Tuesday, June 15, 2021

पुस्तकाचं नाव- कोल्हाट्याचं पोर लेखक - किशोर शांताबाई काळे

पुस्तक क्रमांक-📗87..🖋️ 
   पुस्तकाचं नाव- कोल्हाट्याचं पोर
   लेखक - किशोर शांताबाई काळे

1994 मध्ये M.B.B.S शिक्षण पूर्ण.... 27 वर्षापूर्वीचा काळात उच्च प्रतीचे शिक्षण घेणे कदाचित त्याकाळी तारेवरची कसरतच... मागासलेल्या समाजामध्ये जन्माला येऊनही आयुष्य हे शिवधनुष्य पेलण्याइतकं महाकठीण तरीही कोल्हाटी समाजातील एक मुलगा स्वतःच्या अपार परिश्रम , जिद्द,चिकाटी,आत्मविश्वास या जोरावर डॉक्टर झाला.. कारण विशिष्ट जातीवर किंवा नावावर किंवा उच्च कुळात कोणाच्या पोटी जन्म घेतला याच्यावर आपलं शौर्य अवलंबून नसतं तर आपल्या कृतीवर अवलंबून असतं आणि ज्याने हे शक्य करून दाखवलं त्याचं नाव किशोर शांताबाई काळे...

हो.... किशोर शांताबाई काळे कारण नाचणारीच्या मुलाच्या पुढे आईचं नाव लावलं जातं, कारण बापाचा पत्ताच नसतो.... बापाचे नाव लावण्यापासूनच जीवनाचा संघर्ष सुरू होतो.वैवाहिक जीवन हे तर त्यांच्या वाट्याला येतच नाही. घरातील वडीलधार्‍या बाप माणसांचा फक्त पैसा हाच उद्देश... पैशापुढे सर्व नातीगोती कवडीमोल... आई, बहीण,भाऊ कुणाचा तिथं पैसा फक्त गुणाचा.....

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाजाने नाकारलेल्या समाजाच्या,आई-वडिलांच्या, नातेवाईकांच्या प्रेमाला पोरके झालेल्या आणि आयुष्यभर पोरकेपणाची वागणूक मिळालेल्या एका मुलाची ही हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट स्वतः लेखकाच्या शब्दात....

"कोल्हाट्याचं पोर" हे आत्मचरित्र संपूर्ण समाज व्यवस्थेवर आणि समाज व्यवस्थेचा पाया असणाऱ्या सर्व जबाबदार घटकांना ही खूप मोठी चपराक आहे...
 नाचणे ही तर कला आहे, त्याचबरोबर स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी केलेले हे दिव्यकार्यच.... लहान मुल भुकेने व्याकुळ जरी झाले तरीही लोकांच्या मनोरंजनासाठी त्या मुलांना दूध न बसता नृत्य 
करायला जाणारी आई,एक- एक पैसा अंगावर फेकताना तो नाचत गोळा करायचा आणि गोळा करत असताना अक्षरक्षा थकून जाणे... 

     पाहणारा हा केवळ कला म्हणून पाहत नव्हता तर त्याच्या डोळ्यांमध्ये एक प्रकारची वासना होती.... पैशाची मस्ती होती.... आणि त्या जोरावरच ती धनदांडगे लांडगे  बायांना मालकी हक्क समजायचे.. बाया नाचत असताना कोणी खडे मारत, कोणी डोळा मारत, एखादं गाणं म्हणायला,नाचता आलं नाही तर मोठमोठ्याने ओरडत. कोलाटी समाजामध्ये पुरुष मंडळींनी बसून खायचं आणि त्यांच्या घरातील स्त्रियांनी मात्र त्यांच्या हाऊस भागवण्यासाठी नाचत राहायचं ही कोणती परंपरा आणि हा कोणता न्याय... हा आपणाला योग्य वाटतो का? आणि आजही काही बदल झाला असेल...?

लेखकाची आई शांता अतिशय हुशार सातवीपर्यंत शाळा शिकलेली शिक्षिका होण्याचं तिच्या डोळ्यासमोर स्वप्न.... आपण शिकल्यानंतर सर्व काही सुरळीत होईल असं तिला वाटायचं... परंतु शिकणं हे त्या समाजाच्या नशीबीच नव्हतं. ज्या वयात हातामध्ये पेन वही असावे त्या वयामध्ये पायामध्ये घुंगरू बांधावे लागले. आईला नाचता येत नव्हतं, अंग लवत नसायचे तरीही  ती हे अग्निदिव्य कार्य इच्छा नसतानाही करावे लागले... 

त्याकाळची चिरा उतरवणे ही एक अत्यंत भयानक पद्धत होती. जो व्यक्ती जास्त पैसे देईल त्या व्यक्तीचा त्या महिलेवर मालकी हक्क असायचा... सर्व काही उपभोगायचं, मनाला वाटेल तेव्हा यायचं, परंतु लग्न हा विषय नाही लेखकाच्या आजोबांनी सुरू केलेली हि परंपरा आपल्याच पोटच्या मुलीचे,बहिणीचं शरीर विकणारा या नात्याला कोणतं नाव द्यायचं... बाप म्हणावं तर बाप हा शब्द बदनाम होईल, अपवित्र होईल..... 

लेखकाच्या आईचा ही चिरा नेरल्याच्या एका आमदाराने उतरवला दोन अडीच महिने आनंदात गेले. आईला दिवस गेले आणि तिथून पुढे आमदारांनी आईकडे येणेच बंद केलं.. केवळ शरीरावर प्रेम करणारी किडा-मुंगी सारखी हजारों स्वार्थी माणसं आपल्या अवतीभवती भेटतात... परंतु मनापासून मनापर्यंत प्रेम करणारे मोजकेच आणि विरळच आणि अशी माणसे मिळणे खरंतर भाग्यच.....
पैसेवाले, धनदांडगे लोक तर शेवटी नाचणारी यांना बाजारातील वस्तूच समजत आणि त्यातूनच लेखकाचा जन्म झाला.....

काही दिवस सुखाचे गेले की मोज- मजा झाली की तो मालक पुन्हा एकदा सोडून जायचा आणि स्वार्थी दुनिया मुळे पुन्हा एकदा पायात घुंगरू, पुन्हा काही दिवस संसार पुन्हा पायात घुंगरू ही अशी सतत सुरू असलेली ही ससेहोलपट.... कधीही न संपणारी  म्हणावी लागेल का?

नाच- गाणं पाहायला येणारे लोक खूप गोड बोलून प्रेमाच्या जाळ्यात स्त्रियांना अडकवत असत आणि स्त्रियांच्या घरातूनच त्यांना त्यासाठी जबरदस्ती असत.असंच पुन्हा एकदा एका व्यक्तीच्या प्रेमात आई पडली .परंतु यावेळी मात्र आई  कायमस्वरूपी त्यांच्या बरोबरच राहिली. परंतु तिलाही खुप काबाडकष्ट करावे लागले.कारण जोपर्यंत चेहऱ्यावरती सुरकुत्या पडत नाही तोपर्यंतच स्त्रियांचे जीवन हे गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत पण एकदा का चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला लागल्या की  मित्र... प्रेम... कुणीच कुणाचे नसतं.... 

 आई बरोबर लेखकाला मात्र त्यांच्या नवीन घरी जाता आलं नाही. कारण मी आईबरोबर गेलो तर आई घरी पैसे पाठवणार नाही आणि मग आमच्या आजोबांना दारू, मटण खायला पैसे कुठून मिळणार ? जणूकाही आई मुलाचे नात ह्या गोष्टीसाठी गहाणच ठेवल्यासारखे, आणि बरच काही...

लेखकाला घरातील सर्व कामे दररोज करावी लागायची स्वयंपाक ,दळण आणणे असेल, किंवा जे सांगेल ते काम त्यांना करावे लागत असे. परंतु घरातील त्यांच्या मामांना मात्र जागेवर बसून सगळं आयते खायला मिळायचे. या गोष्टीचा लेखकाच्या बाल मनावर काय परिणाम होत असेल ही कल्पनाही करणे शक्य नाही. अशा परिस्थितीतही शिकण्याची जिद्द, चिकाटी शेवटपर्यंत लेखकाने सोडली नाही.

आईची आणि लेखकाची असणारी ताटातूट ही तर काळीज पिळवटून टाकणारी हृदयद्रावक गोष्ट.. काही दिवस लेखक आईजवळ राहिले परंतु दुरून डोंगर साजरे त्याप्रमाणे तिथे गेल्यानंतर ही तेथील वडिलांचा त्यांना खूप त्रास झाला. खूप काम करावे लागले.

लेखकाला शाळा शिकत असताना पावलोपावली जात आडवी येत असे." किशोर शांताबाई काळे "असं नाव पुकारलं तरी सगळ्यांच्या नजरा  लेखकाकडे वळत.वडिलांचे नाव काय आहे? असे अनेक वेळा प्रश्न एम.बी.बी .एस चे शिक्षण घेत असतानाही विचारले जायचे, रूम मिळण्यापासून जात विचारली जायची आणि रुम मिळाल्यावर ही नाव समजल्यावर रूम सोडून जावे लागे. अशा परिस्थितीमध्ये एक वेळेस परीक्षा पास होणे सोपे,परंतु जीवनाची परीक्षा पास होणे म्हणजे अग्निदिव्य....

समाजामध्ये काही चांगल्या प्रकारची लोक ही असतात. त्याप्रमाणेच  लेखकाला खरोखरच खूप चांगल्या प्रकारचे सहकार्य करणारी  जिवाभावाची माणसेही भेटली त्यामध्ये खासदार रामराव लोणीकर,त्यांच्या पत्नी नागिण मावशी या सर्वांनी त्यांना खूप सहकार्य केले...

 मेडिकलमधील प्रत्येक वर्षाला पैशाची भासणारी चणचण त्यासाठी लेखकाला करावा लागणारा संघर्ष आजच्या तरुण पिढीला खूप काही सांगून जाण्यासारखा आहे...

"कोल्हाट्याचं पोर" हे किशोर काळे यांचे आत्मचरित्र हे प्राप्त परिस्थितीमध्ये न डगमगता यशस्वी वाटचाल कशा प्रकारे करायची याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे हे पुस्तक. सर्वांनी आवश्य वाचावे व आपल्या संग्रही ठेवावे.
 
पृष्ठसंख्या-116
 मूल्य -125 
   अभिप्राय शब्दांकन
         सिधुसूत....🖋️

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know