Thursday, November 18, 2021

पुस्तकाचे नाव : टीचर (तिच्या वेगळ्या प्रयोगाची रोचक कहाणी).

*वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य*

*पुस्तक क्रमांक :50.

*पुस्तकाचे नाव : टीचर (तिच्या वेगळ्या प्रयोगाची रोचक कहाणी).

*लेखिका : सिल्व्हिया ऍष्टन-वॉर्नर.

*अनुवादक : अरुण ठाकूर.

*प्रकाशन :मनोविकास प्रकाशन.

*पृष्ठसंख्या : 179.

*स्वागतमूल्य : 150 रुपये.

*आवृत्ती : पाचवी आवृत्ती (2008).

*पुस्तक परिचयकर्ता : श्री. मनोज अग्रवाल.

##############################

   महाराष्ट्र शासनाच्या लोकचेतना अभियान या अभियानादरम्यान कार्य करत असताना 2011 साली हे पुस्तक भेट स्वरूपात मला प्राप्त झालं . हे पुस्तक मी अनेकदा वाचल आहे आणि या पुस्तकांतील आशय नीट समजून घेऊन पुस्तकात केलेल्या प्रयोगाचा मी अध्यापन पद्धतीत प्रयोग करण्याचा  प्रयत्न केलेला आहे . 

     शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करणारे अनेक जण चाकोरीच्या बाहेर जाऊन शिकवतात, विद्यार्थ्यांना घडवतात ,त्यांचं भविष्य उज्ज्वल बनवतात विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी शिक्षकांसाठी शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी हे पुस्तक म्हणजे एक दीपस्तंभ आहे असं मी समजतो . 
      मानवजात प्रगत व्हावी यासाठी समाजातील काही जण प्रयत्न करतात ,धडपडतात ,कष्ट करत असतात . नंतर हीच माणसे जगामध्ये बहुसंख्य लोकांसाठी प्रेरक ठरतात, आदर्श ठरतात . अशाच एका मागासलेल्या देशातील मागास समाजामध्ये शिक्षणाचे आदर्श नवीन प्रयोग करणार्या एका शिक्षिकेची  ही कथा आहे.  
     पु.ग. वैद्य यांनी या पुस्तकाला प्रदीर्घ अशी प्रस्तावना अतिशय आशयघन पध्दतीने छान शब्द  शब्द गुंफण करून लिहिलेली आहे.  शब्दांमध्ये ज्याप्रमाणे माणसांना घायाळ करण्याची ताकद असते त्याप्रमाणे त्यांना उभारी प्रोत्साहन देण्याची शक्ती देखील असते .म्हणून सिल्व्हिया या शिक्षिकेचा भर अधिकाधिक संवाद करण्यावर असायचा  असा महत्त्वपूर्ण उल्लेख प्रस्तावनेमध्ये वैद्य सरांनी केलेला आहे . इतरांच्या गुणांना ग्रहण करणे हा एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व पैलू असतो. गुणग्राहकता व्यक्तिमत्त्वाचा एक आवश्यक पैलू आहे आणि हा पैलू असणारी माणसं जीवनामध्ये निश्चितपणे यशस्वी  ठरतात.

    सात वर्षांनी या शीर्षकाअंतर्गत सिल्विया अॅष्टन वॉर्नर यांनी मनोगत व्यक्त केलेले आहे.  या मनोगतामध्ये ते म्हणतात की मी चाकोरीबाह्य अशा विविध  प्रयोग  माझ्या शाळेमध्ये केले.   उदाहरणार्थ मुलांचं लक्ष वेधून घ्यायचं असेल तर काही शिक्षा टाळ्या वाजवतात .काही शिक्षक त्यांना प्रश्न विचारतात. मात्र या शिक्षिकेने  स्वरलहरींचे सुरावट विद्यार्थ्यांना ऐकवली आणि विद्यार्थ्यांचं लक्ष  शिक्षिकेकडे वेधलं गेलं आणि त्यांनी सांगितले की जेव्हा मी हे सुरावट तुम्हाला ऐकवेल तेव्हा तुम्ही जे काही करत असाल  ते सर्व सोडून माझ्याकडे लक्ष द्यायचं .
    विद्यार्थ्यांचा विकास नेमका कसा होतो हे सर्वंकष रीतीने एका छोट्याशा कवितेच्या माध्यमातून सिल्विया अॅष्टन वॉर्नर रचतात . 
    लिहिणारी बोटे पुढे सरकतात, लिहीत लिहीत पुढे जातात ,तुमचे सहानुभूती व चातुर्य त्यांना अर्ध्या ओळीवर थांबवू शकत नाही. तुमचे सगळे असून त्याचा एक शब्दही बोलू शकत नाहीत . 
    एवढ्या प्रगल्भतेने या महान शिक्षिकेने त्यांचे विचार व्यक्त केलेले आहेत.  
     एकूण 21 प्रकरणांमध्ये हे पुस्तक विभागण्यात आला आहे  

१.सेतू बांधा रे सागरी  

   या प्रकरणामध्ये 'सहज वाचन' पद्धती ही किती उपयुक्त आणि विद्यार्थ्यांच्या वाचन विकासामध्ये महत्त्वपूर्ण ठरते याचा उहापोह लेखिकेने विस्तृतपणे केलेला आहे. त्यांनी   सहज वाचन पद्धती चा उपयोग करताना केलेल्या विविध प्रकारचे प्रयोग या पाठांमध्ये नमूद केलेले आहेत . विविध संस्कृतीमधील विद्यार्थ्यांसाठी सहज वाचन पद्धती म्हणजे एक अमृतस्तंभ आहे असा विचार लेखिका मांडतात.  

२.पायाभूत शब्दसंग्रह  

  मावरी समाजातील मुले शिकताना त्यांना अनेक प्रकारच्या अडचणी येत आणि अधिक वर्षे ते बालवाडी मध्येच असायची.  मग त्यांच्या मातीतलीच शब्द लेखिकेने त्यांना दिले .पायाभूत शब्द त्यांना शिकवले. ते शब्द संवादामध्ये वापरण्यात येतात अशा शब्दांचा शब्दांचा परिचय लेखिकेने करुन दिला. लेखिका पुढे म्हणतात की जर  मुलांना पायाभूत शब्द म्हणजेच त्यांच्याच भाषेतील शब्द संवादात वापरण्यात येणारे शब्द आधी लिहून दाखवण्यात आले, सांगण्यात आले तर ते विद्यार्थी अधिक गती गतीने शिकतात.  पायाभूत शब्दांचा उपयोग कौशल्याने, कशारीतीने करावा हा विचार या प्रकरणात लेखिकेने मांडलेला आहे .

३. मावरीच्या बालवाडीत वाचनाच्या तयारीची मार्गदर्शक तत्त्वे  

      या प्रकरणात काही मार्गदर्शक तत्त्वे मावरीच्या बालवाडीतील वाचनाच्या तयारीसंदर्भात दिलेली आहे .मूळ शब्दावली ही भीती आणि लैंगिकता या दोन मूळ उपजत जैविक प्रेरणांशी संबंधित असते.  विद्यार्थ्यांना शब्द मनावर बिंबवता ना अधिकाधिक चित्रे दाखवण्याचा मोह टाळला पाहिजे.  

४.व्यक्तिगत आधारभूत शब्दावली  

   मुले हे स्वत: च्या अंतदृष्टीतून विविध शब्द जमवतात हे लेखिकेने या पाठात लिहिलेले आहे  आणि व्यक्तिगतरीत्या जमवलेले हेच शब्द पुढे भाषा शिकण्यास विद्यार्थ्यांना उपयोगी पडतात . मावरी समाजाच्या विविध विद्यार्थ्यांच्या नावाचा येथे उल्लेख आहे . गिलबर्ट ,मोरिन, पेनी, रोबो, फिलिप  या मुलांनी विविध शब्द जमवले आणि ते लेखिकेने येथे लिहिलेले आहेत.  

५.मूलभूत शब्दावली शिकवण्याचे तंत्र मंत्र  

    माझ्या जीवनामध्ये सर्जनशीलतेला अतिशय महत्त्वपूर्ण स्थान आहे, हा विचार लेखिका या पाठामध्ये मांडते. आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्यांकडून  सर्जनशीलतेची  अपेक्षा करते . विद्यार्थ्यांना सकाळी सकाळी  आल्याबरोबर नवीन नवीन शब्द विद्यार्थ्यांना सुचतात का याचा  प्रश्न विचारून आढावा घेत असते.  एखाद्या मुलीला विचारते की तुला काय हवं आहे? मग ती मुलगी म्हणते टोस्ट.ती मुलगी इकडे तिकडे बघते. मग तिला खिडक्या दिसतात ते माध्यमाला खिडक्या दिसत आहेत अशा रीतीने नवीन नवीन शब्द किंवा सर्जनशीलतेला वाव देण्याचा प्रयत्न केला.

६.मी कधीच काही शिकवीत नाही  

   या पाठांमध्ये स्वयंअध्ययन हे अतिशय महत्त्वपूर्ण असते असे लेखिका म्हणते. ती फळ्यावर काही लिहीत नाही विद्यार्थ्यांसह जाऊन बसते आणि विद्यार्थी स्वतः कसे शिकतात.   मधली सुट्टी झाल्यानंतर शब्द साधनेचा तास लेखिका घेते आणि शब्दसंग्रह विद्यार्थ्यांचा कसा वाढेल हे ती प्रयत्न करते  .

७.सहज लेखन  

   विद्यार्थ्यांना सबंध जीवनाबद्दलची माहिती सांगणे यापेक्षा जीवनाचे छोटे छोटे भाग सांगणे हे उपयुक्त ठरेल मात्र असे छोटे सुटे भाग आपण सांगत गेलो तर जीवनच नष्ट होईल हा विचार या पाठांमध्ये मांडलेला आहे . 
   विद्यार्थ्यांनी पायाभूत शब्दावलीचाच संग्रह आत्मसात केल्यानंतर त्या शब्दांचा उपयोग करून त्यांनी सहज लेखन कसा करावे यासंदर्भात या पाठात मार्गदर्शन केलेले आहे.  
     लेखनक्षमता विकसित करण्यासाठी हा पाठ अतिशय महत्त्वपूर्ण आहे . 

८.जीवननिष्ठा सहज लेखनाचे तंत्र व मंत्र

    लहान मुले लेखिकेला एक शब्द मागतात लेखिका तो शब्द वहीच्या पाठीमागे लिहून देते. मग नंतर विद्यार्थी लेखन करतात  विद्यार्थी लिहित असतानाच त्यांच्या लेखनातील दोष लक्षात घेऊन ते दोष दूर केले पाहिजेत हा विचार येथे लेखिकेने दिलेला आहे  .आधी लेखिकेला वाटायचे की मुलांनी आपले जे लेखन आहे ती एकाच बैठकीमध्ये पूर्ण केले पाहिजे मात्र माझा तो विचार चुकीचा होता मग विद्यार्थ्यांना जेवढ जमेल त्यांनी लिहावे. दुसर्या दिवशी तोच धागा पकडून ते लेखन पूर्ण करावे  अशा अनुभवातून नंतर विचार लेखिकेच्या मनामध्ये आला . मुलांच्या मनामध्ये जे काही आहे ते त्यांनी देण्याचा प्रयत्न करावा असा एक उपक्रम देखील लेखिकेने यामध्ये घेतलेला आहे . 

९.सहज वाचन  

 सहज वाचन यासाठी लेखिकेने स्वतंत्र प्रकरण लिहिलेले आहे  मूल प्रगती करतेय ते त्याच्या स्वतःच्या विकासाच्या नियमांना अनुसरून हे सुंदर वाक्य डॉक्टर बरो यांचं आहे.  या पाठांमध्ये लेखिका विद्यार्थ्यांना जो शब्द देते ते शब्द ते लिहितात. पुढे हळूहळू शब्दसंग्रह वाढत जाऊन विद्यार्थी गोष्टी लिहितात. एकमेकांच्या गोष्टी वाचायला लागतात. अनौपचारिक शिक्षण  शिक्षणाकडून औपचारिक शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचे वाटचाल होते याबद्दल कवितेने लेखिकेने या पाठात म्हटले आहे.  सुरुवातीला शब्द हे छोट्या बालकांसाठी मृतप्राय असतात नंतर हळूहळू त्यांच्या मूर्तपणाच्या जाणिवा जाग्या होतात . 

१०.सहज शब्द लेखनाचे तंत्र व मंत्र  

   खेळाच्या तासानंतर आता मुले वह्या घेऊन शब्द फळ्यावर लिहितात.त्यांना पहिल्या तासाला दिलेला शब्द विद्यार्थी फळ्यावर लिहितात आणि शिक्षिका त्या बसून बघतात मुलांनी ते शब्द बरोबर आहे  लिहिलेले
आहेत की नाही अशा सहज लेखनाचे तंत्र मंत्र या पाठवून दिलेले आहेत.

११.सहज वाचन शिकवण्याचे तंत्र  

    पंधरा मिनिटे विद्यार्थ्यांना वाचनासाठी दिले जातात. यामध्ये वयामधील शब्द विद्यार्थी वाचतात एकमेकांच्या वह्याचे आदानप्रदान करतात आणि वाचन करण्याचा प्रयत्न करतात .यावरून सहज वाचनाची त्यांची सवय ही प्रगल्भ होत जाते . 

१२. मावरींची संक्रमण वाचनमाला  

   मावरी मुलांची अशाप्रकारे हळूहळू वाचन प्रगती होते आणि या संक्रमणातून त्यांची संक्रमण वाचनमाला तयार होते हे लेखिकेने या पाठांमध्ये स्पष्टपणे नमूद केले .मावरी खेड्याचे स्वाभाविक  स्फूर्ती ,त्यामधील नाट्य समूहातील परस्परांविषयीची आपुलकी परस्परातील आकस हे सर्वकाही या पुस्तकात  येणे आवश्यक होते मात्र ते मला योग्य वाटले नाही. असे मत लेखिका मांडतात.  लेखिका त्या मावरी मुलांच्या वह्या सांभाळून ठेवते आणि त्यांच्यातील विकसनाचा संक्रमण कशा रीतीने झालेला आहे याचं वर्णन या पाठात करते.  

१३.निसर्ग आमचा सोनेरी टापू  

   अनेक शतकांपूर्वी प्लेटो आणि पायथागोरस या महान शास्त्रज्ञांना अंकामध्ये विश्व दडले आहे विश्वाचे स्वरूप लपले आहे सौंदर्याचे रहस्य आहे हे उघड आहे  हे उमगले होते . लेखिका म्हणते की छोट्या मुलांना वनस्पतिशास्त्र शिकवणे हे यथार्थ नाही मात्र निसर्गातील नेचे सारख्या वनस्पतींच्या माध्यमातून त्यांना अंकगणित शिकवणे हे सोपे आणि सुलभ  आहे. हा प्रयोग लेखिकेने केलेला आहे  लेखिका जेव्हा मुलांना सहलीसाठी घेऊन जाते तेव्हा त्यांना फर्नच्या फांद्या मोजायला लावते आणि त्यातूनच विकास होतो अंकगणिताचा  म्हणजेच निसर्गाच्या सान्निध्यात राहून विविध विषय शिकता येतात, हा विचार लेखिकेने या पाठात मांडलेला आहे .

१४.जीवन जे फुललेच नाही  

    लेखिका या पाठात म्हणते की जेव्हा सर्जनशीलता संपते तेव्हा विध्वंस सुरु होत असतो.  जेथे सर्जन भाव मनातून दूर होतो तेथे विध्वंस भाव मनामध्ये जागा होतो.  अनेक मावरी मुले हे लढा, मारा ,कापा या प्रकारची भाषा वापरत आणि मग अशा विद्यार्थ्यांमध्ये सर्जन व रुजवणे हे आव्हानात्मक होते . लेखिकेला वाटतं की जगात शांतता नांदावी, अहिंसा असावी ,कोणत्याही प्रकारचे भांडण होऊ नये  मात्र अनेक प्रयत्न करूनसुद्धा समाजामध्ये काहीअंशी का असेना विध्वंस असतो, हा विचार या पाठांमध्ये  मांडलेला आहे. 

१५.मावरी शाळेतील जीवन (एका रोजनिशी च्या आधारे)

   या पाठांमध्ये लेखिकेने जी रोजनिशी लिहिली होती त्या रोजनेशितील तिला जीवनात आलेले अनुभव, शाळेत आलेले अनुभव लेखिकेने विस्तृतपणे या रोजनिशी मध्ये मांडले आहेत. आणि रोजनिशी  या पाठांमध्ये रोजनिशीतील आशय उलगडलेलं आहे .

१६.सुट्टीनंतर एक टिप्पणी  

  शाळेला लोक माणसामध्ये उच्च दर्जाचं स्थान मिळावं म्हणून लेखिकेने केलेले महत्त्वपूर्ण प्रयत्न या पाठांमध्ये नमूद करण्यात आलेले आहेत . जेव्हा शाळेमध्ये पोलीस येतात आणि काही मुलांची विचारणा करतात तेव्हा लेखिकेला शाळेला जनमानसात आणण्याची इच्छा होते त्यासाठी प्रयत्नबद्ध असते.  

१७.ट्रेमेनना पाठविलेली टिप्पणी  

   आपण पूर्ण वाक्यांचा वापर करून विचार करतो हे मत जे आहे या मताशी लेखिका पूर्णतः सहमत असते मात्र मावरी भाषेतील मुले ही एक शब्दांचे वाक्य वापरतात.  ही एक शब्दांची असलेले वाक्य हे अर्थपूर्ण असतात. हे या टिप्पणीमध्ये लेखिकेला म्हणायचे आहे  मावरी भाषा अलंकारिक मानण्यात येते पण अशा अलंकारिक प्रमाण भाषेचा उपयोग मोठमोठ्या समारंभातच होतो आणि तो व्यवहार्य असतो असाही विचार या टिप्पणीत लेखिका मांडते.  

१८.ट्रेमेनच्या भेटीनंतरच चिंतन  

    या पाठांमध्ये टाइपरायटर  ट्रेमेन यांचा आणि लेखिकेचा संवाद नमूद केलेला आहे.   या पाठांमध्ये लेखिका ब्रेनन यांना लेखी स्वरुपात काही मजकूर पाठवायच्या आणि ते मोठय़ा स्वरूपामध्ये मोठ्या टाइपमध्ये लेखन करून टाइप करून ट्रेमेन लेखिकेला पाठवायचे . त्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या वाचनासाठी लेखनासाठी सहजरीत्या व्हायचा  मावरी मुलांनी लिहिलेले शब्द, मावरी मुलांनी लिहिलेल्या छान छान सुंदर सुंदर कविता या पाठांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.  

१९.सहज वर्तनव्यवहार  

   मावरी मुलांमध्ये संगीत आणि नृत्यकला ओतप्रोत भरलेली आहे आणि यालाच मी जीवनाच्या बेबंद उत्स्फूर्त आवर्तन व्यवहाराचा आविष्कार अभिव्यक्ती मानते असं लेखिका येथे आवर्जून व्यक्त करते.  

   लेखिका म्हणते की मी एक चांगली शिक्षिका आहे असा आत्मविश्वास माझ्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे होता. मात्र मी एक अर्धवट मूर्ख व्यक्ती आहे, असं मी स्वत: ला मानते.  मात्र शिक्षकी पेशातील कौशल्य माझ्यामध्ये हळूहळू विकसित होत गेले असंही मी समजते.  

२०.सुट्टी  

     शाळेला लागलेल्या सुट्ट्या संपल्यानंतर आंतरिक ओढीने मुलं शाळेमध्ये ओढली जातात. एवढी प्रगल्भता शिक्षकाच्या शिकवण्यामध्ये असणे हे अगत्याचे आहे असा विचार  या पाठात लेखिका मांडते. लेखिका म्हणतात की सर्व शिक्षक वरवरच्या देखाव्यांवर जास्त भर देतात आणि शिक्षणाचा आत्माच हरवून जातो .कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्यांचे अक्षरही कधी कधी हे व्यवस्थित नसतं.  खरं म्हणजे बुद्धिमत्तेच्या कुशाग्र तेचा आणि लेखनाचा तसा अर्थाअर्थी संबंध नसतो. मात्र लेखन सुसंगत आणि सुसंबद्ध असलं पाहिजे असा महत्त्वपूर्ण विचार लेखिकेने मांडलेला आहे.  

२१. स्मरण यात्रा

   पूर्वाश्रमीच्या  शाळेची शिक्षिका असणारी लेखिका आता मुख्याध्यापकाची पत्नी झाली होती आणि जुनाट शाळा पाडून टाकण्यात येऊन आता नवीन शाळा बांधण्यात आली होती . मात्र जुनाट शाळेच्या आठवणी लेखिकेच्या मनावर अशा ठसलेल्या होत्या की त्या  विस्मरणात जात नव्हत्या आणि स्मरणयात्रा या पाठांमध्ये नेमकं हेच म्हटलेलं आहे .   धुळीत   बसलेले विद्यार्थी, त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा उत्साह या भाषणात नमूद करण्यात आलेला आहे . शेवटी लेखिका नवीन इमारत बघून भारावते, विविध चिमुरड्यांना बघते आणि जुन्या आठवणी मनात ठेवून घरी जाते. तिला दिसते  पानगळ , तिच्या डोळ्यांत अश्रू येतात तिला जुन्या आठवणी आठवतात आणि कायम स्मरणात राहतात अशा महान लेखीकेस विनम्र अभिवादन !

     धन्यवाद  !----श्री मनोज अग्रवाल ,औरंगाबाद

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know