Sunday, June 13, 2021

ताई,मी कलेक्टर व्हयनू

*पुस्तक क्रमांक -📗82..🖋️*
*पुस्तकाचे नाव* - 
      *ताई,मी कलेक्टर व्हयनू*
*लेखक- राजेश पाटील*

"ताई,मी कलेक्टर व्हयनू" या  आत्मकथनाची 26 वी आवृत्ती हातामध्ये पडली आणि आघाशासारखी वाचून काढली. शून्यातून विशाल आकाशाकडे झेपावणारा हा संघर्षमय प्रवास वाचत असताना खूप काही शिकण्यास मिळाले..... 
परस्थितीच्या झळा माणसाला खूप काही शिकवून जातात. आणि जे कोणीच कधी केले नाही ते तुम्ही केले तरच.....जे कुणालाही कधी मिळाले नाही ते तुम्हाला मिळतेच... फक्त अंगी असावी लागते जिद्द, चिकाटी , साहस,आणि आत्मविश्वास...... जो राजेश पाटील यांच्याकडे होता. आणि तो तुम्हा-आम्हा सर्वांकडे आहे,फक्त तो स्वतःला ओळखता आला पाहिजे.....

"आमचा बाप आणि आम्ही " या पुस्तकाचे लेखक, मा.कुलगुरू डॉ.नरेंद्र जाधव यांनी या आत्मकथनाला दिलेली प्रस्तावना संपूर्ण पुस्तकाचा सार आपल्या डोळ्यासमोर उभे करते. 
ताई, मी कलेक्टर व्हयनू, या आत्मकथनाला जवळपास बारा वर्ष होऊन गेले तरी सुद्धा आजही ते तितकेच ज्वलंत , वास्तविक स्वरूपात सर्व घडामोडींना सर्व विषयांना स्पर्श करून जाते. शेतकऱ्यांच्या विषयी असणाऱ्या अडचणी ,राजकीय ,सामाजिक ,शैक्षणिक या सर्व घडामोडीवर अत्यंत परखडपणे आणि वास्तविक लेखन या पुस्तकामध्ये केलेले आपणाला पहावयास मिळते.

ताई, मी कलेक्टर व्हयनू. हे पुस्तक आजच्या तरुण पिढीसाठी दीपस्तंभाप्रमाणे अत्यंत प्रभावी असे मार्गदर्शनपर लेखन आहे. यामध्ये केवळ स्वतःच्या वाट्याला आलेले दुःख, दारिद्र्य, स्वतः विषयीची समाजाने केलेली हेटाळणी इथपर्यंतच मर्यादित कथन केलेले नसून समाजामध्ये असणाऱ्या सर्व घटकांचे बारकाईने केलेले निरीक्षण की जे आजच्या तरुण पिढीलाच नव्हे तर संपूर्ण मानव व्यवस्थेला लागू पडणारे, विचार करायला लावणारे असे हे दर्जेदार लेखन आहे.

जळगाव जिल्ह्यातील डोंगराच्या पायथ्याशी असलेले
 " ताडे "हे लेखकाचे लहानशे गाव. गावामध्ये सर्व जाती-धर्माचे राहणारे लोक व गावातील शेतकरी बांधवाविषयी , केलेले वर्णन हृदय पिळवटून टाकणारे आहे.शेती करण्यासाठी, कर्ज घेण्यासाठी गहाण ठेवलेली शेती सोडवणे म्हणजे, जणू काही वाघाच्या तोंडातून शेळी सोडवण्यासारखे वाटते.

लेखक राजेश पाटील यांचे आई-वडील ही शेतकरी कुटुंबातीलच.... घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती, मोलमजुरी करणारे ,दुसऱ्याच्या रानात कामाला जाणारे,भाजीपाला विक्री इत्यादी कामे करून आपली उपजीविका चालवणारे एक प्रामाणिक दाम्पत्य. आई-वडिलांच्या कामाचा तसा लेखकावर काहीच परिणाम लहानपणी झाल्याचे दिसून येत नाही, गावातील एक उनाड, खोड्या करणारा, घरी भांडण आणणारा एक मुलगा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचे. या त्यांच्या अशा वागणुकीमुळे असा एकही दिवस जात नव्हता की, त्यांची आई की जे त्यांना ताई म्हणत होते त्यांचा मार खाल्ला नाही.

लेखकाच्या आईच्या अंगी असणारा साधेपणा,शुद्धपणा
कणखरपणा, विवेक बुद्धी, सकारात्मक दृष्टिकोन हे असणारे गुण नकळत भविष्यात लेखकाच्या अंगी घेऊ लागले. गरिबीचे चटके बसत असतानाही त्यांच्या आई वडिलांनी प्रामाणिकपणे आपल्या हक्काचे जे जवळ आहे तेवढेच त्यांनी आपल्या जवळ बाळगलं.

शालेय जीवनातच मुलांच्या संगतीमुळे चोरी करणे, जुगार खेळणे इत्यादी सवयी लेखकाला लागल्या. परंतु हे सगळं करत असताना त्यांनी  खूप काबाडकष्ट ही  केलेचे दिसून येते. सकाळच्या प्रहरी पाव विकणे, आई बरोबर बाजारात जाणे, कापूस वेचणी करणे,विहिरीवर विहीर खोदकाम, खत भरणे, वाळू भरणे इ. कामे त्यांना करावी लागली.आपल्या वर्गातील मुलांच्या घरासमोर ही त्यांना मजुरी म्हणून काम करावे लागले.

राजेश पाटील यांच्या जीवनात संग्राम नावाचा मित्र आला आणि त्यांचे आयुष्यच पालटून गेलं. कारण चांगल्या मित्रांची संगत ही आयुष्याची रंगत वाढवताना आपणाला दिसून येते. मग ती मैत्री कृष्ण सुदामाची असो,
 कवी कलश व छत्रपती संभाजी महाराज यांची असो चांगल्या मैत्रीच्या रोपट्याला फळेही नेहमी चांगल्या प्रकारची येत असतात. म्हणून तर पुढे संग्राम यांनी डॉक्टर होऊन भविष्यात बाबा आमटे यांच्या नावाने हॉस्पिटल सुरू केले. संग्राम यांनी राजेश पाटील यांचे वेळोवेळी कौतुक केले, प्रोत्साहन दिले.ज्या ठिकाणी पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसे असतात त्या ठिकाणी अशी नररत्न उगवतात, तयार होतात हे दिसून येते.

राजेश पाटील यांची उत्तरोत्तर शैक्षणिक प्रगती चांगली होत असताना केवळ घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना चांगल्या प्रवाहात शिक्षण घेता आले नाही. त्यांनी बी.एस.सी करून उपजीविकेसाठी नोकरी शोधण्याचे काम सुरू केले. परंतु मनामध्ये समाजातील असणारी विषमता,दारिद्र हे त्यांच्या मनामध्ये कुठेतरी सलत होते.त्यामुळेच त्यांनी प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याचा निश्चय केला. कठोर परिश्रम करत असतानाही वारंवार येत असलेले अपयश परंतु त्या अपयशाने  ते अजिबात खचून गेले नाहीत. त्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखल्या होत्या आणि जी माणसं स्वतःला ओळखतात यश त्यांनाच ओळख देते. आपल्या पूर्ण क्षमतेचा तीव्रतेने त्यांनी वापर केला आणि यशाच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले.

प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही भव्य महत्त्वकांक्षा ठेवणारीच माणसं असामान्य ठरत असतात. कारण राजेश पाटील यांनी आय.ए.एस होण्याचा जो मार्ग निवडला तो निवडत असताना त्यांना जे मित्र परिवार भेटले त्यातील कित्येक ग्रामीण भागातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाढलेले होते. त्यामुळे लेखकाच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. अशक्य काहीच नाही आपण ही ते साध्य करू शकतो हे त्यांनी करून दाखवले आणि ज्या वेळेस ते परीक्षा पास झाले त्यावेळेस त्यांच्या मनाची झालेली आनंदमय घालमेल, आईला पास झाल्याचे  वार्ता देताना हृदय भरून व्यक्त होणारी गोष्ट दिसून येते. कारण प्रत्येक आई-वडिलांची एकच इच्छा असते की आपल्या मुलाने स्वतःच्या पायावर उभे रहावें, काहीतरी करून दाखवावे आणि ते जर आई-वडिलांच्या अपेक्षेपेक्षा भरभरून मिळाले तर त्यांच्या इतका सुखी पृथ्वीतलावर दुसरा कोणीच नसतो. आणि ते स्वप्न पूर्ण करणारा मुलगा ही जगाच्या पाठीवर त्याच्या इतका भाग्यवान दुसरा कोणीच नसतो.

आजचा तरुण वर्ग जो आपल्या परिस्थितीला दोष देऊन नशिबावर केवळ विश्वास ठेवत आहे त्यांच्यासाठी हे आत्मकथन म्हणजे त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यासारखे  आहे.

 राजेश पाटील यांनी आपल्या आयुष्यात घडलेली प्रत्येक गोष्ट अत्यंत वास्तव पद्धतीने या ठिकाणी मांडलेली आहे. बालपणीचे खट्याळ वर्णन असो, शालेय जीवनातील प्रेम प्रकरण असो,सामाजिक, राजकीय शैक्षणिक, शेती विषयक ज्या ज्वलंत समस्या आहेत. प्रत्येक गोष्टींमध्ये भ्रष्टाचार, अन्याय या  अत्यंत अभ्यासपूर्ण वास्तववादी स्वरूपात या ठिकाणी मांडलेल्या आहेत, यावर आजही विचार मंथन होणे ही एक काळाची गरज आहे.

ताई, मी कलेक्टर व्हयनू,हे पुस्तक आजच्या तरुण पिढीसाठी त्याचप्रमाणे समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी अतिशय सुंदर वाचनीय आणि या पुस्तकातून भरपूर काही घेण्यासारखं,शिकण्यासारखं असे बरेच काही आहे. हे पुस्तक सर्वांनी आवश्य वाचावे आणि आपल्या संग्रही ठेवावे. 
पृष्ठसंख्या -184 
मूल्य -150 

अभिप्राय शब्दांकन
           सिंधुसूत...🖋️

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know