पुस्तकाचे नाव - एक पोकळी असतेच(फिरस्ती)
लेखक- उत्तम कांबळे
प्रकाशन - सकाळ प्रकाशन
मराठी साहित्यसृष्टीतील एक उत्तुंग व्यक्तिमत्व असणारे लेखक उत्तम कांबळे यांनी वैविध्यपूर्ण विषयावरती दर्जेदार लेखन केलेले असून यामध्ये कादंबऱ्या, कथासंग्रह,ललित, संशोधनपर ग्रंथ, चरित्रपर ग्रंथ, कवितासंग्रह, अग्रलेखांचे संपादन, मुलाखती संपादन आत्मकथने, अशा कितीतरी प्रकारात विपुल प्रमाणामध्ये त्यांनी हे लेखन केलेले आहे.
लेखक उत्तम कांबळे हे साहित्य क्षेत्रांमध्ये, सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असल्याने त्यांना विविध ठिकाणी फिरण्याचा योग आला. ते फिरत असताना त्यांना जे जे काही अनुभव आले ते ते अनुभव या पुस्तकातून आपणा समोर आले आहेत. यामध्ये माणूस विरुद्ध माणूस, माणूस विरुद्ध व्यवस्था, माणूस विरुद्ध पर्यावरण इत्यादी विविध घटकावर परखड लेखन केले आहे.
*एक पोकळी असतेच(फिरस्ती)
या पुस्तकामध्ये एकूण 26 घटकांचा या ठिकाणी लेखकाने अत्यंत समर्पक शब्दात लेखन केलेले आहे. ही सर्व ज्वलंत उदाहरणे असून त्यांनी स्वतः अनुभवलेली उदाहरणे असल्याचे आपल्याला दिसून येते.
"नोटांवर उतरतोय गर्भाचा गोळा"
या घटकात एक हृदय पिळवटून टाकणारे घटनेचे वर्णन केलेले आहे. काही ठिकाणी महिलांचा नवरा मेल्यानंतर कालांतराने त्या विशिष्ठ व्यक्तीशी संबंध ठेवून स्वतःला ज्यावेळेस मूल होतं त्यावेळेस ते मुल गरजू व्यक्तींना, निपुत्रिक व्यक्तींना विकली जातात. अशी कितीतरी बाळंतपणं त्यांची होत असतात. माणूस माणसाला विकत घ्यायला लागतो, ही खरोखरच खूप शोकांतिका आहे.आभाळभर माणसं,आभाळभर दारिद्र्य, आभाळभर वेदना जरी असल्या तरी अर्भकाची विक्री हे उत्तर कसं काय होऊ शकते. पिठाचा गोळा मिळवण्यासाठी गर्भाचा गोळा विकणे हे विलक्षण विचित्र आहे.....
"डी.एड. इज डाईंग" या घटकांमध्ये लेखकाने सध्या डी.एड, बी.एड कॉलेजची असणारी अवस्था, बंद पडण्याची कारणे अतिशय योग्यरीत्या या ठिकाणी मांडलेली आहेत. खाजगी शिक्षणाचा झालेला बाजार दिसून येत आहे. महाराष्ट्रातील सुमारे 400 च्या आसपास डी.एड महाविद्यालये अलिकडच्या काही वर्षात बंद पडलेली आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण घेणारे शिक्षक त्यांना न्याय मिळत नाही असं त्यांचे मत आहे.या घटकातून, विविध उदाहरणातून सद्य परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलेल्या शिक्षित लोकांच्या वाट्याला येणारी करूण कहाणी यात वर्णन केलेली आहे.
"अस्वस्थ करतोय हा उजेड"
या घटकांमध्ये चांदोली धरणाच्या ठिकाणी 34 टीएमसीचे पाणी साठा असणारे धरण आहे. हे धरण होत असताना त्या ठिकाणी ज्या लोकांच्या जमिनी गेल्या आहेत,ज्या लोकांची घरे उध्वस्त झालेली आहेत. अशा लोकांना पुढं शासन दरबारी जमीन मिळवण्यासाठी, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी होणारी हेळसांड प्रामुख्याने या ठिकाणी मांडलेली आहे. धरणापासून मुबलक प्रमाणात वीज ही बनवली जाते परंतु ही वीज बनवत असताना कितीतरी घरे या ठिकाणी अंधारात गेलेली दिसून येतात. धरणग्रस्तसाठी केलेले सुंदर कायदे केवळ कागदावरच राहतात असं लेखकाला व तेथील लोकांना जाणवते.त्यावेळेस एका कवितेच्या चारोळीचे वर्णन केले आहे.
तुकोबाची गाथा तरंगावी,
तशाच चिरंतन
धरणात बुडालेल्या गावाच्या
या काही आठवणी....
त्यामुळे लेखक ज्या ज्या वेळेस विजेचे बटन चालू करण्यास हात ठेवायला जातो. त्यावेळेस तो उजेड लेखकाला अस्वस्थ करताना दिसून येतो.
"अपघात " या घटकात सुंदर अशी घटना या ठिकाणी लेखकाने मांडलेली आहे.मखमलाबादला जोडणाऱ्या गोदेच्या पुलावरून सायंकाळी घरी जात असताना एका ठिकाणी त्यांना रस्त्यावर अपघात झालेला दिसला. अपघातग्रस्त एक मुलगी खाली पडली होती. तिला बऱ्या प्रमाणामध्ये खरचटले होते.बघ्यांची नुसती गर्दी जमली होती. सर्वजण केवळ चर्चेतच वेळ घालवत होते. परंतु मदत कुणीही करत नव्हते. त्यामुळे लेखकाला त्या ठिकाणी आलेले अनुभव त्यांनी अतिशय परखड शब्दात याठिकाणी मांडलेले आहेत. माणूस हा माणसाला मदत करत नाही. नुसता मोकळा वेळ कसा घालवतो आणि दोष कुणाचा आणि चुकी कोणाची याचीच वकिली करत बसतो.
"बोकड इकॉनोमी" या घटकांमध्ये आटपाडी भागातील बोकड व्यवसायांची म्हणजेच शेळीपालन करणारा वर्ग आणि त्यांची होणारी आर्थिक उलाढाल आजकालच्या व्यावसायिकांना दिशा देणारी माहिती आपल्याला दिसून येते. याचे सुरेख वर्णन या ठिकाणी लेखकाने केलेले आहे.
"हंबरणाऱ्या गायीचा धनी....."
या घटकांमध्ये लेखक उत्तम कांबळे हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यावेळची ही गोष्ट. लेखक अध्यक्ष असताना जे साहित्यिक आर्थिक दृष्ट्या दुर्बल असतील त्यांच्यासाठी निधी उभारण्याचा संकल्प त्यांनी डोळ्यासमोर उभा केला होता. त्यावेळेस" हंबरुनी वासराला चाटते जवा गाय" या कवितांचा मुख्य कवी कोण याची त्यांनी माहिती काढून घेतली. बऱ्याच वेळा सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आपल्याला असे दिसून येते की, एकच कविता कित्येक जणांच्या नावावरती फिरत असताना आपल्याला दिसून येते.
परंतु" माय "ही कविता मनाला स्पर्श करून जाते आणि त्या कवितेचा मुख्य व्यक्ती कोण आहे याचा शोध घेतल्यानंतर तयार झालेला कविता संग्रह याचा उल्लेख लेखक आवर्जून करतात.
"लग्न : एक बिग बजेट शो"
या घटकांमध्ये आधुनिक काळामध्ये लग्न ही खरंतर संपत्ती, प्रतिष्ठा दाखवण्याचे एक महत्त्वाचं साधन झालेले दिसून येते. कारण लग्न पत्रिकेतील मोठमोठ्या व्यक्तींच्या नावाबरोबरच लग्नामध्ये असणारे किमती डी.जे. या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी लग्नघरातील व्यक्ती बारकाईने विचार करत असतात त्यातून त्यांची प्रतिष्ठा ते दाखवत असतात. हे लग्न म्हणजे बिग बजेट हिंदी चित्रपटच असे जाणवते....
"गर्भाशयाचे संपादन"
या घटकांमध्ये लेखकाने परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ या विद्यापीठामध्ये जवळपास 7ते 8 हजार एकर शेतकऱ्यांची गेलेली जमीन आणि ही जमीन जात असताना त्या प्रकल्पग्रस्त मुलांना नोकरी देण्याचे दिलेले आश्वासन हे केवळ कागदावरच... आणि त्यावेळी महाविद्यालयांमध्ये 90 टक्के पेक्षा जास्त शेती पडून होती.परंतु हे करत असताना तेथील शेतकरी बांधव जे चांगले शेती पिकवायचे ते सध्या कित्येक गावांमध्ये विखुरले गेलेचे दिसून येते. खडकाळ, मुरमाड जमीन त्यांच्या वाट्याला आल्या. काही थोड्याफार मुलांना नोकऱ्या लागल्या ,पण ती शेतकऱ्यांची मुले जास्त न शिकल्यामुळे शिपाई सारख्या नोकरीवर त्यांना समाधान मानावे लागले. प्रकल्पग्रस्तांना अर्पण केलेल्या
"संपादन" या कवितेतील काही ओळी याठिकाणी मांडले आहेत
कसं जगायचं आम्ही,
तुम्ही वावर घेताय
म्हणजे नुसतं वावर घेताय का?
वावर म्हणजे नुस्ती जमीन.
नुस्ती लँड नाही हो सरकार,
माझ्या कित्येक पिढ्यांचा भूगोलय, इतिहासय
सगळी शास्त्र, पुराणं सगळंच हो,
दुर्बिणीने नका बघू
माझ्या नजरेणं बघा ना - नजरेच्या एका टप्प्यात
अख्खं वावर..मला गर्भाशयासारखं दिसतंय माईच्या....
आणि तुम्ही अचानक
संपादन करणार -
हजारो पिढ्यांच्या गर्भाशयाचं.....
अक्षरशः हि काव्यपंक्ती वाचून हृदय हेलावून टाकते अंगावर अक्षरक्षा काटा उभा राहतो.....
अशाप्रकारे " एक पोकळी असतेच " (फिरस्त्या)या पुस्तकांमध्ये लेखक सर्वत्र फिरत असताना त्यांना ज्या घटना त्यांच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या, अनुभवल्या या प्रातिनिधिक स्वरूपात या पुस्तकात मांडल्या आहेत. अशा बऱ्याच ठिकाणी असणारे सामाजिक प्रश्न, लोकांच्या व्यथा, तऱ्हा, अनुभव, प्रसंग त्यांनी या पुस्तकात वास्तव स्वरूपात मांडले आहेत. अत्यंत सुंदर असे पुस्तक आपण सर्वांनी वाचावे.
*पृष्ठसंख्या-127*
*मूल्य - 150*
*अभिप्राय शब्दांकन*
*सिंधुसूत....🖋️*
Ganesh tambe
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know