Monday, June 14, 2021

"मऱ्हाटा पातशाह

"मऱ्हाटा पातशाह - केतन कैलास पुरी"

इतिहासातील एखाद्या घटनेचा अथवा व्यक्तीचा चित्रमय प्रवास वाचलेला व पाहिलेला आहे. पण चित्रांचाच चित्रमय प्रवास पहिल्यांदाच वाचला आणि पाहिला. महाराष्ट्रात १ वर्षाच्या लहानमुलापासून ते ८०-९० वर्षाच्या वृद्धांपर्यंत ज्या एका नावाचं आदरयुक्त वेड असते ते म्हणजे विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांचा इतिहास आठवला तर त्यांच्या चरित्रातील ठराविक चार ते पाच घटना सोडल्यातर त्यापुढे सामान्य माणूस सरकत नाही. काहींना तर त्यांच जन्मसाल पण सांगता येत नाही. महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांचे असे हाल असतील तर बाकी राज्यातल्या आणि देशातल्या लोकांचा विषय सोडून देणेच बरे. पण तुमचा असा विचार असेल तर मऱ्हाटा पातशाह वाचून हा समज चुकीचा ठरेल. 
               उस्मानाबाद येथे राहणाऱ्या केतन पुरी तरुण इतिहास अभ्यासकांनी शिवछत्रपतींच्या इतिहासाच्या संदर्भाने असे काही संदर्भ खोडून व नव्याने मांडले आहेत की गेली कित्येक वर्ष आपण त्या गोष्टीचा विचारही करत नव्हतो. त्यातला एक मुद्दा सांगायचा झाला तर आजपर्यंत आपण सर्वांनी इयत्ता चौथीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांचे एक चित्र पाहिलेले आहे ज्यात महाराज घोड्यावर बसलेले आहेत व आजूबाजूला काही माणसे आहेत. आजवर सर्वच असे मानत आले की हे चित्र मीर महंमद नावाच्या चित्रकाराने काढलेले आहे. गेले १०० हून अधिक वर्षे सर्व इतिहासकार देखील हेच मानत आले. मुळात हे चित्र दुसऱ्याच चित्रकाराने काढलेले आहे पुस्तक वाचले की तुमचा हा समज दूर होईल. 
               शिवछत्रपतींचा इतिहास अभ्यासताना आपण फक्त स्वदेशी व्यक्तींनी लिहिलेल्या लिखाणाकडे लक्ष देत गेलो. परकीय लोकांच्या नोंदीकडे वा.सी.बेंद्रे, ग.ह.खरे, द.बा. पारसनीस, डॉ. बाळकृष्ण यांच्यासारखे इतिहास संशोधक सोडले तर आजवर कोणीही फारसे लक्ष घातले नाही. पुस्तकात वापरलेल्या परकीय साधनांमध्ये सर्वात जास्त नोंदी ह्या डचांच्या आहेत. आताच्या काळी एखाद्या इंग्रजी साधनाचे मराठीत भाषांतर करायचे म्हटले तरी असंख्य अडचणी येतात. शब्दांचे अर्थ व्यवस्थित लागत नाहीत. केतन पुरी यांचे यासंदर्भात खुप कौतुक करावं वाटते. त्यांना काही परदेशी लेखकांचे शोधनिबंध मिळाले जे डच भाषेत आहेत. आताच्या घडीला डच भाषा येणारे लोक सापडत नाहीत. अश्यावेळी काय करायचे ? एक प्रसंग आठवला म्हणून सांगतो १९७१ साली डॉ. कमल गोखले यांचा शिवपुत्र संभाजी हा संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित झाला. या ग्रंथ अभ्यासताना त्यांना काही डच साधनांचा शोध लागला. आता त्या काळी देखील डच भाषा समजणारे त्यातल्या त्यामध्ये १७ व्या शतकातील डच भाषा समजणारे लोक सापडणे तर खुपचं अवघड होते तरीदेखील त्यांच्या एका मित्राने काही डच साधने व पत्रे इंग्रजीत भाषांतरीत केले व नंतर गोखले यांनी ते मराठीत भाषांतरीत केले. ही गोष्ट आहे ५० वर्षांपूर्वीची. अगदी अशीच परकीय साधने वा.सी. बेंद्रे यांनी देखील संभाजी महाराजांवरील लिहिलेल्या ग्रंथात वापरली आहे. या दोन्ही इतिहास संशोधकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्र लेखनात वापरलेली साधने आजही अप्रकाशित आहेत. त्यांच्यानंतर कोणत्याच इतिहासकाराने ती साधने वापरल्याचे आढळून येत नाही. केतन पुरी यांनी यात एक मार्ग काढला तो म्हणजे गुगल ट्रांसलेशनचा वापर करत डच भाषेतील शोधनिबंध भाषांतरीत केले. यात त्यांचा बराच वेळ गेला पण इतिहासातील बरीच रहस्य उलगडली. हे केवळ इतिहासाशी इमान राखणाराच करु शकतो.
               वरील डच शोधनिबंधातून त्यांना शिवछत्रपतींच्या काही चित्रांची माहिती मिळाली. महाराजांची चित्रे कुठे काढली गेली ? भारतामध्ये असणारी चित्रे लंडन, पॅरीस, अमस्टरडॅम, रशिया येथे कशी पोहोचली ? शिवाजी महाराजांचे प्रथम चित्र कोणी काढले ? हा सर्व शोध घेत असताना शिवछत्रपतींविषयी काही अन्य नोंदी उजेडात ज्या इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. त्या अश्या की १६७७ साली दक्षिण दिग्विजयानंतर स्वराज्यात परतत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना तामिळनाडू मधील वलीकंडापूरम येथे हर्बर्ट डी यागर या डच राजदूताची भेट झाली. या भेटीत एक कौलनामा तयार झाला. इतिहासातला एक प्रवाद असे सांगतो महाराजांनी गुलामांच्या खरेदी-विक्री वर जबर कर आकारला होता पण कौलनाम्यातील नोंदी वाचल्यावर तुम्हाला महाराजांच्या एका मानवतावादी विचारांचे दर्शन घडेल. याच भेटीमध्ये हर्बर्ट डी यागर याने इतिहासाच्या दृष्टीने आणखी एक जबरदस्त नोंद करुन ठेवली आहे. शिवाजी महाराजांची एक सर्वात मोठी ताकद म्हणजे गुप्तहेर खाते. दुर्दैवाने हेर खात्याविषयी अगदी कमी ठिकाणी उल्लेख येतो आणि तोही बखरींमध्ये. पण या हर्बर्ट डी यागरने हेर खात्या संदर्भात नोंद करुन ठेवली आहे. ही नोंद वाचली आणि मला अक्षय कुमार आणि तापसी पन्नू यांच्या नाम शबाना या रॉ या गुप्तचर संघटनेवरील चित्रपटाची आठवण झाली. चित्रपटात मनोज बाजपेयी यांना त्या तापसीच्या मिनिटा मिनिटाची बातमी असते. ही नोंद वाचल्यावर तुम्हाला त्या काळातील हेर खात्याची कामगिरी किती चोख आणि परिपूर्ण होती हे कळेल.
               छत्रपती शिवाजी महाराज दिसायला कसे होते याविषयी परकालदास, हेन्री ऑक्झिंडन, थेव्हेना, कॉस्मो दी गार्दा यांच्याव्यतिरिक्त काही अन्य परकीयांनी महाराजांचे केलेले वर्णन प्रथमच पुस्तकात वाचनात आले.
               प्रस्तुत पुस्तकामध्ये जवळपास ४० दुर्मिळ रंगीत चित्रे छापलेली आहेत. ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांची काही चित्रे, छत्रपती संभाजी महाराजांची ५ चित्रे, थोरल्या शाहू छत्रपतींची २ चित्रे व अन्य काही ऐतिहासिक व्यक्तींची चित्रे आहेत. यातल्या प्रत्येक चित्राचा इतिहास प्रथमतः वाचायला मिळत आहे. ऐतिहासिक दृष्टीकोनातून पुस्तकाचे मुल्य खूप मोठे आहे. छत्रपतींच्या इतिहासामध्ये असा अभ्यास या अगोदर केल्याचे जाणवत नाही. इतिहासामध्ये आणखी एक वाद असा आहे की काही जणांच्या मते महाराजांच्या पदरी चित्रकारच नव्हते पण पुस्तक वाचल्यावर तुमचा हा देखील वाद दूर होईल. 
               एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते ती अशी की Gijs Kruijtzer या परकीय इतिहास अभ्यासकाशी केतन पुरी यांनी संपर्क साधला. त्यांनी हवी तेवढी मदत केतन पुरी यांना केली. यासाठी ना कोणता मोबदला घेतला ना स्वार्थी वृत्ती मनात ठेवली लागेल ती मदत केली. आजही ही परदेशातील माणसे शिवछत्रपतींच्या चरित्रावर अभ्यास करतात याचा खूप आनंद वाटतो. पण दुर्दैव एवढेच आपलेच काही इतिहास अभ्यासक एकमेकांना मदत करताना कुंठित विचारसरणी ठेवून स्वार्थीपणे वागतात. तश्या लोकांना सुध्दा केतन पुरी यांनी धडा शिकवला आहे. "जे जे आपल्याशी ठावे ते सकळांना सांगावे" या भावनेतूनच त्यांनी या विषयावर पुस्तक लिहून उत्तम काम केले आहे. ही शिकवण अर्थातच मांडे सरांची आहे.
               पुस्तक वाचताना काही रंजक गोष्टी प्रथमच माहिती पडल्या आहेत. त्यातल्या दोन गोष्टी सांगतो बाकी पुस्तकात वाचा. शिवछत्रपतींना सरदार, महत्वाच्या राजकीय व्यक्ती, काही परकीय व्यक्ती भेटायला येत असत तेव्हा शामियान्यामध्ये त्यांना खाण्यासाठी विडा ठेवला जात असे. हा विडा ठेवण्यासाठी चक्क सोन्याचा डबा होता. महाराजांच्या मनुचीच्या चित्र संग्रहातील चित्रात हा डबा दाखवला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे थोरल्या शाहू छत्रपतींना प्राण्यांवर फार प्रेम होते. त्यांनी बरेच प्राणी पाळलेले होते. त्याची माहिती पुस्तकात मिळेल. महत्वाचे असे की त्यांनी दोन कुत्री पाळली होती त्यांच्या गळ्यात सोन्याच्या माळा घातलेल्या होत्या. 
               छत्रपती शिवाजी महाराज दिसायला कसे होते हे चित्रातून आणि काही समकालीन लेखकांच्या व परकीयांच्या वर्णनातून आपल्याला कळतेच. महाराजांचा राज्यकारभार आणि महाराज बुध्दीचातुर्याने केलेल्या लढाया सर्वांना माहिती आहेच. पण महाराजांच्या एका गोष्टीविषयी फक्त सेतुमाधवराव पगडी सोडले तर कोणीच लिखाण केले नाही ती गोष्ट महाराजांचे बोलणे कसे होते. पुस्तकात एका स्वतंत्र प्रकरणात या विषयी केतन पुरी यांनी चर्चा केली आहे ती जरुर वाचायला हवी.
               मऱ्हाटा पातशाह वाचल्यानंतर एक प्रश्न मनामध्ये तयार होतो तो ही इथे विचारतो जेणेकरून सर्वांना त्याचे उत्तर मिळेल. पुस्तकात छापलेले चित्र क्र. २० याआधी शिवकथाकार विजयराव देशमुख यांच्या शककर्ते शिवराय खंड १ मध्ये कृष्णधवल रंगात छापलेले आहे. हे चित्र आणि अलिकडेच मनोज दाणी यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे म्हणून एका खाजगी व्यक्तीच्या संग्रहातील प्रकाशित केलेले चित्र. ही दोन्ही चित्रे समोरासमोर ठेवली तर सारखीच वाटतात फक्त अंगावरील वस्त्रांचा रंग वेगळा आहे. अगदी चित्राच्या मागील बांधणीचा रंग देखील सारखा आहे असे असताना एक चित्र शिवाजी महाराजांचे आणि दुसरे संभाजी महाराजांचे कसे ? खरेतर हा प्रश्न पुस्तक प्रकाशित होण्याअगोदरचा आहे. पण पुस्तकात देखील या विषयी उत्तर मिळाले नाही. 
               मऱ्हाटा पातशाह पुस्तकात केतन पुरी यांची मागील काही वर्षांची मेहनत पूर्णपणे उतरली आहे. इंद्रजित सावंत यांनी केतन पुरी हे इतिहासातील बिनीचे शिलेदार आहेत हे शब्द पुस्तक वाचल्यावर तंतोतंत लागू पडल्याचे कळते. पुस्तकाचा मध्यवर्ती विषय हा छत्रपतींच्या चित्रांविषयी आहे. त्या चित्रांची माहिती गोळा करण्यात लागलेली मेहनत आणि कष्ट लक्षात घेता प्रस्तुत लेखामध्ये त्या चित्रांविषयीची माहिती पुस्तकातच शोभेल ह्या उद्देशाने टाळली आहे‌. शिवछत्रपती, शंभूछत्रपती, शाहूछत्रपती यांच्या ऐतिहासिक चित्रांविषयी संपूर्ण माहिती पुस्तकातच वाचा.
               मऱ्हाटा पातशाह पुस्तकाची सिद्धता लक्षात घेता एका गोष्टीची खुप खंत वाटते ती म्हणजे आज प्रमोद मांडे सर आणि स्वप्निल दादा कोलते असायला हवे होते. या पुस्तकाचे लेखक केतन पुरी हे मित्र आहेत याचा खूप अभिमान वाटतो. 

जगदंब....!

                                                   - सुशांत संजय उदावंत
                                                     'तुळजाई' नाथापूर, बीड
                                                     दि. १४/०६/२०२१

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know