लेखक : श्री रत्नाकर मतकरी
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठ संख्या : 64
पुस्तक परिचय क्रमांक : पाच
लेखक श्री रत्नाकर मतकरी यांनी नऊ परिकथा लिहून त्यांचा 'सोनेरी मनाची परी' या नावाने कथासंग्रह तयार केला. या परिकथा म्हणजे लहान मुलांच्या विश्वातील परिकथा नसून प्रेमात पडलेल्या तरुणांच्या आजूबाजूच्या परिस्थिती मधील वास्तवाचे दर्शन घडवणार्या कथा होय. अशा या दुर्मिळ 'सोनेरी मनाची परी' या कथासंग्रहाची नवीन प्रकाशित आवृत्ती म्हणजेच' स्वप्नातील चांदणे' हा कथासंग्रह होय.
अशा या कथा संग्रहाचे श्री चंद्रमोहन कुलकर्णी यांनी रेखाटलेले आकर्षक मुखपृष्ठ पुस्तकातील कथांचे प्रतिनिधित्व करते. आकर्षक कपड्यांमध्ये तरुण तरुणी आकाशामध्ये अधांतरी, लुकलुकत्या चांदण्या, चंद्राच्या अस्तित्वात, तुरळक ढगांच्या सोबतीने विरह करताना, पुस्तकातील कथा रसग्रहण करण्यासाठी वाचकांची उत्कंठा वाढवितात.
कथासंग्रहाचे नाव आणि मुखपृष्ठानंतर आता येवू या मतकरींच्या कथाशैलीकडे. मुळातच या परिकथा किंवा प्रेमकथा अशा वाचकांसाठी लिहिल्यात कि जे मनाने तरुण आहेत, त्यांना जीवनातील लपलेले काव्य, सौंदर्य यांची पारख आहे. प्रेमातील विरह, संवेदनशीलता यांची जाणीव आहे.
पहिली कथा 'जादूचे फुलपाखरू' मध्ये पस्तीस वर्षीय प्राध्यापक रुक्ष जीवन जगत असतात. बालकवींच्या कवितेत त्यांना कधीही प्रेमभाव ओतता येत नाही. त्यांचे जीवन एकाकीपणा आणि नैराश्य यांनी काठोकाठ भरलेले असते. त्यांच्या खोलीतील अडगळच त्यांची सोबत असते. त्यांच्या अस्तित्वाने सभोवतालचे वातावरण वैराण बनत असते. अशातच त्यांच्या वर्गातील एक अल्लड मुलगी सुरवंटाचे फुलपाखरू अथवा कळीचे फुलात रूपांतर झाल्याप्रमाणे तरुणी बनून त्यांच्या सानिध्यात येते. तिच्या बरोबर असलेले जादूचे फुलपाखरू , तिचे प्रेम काही कालावधीसाठी प्राध्यापकाची हरवलेली वर्षे हंगामात मोहोर परत यावा, तशी परत आलीत, असे वाटते. मात्र ते प्रेम दुसर्या कुणाचे ठेव असल्या कारणाने प्राध्यापकाला लाभत नाही. परिणामी जीवनात अंधकार होवून बालकवींची फुलराणी कविता प्राध्यापकांना वर्गात कधीच नीटशी शिकवता आली नाही.
यानंतरच्या कथा वाचावयास मिळतात 'दुखऱ्या गुडघ्याची गोष्ट', 'स्वप्नातील चांदणे', 'फाटक्या कपड्यातील राजकन्या' , 'लाकडातील चेहरा' , 'वनराणी आणि फुल' , 'कुंभ' , 'कवीची प्रिया' आणि 'सोनेरी मनाची परी'.
या सर्व कथा आपल्या आयुष्यातील सत्य कथा आहेत अशा वाटतात. स्री पुरूष नात्यातील आकर्षण वेगवेगळ्या पद्धतीने दाखवतात. मनाला स्पर्शून जाणार्या या कथा मध्ये वाचकाला नकळत कुठे तरी स्वतः ला तुलना करण्यास भाग पाडतात. म्हणुनच जंगल, झाडे, फुले, कळ्या, नदी, समुद्र हे सर्वच आपल्या दैनंदिन जीवनातील सोबती आहेत, आपणही त्यातीलच एक भाग आहे हे वाचक स्विकारतो. कथे मधील दुःख, प्रेम, विरह, त्याग, वेदना वाचकांच्या हृदयाला हात घालतात. 'कवीची प्रिया' मधील धरित्री मनुष्य कसा असतो हे समजावून सांगताना आकाशदेवता आणि जलदेवता यांना म्हणते, "माणूस असाच वेडा असतो. एकदा प्रेम केले की त्याला बरेवाईट, कुरूपसुंदर काही समजत नाही. आणि म्हणुनच त्याचे विरहदुःख हिर्यासारखे तेजस्वी नि बाणासारखे तीक्ष्ण असते."
या सर्व कथा सन 1959 ते 1964 या कालावधी मध्ये वेगवेगळ्या मासिकात प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यावेळी असलेली सामाजिक परिस्थिती आणि आजची परिस्थिती यामधे जमीन अस्मानाचा फरक आहे. मात्र आजही वाचकांना प्रत्येक कथा मंत्रमुग्ध केल्या शिवाय आणि आपल्याच जीवनाशी कुठे तरी निगडित असल्याची जाणीव करून दिल्या शिवाय राहात नाही.
वाचकांची उत्सुकता कमी होवू नये म्हणुन प्रत्येक कथेचे विश्लेषण जाणीवपूर्वक टाळले आहे. टीका टिप्पणी स्वागतार्ह.
@मंगेश काटकर
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know