Thursday, June 17, 2021

*एका अवलियाचा प्रपंच

*पुस्तक क्रमांक-📗88...🖋️* 
*पुस्तकाचं नाव* -
       *एका अवलियाचा प्रपंच*
 *लेखिका - अंजली ठाकूर*

सर्व सुख-सुविधा पायाशी लोळण घालत असतानाही केवळ समाजसेवेचा एक वसा घेतलेल्या आमटे कुटुंबाची थक्क करणारी एक संघर्षमय कहाणी......

बाबा आमटे यांच्यासारख्या असामान्य व्यक्तिमत्त्वा विषयी लिहिणं वाटते इतकं सोपं नाही. बाबा आमटे यांच्या तिन्ही पिढी समाज सेवेमध्ये तन-मन-धन अर्पण करून काम करत असताना अवघ्या जगाने पाहिले आहे, पाहत आहेत. बाबा आमटे यांचे अतुलनीय कार्य, त्यांच्या मुलांचे कार्य हे खरं तर वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यासण्याचा विषय आहे. कारण ते कार्यही तितक्याच तोडीचे आहे. लेखिका अंजली ठाकूर यांनी "एका अवलियाचा प्रपंच" या पुस्तकामध्ये बाबा आमटे यांच्यापासून त्यांच्या सर्व पिढ्यांच्या कार्याचा झंझावत या ठिकाणी अत्यंत बारकाईने सुंदररित्या मांडलेला आहे. त्यामुळे या एका पुस्तकातच या सर्वांच्या कार्याची माहिती आपणाला जाणून घेताना एक वेगळीच अनुभूती येते.

मुरलीधर देवीदास आमटे हे संपूर्ण नाव परंतु आई लाडाने त्यांना "बाबा " म्हणत आणि खरोखरच हा अवलिया पुढे शेकडो लोकांचा काळजातील बाबा झाला. श्रीमंतीत वाढणारे बाबा मोटरसायकल चालवायचे, शिकारीला जायचे, कुस्ती खेळायचे, कित्येक वेगवेगळे शौक लहानपणा पासून त्यांना होते. रसिक तर होतेच त्याच बरोबर चित्रपट पाहण्याची त्यांना आवड भरपूर होती.. बाबा आमटे यांचा  एक विशेष गुण होता तो म्हणजे प्रत्येक गोष्ट जीव ओतून आणि मनापासून करायची. जिथे साहस आहे,संकट आहे त्याठिकाणी त्यांना धावून जायला फार आवडायचे. शिकार करताना  समोर समोर करायचे, मटण सकाळ-संध्याकाळ खायचे, परंतु त्यांनी ज्या वेळेस या सर्व गोष्टी सोडायचे ठरवले त्या पुन्हा आयुष्यात कधीच केल्या नाहीत. 

बाबा हे पेशाने वकील होते. वकिली करून ते स्वतःसाठी खूप काही करू शकले असते. परंतु दोन तास कोर्टात युक्तिवाद करून 50 रुपये आपण कमवतो पण शेतातील मजूर मात्र दिवसभर राबून केवळ 12 रुपये कमवतो. हे योग्य नाही असे त्यांना मनापासून वाटले.बाबा आमटे यांच्यावर महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे,
 सानेगुरुजी इ.लोकांचा त्यांच्या मनावर खोल असा परिणाम झाला. बाबा आणि ताईंचे लग्न झाल्यावर दोघांचे घरातील वातावरण यामध्ये जमीन-असमानचा फरक, परंतु तरीही साधनाताईंनी प्रत्येक गोष्टीत बाबांची साथ दिली.श्रीमंतीतल्या माणुसकीपेक्षा गरिबीच्या  माणुसकीचे पारडे नक्कीच जड ठरत असते अशी बाबांची मनोधारणा होते.

आपल्या मुलांची नावे त्यांनी एक विकास आणि दुसरा प्रकाश अशी ठेवली. नाव ठेवतानाही त्यांची दूरदृष्टी खूप वेगळी होती.कारण डॉ. विकासने आनंदवनाचा विकास केला आणि डॉ.प्रकाशने आदिवासी लोकांचे जीवन प्रकाशमय केले.

 1949 मध्ये बाबांनी "महारोगी सेवा समिती "स्थापन केली. केवळ कुष्ठरोग्यांची सेवा करणे त्यातून त्यांना बरे करणे हा केवळ हेतू नक्कीच नव्हता, तर या सर्व रोग्यांना स्वावलंबी  बनवणे आणि स्वतःच्या पायावर उभं करणे हा त्यांचा मूळ हेतू होता. दुःखी, कष्टी शरीराला पूर्ण व्याधीने जखडलेले घरातील आपल्याच माणसांनी अशा व्यक्तींना घरापासून बाहेर काढले, त्या व्यक्तींच्या मनामध्ये आनंद निर्माण व्हावा, आनंदी वातावरण तयार व्हावे.म्हणूनच आनंदवनाची स्थापना केली.

चंद्रपूर- नागपूर मार्गावर 50 एकर जागा सरकारनी बाबा आमटे यांना दिली की, ज्या ठिकाणी केवळ खडकाळ भाग साप,विंचू चित्ते,अस्वल, यांचा सुळसुळाट होता. अशा ठिकाणी थोडीशी झाडेझुडपे साफ करून तिथं प्रथमतः दोन झोपड्या उभ्या राहिल्या. एक आमटे कुटुंबियांसाठी आणि दुसरी कुष्ठरोग्यांसाठी. भिंती नसलेल्या झोपडीत सुद्धा साधनाताई राहिल्या. हे एक दांपत्य खूप वेगळं  असेच होते.  एके काळी रेसर गाड्या फिरवणारे बाबा आमटे आणि रेशमी साड्यांच्या दुकानाच्या मालकिणीची मुलगी साधनाताई. अशा दाम्पत्यांना कोणत्या मुलखावेगळ्या स्वप्नांचे वेड लागलं होतं.......

हिंस्र श्वापदांची भीती, कुष्ठरोग्यांची लागण होण्याची भीती, निसर्गाच्या रुद्र रूपाची भीती, या सगळ्या गोष्टी असतानाही सर्व संकटांना तोंड देत त्या निर्जन खडकाळ माळरानावर हे दांपत्य पाय रोवून उभे राहिले..... अगदी कायमचे.

स्वतः हातामध्ये टिकाव, खोरे, घेऊन 30-40 फूट विहिरी खोदल्या आणि त्या खडकातून पाणी बाहेर काढले. खरंतर पाण्यापेक्षा किती तरी पट जास्त घाम तिथं बाबा आमटे व त्यांच्या सहकार्यानी गाळला होता. त्यांच्या सोबतीला काम करायला कुष्ठरोगी स्वतः बरोबरीने काम करत. पाण्याच्या वापरामुळे त्याठिकाणी शेती ही चांगल्या प्रकारे होऊ लागली. आनंदवनातील उदरनिर्वाहासाठी लागणारा भाजीपाला त्याठिकाणी पिकू लागला. आणि कुष्ठरोगी ही स्वतःच्या पायावर उभे राहायला लागले. कुठल्याही व्यक्तीला दया करून भीक नको असते, तर हवा असतो तो आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि स्वावलंबन आणि हेच बाबांनी ओळखून हळूहळू पावले उचलायला सुरुवात केली.....

अल्पावधीतच आनंदवनाने खूप मोठी भरारी घेतली, कुष्ठरोगाचे काम करणाऱ्या बाबांच्या विषयी भारतातच नव्हे तर जगात सुद्धा त्यांच्या कामाची दखल घेऊ लागले. आनंदवनात दूध निर्मिती सुरू झाली, अनाथालय सुरू झाले, करमणुकीची साधनं त्याठिकाणी सुरू झाले, शाळा, महाविद्यालय  या ठिकाणी उभारी घेऊ लागले...बाबा हे सर्व करत असताना आपले लेखन ही चालू ठेवत." ज्वाला आणि फुले", 
"करूणेचा कलाम" अशी कितीतरी दर्जेदार काव्य तयार झाली. ही काव्य अतिशय सुंदर व वास्तवातून तयार झालेले दिसून येतात.अजिंठा,वेरूळ येथील कोरीव मूर्ती आपण मोठ्या उत्साहाने पाहतो परंतु आनंदवनात स्वतः हरितक्रांती घडवून आणलेल्या कुष्ठरोग यांचा पराक्रम आपण आवर्जून पाहिला पाहिजे.....

बाबा आमटे म्हणजे मूर्तिमंत चैतन्यशिस्त आणि व्यवहारज्ञान यांचा संगमच त्यांची ऊर्जा फार अफाट होती. आनंदवनातील  काम करत असताना त्यांना अतिशय आनंद होत होता.

भारत जोडो, नर्मदा बचाव आंदोलन अशा कामी बाबांनी सायकलीवर जास्तीत जास्त प्रवास करून अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला... पुढे आनंदवनासारखीच
 अशोकवनाची सुद्धा निर्मिती केली.

बाबा आमटे यांच्या या असामान्य कार्याबद्दल त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण असे असंख्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.त्यांच्या जीवनावर आधारित वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित केलेली असंख्य पुस्तके निर्माण झाली अभ्यासक्रमांमध्ये आली

डॉ.विकास आमटे - 

वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी चुली पुढे बसून स्वयंपाक करतानाचा त्यांचा फोटो पाहिला तर आपण एवढेच म्हणू," उत्तम बीजापोटी फळे रसाळ गोमटी". डॉ.विकास स्वतः डॉक्टर असल्यामुळे आनंदवना मध्येच त्यांनी नवनवीन उपक्रम चालू केले, विविध फॅक्टरी निर्माण झाली. तीन चाकाची सायकल बनवणारे आनंदवन ही एक नंबर कंपनी झाली. दरवर्षी 1000 पेक्षा जास्त सायकली तिथं बनवल्या जातात. पाव बनवणे, पॉपकॉन बनवणे या गोष्टीही तिथं निर्माण होऊ लागल्या.

डॉ. विकास यांची पत्नी डॉ. भारती ह्या बालरोग तज्ञ आहेत. त्यामुळे आनंदवनातील मुलांच्या आरोग्याची जबाबदारी आपोआपच त्यांच्याकडे आली. 14 रुपया पासून सुरु झालेली "महारोगी सेवा समिती" ही समिती 27 कोटी पेक्षा जास्त रकमेची बनली आहे. हे डॉ.विकास अभिमानाने सांगतात, आणि ही किमया केवळ आनंदवनातील कुष्ठरोगी बोटांनी केलेल्या कामाची आहे.1997 पासून डॉ.विकास यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड सुरू केले पक्ष्यांचे अभयारण्य बनवावे हा त्यामागचा विचार होता. आनंदवन येथील 200 एकर जमिनीवर शेती सुरू केली.गाया वाढवल्या, सलाईनच्या बाटल्यापासून आकर्षक कलाकृती बनू लागल्या. कुष्ठरोग यांचा त्याचप्रमाणे अपंग व्यक्तींचा एक ऑर्केस्ट्रा तयार केला त्याला "स्वर आनंदवन ऑर्केस्ट्रा" असे नाव देण्यात आले. यातील कलाकार अंध,अपंग,रुग्ण हे स्वतः बरोबर दुसऱ्यांनाही आनंद देत आहेत.

सुसज्ज कॅम्पुटर लॅब, इंटरनेट कनेक्शन, इ. सर्व सुविधा त्या ठिकाणी आहेत. "आनंद निकेतन"  कॉलेजमधून आत्तापर्यंत हजारो मुले- मुली पदवीधर होऊन बाहेर पडले. 

शेतकऱ्यांचा  आत्महत्या सारखा  ज्वलंत प्रश्न त्या वेळेस खूप गाजत होता. त्या वेळेस  डॉ.विकास व त्यांचे सहकारी अक्षरक्षा गावभर हिंडून त्यांनी शेतकऱ्यांचे मूळ अडचण समजावून घेतली. त्यांना आनंदवनातील शेतीची माहितीही देण्यात आली. डॉ.विकास यांना एकच व्यसन लागले होते ते म्हणजे नवनवे प्रयोग करण्याचे आणि त्यांनी ते आनंदवनमध्ये योग्यरीत्या केल्याचे आपणाला दिसून येते.

डॉ.प्रकाश आमटे-

"हेमलकसा" येथील लोकबिरादरी प्रकल्प म्हणजे बाबा आमटे यांच्या मनातील आणखीन एक स्वप्न. जिथे यांचे धाकटे चिरंजीव डॉ.प्रकाश आमटे यांनी साकारले. या कामी त्यांना सोबत मिळाली  त्यांची पत्नी डॉ.मंदा आमटे यांची. मंदा आमटे यांचे आई, वडील शिक्षक, घरचे वातावरण उच्चशिक्षित असे असतानाही त्यांनी अत्यंत मोकळेपणाने प्रकाश आमटे यांच्याबरोबर लग्न करून त्यांना मोलाची साथ दिली.
"हेमलकसा" म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील अतिशय मागासलेला भाग.घनदाट जंगल अगदी सूर्यप्रकाश जिथे जमिनीवर पोहोचत नाही अशी दमदार जाळी, केवळ हिंस्र पशु पक्ष्यांचे त्याठिकाणी आवाज येत. तिथे राहणारे स्थानिक लोक भिल्ल,वारली,ठाकर जमातीतील त्यातही माडिया हि जमात सर्वात मागासलेली. आदिवासी लोक हे  नवीन लोकांना भिऊन पळून जात असत.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदा आमटे यांनी आरोग्य वैद्यकीय सुविधा पुरवणे हाच एकमेव उद्देश त्या ठिकाणी समोर ठेवला. दोघेही डॉक्टर असल्यामुळे फारशी अडचण नव्हती. हळू हळू  तेथील लोकांची मनं जिंकत त्यांनी लोकांना आपलेसे केले. स्वतः हाफ पॅन्ट, बनेल घालू लागले, केसांना तेल न लावणे, रबरी चपला वापरत, याचा एकच हेतू होता की अशा प्रकारचा पोषक पाहून  आदिवासींना देखील आपण त्यांच्यासारखेच एक आहोत असं जाणवू लागले. पण हा डॉ. प्रकाश आमटे यांचा किती मोठा त्याग...

हेमलकसा येथे प्रथम सर्वात मोठी अडचण आली ती लोकांच्या मधील भाषेची, परंतु त्या भाषेचा अभ्यास करून ही हळूहळू लोकांची जवळीकता ते करू लागले. तेथील लोकांनाही  दवाखानामुळे चांगला फरक पडू लागल्याने जवळीकता जास्त वाढली. हळूहळू त्या ठिकाणी शाळा सुरू झाली, अनाथ जंगली पशुपक्षी यांचा सांभाळ त्या ठिकाणी होऊ लागला.

जंगलातील जीवन म्हणजे रोजच धोकादायक, कधी कुठला प्रसंग समोर उभा राहील याची कल्पना आपण करूही शकत नाही. पण केवळ सामाजिक कार्य आणि काहीतरी करण्याची जिद्द त्यांनी मनावर घेतली. वाघ,चित्ता, अस्वल, हरीण अशी अनेक प्रकारची त्याठिकाणी पक्षी- प्राणी आहेत.

प्रकाश आमटे यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.काही पुरस्कार डॉ. प्रकाश आमटे व मंदा आमटे या दोघांना संयुक्तरीत्या मिळाले. त्याचबरोबर इतरही अनेक पुरस्कार त्यांना त्याठिकाणी मिळाले.

आमटे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या परीने समाजासाठी अतुलनीय, असामान्य असे योगदान दिले आहे. प्रत्येकाची कार्यक्षेत्र वेगवेगळी असली तरीही त्यांचं उद्देश  हे मात्र एकच.... पीडित, दुःखी लोकांसाठी  काहीतरी भरीव कार्य करायचं आणि हे आमटे कुटुंबियांनी केले आणि या कार्याची फलनिष्पत्ती  संपूर्ण जगाने पाहिली.एकाच कुटुंबामध्ये अनेक व्यक्तींना पुरस्कार मिळणे हा खरंतर त्यांच्या कार्याचा केलेला गौरव आहे. आणि हे कार्य करत असताना त्यांना सहकार्य करणाऱ्या त्यांच्या घरातील सर्व लोकांचा मित्र परिवारांचा हा बहुमान आहे.... असा बहुमान होणे दुर्मिळच...

"एका अवलियाचा प्रपंच" हे पुस्तक एकदा हातात घेतले की ते वाचल्याशिवाय ठेवूच वाटत नाही. कित्येक 
सहर्षमय कहानी,अडचणी, अपार कष्ट अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी हे सुंदर पुस्तक सहज, सोप्या भाषेत लेखिकेने उत्कृष्टरित्या मांडणी केलेली आहे. हे पुस्तक आपण सर्वांनी अवश्य वाचावे.
 पृष्ठसंख्या - 272 
 मूल्य- 330 
अभिप्राय शब्दांकन
      Ganesh Tambe

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know