Sunday, June 13, 2021

पुस्तकाचे नाव- ज्ञानबोध

*पुस्तक क्रमांक -📗84..🖋️* 
*पुस्तकाचे नाव- ज्ञानबोध*
*लेखक- प्रा.विकास शिंदे*. (7385379613)

समुद्र मंथनातून ज्याप्रमाणे अमृत कलश बाहेर येतो त्याप्रमाणेच दर्जेदार लेखक, साहित्यिक यांनी लिहिलेल्या आत्मचरित्र, कादंबरी गौरवग्रंथ, कवितासंग्रह इत्यादींचे सखोल वाचन करून त्यामधूनच प्रा.विकास शिंदे यांच्या 
विचार मंथनातून, लेखणीतून "ज्ञानबोध "या अमृतरुपी  ग्रंथाची अत्यंत सुरेख निर्मिती झालेली आपणास दिसून येते.

"ज्ञानबोध" सारखी साहित्य निर्मिती खरंतर वाचकाला एका पुस्तकामध्येच अनेक पुस्तकांची ओळख करून देत असतात. त्यामुळे निश्चितच ही पुस्तके सुज्ञ वाचकांना नेहमीच प्रेरित करत असतात. ती पुस्तके उपलब्ध करून वाचण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. अशाच या "ज्ञानबोध" पुस्तकांमध्ये आलेल्या साहित्यिकांच्या पुस्तकांची आपल्या घरातील ग्रंथ संग्रहात वृध्दी व्हावी असं मनापासून वाटतं.

"पाझर मातृत्वाचा...! हे मी संपादित केलेलं पुस्तक मुधोजी महाविद्यालय फलटण आयोजित पहिले मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले,त्यावेळेस ते पुस्तक श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते प्रकाशित झाले त्यावेळी प्रा.विकास शिंदे आणि माझी भेट,व ओळख झाली. अतिशय शांत,नम्र,अभ्यासू असणाऱ्या व्यक्तिमत्वामध्ये एक दर्जेदार लेखक, साहित्यिक असल्याची जाणीव माझ्यासह उपस्थित श्रोत्यांना झाल्याची दिसून आली.

प्रा.विकास शिंदे यांचे वडील सुरेश शिंदे यांनी सर्ज्या, मेंडका, मुडा अशा कितीतरी ग्रामीण भागातील जीवनावर तसेच मुक्या प्राणीमात्रावर कादंबरीचे लेखन केलेले आपणास दिसून येते. त्यांच्या साहित्याचा पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झाल्याचा दिसून येतो. अनेक घरात मुलं साधा तांब्या भरून मागितला तर पटकन देत नाहीत. पण "सर्ज्या"(बैल)सारखा मुक्त जीव आपल्या धन्यासाठी काम करायला सिद्ध होतो अशा अद्वितीय लेखनाने "सर्ज्या" ही कादंबरी  सर्व वाचकांनी 
अक्षरक्षा डोक्यावर घेतली व "सर्ज्याकार"म्हणून सुरेश शिंदे पुढे नावारूपाला आले. तसेच प्रा.विकास शिंदे यांची आई सुरेखा शिंदे यांनीही "लेखकाचं घर पेलताना " हे दर्जेदार आत्मकथन निर्मिती केली त्यामुळे निश्चितच घरामध्ये आई-वडिलांचा असणारा साहित्यिक वारसा लेखकाने अत्यंत कौशल्याने समर्थपणे पेललेला दिसून येत आहे.

प्रा.विकास शिंदे यांनी लहानपणातच ज्या कविता लिहिल्या त्या कवितांचा "वाळूचे घर" नावाचा संग्रह तयार केलेला आहे त्याचप्रमाणे कॉलेज जीवनामध्ये
" विद्यार्थी "ही लिहिलेली कादंबरी बाल अनुभूतीचा खजिना असल्याचा आपल्याला दिसून येतो. याचबरोबर ग्रामीण जीवनावर आधारित दुष्काळामध्ये पावसाविना होणाऱ्या शेतकऱ्यांची व्यथा  "छावणी" सारखी कादंबरीत मांडून त्यांनी पूर्ण केली आहे.

"ज्ञानबोध" या पुस्तकामध्ये अनेक दिग्गज व्यक्तिमत्व साहित्यिकांचा उल्लेख केलेला तर आहेच परंतू एका मुलाने आपल्या आई वडिलांनी लिहिलेल्या पुस्तकांचे समीक्षण करून स्वनिर्मिती केलेल्या पुस्तकामध्ये त्यांचा समावेश करणे हि महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी असून तो एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल.

"ज्ञानबोध" या पुस्तकामध्ये 'शिवाजी कोण होता' या गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या पुस्तका विषयी माहिती दिलेली आहे. 1988 मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या 60 हजारांहून प्रतींची विक्री झालेली दिसून येते.

"शिवपत्नी सईबाई" ही कादंबरी डॉ.सदाशिवराव शिवदे सरांनी सर्वासमोर आणली एकूण 66 प्रकरणात आणि चार भागात ही विभागलेली कादंबरी राजघराण्यातील इतिहास, प्रसिद्ध चित्र या कादंबरीत ठिकठिकाणी छापलेली आहेत. या कादंबरीला मोठी वैचारिक पार्श्वभूमी लाभलेली असून प्रस्तावना प्राचार्य विश्वासराव देशमुख सरांनी लिहिलेली दिसून येते.

 " जिणं आमुचं " हे आत्मचरित्र बेबीताई कांबळे यांनी लिहिलेलं, आणि साहित्य क्षेत्रात मानाचे पान  बनून राहिलेल्या आत्मचरित्राला राज्य पुरस्कार देऊनही सन्मानित करण्यात आलेले आहे. या पुस्तकाचे अनुवाद विविध भाषांमध्ये केलेले दिसून येते. बेबीताई कांबळे यांचे साहित्य अमेरिकेतील युनिव्हर्सिटी मध्ये सुद्धा अभ्यासक्रमात समाविष्ट केलेले आपणास दिसून येते. या पुस्तकाला थोर समाजसेविका व शिक्षणतज्ञ म्हणून नाव मिळवलेल्या डॉ. मॅक्सिन बर्नसन यांची प्रस्तावना लाभलेली आहे

प्राचार्य शिवाजीराजे भोसले यांच्या "दीपस्तंभ" पुस्तकाविषयी अत्यंत समर्पक असं वर्णन केले आहे. भोसले सरांचे चरित्र महाव्यापक आकाशाला गवसणी घालणारे, समुद्राच्या लाटांना मागे सारणारं आणि समाजाला प्रेरित करणारे आहे. त्यांच्या वक्तृत्वाने मराठी मनात चैतन्य निर्माण केली आहेत. 432 पानांचे पुस्तक 47 प्रकरणांतून एक अखंड चरित्र तपश्चर्येचे फळ आहे. थोरामोठ्यांची चरित्रे पहावीत, वाचावीत, जाणावीत, आठवावीत आणि सांगावीत असा सरांचा स्वभावाच बनून गेलेला असल्याचेही लेखक या ठिकाणी आवर्जून सांगतात.

"श्रीमंत योगी" हा गौरव ग्रंथ ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्तृत्वावर  आधारित असून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील 34 मान्यवरांनी ना.श्रीमंत रामराजे यांच्या बद्दल लिहिले आहे. सुमारे दीडशे किलोमीटर लांबून दुष्काळी भागामध्ये पाण्याची गंगा आणली आणि सर्व माळराने, ओसाड, खडकाळ राने हिरवीगार झाली. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात असलेलं अश्रू त्याचे रूपांतर रानावनातील पाण्यामध्ये,हिरव्यागार शिवारात केले. हा गौरव ग्रंथ म्हणजे महाराष्ट्राला जलसंपदेचा प्रसाद देणारी आणि फलटणच्या मातीचं श्रेष्ठत्व सिद्ध करणारी कार्यसंपन्न राजघराण्याची यशोगाथाच आहे असं लेखक आवर्जून सांगतात.

"ज्ञानबोध" या पुस्तकात जवळपास 37 दर्जेदार पुस्तकांची माहिती या ठिकाणी प्रा. विकास शिंदे यांनी दिलेली आहे. त्याचप्रमाणे प्रा. विकास शिंदे यांच्या साहित्य लेखनात ज्यांचे योगदान मिळाले आहे त्या सर्वांचा उल्लेख या ठिकाणी त्यांनी आवर्जून केलेचा दिसून येतो. पृष्ठ क्रमांक 90 वरील 
"विकास पुढे चल"  असे मधु नेने यांनी त्यांचे काव्यसंग्रह विषयी केलेले कौतुक त्यांना प्रेरणा देऊन जाते. तसेच "झोंबी "कादंबरीकार डॉ.अनिल यादव यांनी
 !!तुझं कौतुक वाटतं !!असं म्हणून भेटायला ये म्हणून व्यक्त केले इच्छा लेखक प्रा. विकास शिंदे यांना खूप काही मिळवून देते.तसेच साहित्यिक विद्याधर म्हैसकर यांनी छावणी या कादंबरीविषयी "छावणीच्या पोटातील व्याकुळता विकासाच्या कादंबरीत दिसेल असे मत व्यक्त केले आहे.

खरं" ज्ञानबोध"सारखी अशी काही दुर्मिळ पुस्तक वाचकांच्या भेटीला मिळाल्यानंतर खरंतर ती पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटतात व मनाच्या गाभाऱ्यामध्ये त्यांना साठवून ठेवावी वाटतात. लहानापासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना हवाहवेसे वाटणारे ज्ञान, शब्द संपत्ती अशा पुस्तकातून  मिळत असते.

"ज्ञानबोध " प्रा.विकास शिंदे यांच्या पुस्तकाला मुधोजी महाविद्यालय फलटणचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. प्रभाकर पवार सर यांची सुंदर अशी प्रस्तावना लाभलेली आहे. आपल्या विद्यार्थ्यांच्या लेखणीतून अवतरलेल्या 
अमृतरुपी ग्रंथाला, पुस्तकाला प्रस्तावना लिहीत असताना आपल्या गुरूला झालेला आनंद याठिकाणी ओसांडून वाहत असलेला आपल्याला दिसून येत आहे.ज्ञानबोध या पुस्तकाच्या नावाप्रमाणेच असणारे मुखपृष्ठही खूप बोलके आहे.अत्यंत सुंदर असे हे पुस्तक सर्वांनी आवश्य वाचावे आणि आपल्या संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे.
 पृष्ठसंख्या -96 
 मूल्य -150
*अभिप्राय शब्दांकन*
      *सिंधुसूत...🖋️*

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know