन नं. - ९९२२२१३६९५
प्रकाशक - प्रेरणा कम्युनिकेशन
पृष्ठसंख्या - २३९.

रमा खटावकर.
*****

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know