काव्यसंग्रहाचे नाव .... रमाई
संपादन... सिद्धार्थ तलवारे
परिचयकर्ता .. कचरू चांभारे
प्रकाशन .. अक्षरा प्रकाशन
पाने ....104
मैत्री जुळण्याचा पहिला निकष सहवास आहे पण प्रसारभाध्यमाच्या प्रभावाने हा निकष निकाली निघाला आहे.प्रत्यक्ष सहवास जरी घडला नाही पण वैचारिक बंध जुळला तरी मैत्री घडतेच .याची प्रचिती अनेकवेळा आली तशी रमाई काव्यसंग्रहाच्या निमित्तानं पुन्हा आली.रमाईमातेच्या स्मृतिदिनी मी लेख लिहिला होता ,तो लेख लेखक/कवी सिद्धार्थ तलवारे यांना आवडला .त्यांनी तसा मेसेज केला मग आमच्यात संवाद सुरू झाला.त्यातूनच घट्ट वीण जुळली व परिवर्तनवादी चळवळीतील निष्ठावान,होतकरी बुद्धीजीवी मित्राचा संग जुळून आला.रमाई काव्यसंग्रह सिद्धार्थ तलवारे यांनी संपादित केलेला काव्यसंग्रह आहे.
काव्यसंग्रहाचा परिचय देण्यापूर्वी रमाई विषयाकडे आकृष्ट झाल्याचा सिद्धार्थजींचा प्रवास मांडणं उचित वाटतं.सिद्धार्थ तलवारे यांचे वडील शिक्षक असल्याकारणाने वाचन,लेखन व भाषणाचे धडे घरातूनच मिळाले.शिवाय मातृकुलाकडून आमदार खासदारकीपर्यंत मजल गेलेली असल्यामुळे राजकीय धड्यांची धुळपेरणीही घरातच झालेली.प्राथमिक शिक्षण घेत असताना महापुरूषांच्या जयंती पुण्यतिथीला भाषण करणे हा सिद्धार्थजींचा छंद होता.या छंदामुळे महापुरूषांची जीवनगाथा बाल सिद्धार्थच्या मनात घर करत होती अन् याच वैचारिक घराने त्यांचे तारूण्य झपाटून टाकले गेले.चळवळीचा प्राणवायू घरातूनच मिळालेला ,त्यामुळे आंबेडकरवादी चळवळीचा ते आपोआपच एक हिस्सा बनले.महामानव बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा व एकूणच चळवळीचा अभ्यास करत असताना रमाईमातेच्या असीम त्यागाने प्रस्तुत कवी झपाटल्यागत झाला.रमाईमातेबद्दल अजून खूप माहिती मिळविण्याच्या उद्देशाने त्यांनी ग्रंथाचा शोध सुरू केला पण दुर्दैवाने रमाईमातेवर फारसं साहित्य सापडलं नाही.मग इथूनच प्रवास सुरू झाला स्व लेखनाचा.रमाईंविषयी लेखन करण्याची कल्पना नव्वदच्या दशकात लेखकाच्या डोक्यात आली.त्याकाळी प्रसारमाध्यमाची साधने व त्यांचा प्रसार वेग या दोन्ही गोष्टी मर्यादित होत्या.तरीही सिद्धार्थजींनी जिद्द सोडली नाही.प्रसिद्ध लेखक यशवंत मनोहर,गंगाधर पानतावणे ,कवीचे राजकीय गुरू प्रा.जोगेंद्र कवाडे,रा.सु.गवई ॲड.गौतमदादा भालेराव अशा अनेक राजकीय,सामाजिक व लेखन क्षेत्रातील मान्यवरांची भेट घेतली.सातत्याने वर्षानुवर्षे पत्र व्यवहार केला.रमाई काव्यसंग्रह जन्माला घालताना एक बोलका प्रसंग इथं मांडूनच आपण पुढे गेलो तर कवीची सिद्धता लक्षात येईल.कवी /लेखक यशवंत मनोहर हे चळवळीतले खूप मोठं नाव आहे.रमाई या संपादित काव्यसंग्रहास कविता द्या म्हणून प्रस्तुत कवी तलवारे ,यशवंतजींना भेटले होते.वारंवार पत्र व्यवहार केला होता.त्यावेळी यशवंतजींनी रमाईविषयी काहीही लिहिलं नव्हतं.पण प्रस्तावना लिहिण्याच्या हेतूने हातात लेखनी घेतलेल्या कवी यशवंत यांना रमाईमातेच्या कर्तृत्वाने झपाटून टाकले.प्रस्तुत काव्यसंग्रहास यशवंत सरांनी प्रस्तावना दिलीच पण रमाई नावाची एक स्वतंत्र कादंबरी लिहिली.जी कादंबरी आज रमाईमातेची कारूण्यमय गाथा सांगते.रमाई कादंबरीबद्दल लिहिताना पहिल्याच ओळीत कवी यशवंत लिहितात की रमाई कादंबरी सिद्धार्थ तलवारे या तरूणाच्या रमाई काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेमुळे लिहिण्यात आली आहे.हा खरोखरीच तलवारेंच्या लेखन तलवारीला धार देणारा प्रसंग आहे.
प्रस्तुत काव्यसंग्रहात एकूण 54 कविता आहेत.रमाई ही दलितांची,शोषितांची,वंचितांची माय आहे.प्रस्तुत कवीने रमाई काव्यासाठी हाक दिल्यानंतर अनेक लेखक /कवी प्राध्यापक साहित्यिकांनी माईंना शब्दबद्ध केले .माईविषयीची श्रद्धा ,भक्ती मांडताना संबंधित कवी कारूण्याच्या कवितेत डुंबुन गेल्याचे आपल्या लक्षात येईल.लेखकाच्या मनोगतात आपल्याला लेखकाच्या अपार कष्टाची व जिद्दीची कल्पना येते.प्रस्तुत काव्यसंग्रहास कवी यशवंत यांची दीर्घ प्रस्तावना आहे.प्रस्तावनेतून रमाईची त्यागमय ,चित्तवेधी जीवनकहानी कळते. आयुष्यरेखेच्या लांबीवर रमाईचे आयुष्य मोजलं तर त्याची लांबी खूप कमी भरते. अवघ्या पस्तीशीच्या घरातलं आयुर्मान त्यांना लाभलं.पण रमाईच्या आयुष्याची खोली विचारात घेतली तर अख्ख्या दलित जनांची ती मातोश्री आहे.करोडोंची मायमाऊली बनण्याचा सन्मान रमाईस मिळाला.यातच त्यांच्या आयुष्याची थोरवी स्पष्ट होते.रमाई हा काव्यसंग्रह मातृत्वाच्या महानतेचाच प्रतिभावंतांनी केलेला गौरव आहे.काव्यसंग्रहातील कविता या वेगवेगळे भाव मांडणा-या आहेत.काही कवितांत रमाई मातेची कष्टमय कहानी सात्विकतेने मांडली आहे तर काही कवींनी विद्रोही जागर केलेला आहे.काही कविता व्याकुळ करणा-या आहेत.कष्टाचे डोंगर उपसणारी रमाई माय मांडताना कवींनी शब्दांचे डोंगर उभे केले आहेत.प्रस्तुत काव्यसंग्रहात संपादित केलेल्या कविता एकाहून एक सरस आहेत.त्यामुळे कोण्या एका कवींबद्दल सविस्तर मांडलं तर इतरांवर अन्याय केल्यासारखे होईल.पण तरीही विषय प्रस्तुतीकरणासाठी काही कवींचा नामोल्लेख व्हावा,असं मला वाटतं.कवी सूर्या रमाईमातेच्या सहनशीलतेला शब्दबद्ध करताना छान व्यक्त झालेत.रमाई ही कारूण्यमय महासागर आहे जिथं वादळी सागर ,युगंधर क्रांतीपुरूष उजेडासाठी जळताना विसावला.बाबांचा रथ ओढताना तन मन धन आयुष्य लावून रमाईने रथाला बळ दिलं असं अर्जून वाघमारे हा कवी म्हणतो.माऊली माऊली असा रमाईचा गौरव करणारी उषा भालेराव यांची कविताही छान आहे.उषा साळवेच्या कवितेत सामाजिक स्थिती व त्या स्थितीवर केलेला जोरदार प्रहार भारदस्तपणे मांडला आहे.कुमुदिनीच्या कवितेत रमाईं बाबांचा अर्धवट सुटलेला डाव मांडला आहे.काही कवींनी दीर्घ काव्य लिहिताना रमाई जीवनगाथा सार मांडण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे.यामध्ये माया वासनिक व मीनाक्षी मून यांचे दीर्घ काव्य दखलपात्र आहे.नेरूरकर आपल्या दीर्घ कवितेत म्हणता आई या शब्दानंतरचं सुंदर गोड नाव म्हणजे रमाई.कवी यशवंत यांच्या कवितेतली प्रत्येक ओव न् ओळ आशयगर्भी आहे.कारूण्य,वेदना व खंत यांचा इमला बांधताना यशवंत मनोहर यांनी मनोहारी मांडणी केलेली आहे.त्यांची कविता चळवळीला प्राण देणारी आहे.नामदेव ढसाळांचीही एक विद्रोही कविता प्रस्तुत काव्यसंग्रहात आली आहे.बाबांची सावली म्हणून रमाई वाचताना हिरा निमगडेंची कविता वाचकाचा ठाव घेते.संपादक कवी सिद्धार्थ तलवारे यांचीही एक कविता प्रस्तुत काव्यसंग्रहात आहे.त्यांच्या कवितेतून दलितांची उत्थानगुंफा ठरलेल्या ज्ञानपीठ त्यागमूर्ती रमाई मातेस कवी कोटी कोटी प्रणाम करतो.
काव्य हे कमी शब्दात जास्त आशय मांडत असतं.प्रस्तुत काव्यसंग्रहात रमाईंविषयी कृतकृत कृतज्ञता व्यक्त झालेली आहे.स्वतः तलवारे यांची चोवीस वर्षाची कष्टप्रद वाटचाल आहे.
काव्याची आवड असणारांनी कवितेतून रमाई वाचण्यासाठी प्रस्तुत काव्यसंग्रह वाचायाला हवाच.
संपादक कवी सिद्धार्थ तलवारे बिलोली जि.नांदेड
परिचयकर्ता ..कचरू चांभारे
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know