संपादक : डॉ.पु.ग.सहस्त्रबुद्धे
कॉन्टिनेन्टल प्रकाशन
गोपाळराव हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांचा इ.स.१८६६ मध्ये 'शतपत्रे' हा निबंधसंग्रह ग्रंथ प्रकाशित झाला.शतपत्रे असे म्हटले जात असले तरी त्यांनी एकूण १०८ पत्रे लिहिली आहेत.
इंग्रजी विद्या आणि इंग्रज राज्यकर्ते यांच्याविषयीची लोकहीतवादींची भूमिका स्वच्छ आणि सकारात्मक होती.कोणत्याही वैयक्तिक लाभापायी त्यांनी परकीय राजवटीचे समर्थन केले नाही.आपल्या समाजाचे प्रबोधन व्हावे, सुधारणेचे वारे वाहवेत आणि अज्ञान ,अंधश्रद्धेच्या विळख्यातून आपला समाज बाहेर पडावा या तीव्र आंतरिक भावनेतून त्यांनी जाणीवपूर्वक लेखन केले.'इंग्रजी विद्या', 'इंग्रजी राज्यपासून लाभ', 'इंग्रजी राज्यापासून फळ' यासारख्या निबंधातून त्यांनी आपली मते परखड शब्दात मांडलेली आहेत.
धर्मविषयक प्रबोधन करत असताना हिंदु धर्मातील दोष दाखवून त्यात सुधारणा कशी होईल याविषयीचे विचार लोकहीतवादींनी 'धर्मसुधारणा' इत्यादी निबंधांतून मांडलेले आहेत.
'स्त्रियांची स्थिती', 'पुनर्विवाह' यासारखे निबंध लिहून लोकहीतवादींनी स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार केलेला आहे.स्त्री-पुरुष समतेचा विचार मांडताना आणि विशेषतः तत्कालीन समाजात स्त्रियांच्यावर जे अन्याय होत त्याला आक्षेप घेताना लोकहितवादी संत साहित्यातील किंवा संस्कृत साहित्यातील अनेक दाखले देऊन आपला विचार पटवून देण्याचा प्रयत्न करतात.
ब्राह्मणांच्या दोषांवर प्रहार करताना त्या दोषांवर नेमके बोट ठेवून त्यामुळे इतर वर्णीयांना जो त्रास होतो, इतरांची जी लुबाडणूक होते त्यावर लोकहितवादी अनेक निबंधातून तुटून पडताना दिसतात.स्वतः ब्राह्मण असूनही ब्राह्मणांच्या दोषांवर कडाडून हल्ला चढवताना आपली लोकहिताची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी साधार दाखवून दिले.
लोकहीतवादींनी आधुनिक दृष्टिकोण उराशी बाळगून तत्कालीन आर्थिक परिस्तिथीविषयी मीमांसा केलेली आहे.एकोणिसाव्या शतकात स्वदेशीचा पुरस्कार व परदेशातील मालाचा तिरस्कार करण्याचा राष्ट्रवादी विचार मांडून लोकहीतवादींनी अर्थव्यवस्थेविषयी मूलगामी विवेचन केले आहे.
ज्ञानिष्ठतेचा पुरस्कार करीत असताना ज्ञानावर अखंड निष्ठा ठेवून ते अज्ञान-अंधश्रद्धेवर हल्ला करत राहिले.'इंग्रजी विद्या' , 'संस्कृत विद्या' ,'विद्वान कोणास म्हणावे' ,'ग्रंथ' , 'नवीन ग्रंथांची आवश्यकता' इत्यादी निबंधांतून त्यांनी ज्ञानमाहात्म्य विशद करून सांगितले आहे. प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या, शास्त्राच्या, विज्ञानाच्या, तर्काच्या आणि विवेकाच्या कसोटीवर तपासून स्वीकारली पाहिजे. पोथ्यापुरणातील भाबड्या श्रद्धेवर अजिबात विश्वास ठेवू नका, असे आग्रही प्रतिपादन ते सतत करीत राहिले.
लोकहीतवादींचे सर्व क्रांतिकारक मूलगामी विचार प्रामुख्याने शतपत्रांतच आले आहेत.त्यामुळे समाजाने त्यांना दिलेली ही मान्यता वाजवीच आहे.
-©पूर्वा बडवे
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know