पुनः तो अधिकाऱ्यांकडे गेला.तळतळून म्हणाला,"आज वीस-पंचवीस वर्षे चोर-वस्ती कायद्याच्या बंधनात ठेवूनही सरकारने ते दारिद्रय का घालवले नाही?नादान स्वार्थी अधिकारी दारिद्र्यालाही दळून स्वतःच्या पोळीवर तूप ओढीत असता त्यांना अधिकारावर का ठेवले?आम्ही चोर ना?का चोरी करतो?आम्ही अडाणी?का?तुमच्या ताब्यात आमची जीविते असता,का अडाणी ठेवले तुम्ही आम्हाला ?वीस वर्षात इतर कारणांनी पाठी सडकल्या?शिकण्यासाठी तुरूंगात का नाही टाकलं ?पोरांची ताटातूट करून त्यांना आईबापं कायमची वर्ज्य केली असतीत तर,दुःखाने आईबापांचा एकदा निकाल लागला असतात.ही नव्या नव्या पिढीची आईबापं पुनः पुनः तीच दुःखं भोगायला ठेवली कशाला? वीस-पंचवीस वर्षे अधिकारी म्हणून फुकट पोसले सरकारने.त्याऐवजी एवढा पैसा कठोर आणि प्रामाणिक प्रयत्नांना खर्च झाला असता,तर आज चोरवस्ती रयतेसारखी झाली असती.सार्या अधिकाऱ्यांच्या आणि लवाजम्याच्या खर्चात सारी आईबापं शिक्षित झाली असती.सरकारी प्रचंड कारखाना निघून तेथे सार्या चोर-वस्तीच्या पोटाची कायम सोय झाली असती.वीस आणि पंचवीस वर्षे चोर-वस्तीच्या अधिकाराचं भूषण सरकारने मिरवलं रयतेच्या डोळ्यांत धूळ फेकली की आम्ही तुम्हाला चोरापासून वाचवतो म्हणून.आणि पुन्हा कंगाल,अर्धपोटी,अडाणी स्थितीत चोर -वस्तीला वार्यावर सोडून,रयतेची हानी आणि चोर-वस्तीची अधोगती साधलीत.पुनः ते चोर म्हणून हिंडणार.आणखी चोऱ्या करणार.आणखी हीनतेत पिचणार आणि पुनः चोरी हा धर्म वाटणार त्यांना!
तुम्हाला रयतेला बचावायचे आहे ना?चोरांना चोरांपासून फिरवायचं आहे ना माघारं? मग त्यांच्यापैकी प्रत्येकाला प्रामाणिक कष्ट करायला वाव द्या.प्रामाणिक कष्ट करणारांना भरपेट जगता येईल इतका दाम द्या.त्यांना दिसू द्या की साव म्हणून वावरणारे,प्रतिष्ठा मिरवणारे त्यांच्याहून भयंकर चोऱ्या करीत नाहीत.तुम्ही मायबाप सरकार ना?"
पुस्तकाचे नाव- बळी (कादंबरी)
लेखिका - विभावरी शिरुरकर
पहिली आवृत्ती - १९५०
स्वातंत्र्याच्या संधिकालात सुरू होऊन स्वातंत्र्य मिळालेनंतरच्या काळात संपलेल्या कथानकाची ही कादंबरी.स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही जीवनमानात कोणत्याही प्रकारे बदल न झालेल्या मांग-चोर समाजाची एक सुन्न करणारी कादंबरी.काळजाचा ठाव घेणारी साधी अनलंकृत शैली हे या कादंबरीचे वैशिष्ट्य.
दलित साहित्य,पांढरपेशी साहित्य असे तट पडण्यापूर्वीच्या काळातील एका सवर्ण लेखिकेची दलित समाजाचे दुःख मांडणारी ही जबरदस्त कादंबरी एकदा वाचायलाच हवी अशी.
Chandrakant Kavethekar
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know