Monday, January 17, 2022

पिपिलिका मुक्तिधाम" कांदबरी

*उत्तर आधुनिकता आणि पिपिलिका मुक्तिधाम*

        - डॉ.संजय बोरुडे.

        "पिपिलिका मुक्तिधाम" कांदबरी (२०१९ ग्रंथाली प्रकाशन मुंबई) संदर्भात अनेक लेखकांनी समिक्षा केलेली असून अनेक लेखकांनी या कांदबरीचा आशयाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे.हे करत असतांना सगळ्यामध्ये एक वाक्यता दिसून येते की ही कांदबरी वाटते तितकी सोपी नाही.म्हणजे ती आकलनाच्या दृष्टीने पचायला अवघड आहे.असे ब-याच लेखकांना वाटत आहे.त्याचे मुख्य कारण असे की या कांदबरीसाठी त्यांनी जो गाभा निवडलेला आहे तो वेगळ्या पध्दतीचा आहे.कांदबरीतील निवेदिका म्हणून ज्या चार मुंग्या आपल्याला दिसतात.या चार मुंग्यांच्या माध्यमातून त्यांनी समकालीन वास्तव,धर्म,वंश,परंपरा,आधुनिकता,नवता ,आधी सर्व घटनांचा,सर्व घटकांचा एक वेगळ्या पध्दतीने,एक त-हेवाईक पध्दतीने परंतु तो तात्विक अन्वय मांडलेला आहे.आणि अशा पध्दतीला अन्वय वाचण्याचा किंवा पाहण्याची आपल्याला सवय नसते.त्यामुळे ही कांदबरी थोडीशी अवघड वाटू शकते.आणि घाईघाईने यावर भाष्य करायला बरेच लेखक धजावत नाही.कोणी त्याच्या रचनेच्या अंगाने,किंबहुना स्वरुपाच्या अंगाने,शब्दकळेच्या अंगाने,प्रतिमेच्या अंगाने,प्रतिकांच्या अंगाने बोलतात.मात्र या कांदबरीचा गाभा तरी सुध्दा कोणाला सापडला यावरील समर्पक लेख माझ्या वाचण्यात नाही. म्हणून   "उत्तर आधुनिकता आणि पिपिलिका मुक्तिधाम" या अंगाने मी काही मुद्दे समोर ठेवत आहे.तर 'उत्तर आधुनिकता ' म्हणजे काय?हे समजून घेण्याअगोदर आपणांस 'आधुनिकता ' माहित असणे गरजेचे आहे,आता उत्तर आधुनिकता हे पर्व सुरु होऊन जवळ पास पन्नास वर्षाहूनही जास्त काळ लोटलेला आहे.उत्तर आधुनिकतेचे अस्तित्व आपल्या जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये जाणवते.तरीही उत्तर आधुनिकता म्हणजे नेमके काय..याची व्याख्या करणे अवघड जात आहे.सुरुवातीला काही तात्विक भागावर प्रकाश टाकू..नंतर या कांदबरीच्या अनुषगाने काही उदाहरणांवर प्रकाश टाकू.  

आधुनिकता ह्या वांड़मयीन घटकांवर आपण जी काही चर्चा करत असतो पण  ब-याचदा सवंगपणे किंवा ढोबळपणे ती असते.मात्र आधुनिकता ही बुध्दी,विचार आणि ज्ञान या तत्वांशी संबंधित आहे.आणि आधुनिकतेची महत्वाची उपलब्धी म्हणजे..आपल्याकडे विज्ञान युग अवतरले..केशव सुत म्हणतात की,"जुने जाऊ द्या मरणालागुनी" हे जे काही नव सृजन घडलेलं आहे.हे सृजन कसे घडलेलं आहे हे केवळ साहित्याच्या प्रांतात घडलेलं आहे असं नाही..हे एकूणच समाजाच्या जागतिक पातळीवर घडलेलं आहे,ही सगळी उलथापालथ झालेली आहे.आणि या उलथा पालथीमुळं नवी मूल्य आकाराला आलेली आहे.नवे तत्वज्ञान आकाराला आलेले आहे.माणसाची भौतिक प्रगती झाली.ज्यावेळी गँलिलिओ आणि त्याकाळातील संशोधक वेगवेगळे शोध लावत होते.त्यावेळी जसे आपल्याकडे संतांचा छळ झाला तसेच त्यांच्याही देशात या वैज्ञानिकांचा छळ झाला.पृथ्वी गोल आहे.हे सांगत असतांना धर्ममांतडांना ते मान्य नव्हते..ते सांगत होते की पृथ्वी गोल नसून ती सपाट आहे.. गॅलिलिओला धर्म विरोधक म्हणून त्यांनी गिलोटीन खाली दिले.हा इतिहास आपणास ज्ञात आहे.फ्रांन्स मध्ये औद्योगिक क्रांती झाली त्यामुळे..अनेक यंत्रे आली, सुबत्ता आली आणि उत्पादनाचा वेग वाढला.मानवाची भौतिक प्रगती झाली.परिणामी आधुनिकीकरणाचा एक दुष्परिणाम असा झाला की,यंत्रयुग आल्यामुळे कमवत्या हातांचा रोजगार गेला..मनुष्य बळाची जागा यंत्रयुगाने घेतली.कारखान्यांमध्ये काम करतांना माणूस हाच यंत्र बनला.आपल्याकडे गिरगावच्या संदर्भात कापूस मिल संदर्भात कवी नारायण सुर्वे पासून अनेकांचे साहित्य आपण वाचत असतो.त्यामध्ये याचे प्रतिबिंब पडलेले आपणांस दिसते.किंवा "रोबोट" नावाची कांदबरी जी.के.ऐनापुरींची त्यामध्येही या पध्दतीचे प्रतिबिंब पडलेलं दिसतं.पुढे त्यातुन दोन गोष्टी झाल्यात एक म्हणजे मालक हा एक वर्ग उदयाला आला.उत्पादन करणारा कंंपणीचा मालक आहे.आणि दुसरा श्रमिक ..हे दोन वर्ग उदयास आले. श्रमिक हा वर्ग कष्टाला मानणारा होता.कष्ट हेच त्याचे देव होते आणि धनिक हा पर्यायाने जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा विचार करतांना..मालक आणि श्रमिक यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत गेली.कारखान्यात काम मिळते म्हणून दुष्काळ,नापिकी,कर्ज बाजारीपणा या सगळ्यांना कटाळून गावातून अनेक तरुण लोक यांनी शहराच्या वाटा धरल्या.शहरामध्ये,महानगरात येऊन त्यांनी उदरनिर्वाहासाठी रोजगार मिळवले.पर्यायाने झोपडपट्या वाढल्या.. प्रदुषणाच्या अनेक समस्या निर्माण झाल्यात.  "उत्तर आधुनिकता समाज व संस्कृती"  या पुस्तकामध्ये अशा ब-याच गोष्टींची चर्चा  आहे.त्यातील एका  महत्त्वाच्या विधानाचा येथे आवर्जून उल्लेख करावा वाटतो.कारण आपल्याकडे आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अंधश्रध्दा बाळगत असतो.तशाच काही 'वाङ्मयीन अंधश्रध्दा ' आपण नेहमी बाळगत असतो.
    आधुनिकता म्हणजे एकदम सगळं जुनं गेलं आणि एकदम सगळं नवीन आलं.माणूस आला आणि त्याच्या  बरोबर सगळी मानवतावादी मूल्य आली. प्रत्यक्षात तशीच क्रांती झाली असे काही नाही.बी रंगराव यांचे हे  विधान त्यादृष्टीने धक्कादायक वाटू शकते.परंतु त्यांचे एक महत्त्वाचे उदाहरण आहे.त्यांनी असे म्हटले आहे की, "आधुनिकतावाद हा अभिजातवादाचाच एक प्रकारचा नवा अविष्कार होता." म्हणजे काय झाले की आधुनिकतेच्या नावाखाली जुने जे पारंपरिक होते ज्याला अभिजात म्हणून गाजवले गेले होते.  आजही त्यापध्दतीचा अभिजातवाद किंवा कुठले वाद ज्याच्या-त्याच्या पध्दतीने गाजवले जात असतात.अभिजातवाद म्हणजे पुन्हा पारंपरिक म्हणजे 'नव्या बाटलीत जुनी दारु' असे म्हणता येईल,अशा  पध्दतीचा हा अविष्कार होता. 'पिपिलिका ' ही आधुनिकतेच्या पुढची म्हणजे उत्तर आधुनिक कादंबरी आहे. मराठीत  यासारखे अनेक लेखक हे एक प्रकारच्या पारंपरिक पद्धतीने लिहीतात.त्यांच्या कथनाचा एक ट्रॅक  ठरलेला आहे. त्यांच्या लेखनातून  लेखक हा सारखा डोकावत राहतो.पात्रांमध्ये लेखक डोकावत राहिला की तो त्यांच्यावर हावी होतो.
    पिपिलिका  मध्ये चार मुंग्या आहेत त्यातील लाली तिच्या स्वभावाप्रमाणे वागते ,काळी तिच्या स्वभावाप्रमाणे वागते.कामकरी तिच्या स्वभावाप्रमाणे वागते.यातील राणी मुंगी तर स्वतंत्रच आहे.त्यामुळे त्याचा विचार कृती रूपकात्मक असली तरी सहज आणि नैसर्गिक आहे.त्या सगळ्या मुंग्या एकत्र येतात त्या 'आम्ही ' बनतात.नवी मोडतोड करू लागतात. या मोडतोडीच्या अर्थाने ,ही कादंबरी कथनाच्या अंगाने उत्तर आधुनिक ठरते.उदा 'हत्तीच्या कानात बँड ' मधील भागात लोककथेचा बाज घेऊन निवेदन येते तर 'अंधारातील सावल्या ' या भागात उपहास उपरोध येतो.तर 'कार्ल मार्क्सच्या केसात आम्ही 'त तिरकस सटायर येते.प्रत्येक भागाची शिर्षके वेगळी, क्रिएटीव्ह आहेत.उत्तर आधुनिकतेपुर्वीची आधुनिकता आपणाकडे जशी होती तीच आपले लेखक मांडत राहतात. 
     दुसऱ्या  महायुध्दानंतर ब्रिटिश वसाहती ज्या होत्या त्या ब्रिटीशांच्या जोखडाखालून अनेक राष्ट्र स्वतंत्र झाली. खुद्द अमेरिकेमध्ये जी गुलामगिरीची प्रथा होती ती प्रथा नष्ट करण्यासाठी मार्टिन ल्युथर किंग व अनेक तत्ववेत्ते विचारवंत झाले..अमेरिकेने सुध्दा त्याला पाठिंबा देऊन गुलामगिरीतून कृष्णवर्णीय मुक्त केले. अशा अनेक घटना दुसऱ्या महायुध्दानंतर घडल्या. ' नॉर्डीक हाच खरा आर्यवंश ' असं म्हणणाऱ्या  हिटलरच्या निमित्तानं जो राष्ट्रवाद जर्मनीत फोफावला होता,जी काही एकाधिकारशाही होती ती संपुष्टात आली होती.असे अनेक बदल झाले होते.
     आपल्याकडे सुध्दा पन्नाशीच्या दशकामध्ये आशिया खंडामधील भारत व अनेक देश  स्वतंत्र झाले हे सगळे बदल घडत होते  आणि सामाजिक,सांस्कृतिक इतिहास बदलत गेला.भारतीय समाजाच्या व्यामिश्र संरचनेत आधुनिकता,उत्तर आधुनिकता आणि दोहोंच्या मधले आणि त्यापुढील टप्पे सगळे एकाच वेळी आपल्याला दिसायला मिळतात.म्हणजे  पुरोगामी व सगळं मानवतेचं एकीकडे बोलत असलेले लोक  , प्रत्यक्षात व्यवहारात वागतांना पारंपरिक पध्दतीने वागताना किंवा परंपरावादी असल्याचा आपल्याला दिसतं.म्हणजे आपल्याकडे एखादे आजोबा एखाद्या घरामध्ये सकाळी देवपूजा करतांना दिसतात.समोर पिंपळ असेल मुंज्या असेल त्याला प्रदक्षिणा घालतांना दिसतात.घरात आजी असेल तर ती जपमाळ ओढताना दिसते किंवा 'रामकृष्ण हरी 'जप करतांना दिसते.ही म्हातारी माणसं टी.व्ही वर वैगरे कीर्तन प्रवचन,भजन, जे काही धार्मिक स्वरुपाचे आहे  ते पाहतात.आपणाकडे धार्मिक पुण्य कमवण्याचा महत्त्वाचा उद्देश जो आहे,तो प्रत्येक जण  पूर्ण करतो.तसेच धार्मिक साहित्याचा उद्देश आहे तो पुण्य कमवण्याच्या मार्गाला लागलेला दिसतो .त्यावेळी त्यांचा नातू , गुडघ्यावर जीन फाटलेली फँशनेबल कडे अशा अवस्थेत कानात हेडफोन घालून कुठल्यातरी पाश्चात्त्य संगीतावर 'राम्भासांभा' करतांना दिसतो . हा जो विरोधाभास आहे, तो आपल्या भारतीय समाजरचनेत ;   अनेक कुटुंबामध्ये  पाहायला मिळतो.म्हणजे आपण आधुनिक असलो तरी परंपरावादी आहोत.पिपिलिका पुराणांचा ,वेदाचा इतिहासाचा गौरवीकरण न  करता ,त्याच्या नव्या झुंबराची चिकित्सक मांडणी करते.आपल्या परंपरेचा धागा सांगून ती नवी मांडणी करते .तिच्याकडे जी दृष्टी आहे ती सर्वव्यापी आहे.
भारतीय समाजरचनेत हे जे आक्रित पाहायला भेटते.त्याचा स्तर ती मांडून दाखविते.
   पाश्चात्त्य इतिहासकारांनी जगाच्या इतिहासाचे ढोबळ मानाने चार टप्पे मांडलेत त्यामध्ये 'कृष्णयुग ' ज्याला इंग्रजीमध्ये 'डार्क एज 'म्हणतात त्यानंतर मध्ययुग अर्थात 'मिडल एज ',आधुनिक युग म्हणजे 'माँडर्न एज ' त्यानंतर उत्तर आधुनिक युग 'पोस्टमाँडर्न एज ' .प्राचीन भारतामध्ये आपल्याकडे सुध्दा बौध्द भिख्खु आणि श्रमणांनी वैदिक धर्मामधील ज्याकाही अनिष्ट रुढी,परंपरा होत्या जी काही तत्वं होती त्याला विरोध करतांना ते दिसतात.दुसरी गोष्ट आपल्या भारतीय  उपखंडाच्या पार्श्वभूमीवर पाहिले तर इथला जो माणूस होता तर तो ऐहिक चिंतेपेक्षा आपल्या अध्यात्मिक चिंतेत म्हणजे पारलौकिक जीवनाच्या बाबतीत तो जास्त दक्ष होता. ऐहिक जीवन कसेही असले तरी पारलौकिक जीवन 'मुक्ती मोक्ष ' या संकल्पना वाढीस लागलेल्या होत्या.आणि वेगवेगळे पंथ जरी निर्माण झाले तरी त्यांचे उद्देश मात्र एकच होते.तरी या अर्थाने ख्रिस्तपूर्व काळामध्ये मनुष्य हा विश्वातील आपलं स्थान शोधण्याच्या प्रयत्नात होता असं दिसतं.
   पिपिलिका ही दार्शनिक कादंबरी आहे ,जी जगभरातील तत्वज्ञानाचा अन्वयार्थ मोक्षमुक्तिच्या अनुषंगाने मांडते आहे.मोक्षाच्या या पैलूंवर अजून कोणी लिहीलेले पाहण्यात नाही.उत्तरआधुनिकता या कादंबरीत अनेक अंगाने आली आहे. आधुनिकतेच्या सुवर्ण युगामध्ये माणसं माणसांतील दरी रुंदावत गेली गुलाम,दास वर्ग निर्माण झाले.ज्ञान ,विज्ञान धर्म आणि राजकारण यासारख्या महत्वाच्या क्षेत्रामध्ये विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आली.शक्ती आणि बळ एका विशिष्ट वर्गाच्या हाती राहिले आणि त्यातूनच भांडवलशाही उदयाला आली.पर्यायाने सामाजिक विषमता दूरवर पसरत गेली.भांडवलशाहीचे देशीय रूप ही कादंबरी रेखाटते. आधुनिकतेचा प्रवाह अगदी कालपरवापर्यत म्हणजे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धा पर्यत अव्याहतपणे चालू असल्याचा आपल्याला दिसतो.ज्या कलाकृतीना म्हणजे ह्या कालखंडामध्ये जर आपण काही कलाकृती पाहिल्या तर उदाहरणार्थ आपल्या मराठी कवितेच्या तीन वळणं जरी बघितले तरी आज आपण उत्तर आधुनिकतेचे प्रतिनिधी म्हणून किंवा एकविसाव्या शतकाचे पहिल्या वीस वर्षाचे प्रतिनिधी म्हणून एक पिढी म्हणून याकडे बघितले तर काही शंका आपल्याला यायला लागतात. या शंकेमागील गाभा असा आहे की, ज्या कलाकृतीला अभिजात म्हणून संबोधितले गेलेले आहे.त्या कलाकृती ह्या भांडवलशाही वर्गाला पोषक असलेल्या समूहातील होत्या. हे आपल्याला सहज लक्षात येते.कारण आधुनिकता आणि परंपरा यांच अतुट असं नातं.... उदाहरणार्थ जर आपण बघितले की नोबेल पारितोषिक  भारतातील फक्त एकाच व्यक्तीला मिळाले ते म्हणजे रविंद्रनाथ टागोर.  त्यांचे चरित्र  वाचल्यानंतर   लक्षात येते की, त्यांचे दोन भाऊ ब्रिटिशांच्या कचेरीत कामाला होते.ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कलकत्ता येथे झाली होती आणि तेथून पुढे त्यांनी सगळीकडे हात - पाय पसरवले .त्यांच्याच कचेरीत कामाला असणारे त्यांचे दोन भाऊ आणि या पार्श्वभूमीवर टागोरांचे इंग्रजीतून शिक्षण तसेच अर्जेटिंनात वास्तव्य ; या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर  या वसाहतीमध्ये आपण सर्वानाच गुलाम म्हणून किंवा तेथे आपण शोषण करत आहोत असं चित्र जगापुढे येऊन आपली काहीतरी नाचक्की होऊ नये,या हेतूने इंग्रजांनी ज्या काही सुधारणा येथे केल्या होत्या ;जे काही उदारमतवादी धोरण दाखवले होते ;त्या धोरणाचाच हा परिपाक असल्याचाच एक मतप्रवाह आपल्याकडे आढळतो .तो याचमुळे आढळतो.पिपिलिका ही सत्यशोधकी वळणाने व्यक्त होणारी कादंबरी आहे.सत्यशोधन हा तिचा गाभा आहे.सत्याची अनेक रूपे ती दाखवत जाते.
   मराठीत उत्तरआधुनिक अंगाने विलास सारंग, सतिश तांबे, विजय तांबे, ग्रेसी कुळकर्णी यांनी लेखन केलेले दिसते. म्हणजे त्यांचे लेखन उत्तर आधुनिकतेच्या अंगाने अभ्यासता येतात.
   पिपिलिका ही कादंबरी उत्तरआधुनिकतेच्या अंगाने तपासता येते.
 १. आम्ही चौघी दुर्जनं दुष्टाला वश करण्याची प्रतिज्ञा करत आहोत . खरोखर कुतूहल म्हणून हालाहल पिण्याची इच्छा करत आहोत . जीव घेणाऱ्या आगीचं खुशाल सर्व बाजूंनी चुंबन घेण्याची इच्छा व्यक्त करत आहोत . गाढ आलिंगन देण्याची इच्छा करत आहोत . खरोखर अतिशय विषारी सापाला आलिंगन देण्यासाठी प्रयत्न करत आहोत . साधु ... साधु ... साधु ... हे जग्गनाथा दिल्लीश्वरोवा जगदीश्वरोबा तू म्हटले गंधवाला ,त्याच दिशेने जात आहे . आम्ही मुस्लिम होऊन तुझं मुस्लिम मन वाचतोय . मोहिनी मोहिनी कहा चली । बाहर खुदाई काम कन चली । फलानी फलाने को देखै , जरै मरे । मेरे को देखकर पायन पडै । छु मंत्र काया , आदेश , गुरु की शक्ती , मेरी भक्ति , फुरो मंत्र ईश्वरो वाचा || वशीकरण मंत्र वाचा वाचा पुजा पुजा आणि पुजा जाहिरातीच जाहिराती हे नेटकऱ्यांनो आम्ही येत आहोत .[ पृ.१३५]
यात संकल्पनांची व्यामिश्रता, प्रतिमांची मोडतोड, चमत्कारिक शब्दकळा अभ्यासण्यासारखी आहे किंवा हा उतारा पहा.
२.गंधवाल्याला ही जातककथा काही आवडलेली नव्हती . त्याचा आणि आमचा संघर्ष हा कायमच होता . म्हटलं तर गंधवाला म्हणजे काय ? त्यादृष्टीने तशी ती एक अदृश्य शक्ती होती . जी आम्हाला मूर्त स्वरूपात दिसत होती . कधी अमृर्त होती . धुतरी धुतरी होती . तिनं एकदा उवाच केलं की आमच्या डोक्यात भिनायला लागायचं , चार मनांच्या चार म्हणी कार्यरत व्हायच्या . म्हण म्हणजे अनुभवच असायचा . ती धुतरीच्या लोककथेतील असायची . आमच्या अंगात आलं की वाटायचं गंधवाल्याला चांगलं चोपून काढावा . हिंसा हे काही उत्तर होऊ शकत नाही . याची जाणीव होती . विचार आणि विचार फक्त विचार आणि विचाराने उत्तर . मला माहीत होतं . आमच्या अंगात आलं होतं . मन १ : काळी उवाच : ती पिसाळली की कुत्रं बडवायला लागते . कुत्रं उवाच म्हणून तिची बडबड सुरू होते . “ श्वानाय नमः बडविंगम् बडविंगम् बहु बडविंगम . जिथं भागिंगम् तिर्थमं बडविंगम , दगडंमं स्पर्शम् भिरकाभंगम् भागंमंगम् भागमंगम् रस्तोरस्ती भागंगम् अथ जिवस्य लक्षणम् " मन २ : तांबडी उवाच : ती पिसाळली की वारूळाच्या मातीचे सागरगोटे करून चल्लस खेळायची . दर डावाला आकाशाकडे पाहून पाढे म्हणायची बे एके बे वाटेत होते काटे मी सोडून सगळेच चाटे बे दुने आठ आपलेच सराटे आपलेच बोराटे बे पंचे बारा चारा गारा आणि माझाचं मला वारा [ पृ १३३ ]

उत्तर आधुनिकतेच्या  काही  संज्ञा पुढीलप्रमाणे सांगता येतात.

१. भाषिक मोडतोड
२.आकृतीबंधाची वेगळी संरचना
३. कथनाची आगळी शैली.
४. पुराणकथांचा नवा अर्थ
५. आधुनिकतेच्या पलीकडील अभिव्यक्ती 
६. मूलगामी व्यवस्था विश्लेषण
७. विरचना
८. उपहास 
९. सत्याच्या अंगाने 
राजकीय  विश्लेषण .
 
या पार्श्वभूमीवर आपण पिपिलिका कुठे बसते हे ताडून पाहू शकतो.
तूर्त इतकेच.

- डॉ. संजय बोरुडे

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know