Sunday, March 20, 2022

कादंबरी:द फाउंटनहेड

जागतिक बेस्ट सेलर

कादंबरी:द फाउंटनहेड 

मूळ लेखक: आयन रँड, मराठी अनुवाद: मुग्धा कर्णिक

पृष्ठ:७२४ मूल्य:५९५/  सवलत मूल्य:५००/ टपाल:५०/ 

एकूण:५५०/ 

खरेदीसाठी व्हॉट्सॲप करून नाव, पत्ता, पिनकोड आणि मोबाईल नंबर द्यावा.सेम नंबर : गुगल पे,फोन पे आणि paytm साठी. बँक खात्याचे डिटेल्स व्हॉट्सअपवर मिळतील.कॅश ऑन डिलिव्हरी ची व्यवस्था नाही.कृपया नोंद घ्यावी ही विनंती.

ज्ञानसाधना पुस्तकालय:9421605019

द फाऊंटनहेड:मानवाच्या  उत्तूंग भव्यतेचं उगमस्थान

पुस्तक परिचय:बाळासाहेब नागरगोजे

हॉवर्ड रोर्क एक नखशिखान्त बंडखोर प्रज्ञावंत. सर्जनशील आर्किटेक्ट. त्याची कोणाशीही स्पर्धा नाही आणि तो कोणालाही स्वतःचा स्पर्धक वगैरे मानत नाही. तो आणि त्याची दुनिया बस्स.त्याला काहीही घेणेदेणेच नाही, त्याच्या आसपास दिवसरात्र सुरु असलेल्या जगरहाटीशी. तो जन्माला आला आहे फक्त त्याच्या हातातलं काम मनस्वीपणे पूर्ण करण्यासाठी. त्याच्या हातातल्या कामावर त्याचं विलक्षण असं प्रेम आहे. स्वतःचे विचार, कल्पना मांडताना तो मुक्तपणे मांडतो. त्याच्या मतांनी कोण सुखावतो कोण दुखावतो याच्याविषयी त्याला तिळमात्रही चिंता नाही. स्टँटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजमध्ये तो आर्किटेक्चरचे शिक्षण घेतोय. तेथील डीनला, सर्व प्राध्यापकांना, त्याच्या बॅचमेट्सना माहितीये की, रोर्क हे अजब रसायन आहे. रोर्क कोणाच्या पुढे पुढे 'जी हुजूर ' , 'हांजी हांजी 'करत नाही. त्याला कोणाच्याही कौतुकाचे आणि कोणी करत असलेल्या त्याच्या द्वेषाशी काहीही  घेणेदेणे नाही. तो स्थापत्यशास्त्रातील रेखाटनावरही स्वतःच्या स्वतंत्र प्रज्ञेचे संस्कार करतो. त्याला जुनं बाड जसेच्या तसे मुळीच मान्य नाही.त्याच्या हातातून निघणाऱ्या रेषा त्याच्या आत कोंडलेल्या चैतन्याला मुक्तपणे अभिव्यक्ती देतात. त्याच्या निर्मितीमध्ये पारंपारिक चौकटीतलं काहीही नसतं. रटाळपणा त्याच्या आसपासही फिरकत नाही. तो आधुनिकतावादी आहे. नाविन्याच्या शोधात आहे, परंतु इतरांच्या नजरेत रोर्कचा हाच मोठा गुन्हा आहे. तो कळपात चालत नाही, बाहेर पडून स्वतंत्रपणे चालतो.प्राध्यापकांच्या, बॅचमेट्सच्या नजरेत तो सलतो. त्याचे अस्तित्व इतरांसाठी अस्वस्थतेचा विषय ठरते. रोर्कच्यापुढे  प्रत्येकालाच आपापलं खुजेपण अगदी ठसठशीतपणे दिसून येत असतं,आणि प्रत्येकाच्या  अंतःकरणातली भळभळती जखम ही तीच असते. मग यावर उपाय काय..?
 तर रोर्कला नेस्तनाबूत करणे, हाच एकमेव उपाय .मग सुरु होतात कट-कारस्थानं. त्याला हरवलं पाहिजे, नाहीतर आपण पुढे कसे जाणार...?
आपल्याला कोण किंमत देणार ? रोर्क हा दीड शहाणा आहे, मग्रूर आहे,अहंकारी आहे, हीच भावना असते  त्याला विरोध करणाऱ्यांच्या मनात. रोर्कने कॉलेजमध्ये सादर केलेल्या रेखाटनांना तकलादू ठरवून, तू अपात्र आहेस. असं कॉलेजतर्फे त्याला सांगण्यात येतं. त्याला शिक्षण पूर्ण होण्याच्या आतच कॉलेज मधून काढून टाकण्यात येतं. इतकं होऊनही त्यावर रॉर्कची कुठलीच प्रतिक्रिया नाही, मनस्ताप नाही, आदळआपट नाही. ' चुन चुन के बदला लूंगा.. '   'दुनिया को दिखा दूंगा.. '
 असंही काही नाही.
 तो कॉलेजच्या बाहेर पडतो. त्याला फक्त त्याचं काम करायचं असतं ,आणि त्याचं काम कोणाच्याही प्रशंसेच्या दयेवर अवलंबून नाही की कोणाच्या तिरस्कारानेही ते काम बाधित होत नाही. तो अगदी बर्फाइतका थंड आहे. ना तो रागाने उसळतो, ना प्रतिशोधाची भावना बाळगतो. ना प्रतित्युत्तराच्या भानगडीत पडतो. तो चालत राहतो. त्याला अनामिक ओढ आहे, स्वतःच्याच शोधाची. स्वतःलाच आकार देण्याची. त्याचे भावविश्व, त्याची प्रज्ञा, त्याची स्वतंत्र अभिव्यक्ती आणि त्याच्या बोटांतून झिरपणाऱ्या घरांच्या, बिल्डिंग्जच्या  रंगरेषा यामध्ये द्वैत नाही. सर्व काही एकरुप, सर्व काही एकजीव. तो रात्रंदिवस रेखाटनामध्ये रमतो, सुखावतो. बहुतांशी समाजाच्या बौद्धिक कुवतीपेक्षा, सांस्कृतिक, धार्मिक परंपरांच्या पठडीपेक्षा वेगळं, नाविन्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण म्हणजे त्याला स्वतःला हवं असलेलं क्रांतिकारी काहीतरी तो मांडतोय, हेच झुंडशाहीला सहन होत नाहीये. रोर्क हे सर्व जाणीवपूर्वक करत नाहीये. काही तरी स्टंटबाजी करुन त्याला मुळीच चर्चेतही यायचं नाहीये. पण झुंडशाही, न्यूयॉर्क शहरातील प्रस्थापित बांडगुळं, पत्रकार टुही व 22 वर्तमानपत्रांचा मालक असलेला गेल वायनाड हे एका मंदिराच्या बांधकामाचे निमित्त करुन समाजाच्या मान्य नीतिमूल्यांच्या पावित्र्यभंगाच्या आरोपाखाली त्याचा मोठा छळवाद उभा करतात, कारण रोर्कने काहीतरी क्रांतिकारी मांडणं हे इतरांच्या बौद्धिक, मानसिक कुवतीला मोठं अप्रत्यक्ष असं आव्हानच असतं आणि रोर्कला प्रतिस्पर्धी मानणाऱ्यांना खरी भीती वाटते ती याच आव्हानाची. कारण रोर्कच्या प्रतिभेसमोर केवळ स्थिर, अविचल उभेही राहण्याची त्यांची कुवत नसते. हात पाय लटपटतात त्यांचे. यावर उपाय काय..?
 तर रोर्कला  समूळ नेस्तनाबूत करणे. तोच नसेल तर मग निर्धास्त जगता येईल. कोणाच्याही मनावर अनामिक ताण, धाक, मानसिक दडपण असणार नाही.कोणाच्याही मनात न्युनगंड निर्माण होणार नाही. सूमारांचे राज्य येईल. मग  सगळीकडे आनंदीआनंदच. अमेरिकेच्या सर्वोच्च क्षेत्रावर आपली मांड टाकून बसलेला पाताळयंत्री पत्रकार टुही हा रोर्कचा नखशिखान्त विरोधक असतो. रोर्कला उद्ध्वस्त करण्यासाठी तो स्वतःची पूर्ण क्षमता पणाला लावतो. टुही व  रोर्कची अचानक भेट झाल्यानंतर टुही रोर्कला  खोदून खोदून विचारतो की, "त्या मंदिराच्या उभारणीबाबत जे वादग्रस्त प्रकरण उभे राहिले, त्याचा तुला काय त्रास झाला..?
 तू व्यथित झाला आहेस का...? "
  त्या मंदिराच्या वादग्रस्त प्रकरणाच्या मुळाशी टुहीचाच  मेंदू असतो. त्यामुळे त्याने रोर्कला विचारलेले  प्रश्न सरळ नाहीत. रोर्कने जर मान्य केलं की, हो मला त्रास झाला. मला कित्येक दिवस झोप आली नाही. तर मग टुहीला स्वतःचा विजय राक्षसी पद्धतीने साजरा करायचा मार्ग मोकळा. पण रोर्क म्हणतो, 
" माझे फक्त माझ्या कामावर लक्ष असते, इतर गोष्टींकडे मी लक्ष देत नाही. "
 हे उत्तर टुहीला खूप बोचणारं आहे. रोर्कचं कितीही नुकसान केलं तरी तो हार मान्यच करत नाहीये. ही बाब टुहीला खुप छळते. रोर्कने संतापून माझी गच्ची पकडावी, मला बेभानपणे शिव्या द्याव्यात, खूप आदळआपट करावी, ही अपेक्षा असते टुहीची. कारण रोर्कने असे केले तर रोर्कचा पराभव झाला आहे हे सिद्ध होईल. पण रोर्कच्या चेहऱ्यावरची एकही रेष हलत नाही. शेवटी टुही  वैतागून विचारतो, 
"तुला माझ्याबद्दल काय वाटतं...? "
 रोर्क शांतपणे म्हणतो, 
" मी तुझ्याबद्दल कधी विचारच केला नाही... "
 द्वेषमूलक मानवी संबंधांची कातडी सोलून लेखिका आयन रँड दुनियादारीच बेसुर रुप वाचकांसमोर उघडं करत जातात. आपल्या कामात तल्लीन असलेल्या, स्वतःच्या सर्जनशीलतेला ऊर्ध्वगामी दिशा देणाऱ्या, नवीन प्रयोग करु पाहणाऱ्या प्रज्ञावंतांचा  छळ का केला जातो...? 
अगदीच लाचार, लाळघोट्या, सुमारांना  राजमान्यता कशी मिळते..? 
कुठलेच विशेष कौशल्य नसलेला रोर्कचा बॅचमेट पीटर कीटिंग अमेरिकेचा टॉपचा आर्किटेक्ट म्हणून कसा काय नावाजला जातो..?
 आणि महानत्वाचा अंगभूत शाप वाहत रोर्कला ग्रॅनाईटच्या खाणीत मजूर म्हणून काम करण्याची वेळ का येते...?
रोर्क उध्वस्त  झाला पाहिजे, त्याला अद्दल घडविलीच पाहिजे, ही कुजकट वहिवाट लेखिका एका भव्य पटावर खूप सहजपणे अधोरेखित करत जातात. व्यवस्थेचे प्रिय ताणेबाणे, समूहाची सरंजामशाही मानसिकता, तडजोडवादी परंपरांचा मुजोरपणा, यांनी अनेक आधुनिकतावादी प्रज्ञावंतांना मातीत  घालण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. आजही जगभरात असे हॉवर्ड रोर्करुपी  स्त्री-पुरुष मानवी जीवनाला अधिक सुंदर, उदात्त, भव्य व विश्वव्यापी करण्यासाठी झगडत असतात आणि त्यांच्या विरोधात स्थितीवादी आणि प्रतिगामी बाजारबुणगे अहोरात्र कट-कारस्थानं करण्यामध्ये व्यस्त असतात. हा आदिम संघर्ष आहे. आणि तो मानवी अस्तित्वाच्या अंतिम क्षणाच्या वेळीच संपेल. सत्ता आणि वर्चस्ववादाच्या न्यूनगंडातून हे वेदनादायी छळसत्र सुरु होते आणि बघता बघता ते स्थितिशीलतेच्या हीन पातळीपर्यंत पोहोचते. डॉमिनिक आणि रोर्कच्या प्रेमाची या सूडसत्रात झालेली फरफट वाचकाला समूळ हेलावून टाकते. व्यक्ती की समाज....?
 महत्त्वपूर्ण नेमकं कोण..? व्यक्तीचं हित समूहात बांधलेलं असतं की व्यक्ती स्वतःचे हित- अहित स्वतःच ठरवित असते..? समाज व्यक्तीच्या विकासाला प्रेरक असतो की बाधा आणणारा असतो..? 
समुहाबरोबर मेंदू गहाण टाकून चालण्यात व्यक्तीच्या उन्नतीची काही एक शक्यता असते..?
व्यक्ती की समष्टी...?
गुढवाद की भौतिकवाद..?  
हा संघर्ष आजचा नाही आणि हा संघर्ष मानव जातीच्या अंतापर्यंत संपणारही नाही.
समूहाचा सामूहिक अहंकार व्यक्ती घेऊ पाहत असलेल्या आकाशमिठीला बंदिस्त करु पाहत असतो..?
अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ उठविणारी, वाचकाला स्वजाणिवेची पुनर्मांडणी करावयास लावणारी, सखोल अंतर्मुख होण्यास भाग पाडणारी ही कादंबरी आहे. व्यक्ती आणि समूहात वर्तनाबाबत काही अलिखित करार असतो...?
 की व्यक्ती आणि समूहात कायमच कधी उघडपणे तर कधी सुप्तपणे संघर्षाचे अविरत युद्ध सुरु असते..?
 1935 मध्ये लेखिका आयन रँड यांनी ' द फाउंटनहेड ' ही महाकादंबरी लिहायला घेतली, त्यातील आर्किटेक्ट हॉवर्ड रोर्क याचे व्यक्तिमत्व हा या कादंबरीचा लेखनाचा प्रमुख हेतू होता.  'मानव जसा असावा आणि असायला हवा '  तसा नायक रंगवणे हेच त्यांचे उद्दिष्ट होते.   'द फाउंटनहेड ' ही कादंबरी लिहून झाल्यानंतर तब्बल बारा प्रकाशकांनी ती छापण्यास नकार दिला.शेवटी 1943 आली ही महाकादंबरी प्रकाशित झाली. तब्बल सातशे तेवीस पानांची ही कादंबरी आहे यावरुन आपणांस या कादंबरीची काहीएक कल्पना येऊ शकते. जरी सुरुवातीच्या कालावधीत प्रकाशकांनी या कादंबरीला सकारात्मक प्रतिसाद दिलेला नसला,तरी याच कादंबरीने जागतिक साहित्यात इतिहास निर्माण केला. आयन रँडच्या अस्सल साहित्यिक दृष्टिकोनातून आणि परंपरेला छेद देणाऱ्या त्यांच्या व्यक्तिवादी तत्वज्ञानातून साकारलेल्या या कादंबरीची जगभरात भरपूर प्रशंसा झाली. या अजरामर कलाकृतीची कथा आहे एका तत्त्वनिष्ठ तरुण आर्किटेक्टची. समाजात रुढ असलेल्या प्रमाणांविरुद्धची, त्याच्या कठोर संघर्षाची आणि त्याच्याच प्रेमात असून सुद्धा त्याला रोखण्यासाठी आणि वाचवण्यासाठी झगडणाऱ्या  सुंदर  डोमिनिकवरच्या त्याच्या उत्फुल्ल प्रेमाची.ही कादंबरी समुहाच्या व्यर्थ कोल्हेकुई मध्येही स्वतःच्या तत्त्वावर ठाम राहण्याचे आत्मिक बळ देते. पुढे पाऊल टाकण्याची प्रेरणा देते.जोपर्यंत तुमच्यातील स्वत्व अभेद्य आहे, तोपर्यंत तुमचे कोणतेही नुकसान झालेलेच नाही, याची खात्री ही कादंबरी देते. मुग्धा कर्णिक यांनी या कादंबरीच्या अनुवादाचे शिवधनुष्य ताकदीने पेलले आहे.
रोर्कची जेव्हा त्याच्या शिक्षणाच्या कालावधीत आर्किटेक्चर कॉलेजमधून हकालपट्टी करण्यात येते,तेंव्हा  हकालपट्टी करण्यात आल्यानंतर पदवीदान समारंभाच्या दिवशीच रोर्क कॉलेजच्या डीनला भेटायला जातो. दोघांमध्ये चर्चा होते, कॉलेजमधून का काढून टाकण्यात आले,याविषयी डीन स्वतःच पुढाकार घेऊन स्पष्टीकरण देतात, कारण रोर्क त्याबद्दल काहीही विचारत नाही.
इंजिनियरिंगमधील विविध परंपरांवर दोघांमध्ये चर्चा होते. डीनला या चर्चेत रोर्कवर मात करता येत नाही. रोर्कचे बंडखोर विचार ऐकणं ही डीनच्या पायाखालची जमीन थरथरण्यासारखं असतं. रोर्क हा पठडीतला नाही. तो स्वतःची वाट स्वतः तयार करणार आहे. कॉलेजमधून काढल्यामुळे तो डीनपुढे गयावया करेल, रडेल, माफी मागेल अशी अपेक्षा असते डीनची. पण  रोर्कला कोणत्याच गोष्टींनी कशाचाही फरक पडलेला नाहीये. आर्किटेक्चर मधील गॉथिक, क्लासिक, ,हिस्टॉरिकल परंपरावर दोघांमध्ये चर्चा होते. रोर्क परंपरागत कलामूल्यांच्या विरोधात जाणारा आहे.तो मॉर्डर्निस्ट आहे.डीनला  चर्चेतून समजतं की रोर्क हा कोणत्याच परंपरेचा पाईक नाही.
तेव्हा डीन वैतागून रोर्कला  विचारतात, 
'' रोर्क, तू कोणत्या परंपरेचा अनुयायी आहेस...? "
  तेव्हा 22 वर्षांचा रोर्क म्हणतो, 
" माझी परिमाणं मी ठरवतो. माझे मापदंड मी तयार करतो. मला कोणत्याही परंपरांचा वारसा चालवण्यात रस नाही. मी कोणत्याही परंपरेच्या शेवटी उभा नसून माझ्यापासूनच एक नवीन परंपरा सुरु होईल. मी सुरु करत असलेल्या परंपरेच्या प्रारंभाला मी उभा आहे...." बाळासाहेब नागरगोजे

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know