लेखक - सुहास शिरवळकर
असं म्हणतात की जन्माला येणारा प्रत्येक माणूस आपलं नशीब बरोबरच घेऊन येत असतो. त्याच्या आयुष्यात त्याच्या वाट्याला तेवढीच सुखदुःख येतात जेवढी नशिबात लिहून ठेवलेली असतात. पण जर तुम्हाला तुमचं भविष्य समजलं तर? तुमच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे हे जर तुम्हाला आधीच समजलं तर तुम्ही तुमचं नशीब बदलू शकाल? याच कथासूत्राभोवती विणलेली आहे प्रसिद्ध लेखक सुहास शिरवळकर यांची 'समांतर' ही कादंबरी.
या कादंबरीचा नायक आहे कुमार महाजन. कुमार हा साधारण तिशीचा मध्यमवर्गीय तरुण आहे. त्याच्या आयुष्यात काहीच चांगले होत नाहीये. त्याचा एक मुलगा काळाने लहानपणीच त्याच्यापासून हिरावून घेतलाय. आपल्या बायको आणि मुलाला सुखात ठेवण्यासाठी आपण पुरेसे पैसे कमावू शकत नाही यामुळे तो खूपच निराश आहे. कुमारचे वर्तमान चांगले नाही पण भविष्य तरी चांगले आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याचा मित्र वाफगावकर त्याला एका स्वामींकडे घेऊन जातो. तेथे त्यांच्या बरोबर एक आश्चर्यकारक घटना घडते. कुमारच्या हाता सारखा हुबेहूब हात ३० वर्षापूर्वी पाहिल्याचे स्वामी कुमारला सांगतात. सुदर्शन चक्रपाणी असे त्या व्यक्तीचे नाव होते. परंतु कुमारचे भविष्य सांगण्यास मात्र स्वामी नकार देतात. स्वामीजींच्या या वागण्याचे कुमारला आश्चर्य वाटते आणि त्याच्या मनात एक विचार तरळून जातो, की जर सुदर्शन चक्र पाणी याचा हात हुबेहूब माझ्या हाता सारखा आहे, तर दोघांचे नशीबही सारखेच असेल का? या विचाराची पडताळणी करण्यासाठी तो शोध सुरू करतो सुदर्शन चक्रपाणीचा. हा सुदर्शन चक्र पाणी कुमारला भेटतो का? खरेच दोघांचे नशीब सारखे आहे का? सुदर्शनचा भूतकाळ म्हणजेच कुमारचा भविष्यकाळ आहे का? जर असेल तर त्याचा वापर करून कुमार आपले भविष्य बदलू शकतो का? स्वामींनी कुमारचे भविष्य का सांगितले नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला कादंबरीच वाचावी लागेल.
समांतर ही अतिशय छोटी कादंबरी आहे. केवळ दोनशे पृष्ठसंख्या असलेली. त्यामुळे एका बैठकीत चार पाच तासात देखील तुम्ही ती संपवू शकता. खरे तर एकदा सुरुवात केली की शेवट होईपर्यंत तुम्हाला ती खाली ठेवताच येत नाही. शिरवळकरांनी वाचकांना अगदी सुरुवातीपासून शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवलेला आहे. याच पुस्तकावर आधारित स्वप्निल जोशीची एक वेबसिरिज देखील आहे. वेब सिरीजचा पहिला भाग प्रदर्शित झाला असून दुसरा भाग प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. वेब सिरीज मध्ये कादंबरीतील कथेला थोडा मॉडर्न टच देण्याचा प्रयत्न केला असून कथेचा मूळ गाभा मात्र सारखाच आहे. कादंबरीचा शेवट तर इतका अनपेक्षित आहे की असं काही होईल अशी कल्पनादेखील तुम्ही आधी करू शकत नाही. त्यामुळे एखाद्या दिवशी मस्त चहा अथवा कॉफीचा वाफाळता कप हाती घेऊन 'समांतर' वाचायलाच हवी.
Vinod thorat
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know