Monday, June 14, 2021

जंगलाचं देणं

# वाचनसाखळी 
पुस्तकं परिचय क्र. -1 
पुस्तकाचे नाव  :- जंगलाचं देणं 
लेखक  :- मारुती चितमपल्ली 

 निसर्ग आणि मानवाचं अतूट असं नातं आहे. हे नातं आपल्याला खेचत असतं ! खुणावत असतं! साद घालत असतं. खर तर या निसर्गामुळे,  त्यातील घटकांमुळे आपल्या अस्तित्वाला आधार दिला आहे. आपल्या जगण्यातली एक भक्कम बाजू म्हणजे हा निसर्ग होय! निसर्ग आपल्याला दोन्ही करे जे जे म्हणून देता येईल ते ते आनंदाने भरभरून कायम देताच आला आहे! हा निसर्गच आहे जो आपल्या जगण्यातील क्षण अजरामर करतो. आयुष्यातील दुःख दुःखाचे चटके कसे सहन करायचे,  संयमी वृत्ती कशी राखायची,  नाती कशी जपायची, परोपकार, दयामाया,  प्राणीमात्रांविषयी चा कळवळा,  भूतदया, हे सारे  कधी गुरु तर  कधी माता बनून  तो आपल्या बदलातून की सारी जीवन मूल्ये  आपल्याला शिकवत जातो! इतकेंच नव्हे तर आनंदाचे क्षण द्विगुणीत करण्याचेही कार्य निसर्गाच करत आला आहे. अशा या अद्भुत,  चमत्कारिक पण विलोभनीय रुतूप्रमाणे बदलत जाणाऱ्या या रूपाचे आकर्षण साहित्यिकाला न होणे म्हणजे नवलच! नाही का!
              साहित्यिकांच्या कितीतरी पिढ्या या निसर्गावर पोसल्या गेल्या आहेत. तो कायम आपल्याला खुणावत,  आणि साद घालत,  शीळ घालत,  आपल्याला मोहित,  अचंबित करत,  आनंदाचे तुषार शिंपडत, ओलावा, गारवा देत,  चेतना पल्लव जागृत करत आला आहे! केशवसुत, बालकवी,कवी बी, कुसुमाग्रज,बोरकर, शांता शेळके,  अरुणा ढेरे अशी किती नावे सांगितली तरी ही यादी न संपणारी आहे. प्रत्येक साहित्यिक निसर्गातील तरल, कोमल जाणीवा,  भावना असणारे घटक सजीव करून आपल्या पुढ्यात आणतात आणि आपणही त्याचाच एक अविभाज्य घटक आहोत ही सुप्त जाणीव अगदी नकळत चेतवून जातात! मग ज्यांचा या निसर्गाशी अगदी जवळून संबंध येतं असणाऱ्या व्यक्तींना तर खजिनाच गवसल्याचा आनंद होत असेल! असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. वन अधीक्षक असलेले मारुती चितमपल्ली यांना आपण सारेच ओळखतो यांचे दुसरे घर म्हणजे जंगल होय! मग अशा या गूढ रहस्यमय मूक  असले तरी विशिष्ट शब्दात खुणा व संकेत देणारे,  आपल्या रुक्ष व नीरस अशा जगण्यातून एका सचेतना च्या पातळीवर घेऊन जाणारे,  अंतर्मुख करणारे,  अद्भूत अशा विश्वाची बाजू उलगडून दाखवणारे" जंगलाचे देणे" हे पुस्तक होय!
            आतापर्यंतचा जंगलाचा इतिहास आपल्याला हेच सांगतो की मनुष्य निसर्गाच्या सानिध्यात गेला की प्रगल्भ, परिपूर्ण होत जातो! जगण्याची कला जर कोणी शिकवत असेल तर तो निसर्ग !आणि लेखक मारुती चितमपल्ली यांचे हे पुस्तक आपल्याला बरेच काही देऊन जाते. ते मी पुढे सांगणार आहेच.  गो नी दांडेकर, ग्रेस,  शांता शेळके,  रवींद्र पिंगे, डॉक्टर सुरेश मिश्रा यासारख्या साहित्यिक दिग्गजांनी आपला अभिप्राय त्यांच्या या पुस्तकावर नोंदवला आहे त्यांची ही कौतुकाची मोहर त्यांच्या पुस्तकाला लाभली यातून मारुती चितमपल्ली यांचे हे पुस्तक किती उच्च दर्जाचे आहे याची साक्ष पटते.
             लेखक मारुती चित्तमपल्ली यांनी हातचं न राखता जंगलाच देणं भरभरून दिले आहे. यात कथात्मकता आहे, काव्यात्मकता आहे. संवेदनशील मनाची स्पंदने आहेत,  तरल सौंदर्यदृष्टी आहे! चिंचा आल्यात पाडाला,  पळस,  निंबोणीचं झाड,  फुललेला  मोहा,  देवदार वृक्ष या झाडांचे वर्णन त्यांनी आपल्या तरल शब्दातून जिवंत केले आहे! नुसते जीवंतच  नव्हे तर वर्षानुवर्षे आपली भव्यता,  उदात्तता जपत थोर माणसांसारखे ही झाडे आपल्याशी असणारे अतूट नाते अगदी सहज सांगून जातात !पक्ष्यांच्या जन्माचे गुढ  या त्यांच्या लेखात ते पक्षांच्या जन्माची रहस्ये मोठ्या प्रभावीपणे उलगडत जातात! पक्षिगान  या त्यांच्या लेखात पक्षांचे संगीत हे जगातलं सुंदर काव्य आहे याची प्रचिती ते आपल्याला करून देतात. पाखरांच्या जाती,  त्यांचे प्रकार,  त्यांचे रंग, व त्यांची घरटी या सार्‍या सार्‍या गूढ रहस्याची उकल  करता करता पाखरांचे आपले असे एक वेगळे विश्व असते याची ओळख ते मोठ्या सुरेख पद्धतीने करून देतात! तसेच नक्षत्रांचे देणे हा लेख तर वाचक रसिकांच्या मनात नक्षत्रांचे तेज  अलगद ओतून निसर्ग विभ्रमांचे भव्य आणि विशाल असे दर्शन घडवतो! सरोवर,  जलाशय आणि तळी यांनी निसर्गाला जे सौंदर्य बहाल केले आहे! याच्या वर्णनाने जलाला जीवन का म्हणतात,  यामागचा हेतू स्पष्ट होतो. पाण्याचे महत्व पटवून देणारा हा लेख वाचला की आपण आतापर्यंत वाचलेल्या काव्य व विशेषतः संस्कृत खंडकाव्य ची आठवण आपल्याला इथे प्रकर्षाने होते. त्यातील त्यांचे वर्णन वाचताना निसर्गातल्या इतर अनेक अलंकारांपैकी  तळी हा किती मौल्यवान अलंकार आहे याची साक्ष पटते! देवतळ,  गंगाझरी,  जलकन्या,  दारू बंद ही  गंधर्व नगरीशी नातं सांगणारी तळी आपल्याला भेटतात! लेखक म्हणतात गांधारी तळं  ही निसर्गातील अद्भुत किमया आहे.
            असं आपलं तुमचं माझं आणि सगळ्यांचंच जीवन समृद्ध करणारे जंगलं आणि त्यांचं वैभव जर कुठे सापडेल तर ते मारुती चितमपल्ली यांच्या "जंगलाचं देणं" या पुस्तकात !
             अलिबाबाच्या गुहेत कुबेराचा खजिना सापडावा त्याप्रमाणे या पुस्तकातील जंगलाच्या गुहेत संपूर्ण सृष्टीला संजीवनी देणारे,  चैतन्याचे अमृत प्राशन करायला देणारी,  रूप रस गंध असे नानाविध रसांचे रसपान करायला लावणारी,  तळ्यांच्या हिरव्या पाण्याची चव चाखायला देणारी,  आणि आपल्याला तृप्त,  शांत आणि परिपूर्ण करणारी ही अद्भुत गुहा आहे असे मला वाटते! तेव्हा अशा या रहस्यमय जंगली गुहेची सफर तुम्ही नक्की कराच !
             माझ्या या पुस्तक परिचयाने  जर तुम्ही चेतविल्या गेला असाल तर ती ठिणगी विझायच्या आत हे पुस्तक जरूर वाचाचं !  

            धन्यवाद ! 🙏🙏
Mruga Pagey

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know