Monday, May 31, 2021

इकिगाई

इकिगाई 
लेखक : हेक्टर गार्सिया ,फ्रान्सिस मिरेलस
प्रकाशक : मायमिरर पब्लिशिंग हाऊस

आजकाल जगभरात सर्व सुख सुविधा उपलब्ध असूनही माणसाचे आयुर्मान मात्र जास्त नाही. याउलट लठ्ठपणा, कँन्सर, ब्लडप्रेशर, डायबेटीस, हायपरटेन्शन यासारख्या जीवनशैलीच्या आजाराने बरीचशी माणसं वयाच्या साठी गाठण्याआधीच दगावतात.
वयाची शंभरी गाठणे अजूनही फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांनाच शक्य आहे.
निरोगी दीर्घायुष्य कसे मिळवायचे या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी स्पेनमधील हेक्टर आणि फ्रान्सिस यांनी जगभरातील जास्त आयुर्मान असलेल्या भागांचा अर्थात ब्लू झोनचा अभ्यास केला

ब्लू झोनमधील ओकिनावा जपानचा दक्षिण भाग हया परिसरात त्यांना १२० वर्षे जगणारे अनेक लोक आहेत असे त्यांना आढळले.
लेखकांनी हया भागात काही दिवस मुक्काम केला आणि त्यांच्या निरोगी दीर्घायुष्याची रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना जे काही हाती लागले ते पुस्तकातून मांडण्याचा लेखकांनी प्रयत्न केला तेच हे जगातील लाखो लोकांनी गौरवलेले पुस्तक #इकिगाई

निरोगी दीर्घायुषी जगण्यासाठी ते लोक काय करतात
1️⃣ #आहार
➡️सुशी पद्धतीने बनवलेले इंद्रधनुषी जेवण दिवसातून दोन वेळा घेतात 
➡️यात सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या सात वेगवेगळ्या भाज्या,फळ एकावेळच्या जेवणात असतात, 
➡️जास्त करून आहारात टोफू , गाजर, कोबी,गोड बटाटा असे Anti oxident पदार्थ असतात
➡️आहारातील साखरेचे आणि मिठाचे प्रमाण जगभरातील लोकांपेक्षा निम्मे आहे
➡️भात, न्यूडल्सशिवाय त्यांचे जेवण परिपूर्ण होत नाही.
➡️ काही मांसाहारी लोक आठवड्यातून तीनदा मासे खातात किंवा एकदा डुकराचे मांस खातात
➡️त्यांचा आहार कमी कँलरीयुक्त असतो ( 1800 Cal per Day)
➡️ ते 80% पोट भरेल इतकेच जेवतात (काहीजण त्याऐवजी ➡️आठवड्यातून एकदा / दोनदा उपवास करतात त्या दिवशी फक्त 500 कँलरी इतकाच आहार घेतात )
➡️दिवसातून तीनदा सँनपिन चहा पितात जो ग्रीन टी आणि जाईच्या चहाचे मिश्रण असतो
➡️प्रोसेस्ड फूड,बेकरी फूड ,फास्ट फूड त्यांच्या आहारात नसते.
➡️कुठल्याही व्यसन आणि नशील्या पदार्थापासून दूर राहतात

2️⃣ व्यायाम 
ओकिनावा चा बराचसा परिसर दुर्गम आहे ,जिथे बुलेट ट्रेन सोडा साधी लोकल सुद्धा जात नाही ,काही ठिकाणी कारने पोहचणे सुद्धा अवघड आहे त्यामुळे येथील लोक बहुतांश सायकल किंवा पायी प्रवास करतात त्यामुळे शरीराची प्रचंड हालचाल दिवसभर होते
रात्री 7-9 तास झोपून ते भल्या पहाटे उठून ते हलकेफुलके व्यायाम करतात (झोपेमुळे अल्झायमर सारख्या आजाराला दूर ठेवून चेहरा टवटवीत ठेवता येतो)

ज्यात खालीलपैकी कुठलातरी व्यायाम केला जातो ज्यामुळे ते तणावमुक्त राहतात
1.#रेडिओ_ताईसो 
रेडिओवरून सूचना ऐकत सर्वांनी हाँल अथवा मैदानात एकत्र येऊन केलेला हातांचा व्यायाम
2.#योगासने मुख्यत्वेकरून सूर्यनमस्कार म्हणजे सर्वांगाचा व्यायाम 
3.#क्किगाँग -जीवनातील चेतनेला कार्यरत करणारे श्वसन प्रकार
ज्यातून शरीर, श्वास आणि मन यांचे नियमन करून आत्म(चैतन्य) नियंत्रण केले जाते
4. #शिएत्सु -उच्चारध्वनीमार्फत श्वसनप्रक्रिया नियंत्रित करून शरीराच्या सगळ्या अवयवांचा समतोल साधत ,हालचाली करत अंतरात्म्याला शांत करायची ही व्यायाम प्रणाली
5.#ताईची -मार्शल आर्टचा प्रकार ज्यात कमीतकमी उर्जेत चपळतेने स्वतःचे मन, शरीर, श्वास यात एकसंधता आणून  प्रतिस्पर्ध्यापासून स्वताचे स्वसंरक्षण करण्याचे धडे दिले जातात

3️⃣ इकिगाई (जीवनाचा उद्देश माहिती असणे )
कित्येक जण जिवंत आहेत म्हणून जगतात आणि असेच निराशेत रडतकुढत जगून एखाद्या दिवशी हया जगातून नाहीसे होतात 
सुखी समाधानी आणि दीर्घायुषी जीवनासाठी देवाने आपल्याला हया धरतीवर कशासाठी पाठवलयं हे माहिती हवं  हे जाणून घेण्यासाठी जपानी लोक खालील पद्धती वापरतात
1. #लोगोथेरपी
आपल्या जीवनाचा उद्देश माहिती नसतो म्हणूनच आपल्या जीवनात चिंता ,निराशा पोकळी जाणवते 
लोगोथेरपी स्वतःचा आध्यात्मिक शोधाची नैसर्गिक प्रक्रिया आहे 
ज्यात निराश व्यक्तीच्या समस्या आणि भूतकाळ थेरपिस्ट जाणून घेतो आणि समस्यांच्या मुळाशी जाऊन जीवनातील तो उद्देश शोधायला मदत करतो ज्यामुळे व्यक्तीच्या मनाची द्विधा अवस्था दूर होते
2.#मोरिताथेरपी
ही सुद्धा आध्यात्मिक आधारावर उद्देश शोधणारी आणि निराशेवर मात करणारी पद्धत आहे
यात पहिल्या टप्प्यात निराश माणसाला पाच दिवस एका खोलीमध्ये ठेवले जाते जिथे टिव्ही, पुस्तक ,मित्र अशा कुठल्याच उत्तेजक गोष्टी नसतात फक्त उपचारकर्ता त्याला भेटतो
माणसाला फक्त आराम करुन स्वतःच्या भावनांतील चढउतार अनुभवयाचा असतो
पण माणूस लवकरच याला कंटाळतो
मग दुसऱ्या टप्प्यात पुढील पाच दिवस बागकामासारखी हलकी कामे करत स्वतःच्या भावनांची विचारांची डायरीत नोंद करायची असते 
हयातही उपचारकर्त्याशिवाय इतर व्यक्ती बरोबर बोलायची परवानगी नसते
तिसऱ्या टप्प्यात पुढील पाच दिवस कष्टाची (लाकूड तोडण्यासारखी) कामे करायची असते ,इतरांशी बोलत आपल्या भावना डायरीत नोंदवायच्या असतात
चौथ्या टप्प्यात ध्यानाच्या मदतीने स्वतःच्या भूतकाळाचे चुकांचे सिहांवलोकन करून स्वतःच्या जीवनाचा उद्देश शोधायचा असतो.

3.#नाईकन_ध्यानपद्धती
ध्यानाद्वारे स्वतः कडून तीन प्रश्नांची उत्तरे मिळवायची 
➡️ मला कुणाकडून काय मिळाले?
➡️ मी कुणाला काय दिले?
➡️ माझ्यामुळे कुणाला त्रास झाला? हयातून स्वतःच्या जबाबदारीची जाणीव तर होतेच आणि आपली दुसऱ्याला दोष द्यायची वृत्ती नाहीशी होते.

4. #प्रवाहाचा_शोध
 जी कामे करताना आपण देहभान विसतो, तल्लीन होतो,आपण थकत नाही, आपल्याला वेळकाळेचे भान राहत नाही
काम पूर्ण केल्याशिवाय आपण उठत नाही अशा अवस्थेला 'फ्लो' म्हणतात ( अर्थात तो आहे....आपल्यातील प्रवाह )
फ्लो शोधण्यासाठी एखादे आवडीचे पण थोडेसे अवघड काम करा म्हणजे मेंदू कार्यरत होईल आणि काम पूर्ण झाल्यावर समाधान मिळेल.
हे काम करत असताना आपले ध्येय स्पष्ट असावे जेणेकरून आपल्या कार्यपूर्तीची आणि यशस्वीतेची ओळख पटेल 
अशा छोट्या छोट्या पावलांतून स्वतःचा आत्मविश्वास वाढतो,प्रसन्नता वाढते,आणि भविष्याची चिंता ही उरत नाही
तसेच एकावेळी एकच काम करा म्हणजे मल्टीटास्किंग करुन एक ना धड भराभर चिंध्या अशी कामांची अवस्था होणार नाही

अशी छोटी छोटी कामं पूर्ण झाल्यावर ध्यान करून आपल्याला नक्की कुठल्या कामात फ्लो जाणवला हे शोधा.
त्या कामालाच आपला धर्म माना आणि त्यातच आनंद शोधा हाच आपला इकिगाई असेल 
इकिगाई दुसऱ्याला मदत करणं एवढा सुद्धा छोटा असू शकतो 
पण त्या इकिगाई वर निश्चयपूर्वक ठाम राहा ,दृढतेने त्यावर आयुष्याच्या शेवटापर्यंत वाटचाल करा 

4️⃣ सामाजिक भान
भूत भविष्याची कसलीही चिंता न करता कायम वर्तमानात आलेला प्रत्येक क्षण आणि क्षण ते जगून काढतात
माणसात मिसळतात, शेजारयांशी नातेवाईकांशी सलोख्याचे संबध जपतात, हास्यविनोद करत नाचतात, गातात
सामाजिक कार्यात सहभागी होत मिळेल ती जबाबदारी पार पाडतात
आयुष्य मित्रांच्या टोळया बनवून जगायचे मेडिकलच्या गोळया खाऊन जगायचे नसते यांचे सदैव भान ठेवतात
जीवन क्षणभंगुर आहे ,आपल्यापैकी कुणालाही अमरत्वाचे वरदान नाही त्यामुळे सगळयांना प्रेमाने हसतमुखाने सामोरे जातात.
तणावाखाली जगण्याऐवजी शांत निवांत जगणे त्यांना आवडते
 म्हणून तणावामुळे होणारे आजार आणि त्यांच्या शरीराची झीज होत नाही.
आपल्या पूर्वजांचे आपल्यावर अनंत उपकार आहे त्यामुळेच आपली अन्नपाण्याची इतकी उत्तम व्यवस्था आहे त्यामुळे
त्याबद्दल ते त्यांना धन्यवाद देत असतात
निसर्गाच्या सानिध्यात भरभरून जगणे हीच ब्लू झोनची ओळख आहे

हया पुस्तकातून किमान आपल्या तन, मन,आत्मा हयांची जपणूक
करण्यासाठी काही हानिकारक सवयींना चांगल्या सवयीत बदलावे
आणि निरोगी दीर्घायुष्य अनुभवावे.
संदर्भ:निलेश शिंदे 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know