Sunday, October 9, 2022

पुस्तकाचे नांव--वळीव

वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
 परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
 पुस्तक क्रमांक-११४
 पुस्तकाचे नांव--वळीव
 लेखकाचे नांव--शंकर पाटील
प्रकाशक-मेहता पब्लिकेशन्स हाऊस,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण डिसेंबर २०२१
एकूण पृष्ठ संख्या-१५०
वाङ्मय प्रकार --कथासंग्रह
मूल्य--१५०₹
📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖
      ११४|पुस्तक परिचय
           वळीव
 लेखक--शंकर पाटील 
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾-----------------------------------------------
वैशाख वणव्याने अंगाची लाही लाही होत असते.नरड्याला सारखा सोक पडतो. ऊनाच्या काहिलीनं  छपरात नाहीतर घरातल्या पडवीत गप्प पडावं लागतं. रानवाटेतल्या फुफाट्याने सगळा धुरळा उडत असतो.झाडांच्या पानांवर धुळीचं किटाण बसलेलं असतं.भेगाळलेल्या जमिनीला तृष्णेची आस लागलेली असते. नदीनालीकोरडी ठणठणीत पडलेली असतात. सगळ्यांच्या नजरा आभाळाकडे लागलेल्या असतात.अन् अचानक सोसायट्याचा वारा वाहू लागतो.आभाळ भरुन येते.आणि ढगांचा कडकडाट करत  टपोऱ्या गारांचा वर्षाव हैत होत..गर्जत वाऱ्याच्या संगतीने वळीव सडकून कोसळतो.अशा 'वळीव' या कथासंग्रहाचे लेखन सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकार शंकर पाटील यांनी इरसाल आणि खुमासदार शैलीत केले आहे.या पुस्तकास राज्य शासनाने पुरस्कार प्रदान करुन गौरविले आहे.
महाराष्ट्रातील रसिक श्रोत्यांना पोटधरून हसायला लावणारे,ग्रामीण जीवनाचा वेध व्यक्तिचित्रांतून वेध घेणारे पटकथाकार, जेष्ठ कथालेखक,सुप्रसिद्ध विनोदी कथाकथनकार शंकर पाटील हे नाव मराठी वाचकाच्या मनात एक अढळ स्थान मिळवून आहे.त्यांच्या ग्रामीण कथा म्हणजे मराठी साहित्याला मिळालेले लेणे आहे. ग्रामीण जीवनाच्या संघर्षाचे पारदर्शी चित्रण आणि खुमासदार संवाद आपल्याला त्यांच्या अनेक कथांतून अनूभवायला मिळतात.प्रत्येक कथेला सामाजिक प्रश्नांचा कंगोरा असतो. अतिशय सहज सुंदर ग्रामीण शब्दसाजात कथा गुंफलेली आहे.रसग्रहण करताना आपण तल्लीन होऊन जातो.शब्दांची ठेवण वाचताना आपल्या डोळ्यासमोरच दृश्य बघतानाचा अनुभव येतो.अस्सल आणि जिवंतपणा त्यांच्या कथेत ओसंडून वाहत असतो.व्यक्ति आणि निसर्ग वर्णन तर लाजवाब रेखाटले आहे.
 वळीव कथासंग्रहातील कथांचे वर्णन जसा वळीव सडकून पडल्यावर माणसांची आणि जित्रांबांची जशी त्रेधातिरपिट उडते. तश्या या कथेतील प्रत्येक व्यक्तिरेखेतून एकेका वळीवाची आठव मनात पिंगा घालत राहते.इतकं सशक्त लेखन या कथांमधून पेरलेलं आहे.
पावसाचं आणि शंकर पाटलांचं एक नातं आहे.ते एकदा म्हणाले होते,'पाऊस म्हणजे माझा जिवलग दोस्त!उन्हाची खाई उसळली की माझी तगमग सुरू होते. अगदी गुदमरल्या सारखं वाटतं; पण पाऊस एकदा कोसळू लागला,की माझ्या चित्तवृत्ती उल्हसित होतात.'त्यांचं म्हणणं खरं आहे.'आभाळ','वळीव'अशा कितीतरी कथांमधून पावसाची विविध रुपं त्यांनी चित्रित केली आहेत.झिमझिम पाऊस, ताशा बडवत राहिलेला पाऊस,थट्टेखोर पाऊस गारांचा सडा टाकून घेणारा पाऊस, थुई थुई मोरावनी नाचवणारा पाऊस, बुरंगाटा सारखा पाऊस तरं ढगफुटी झाल्यासारखा मुसळधार कोसळणारा पाऊस... खरंतर मग पाऊस अंगावर झेलण्यात एक अपूर्व आनंद आहे!
पावसाचा स्पर्श म्हणजे परमेश्वराचा स्पर्श.पण वैशाखात कोसळणारा वळीव मात्र सगळ्यांचा थरकाप उडवणाराच पाऊस असतो.
अशाच थरकाप कुतूहल आणि अस्सल कथांचे शब्दथेंब वाचताना आपल्याही मनात पाऊस विचारांचे थैमान घालत घालत त्यांतील व्यक्तिंच्या अस्सलपणाची, खऱ्यापणाची आणि ग्रामीण भाषेची रंगत खुलवतात.त्यांचे परखड विचार आपल्या मनात काहूर माजवितात. ग्रामीण इरसाल व्यक्तिंच्या स्वभावाचे पैलू कथेचे वाचन करताना लक्षात येतात.
 लेखक शंकर पाटील यांनी जन्मदात्या आईवडिलांच्या स्मृतीस ही ग्रामकथेची गाथा अर्पण केली असून.ते म्हणतात की,"आमच्या नशिबाची व मोटनाडा जाऊन हातात खुरप्याऐवजी लेखणी आली ती त्यांच्याच अपरंपार कष्टामुळे."
त्यांचे लेखन हे त्यांच्या जगण्यातून उमलले आहे.कधी ते जुन्यानव्यातील पडलेलं अंतर समजून घेतील,तर कधी अवती भोवतीच्या माणसांशी गप्पागोष्टी करण्यात रंगतील.खर तर गाव म्हणजे गोष्टींचा वाहता झरा.अशा वेगळ्याच गावची पाटीलकी लाभलेला हा माणूस,'चार पाऊले उमटवू आपली ठेवू खुणेचा मार्ग बरा'असं म्हणत पाय नेतील तिकडे वाचकांना प्रथदर्शन करीत नेणारा हा कथासंग्रह आहे.
या कथासंग्रहात एकूण १४ बहारदार  रसदार व कसदार कथा आहेत. वैशाखातील पहिल्या पावसाची 'वळीव' कथा तर अप्रतिम शब्दांकनात गुंफलेली आहे.प्रत्येक वाक्यातून शेती,गाव आणि व्यक्तिचं वर्णन नजरेत भरतं. ग्राम्य बोलीतल्या अनेक नवनवीन शब्दांची ओळख होते आणि शब्दभांडार वाढतच रहातं.इतकी दर्जेदार अस्सल मराठमोळी सृजनशील साहित्यकृती आहे.
    वीज आपल्या वर पडू नये म्हणून लोखंडांची वस्तू घराबाहेर ठेवण्याची प्रथा असो.ती आठव कायम तात्या करतात. वळिवाच्या पावसाने वातावरण कस़ बदलतं याचं वर्णन,वायदुळीचं, फुफाट्याचं आणि झाडोऱ्याचे वर्णन छानच रंगविले आहे.शेवटी घराकडे जायला तात्या देसाई निघालेले असतात डगरीच्या वाटेवरच त्यांची हरवलेली तांब्याची अंगठी देण्यासाठी पावसाची उघडीप झाल्यावर धावतपळत पुतण्या येतो.काकीने दम देऊन त्याला पिठाळते असते.कारण तात्या अंगठी विसरून तसेच शेतावर गेलेले असतात.तांब्याच्या अंगठीमुळे ईज जवळ येणार नाही कल्पना आणि पाऊस 'वळीव'या बहारदार कथेत गुंफलेली आहे.

एका खेडेगावातील पंतोजी काळातील शाळा,शिक्षक आणि विद्यार्थी यांचे वर्णन अतिशय इरसाल आणि मिश्किली शैलीत केलेले आहे.खरंच वाचताना हल्लीच्या 'हवा येवू दे!' या मालिकेतील विनोदी प्रहसनाचा प्रयोगच आपणासमोर घडतोय इतकं खुमासदार व मिश्कील शैलीत संवादाचे सादरीकरण'शाळा'या कथेत केले आहे.वर्ग शिकवणं आणि तपासणीचे वर्णन अप्रतिम आहे.
'शरीर अपंग मन अभंग' या उक्तीप्रमाणे अंध असणारी शारी एखाद्या डोळस माणसाला लाजवेल या पध्दतीने दैनंदिन कामं करीत असते.पण तिला भावभावजयींचे सुखाचे बोल ऐकायला मिळत नाही.सतत तिचा दुस्वास होत असतो.अशी दर्दभरी कहाणी 'शारी 'या कथेत हृदयस्पर्शी भावपूर्ण शब्दांत सजविली आहे.फक्त ती काळीज कप्प्यातील संवेदनांची उकल लेखकाशी करायची.मनातील वेदनाआणि दु:ख  लेखकाशी बोलून मन रितं करायची.
टाकवड्याला जायच्या ऐवजी रात्रीचा  बैलगाडीने भलतीकडेच प्रवास घडतो त्याची कथा चांदण्यासारखी 'भूल' कथा होय.यातील बैलगाडीच्या रात्रिच्या प्रवासाचे वर्णन अगदी प्रत्येक खाचखळग्यागणिक अप्रतिम केले आहे.
गावातील हौशी कलावंतांनी एकत्र येऊन केलेल्या नाटकाची खुमासदारी 'नाटक'या कथेत सादर केलीय.दिग्दर्शक अन्याबा परटाला नाटक सुरू करण्यासाठी काय काय दिव्य करावं लागतं याचं बहारदार आणि खुमासदार शैलीत संवाद लेखन केले आहे.खरोखरच ही कथा वाचताना आपली हसून हसून पुरेवाट होते.इतकं यथार्थ दर्शन आपल्याला या नाटकातून घडतं.
रहस्यमय सुडाची कथा 'भान' अप्रतिम शब्दात प्रस्तुत केलीय.रात्री दिसणाऱ्या रस्त्याच्या दृश्याचे वर्णन तर लाजवाब आहे.तर पुढे पाटलाचं पोरगं बाजाराला गेल्यावर अचानक हरवतं.त्याला शोधायला केलेली पळापळ. तदनंतर मिरजेच्या एका इसमाबरोबर पाटलांचा मन्या वाडीवर येतो.त्यावेळी घडलेली उलट तपासणी संवादातून व्यक्त केली आहे. 'आफत'या कथेतून शेवटपर्यंत कुतूहल कायम ठेवले आहे.
कुस्ती बरोबर बैलगाडा फिरवणं हा तर रांगडा खेळ,तर महाराष्ट्राच्या मातीतला मर्दानी नाद म्हणजे बैलगाड्याच्या शर्यती. तालेवार व बागायतदार शेतकऱ्यांचा जीव की प्राण असतो हा खेळ.'भिर्रऽऽऽर' शब्द कधी कानावर पडतोय,याची उत्सुकता सगळ्यांनाच! गावच्या यात्राप्रसंगी या शर्यतींचे आयोजन केलं जातं. मनुष्य स्वभावाप्रमाणे तालेवार जिद्दी माणसांच्यातच ईर्षा आणि जिंकायची ऊमेद कायमच ओसंडून वाहत असते. जिंकण्याची उमेद वाढवणारी तऱ्हा सूक्ष्मपणे 'सूड'या कथेत  गुंफली आहे. प्रत्यक्ष शर्यतीचं वर्णन तर अस्सल जिवंतपणा दाखविते.
पाटील घराण्यातील जयसिंगाच्या दुसऱ्या लग्नाच्या हुलीमुळं गावात व पावण्यात उडालेला गोंधळ समर्पक शब्दात 'टिपिशन'कथेत उलगडून दाखविला आहे.तर भावाची पोलिस कस्टडीतून सुटका करायला जामिनासाठी गावचे देसाई,तसेच सख्ये मामा व मेहुण्याशी केलेली अन्नापाची  विनवणी. मास्तरांचाआश्वासक सल्ल्याचे वर्णन 'कणव'या कथेत अफलातून केलेलं आहे.
चंपाला माहेरवाशीण म्हणून आणायला बाप इटुबा जुगळ्याला काय करावं लागलं.जावाय आणि त्याच्या बहिणीशी कशी डेअरिंग केली त्याची ही जिगरबाज कथा 'माहेर'.तर 'खेळ'या कथेत हरणावानी चलाख रुप्या वासराची कथा 
मांडलेली आहे.घरातल्या लहान मुलांना वासरांशी खेळायला फार आवडते.अशीच शाळकरी मुलं लहानग्या वासराचे पाय बघून हे खोंड पुढं पळावू बैल होईल असं एकमेकांशी म्हणून त्याला लय पळवतात.त्यामुळं ते कासावीस होऊन गतप्राण होते.त्याची ही भावस्पर्शी कथा आहे.
न पटणाऱ्या म्हाताऱ्याम्हातारीचं कथा 'जुगळ्या काका'.प्रत्येक वेळेला नवऱ्याचा पाणउतारा करणारी कजाग म्हातारी. नवऱ्याच्या भुतकाळातील करणीच्या वजावटा काढणारी आणि बाळासाहेबांशी हितगुज करणारी म्हातारी छानच शब्दात शब्दचित्र मांडले आहे.
प्रेमापोटी रात्रिचं पळून जाण्यासाठी काय काय करावं लागतं त्यामुळे मनाची घालमेल होणारी,बैचेन करायला लावणारी 'प्रतिक्षा'कथा.लेखक शंकर पाटील यांच्या कथा विलक्षण पारदर्शी आहेत.त्यांची कथा चिंतनाच्या डोहात जन्मते.कथेद्वारे परंपरेपेक्षा परिवर्तन आणि ग्रामीण प्रश्न कथेतून रसिक वाचकांसमोर ठेवलेले आहेत. मनाचा वेध घेणाऱ्या  कथांची मेजवानी या पुस्तकात आहे.त्यांच्या लेखणीस त्रिवार वंदन!!!
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे, वाई

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know