Saturday, January 15, 2022

पुस्तकाचे नाव* : यशस्वी आणि समाधानी जीवनासाठी दहा रहस्ये

*वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य*
*परिचय कर्ता* : ढाकणे विवेकानंद भानुदास 
*पुस्तकाचे नाव* : यशस्वी आणि समाधानी जीवनासाठी दहा  रहस्ये 
 *लेखक* : डॉक्टर बी.एन.डब्ल्यू. डायर अनुवाद : विद्या अंबिके 
*प्रकाशन वर्ष व आवृत्ती* :नोव्हेंबर 2018 
*एकूण पृष्ठसंख्या* :152 
                                                जीवन जगत असताना कायम उपयोगी पडावे अशी दहा रहस्ये असलेलं हे एक रहस्यमय पुस्तक आहे. मूळ लेखक एक उत्तम वक्ते आहेत. त्यांचे जीवन यशस्वी होण्यामागचे रहस्ये या पुस्तकात मांडले आहेत. अगदी पुस्तक वाचायला हातात घेतल्यावर पुस्तकाचा शेवट केल्याशिवाय पुस्तक हातातून खाली पडणार नाही.असे  उत्तम व रहस्यमय विचार यात मांडलेले आहेत.खरं तर पुस्तक वाचण्यापूर्वी मी एका वेगळ्या विचाराने मानसिक तणावात होतो, पण पुस्तक वाचत वाचत माझे मन हलके व्हायला लागले. वेगळी आत्मशांती मला लाभायला लागली. या पुस्तकातील प्रत्येक वाक्य हे विचार करायला लावणारे आहे. लेखकाचा परिचयच पुस्तक वाचण्यास प्रेरित  करणारा आहे. परिचयच्या  आतच लेखकांनी सर्वासाठी खूप सारं प्रेम आणि सदिच्छा सर्वांना दिल्या  आहेत. या पुस्तकात एकूण रहस्ये यांचा विचार मांडण्यात आला आहे. क्रमगत विचार केल्यास प्रत्येक गोष्टीसाठी खुलं पण कुठलीच आसक्ती नसणारा मन हे पहिलं रहस्य माणसाला खूप काही शिकवून जाते. जसं घडतय तसं घडू द्या. जीवनाच्या प्रत्येक प्रक्रियेचा आनंद घ्यावं, पण कधीही तुमचा आनंद किंवा यश इतरांवर अवलंबून असू देऊ नका. आपल्या जीवनातील किंवा आपल्या जवळील सर्व नात्यांना गुणदोषांसहित स्वीकारा कुठल्याही आसक्तीशिवाय त्यांच्यावर प्रेम करा. यात  विचार वाचत असताना आवडलेली  काही वाक्य १)’ माणसाच्या जीवनात जेवढा जास्त संयम असेल तेवढेच लवकर परिणाम मिळतात.’ २) एखाद्या गोष्टीत अपयश आलं तर त्यात तुम्ही स्वतः कडून जास्त अपेक्षा ठेवल्या ही समस्या नसून तुम्ही स्वतः कडून खूप कमी अपेक्षा ठेवल्या हीच समस्या आहे. ३)आज मला जे काही वाटते ते बोलण्याची माझी इच्छा आहे पण कदाचित उद्या याच्याच विरुद्धही बोलू शकेल असा ही मी संकेत देतो.
                                            दुसऱ्या रहस्याचा विचार केला असता -तुमच्या आतील संगीत जिवंत ठेवा या रहस्यात  लेखक म्हणतो आपल्याकडे डावा मेंदू आणि उजवा मेंदू असतो त्यातील डावा मेंदू हा आकडेमोड, विश्लेषण करणे, गोष्टीचा अर्थ लावणे, अतिशय तार्किक  अशा निवडी घेऊन येतो, तर हा डावा मेंदू विचार आणि  विचारच करतो. पण तुमचा उजवा मेंदू आंतरिकतेचे प्रतीक आहे. तो विश्लेषणाच्या पलीकडे जाऊन काम करतो. आपण कायम डाव्या मेंदूच्या ऐकले तर तो डावा मेंदू तुम्हाला कृत्रिम किंवा त्याहीपेक्षा वाईट एखाद्या यंत्रवत माणसाप्रमाणे बनवेल. जीवन जगत असताना तुम्हाला तुमच्या उद्देशापासून तुमच्या आत मधील संगीत ऐकल्यापासून, त्यावर वाटचाल करण्यापासून थांबवू शकते  ते म्हणजे  भीती. कोर्स इन मिरकल यांच्या मते आपल्याला महत्त्वाच्या दोनच भावना आहेत त्यापैकी एक प्रेम आणि दुसरी भीती.
                                           पुढचे रहस्य म्हणजे तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता. लो एनर्जीमुळे लो एनर्जीच ॲट्रॅक्ट होते. खालच्या स्तरावर ऊर्जेचे विचार राग,घृणा  आत्मग्लानी , अपराधबोध आणि भीती तुम्हाला कमजोर करत नाही तर अजून त्यासारखीच विचार तुमच्याकडे आकर्षित करतात. जर आपण खालच्या स्तरावरील ऊर्जेच्या जागी तुमच्या आंतरिक विचार बदलून उच्च स्तरावरील ऊर्जा किंवा फ्रिक्वेन्सी आतमध्ये आणली जसे प्रेम, दयाळूपणा, करुणा, शांती, आनंद या गोष्टीचा विचार आत मध्ये असेल तर तुमच्याकडे अशीच ऊर्जा आकर्षित होईल आणि तुमच्याकडे देण्या साठी उच्च दर्जाच असेल. आपण खरंतर जे काही दुसऱ्यांना देतो किंवा वाटतो तेच आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असते. आपण जर लोकांना प्रेम दिलं तर आपल्याकडे तेच प्रेम कितीतरी पटींनी वाढून परत येते. आपण दुसऱ्यांना दुःख दिलं तर कितीतरी पट जास्त दुःख आपल्याकडे आकर्षित होते. अतिशय सुंदर रेखाटन या रहस्यात  वाचायला मिळाले. त्यानंतर मौन हे चौथं रहस्य - निर्मितीचं मूळ मौनच आहे. यातच निर्मितीला सुरुवात होत असते. म्हणूनच लेखक सांगतात वारंवार,जेव्हा जेव्हा  संधी मिळेल तेव्हा मौनात  प्रवेश करा आणि मनाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा. अगदी आत्मशांती, आत्मसमाधान मिळवण्यासाठी या रहस्याला महत्त्वाचे स्थान आहे. 
                                                       भूतकाळ आणि भविष्याचा विचार करण्यापेक्षा वर्तमानात जीवन जगण्यास प्रेरित करणारे विचार पाचव्या रहस्यात  वाचायला मिळाले. पाचव्या रहस्यात  अगदी मनाला विचार करायला लावणारे  वाक्य म्हणजे आजपर्यंत पकडून ठेवलेल्या भूतकाळाला मी समाधानाने निरोप देतो आहे. आता त्याची मला कधीही आठवण येणार नाही. वर्तमानाला इंग्लिश मध्ये प्रेझेंट असं म्हटलं जातं. प्रेझेंट म्हणजे भेट. वर्तमानातील प्रत्येक क्षण हा खरंच आपल्याला मिळालेली अनमोल भेट असते.
                                                यशस्वी जीवनासाठी उपयोगी असं सहावं रहस्य म्हणजे मनाच्या ज्या स्थिती मध्ये समस्या निर्माण झाली ती त्याच स्थितीमधून सोडवता येत नाही. खरंतर आपण कुठल्याही  चांगल्या न वाटणाऱ्या भावनेला किंवा अप्रसन्नतेला समस्या असं नाव देतो. खरं म्हणजे ईश्वराच्या जगामध्ये समस्या नावाची कुठलीही गोष्ट अस्तित्वातच नाही किंवा समस्या असण हे  सत्य नाही. 
               सातवं रहस्य  तर खूपच  रहस्यमय वाटले ते म्हणजे इतरांना दोष देणं कधीच योग्य नसत. खरंतर समोरचा कुठलाही माणूस तुमच्या मनाप्रमाणेच वागेल असं नाही. म्हणून समोरच्याने तुमच्या मनासारखं वागलं पाहिजे ही अपेक्षा करणं बंद करा. जेव्हा तुम्ही घृणेने  उत्तर देता तेव्हा समस्येचा भाग बनता, उत्तराचा नाही. प्रेमामध्ये इतरांविषयी चीड नसते तर, उलट क्षमाशीलतेचे भाव असतात. प्रेम आणि क्षमाशीलता हे तुम्हाला तुमच्या उद्देशाच्या बाजूने काम करायला प्रेरित करतील, विरोधात नाही. 
                                    आठवे रहस्य जसं बनायचंय  तसे  आहातच असे समजून वागा. या रह्स्यात  आवडलेलं वाक्य - मनुष्याच्या आनंदासाठी त्याचं स्वतःशी प्रामाणिक असणं आवश्यक आहे. अगदी पुस्तक वाचल्यानंतर मनाला कुठेतरी आत्म शांती आणि समाधान मिळत आहे असं मला जाणवत होतं. तुम्हाला जे बनायचं आहे ते तुम्ही बनलेले  आहात, असं आतमध्ये घोषित करण्याचे धाडस जेव्हा  तुम्ही करता तेव्हा तुम्ही स्वतःला एका  नवीन उत्साही. अशा जगात घेऊन जातात. तुम्ही हेच तत्व तुमच्या प्रत्येक क्षेत्रात वापरू शकता. सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी इतराकडे आहेत पण तुमच्याकडे जर नसतील तर हीच ती वेळ आहे की, तुम्ही तुमचे विचार बदला आणि असं वागा जणू त्या सर्व गोष्टी तुम्हाला  मिळालेल्या आहेत आणि मी त्याचा आनंद घेतो.
 नवव्या  रहास्याच्या  बाबतीत जर विचार केला तर तुमचे दिव्यत्व जतन करा. तुम्ही ईश्वराचा अंश आहात, त्याची दैवी निर्मिती आहात. म्हणूनच तुम्ही जेव्हा असायला पाहिजे त्याच वेळेस येते पृथ्वीवर आहात.तुमचं शरीर अगदी योग्य क्षणी या जगाचा निरोप घेईल. पण तुम्ही ज्या शरीरात  राहता ते शरीर म्हणजे तुम्ही नाही आणि तुमचं व्यक्तिमत्त्वसुद्धा तुम्ही नाही किंवा तुमची कुठलीही संपत्ती किंवा तुम्ही प्राप्त केलेलं वैभव म्हणजे तुम्ही नाही. तुम्ही त्या ईश्वरच  प्रेम आहात. एक आश्चर्य आहात. तुम्ही ईश्वराच्या परिपूर्णतेचा एक भाग आहात. तुम्ही त्या ईश्वरी शक्तीचा भाग आहात.जी  दैवी शक्ती या विश्वातील प्रत्येक गोष्ट चालवते. या जगामध्ये  हीच दैवी शक्ती प्रत्येक गोष्टीची अतिशय हुशारीने निर्मिती करत असते.जेव्हा जेव्हा तुम्ही या  दैवतवाला नाकारत असता. आणि मग तुमचा अहंकार तुमच्या मनाचा ताबा घेतो आणि तुम्ही ईश्वरापासून वेगळे आहात असं पटवून देतो. तुमचा अहंकार तुम्हाला सातत्याने भीती, चिंता अस्वस्थता आणि त्या तनावाला  खाली ठेवतो. सातत्याने तुम्हाला सांगत असतो की, तुमच्या आजूबाजूच्या लोकांपेक्षा तुम्ही सरसच असले पाहिजे. म्हणूनच तो सातत्याने तुम्हाला विनवणी करत असतो की, तुम्ही काहीही करून ईश्वराला स्वतःच्या बाजूने करून घ्या. थोडक्यात सांगायचं झालं तर, अहंकार  हा तुम्हाला ईश्वरापासून वेगळं करत असतो .
                                दहावे  रहस्य म्हणजे दुबळ बनवणारे विचार टाळण्यातच खरी हुशारी आहे. कोणताही विचार तुम्हाला एकतर ताकद देतो किंवा दुबळ बनवतो म्हणून आपल्या मनात निर्माण होणाऱ्या विचारावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे. तुम्हाला सर्वात दुबळा बनवणारा विचार कोणता असेल तर तो आहे अपराधीपणाच्या विचार, स्वतःची लाज वाटण्याचा विचार किंवा मानहानीचा विचार म्हणूनच स्वतःला माफ करणं अतिशय महत्त्वाचा आहे. जर तुम्ही स्वतः विषयी लाजिरवाणा विचार घेऊन फिरत असेल तुमच्या भूतकाळात तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील आणि त्याचा अपराधबोध घेऊन तुम्ही करत असाल तर तुम्ही स्वतःला शारीरिक मानसिक स्तरावर दुबळे बनवत आहात. त्याचप्रमाणे समोरच्या माणसाचा जर तुम्ही अपमान केलात किंवा त्याला वाईट वाटेल असं बोललात तर, त्याला दुबळे बनवता आणि त्या माणसाची ऊर्जा तुम्ही काढून घेता.
                                          अशाप्रकारे प्रत्येकाला उपयोगी पडेल अशी दहा रहस्ये लेखकाने या ठिकाणी मांडलेले आहेत. अगदी मनापासून हे  पुस्तक मला आवडले . जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर उपयोगी पडणार हे पुस्तक आहे.आपणही हे पुस्तक वाचावे.  वाचनासाठी आपणास सर्वांना शुभेच्छा !

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know