हजारो वर्षे निर्वासितांचे जीवन जगले.जगभर वणवण भटकत राहिले. करोडो बांधवांचा नरसंहार पाहण्याचे दुर्भाग्य त्यांना लाभले... तरीही ते भक्कमपणे उभे राहिले. लढले, जिंकले. जगातील श्रीमंत आणि बुद्धिमान लोक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली, ते लोक म्हणजे "ज्यू"! त्यांच्या यशाचे मर्म त्यांच्या शिक्षणात आहे! त्यांच्या संस्कारात आहे! त्यांच्या इतिहासात आहे!
"मनुष्य केवळ आळसाने मरतो. मरण टाळायचे असेल, सुखाने जगायचे असेल तर त्याने सतत काम केले पाहिजे. पण जो कामच करत नाही त्याला जेवायचा अधिकार नाही. जेंव्हा तू स्वतःच्या श्रमाच्या भरवशावर जेवतोस तेंव्हाच तू सुखी होतोस नि त्यातच तुझे पुढे हित आहे....
.....'इस्राएल: छळाकडून बळाकडे' या पुस्तकातून!
पुस्तक: इस्राएल : छळाकडून बळाकडे
लेखक: ना. ह. पालकर
प्रकाशन: अपर्णा प्रकाशन
पृष्ठ: ३०४ मूल्य:३००₹
पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी व्हॉटसअप करून संपर्क साधावा. पुस्तक देशभरात कोठेही घरपोच मिळेल
ज्ञानसाधना पुस्तकालय मो:9421605019
दोन देशांना जोडणारे रस्ते, लोहमार्ग यांच्याविषयी तर आपण ऐकले, पाहिले असेल. पण दोन देशांना जोडणाऱ्या पुस्तकाची माहिती आहे का? ते हेच पुस्तक ज्या पुस्तकामुळे इस्रायली लोकांमध्ये या लेखकाविषयी अपार श्रद्धा निर्माण झाली. त्यांनी त्यांच्या देशात या लेखकाच्या नावाने एक चौक आणि एक रस्ता सुशोभित केला. त्या लेखकाचा नागरी सत्कार योजिला.अर्थात लेखक तो सत्कार स्वीकारण्यास इहलोकात नव्हते, ही गोष्ट वेगळी. असे हे पुस्तक जे वाचून लाखो भारतीयांना इस्रायली लोकांच्या संघर्षमय इतिहासाला समजून घेता आले.
पुस्तकाची सुरुवात होते ती ज्यू अर्थात यहुदी लोकांचा आद्य (इ. स.पूर्व १७५०) पुरुष "अब्राहम" या पासून! आणि शेवट होतो तो अलीकडील अरब इस्राएल(१९५६) संघर्ष विरामाने! तब्बल चार हजार वर्षांचा हा रक्तरंजित इतिहास लेखकाने अतिशय ओघवत्या शैलीत रेखाटला आहे. यात लेखकाने यहुदी लोकांचे श्रद्धास्थाने, त्यांचे धर्मग्रंथ, धार्मिक विधी , धार्मिक शिक्षण संस्कार या सोबतच त्यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा! त्यांच्या मेहनत आणि प्रयोगशीलता यांचे गुणवर्णन केले आहे. त्यांच्या मेहनतीचे, त्यांच्या जिद्दीचे वर्णन वाचून कोणताही संवेदनशील माणूस अधिक कष्टाळू होईल. वाळवंटात फुलवलेला नंदनवन आज जगाला दिसतो पण त्या साठी जे रक्त आणि घामाचे सिंचन केले, ते या पुस्तकात वाचायला मिळते.
दैवी पुरुष अब्राहम ( यहुदी लोकांचा मूळ पुरुष) यास उर प्रदेश सोडून पॅलेस्टाईनमध्ये वस्ती करण्याचा संदेश दिला. तेथेच उन्नत आणि सुजलाम राष्ट्र विकसित करेन असा आशीर्वाद दिला. हा भाग सुरुवातीला समृद्ध होता.येथे निसर्गाची कृपा होती. त्या भागाचे नाव "कनान". या भूमीवर आस्था निर्माण झाली. समृद्धीमुळे या भागास दुधा मधाचा देश म्हटले जात असे. पुढे कालांतराने जीवघेण्या दुष्काळामुळे अब्राहमचा नातू जॅकोब, त्याची १२ मुलं आणि ७० नातू घेऊन तो इजिप्तमध्ये विस्थापित झाला. येथे जॅकोबला इस्राएल असे संबोधले जाऊ लागले. त्याची मुलं म्हणजे इस्राएल किंवा इस्रलाईट म्हटले जाऊ लागले. सुमारे १५० वर्षानंतर इजिप्तमध्ये सत्तांतर झाले. राजा फरोहने संपूर्ण ज्यू लोकांना गुलाम बनवले. त्यांच्या जीवनावर अनेक निर्बंध लादले. ज्यू लोकांनी संघटित होऊन उठाव करू नये, त्यांची लोकसंख्या वाढू नये म्हणून प्रत्येक ज्यू दाम्पत्याचा पहिला मुलगा बळी देण्याचा प्रकार सुरू केला. या गुलामगिरीतून मोजेस याने यांना मार्गदर्शन करून मुक्त केले.(ज्यू लोकांचा प्रेषित...ज्याला येहावा या परमेश्वराचा आशीर्वाद मिळालेला) लोकांना इ.स.पूर्व १२६६ इजिप्त मधून बाहेर काढले. ४० वर्ष हे लोक सिनाई या वाळवंटी पर्वतावर राहिले. मोझेसने Ten Commandments सांगितल्या. त्याच्याच वंशातील डेव्हिड नावाच्या पुजाऱ्याने ज्यूंची राजसत्ता निर्माण केली. भव्य मंदिर उभे केले. जेरूसलेम शहर जिंकून घेऊन राजधानी बनवली. जेरुसलेम शहराला भव्य तटबंदी बांधली. संपूर्ण कनान प्रदेश जिंकून घेतला. एका अर्थाने ज्यू लोकांमध्ये राष्ट्रीयता निर्माण केली. येहोवा या देवाचे मंदिर (आर्क प्रतीक) ज्यू लोकांसाठी अतिशय प्रिय आणि श्रद्धेचे विषय होत गेले. त्यासाठी ज्यू मारण्यास आणि मारण्यास कधीही तयार असू लागले.
पुढे काळाच्या ओघात अनेकवेळा सत्तांतर झाले. भिन्न वंशीय लोकांनी ज्यू लोकांना पुन्हापुन्हा गुलाम बनवले गेले. यात बॅबिलोन, रोमन ,ग्रीक, अरब , ख्रिश्चन या सर्वांसोबत ज्यू लोकांना संघर्ष करावा लागला. या सर्वांनी त्यांना प्रिय असलेले मंदिर पाडले. जे ज्यू लोकांनी पुन्हा पुन्हा बांधले. मातृभूमी मिळवण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केला. हजारो वर्षांचा हा काळ लेखकाने अतिशय गतिमान पद्धतीने लिहिला आहे. चार हजार वर्षे चार दिवसात समजून जातात.
बॅबिलोन राजाने इस्राएलचा राजा जेहोआकिनचा पूर्ण पराभव करून मंदिर आणि राजधानी भुईसपाट केली. या लोकांना गुलाम केले. हजारोंना बॅबिलोनमध्ये गुलाम म्हणून कामाला लावले. पुढे ४० वर्षांनी हा अनन्वित अत्याचार संपला. सायरस राजाने बॅबिलोन सम्राटाचा पराभव करून इस्रायली लोकांना मुक्त केले. मंदिर पुन्हा बांधले. या काळात या लोकांना ज्युडिआची जनता म्हणजे ज्यू म्हणून संबोधले जाऊ लागले.या काळात ज्यू लोकांचे राज्य नव्हते.
रोमन लोकांच्या आक्रमणात ज्यू पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. मातीतून उठून बाहेर फेकली गेलेली झाडं जणू! त्या झाडासारखी त्या समाजाची अवस्था झाली. रोमन सेनापती टायटसने मंदिर पाडले. स्वतःच्या विजयाची कमान उभी करून मंदिरातून आणलेल्या सात मेणबत्या लावण्याचा दीप तेथे स्थापित केला...+जो पुढे चालून इस्रायली लोकांचे राष्ट्रीय प्रतीक ठरला.) या पूर्वीच रोमन सुभेदाराने ज्यू लोकांच्या आग्रहावरून येशुला सुळावर चढवले.Ten Commandments त्याने मानल्या नाही. मंदिर पाडून बांधू शकतो असे म्हणाला, असे आरोप होते. रोमन लोकांच्या जाचातून वाचण्यासाठी ज्यू लोकांनी आपली प्रिय मातृभूमी जड मनाने सोडली.
पुढे जगभर ज्यू नागरिकांवर प्रचंड अत्याचार झाले. १६ व्या शतकानंतर ज्यू होऊन जगणे जणू शापच ठरला. त्यांच्यावर संघटित हल्ले होऊ लागले. त्यांच्या विरुद्ध समाजात धार्मिक द्वेष निर्माण केला जाऊ लागला. हा हिंसाचार राजाच्या आशीर्वादाने होऊ लागला. ज्यू लोकांना घोड्यावर बसण्यासाठी बंदी झाली. ख्रिश्चन नोकर ठेवायला बंदी झाली. त्यांच्या मुलींना पळवून लग्न लावून ख्रिश्चन केले जाऊ लागले. मृत ज्यूला ख्रिश्चन पद्धतीने दफन करून त्याला ख्रिस्त म्हटले जाऊ लागले. त्यांच्या पवित्र ग्रंथाच्या (पोथी) ठिकठिकाणी होळ्या केल्या जाऊ लागल्या. त्यांना मुक्त संचार नाकारला. गावाबाहेर, दूर , गोल तटबंदीत अतिशय घाणेरड्या आणि दाटीवाटीत वस्त्या सुरू केल्या. त्यात बाहेर किंवा आत येण्याचे नियम ठरवले गेले. चर्चमध्ये उपस्थिती अनिवार्य ठरवली गेली. जगभर ज्यू भरडून जावू लागला. येशू ख्रिस्ताचे मारेकरी म्हणून अनन्वित छळ होऊ लागला. फ्रान्स, इंग्लंड व अमेरिका वगळता जगात ज्यू म्हणजे मारण्याची वस्तू ठरला. लाखो ज्यू दरवर्षी या देशातून त्या देशात जीव मुठीत घेऊन पळू लागला. जेथे जाऊन स्थिर होई तेथे त्याला त्रास सुरू होत असे. कमवलेले सोडून पळावे लागे. असे एक नाही दोन वर्षे नाही, शतके नाही तर तब्बल १८०० वर्षे ज्यू जगात न्याय मागत भटकत राहिला.
तरीही या ज्यू लोकांनी जेथे गेले तेथे व्यापार केला. मेहनत केली. शेती केली. प्रंचंड मेहनत आणि प्रयोगशीलता यामुळे ते यशस्वी होत गेले. नव्या वस्तूंचा व्यापार, व्यवसायासाठी बंदी असल्याने जुने कपडे विकले. ज्या हाताने शेती फुलवली होती ते हात आता तराजू तोलू लगाले. नफा कमावू लागले. श्रीमंती दिसू लागली...ही श्रीमंती देखील त्यांच्या नशिबावर उठली.अनेक कर त्यांच्यावर लादले गेली...
Getto अर्थात बंदिस्त ज्यू वस्ती , या मुळे सगळे ज्यू गावोगावी एकत्र राहू लागले. त्याचा त्यांना फायदा झाला. हिब्रू भाषा टिकली.धर्म टिकला.संस्कार टिकले. सर्वात महत्वाचे म्हणजे मातृभूमीची ओढ शिल्लक राहिली. ज्या ज्यू लोकांनी आपली ओळख ख्रिश्चन अशी धारण केली त्यांनाही भविष्यात प्रचंड छळ झाला. त्या सर्वांनी पुन्हा ज्यू नावे धारण केली.
पुस्तकात लेखकाने रशिया, जर्मनी, पोलंड या प्रदेशात ज्यू लोकांवर केलेल्या अत्याचाराचे धावते वर्णन केले आहे. त्यानंतर हिटलर प्रणित अत्याचाराचेही वर्णन केले आहे. या पेक्षा जास्त वाचकाला राग आणणारी गोष्ट म्हणजे इंग्रजांचे राजकारण लेखकाने अतिशय योग्य पद्धतीने रेखाटले आहे. जगात ज्यू कोठेच सुखी आणि स्थिर होऊ शकत नव्हता. यातून ज्यू लोकांनी स्वतःची भूमी परत मिळवण्यासाठी एक दीर्घ काळाची मोहीम उभी केली. त्या मोहिमेची पार्श्वभूमी, त्यांच्या सभा, बैठका यांचा लेखकाने ठळक आढावा घेतला आहे.सर्व प्रमुख घटना ३०४ पृष्ठांमध्ये मांडण्याचा एक यशस्वी प्रयत्न लेखकाने केला आहे.
जगातील वेगवेगळ्या देशांमधून पीडित ज्यू वाचवून त्यांना ज्या पद्धतीने इस्राएलमध्ये आणले जाते त्याचे वर्णन तर भारावून टाकते. इस्राएलची भूमी मिळवण्यासाठी ती विकत घ्यावी लागली हे वाचून आश्चर्य वाटते. जू लोकांनी अरबांकडून इस्राईलची इंच-इंच जमीन विकत किंवा लढून मिळवलेली आहे. हे या पुस्तकातून कळते. जागतिक राजकारण कळते. इस्राएल म्हटले की आपल्याला अरब आणि ज्यू लोकांचा संघर्ष आठवतो. ती गोष्ट योग्यही आहे. पण त्या पेक्षा जास्त महत्वाचे अनेक पैलू या पुस्तकातून वाचकाला वाचायला मिळतात.
इस्राएल निर्मितीसाठी जसे त्यांच्या महान नेत्यांचे आणि क्रांतिकारकांचे योगदान आहे तसेच त्या समाजातील सामान्य माणसाचे योगदान आहे. तो शेती करत करत स्वतःला संरक्षण सिद्ध करतो. शेतीची नांगरट करतो पण बंदूक खांद्याला लटकवून! तेथील मुली, स्त्रियादेखील आपल्या वस्तीचे, शेतीचे बंदूक घेऊन संरक्षण करताना वाचायला मिळते. त्यातून देशाचे सैन्य दल उभे राहते. दुसऱ्या महायुद्धात लोकांना संधी मिळावी म्हणून अनेक नेते सैन्यभरतीचे आव्हान करतात. हेच ज्यू पुढे अरब-इस्राएल संघर्षात मोलाची भूमिका घेतात.
चहू बाजूंनी अरब लोकांनी वेढलेल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले की लगेच युद्धाला सामोरे जावे लागते. एका देशाला जन्मतःच युद्धाला सामोरे जावे लागते.शेकडो पटीने अधिक सैन्यापुढे आणि शक्तिसमोर माणूस गर्भगळीत होऊन जाईल.पण या युद्धाचा जेंव्हा शेवट होतो तेंव्हा 30% अधिक भूभाग इस्राएलने कायम जिंकलेला असतो.
या पुस्तकाचे गोडवे गाऊ तितके कमीच! असे पुस्तक वाचून माणूस अनेक अडचणीत कसा उभा राहू शकतो, एखादे राष्ट्र भूमी नसतानाही केवळ लोकांच्या राष्ट्रभक्ती व इच्छाशक्तीवर कसे जिवंत राहू शकते याचा प्रत्यय येतो.
रावजी लुटे
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know