ययाती आणि अमृतवेल
त्यांच्या एकूण साहित्यकृती च्या रत्नमाळेत " ययाती आणि अमृतवेल हे दोन रत्न सर्वात जास्त आदर मिळालेले आणि मानी रत्न आहेत.
साधारणपणे अमृतवेल ही एक कादंबरी आहे. आणि यात प्रेमकथा रंगवली आहे. पण प्रेमकथा म्हणल्यावर एक साचा तयार झालेला दिसतो. आणि मला व्यक्तिशः वाटतं की ही प्रेमकथा नेहमीच्या साच्यात बसणारी नाहीये. कारण साधारणपने प्रेमकथा असली की त्यात एक प्रेमी युगुल म्हणजे दोघेजण असतात प्रेम करणारे. पण अमृतवेल मध्ये तसं नाहीये. बारकाईने बघितलं तर यातलं प्रत्येक पात्र कुणावर ना कुणावर प्रेम करतच.
नंदा शेखर वर प्रेम करते …| देवदत्त चंचल वर प्रेम करतो , तसेच चार पायांची जीव जरी असली तरी चंचल सुद्धा देवदत्त वर प्रेम करते …| आबा माईंवर जीवापाड प्रेम करतात , आजाराने एका जागी खिळलेल्या माई सुद्धा अबांवर प्रेम करतात ….| दादा आपल्या कुटुंबावर प्रेम करतात ….त्यांच्या तारुण्यात त्यांनी गांधीजी आणि देशाच्या स्वातंत्र्यावर प्रेम केलं …| वसू वर्तमानावर तिरस्कार करते पण तिच्या भूतकाळातील आठवणींवर प्रेम करते …| दास बाबू त्यांच्या तत्त्वज्ञानावर प्रेम करतात ….आणि शेवटी व्यक्त - अव्यक्तपणे नंदा देवदत्त वर आणि देवदत्त नंदा वर प्रेम करतात.
कथा एकंदरीत चांगली आहे. सुरुवातीला थोडीशी निरस आणि कंटाळवाणी वाटू शकते पण एकदा दादा आणि नंदा दास बाबू यांच्या घरी गेले की तिथून कथा आपली पकड घेण्यास सुरुवात करते. खूप मोठी नसून १५० पानी कादंबरी आहे. फारतर दोन बैठकांमध्ये संपू शकते. पण वाचल्यावर एकंदरीत तुम्हाला वाचल्याचं समाधान मिळेल नक्की.
लेखनाच्या बाबतीत वेगळं काही सांगायची गरज नाही. खांडेकर आहेत म्हटल्यावर लेखन अव्वल दर्जाचे च असते. सुंदर सुंदर शब्दांमधून सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. मला सर्वात जास्त आवडलं त्यांनी स्थळांच केलेलं वर्णन. जेव्हा नंदा - वसू विलास पुर ला पोचतात. आणि दुसऱ्या दिवशी च्या प्रसन्न सकाळचं आणि आजूबाजूच्या रम्य परिसराचं आणि वातावरणच जे वर्णन खांडेकरांनी केलंय…आहा हा हा ..! त्याला तोड नाही. ते वर्णन वाचून आणि मनात त्या परिसराचं केलेलं चित्रण बघून आत्मिक तृप्ती मिळते . आणि शब्दांची ताकत कळते.
सुरुवातीचे काही पानं जे आहेत त्यात पूर्णपणे भूतकाळ आणि तत्त्वज्ञान मांडलेल आहे. विविध पात्रांच्या तोंडून खांडेकरांनी जे तत्त्वज्ञान मांडलं आहे ते फक्त एक तत्त्वज्ञान नसून एका ज्येष्ठ लेखकाने सांगितलेलं जीवनाचं सार आहे. बारकाईने त्या ओळी जर वाचल्या आणि प्रत्येक शब्द सूक्ष्मपणे समजून घेतला तर त्यात दडलेला खोल अर्थ कळतो.
सुरुवातीच्या भागात लेखकाने स्वतः बरोबर इतरांचे तत्त्वज्ञान सुद्धा इथे मांडलेले दिसते. स्पष्टपणे शेक्सपियर , सॉक्रेटीस , हेमिंग्वे यांच्या बाबतीत सुद्धा लिहिलं गेलंय. आणि या लिखाणातून लेखकाच्या प्रतिभेचा अंदाज येतो की लेखक म्हणून खांडेकर किती सामर्थ्यशाली होते. त्यांनी केवळ त्यांची तत्त्वे मांडली नसून इतरांनी मांडलेल्या तत्त्वां चा देखील सखोल अभ्यास केलेला दिसून येतो. ते फक्त उत्तम लेखक नसून उत्तम वाचक देखील होते हे कळते.
अनेक गोष्टी समजून सांगण्यासाठी त्यांनी अत्यंत सटीक असे उदाहरणं दिले आहेत. स्त्री ची दोन रूपे समजावून सांगताना यामाकडून पतीचे प्राण परत आणणारी सावित्री आणि वासनेच्या आहारी जाऊन पतीशी प्रतारणा करणारी हॅम्लेट ची आई या दोन स्त्री रुपाना इथे त्यांनी अंतर्भूत केलेलं आहे. असे अनेक प्रसंग वाचताना आपल्याला या कलाकृतीच्या भाव खोलीचा …… (Emotional depth ) अंदाज येतो. एकंदरीत मनापासून वाचली तर विचार करायला लावणारी कादंबरी आहे ही. प्रेमकथा फक्त नावाला. खूप सारी मानवी मूल्ये सांगितलेली आहे इथे.
देवदत्त या पात्राने त्याच्या प्रवास वर्णनाचे आणि पडलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधताना जे छोटे छोटे उतारे लिहिले आहेत. त्यातूनही लेखक खूप काही सांगून जातो त्याचप्रमाणे दादा आणि नंदा यांच्या लिहिलेल्या पत्रांत देखील खूप काही दडलेले आहे.
यातले प्रत्येक दुसरं वाक्य काही ना काही सांगून जाते आपल्याला…….!
रात्रीच्या एकांतात स्वाभाविक वाटणाऱ्या कितीतरी गोष्टी दिवसा कृत्रिम वाटू लागतात..!
आयुष्य हा सुख दुःखाचा पाठ शिवणीचा खेळ आहे , जीवनात स्वप्न पाहण्याचा आनंद आहे , आणि स्वप्न भंग झाल्यामुळे होणारा विषादही आहे..!
मनुष्य सुखाने जगू शकतो तो धुंदीत.. मग धुंदी कसलीही असो…!
जगात दोन जाती आहेत माणसांच्या .. एक मनस्वी मनांची आणि दुसरी मुर्दाड मनांची मुर्दाड माणसं जगण्याची केविलवाणी धडपड करीत राहतात . त्यांना भय वाटतं ते मरणाचं. मनस्वी मने अभिमानाने जगता आलं तरच जगतात पण ती दुसऱ्याला शरण जाणार नाहीत….!
पुस्तकं बघितली की माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते , सारी मेली खोटारडी ! त्यातलं प्रेम खोटं , सुख खोटं , सारं सारं सिनेमा सारखं खोटं..! शाकुंतल लिहिणारा कालिदास मला भेटायला हवा एकदा..! त्याला असा फैलावर घेणार आहे मी..!
ही अशी अनेक वाक्ये आहेत जी काही तरी सांगण्याचा प्रयत्न करतात. दागिन्यां प्रमाणे त्यांनी सजवलय या कलाकृतीला.
सुंदरता अनुभवायची असेल तर ही कलाकृती किमान एकदा तरी वाचनात आणाच….!
धन्यवाद ….! ✌️
🙏🙏🙏
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know