मी सायूरी( मेमरीज ऑफ गेश्या)
मूळ इंग्रजी लेखक - आर्थर गोल्डन
अनुवाद- सुनंदा अमरापूरकर
प्रकाशक -मेहता पब्लिशिंग हाऊस मूल्य चारशे- रुपये
पृष्ठसंख्या -520
समुद्रकाठच्या खेड्यात स्वच्छंद बागडणारी कोळ्याची पोर चिओचान..... दुर्दैवाला शरण गेलेला तिचा बाप तिला नवव्या वर्षी विकतो. आणि ती येऊन पडते गेशा बाजारात. जिथे मुलीच्या मनाचं ,शरीराचं शेवटच्या क्षणापर्यंत शोषण करून त्याची किंमत वसूल केली जाते .तिथे अतोनात कष्ट अवहेलना ,उपासमार यांचा सामना करता करता अंगभूत सौंदर्य ,हुशारी आणि नशिबाची साथ यांच्या जोरावर वयाच्या तिशी पर्यंत ती प्रसिद्ध गेशा सायुरी म्हणून थेट न्यूयॉर्क मधल्या एका टी हाऊस ची मालकीण कशी बनते याची ही कथा. सांगण्याच्या ओघात इतरही अनेक जणांच्या कहाण्या सायुरी सांगत राहते. हे सगळे घडत असताना आपल्या बहिणी बद्दलची आंतरिक ओढ ,निसर्गप्रेम ,स्वतः पेक्षा 31 वर्षांनी मोठ्या असलेल्या चेअरमन बद्दलची उत्कट प्रीती भावना अशी तिच्या भावनांची आंदोलने व त्यातून स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न हे सगळं एखाद्या कवितेसारखं वाचकांवर गारुड करतं ,जपान मधल्या सांस्कृतिक जीवन ,दुसऱ्या महायुद्धाचे भीषण परिणाम ,पिढ्यान् पिढ्या योजनाबद्ध तरीही गुप्तपणे चालू राहिलेली रात्रीच्या फुलपाखरांची ही मोहमयी दूनिया हे अनोळखी विश्व आपल्याला थक्क करून सोडते . वेश्या व गेश्या या दोन्ही व्यवसायातील गेश्या म्हणजे थोडा वरचा स्तर हे आपल्याला समजते. कोळी लोक यांच्या जीवनापासून सुरु झालेली कादंबरीची सुरुवात आपल्याकडील समुद्र व कोळी लोकांच्या जीवनाची साम्य असणारे वाटते .योरोइदो, सेनझुरु, गिओन,तोक्यो,क्योतो, न्यूयॉर्क.... असा विविध खेडी ते शहर झालेला सायुरी चा प्रवास आपल्याला त्या शहराची व खेड्यांची ओळख करून देतो तसेच इथे असणाऱ्या एका गेश्या
च्या घराला असणार ओकिया हे नाव आपल्याकडील कोठी यासाठी वापरलं याची माहिती होते. व्यवसायात असणाऱ्या स्पर्धा कुरघोडी चाली आपले अस्तित्व टिकवण्यासाठी केलेल्या हालचाली कट-कारस्थान हे सगळीकडेच असते. देश ,राज्य ते गल्लीपर्यंत सारखेच असते हे जाणवते. प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाची लढाई लढवावी लागते. मग ते क्षेत्र कुठलंही असो. सायुरीच्या आयुष्यात आलेल्या सर्वांची कहाणी तिच्याबरोबरच आपल्याला समजत जाते .आपलं आयुष्य पारदर्शकपणे सर्वांसमोर मांडताना आपल्याला गेशा यांची एक विलक्षण वेगळीच दुनिया समजते. सायुरी ची कहाणी वाचत असताना जपानच्या देशात जीवनातील अनेक परंपरा रितीरिवाज त्यातले सूक्ष्म तपशील यांचं दर्शन आपल्याला घडतं. गेशाने आपला जीवनपट कुणापुढे उलगडून नये असा अशा परंपरेतला कडक संकेत असल्यामुळे सायलीच्या निधनानंतर तिच्या आठवणी प्रसिद्ध करण्यात आल्या. तिला डायरी लिहिण्याची सवय होती. गेशा म्हणजे कलावती. आपल्या कलेने सौंदर्याने ,मधुर भाषणाने ,पुरुषांना रिझवणारी, मनरंजना !तिला म्हणायचे 'गेशा'
एक वाचक @ योगिता मराठे
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know