Sunday, November 28, 2021

पुस्तकाचे नाव..महापुरुष मंडेला

वाचन साखळी समूह

 पुस्तकाचे नाव..महापुरुष मंडेला  -  लेखक.....जोसेफ तुस्कानो
परिचय कर्ता...संगीता वाईकर.

     *महापुरुष मंडेला * या पुस्तकातील अंतरंगात
* ओळख
*आफ्रिकन बापू
*झुंजार नेत्याचा उदय
*आफ्रिकन लढ्याला पाठिंबा
*भारतीयांशी संबंध
*या सम हाच नेता
*क्षमाशील वृत्ती
*खिलाडू वृत्ती
*कुटुंबीय
*मंडेलांच्या मृत्यू नंतर
*हृदय आठवणी 
*आणि मरणोत्तर कार्य
     अशी एकूण बारा प्रकरणे आणि चार परिशिष्टये आहेत.
स्वर्गीय नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिका देशाचे पितामह होते.त्यांना 'मदिबा ' असेही संबोधले जात.त्यांचे सगळे आयुष्य वर्ण द्वेषा विरुद्ध लढा देत तुरुंगातच गेले पण जीवनाच्या अखेरच्या पर्वात त्यांनी आपले साखळदंड अहिंसक मार्गाने तोडले व ते मुक्त झाले.
    केवळ हाता पायांना जखडणे ,साखळदंड तोडणे म्हणजे मुक्ती नव्हे तर इतरांच्या स्वातंत्र्याची कदर नि आदर करणे म्हणजे खरी मुक्ती होय ,हेच त्यांचे मत होते .मानवतेच्या स्वातंत्र्या साठी जीवात जीव असे पर्यंत लढायचे हे त्यांच्या जीवनाचे ब्रीद होते.त्यांचे नि: स्वार्थी नेतृत्व ,आपल्या देश बांधवांप्रती असलेली अनुकंपा आणि त्यांची उदात्त परंपरा यासाठी ते देश वासियांच्याच नव्हे तर अखिल जगाच्या स्मरणात राहतील यात संदेह नाही.भावी पिढीसाठी त्यांचे त्यागपूर्ण जीवन एक आदर्श आहे.
     साऱ्या दक्षिण आफ्रिकेचे ते ' ताता ' म्हणजेच ' पिता ' होते.एक जागतिक कीर्तीचे व्यक्तिमत्त्व,मुत्सद्दी,राजकारणी,क्रांतिकारक,जागतिक दीपस्तंभ होते.१८ जुलै १९१८ रोजी दक्षिण आफ्रिकेतील ट्रांस्केई प्रांतातील एका गावात त्यांचा जन्म झाला. त्यांनी एकूण २७ वर्षे कैद भोगली.'हिंस्त्र जनावरांशी मोकळ्या हाताने सामना करता येत नाही,त्यासाठी शस्त्र उचलायला पाहिजे ' हे त्यांचे उद्गार.
   नेल्सन राष्ट्रपती झाले तेव्हा ' यापुढे या देशात वर्ण द्वेष राहणार नाही,सर्वांस समान हक्क राहील ,सर्वांचे जीवन सुखी करता येईल असा प्रयत्न करू. काळे- गोरे असा भेद न मानता या महान  देशाचे नागरिक म्हणून देशाचा उत्कर्ष करू असे आश्वासन त्यांनी दिले.
    'प्रश्न तत्वांचा नसतो ,तर कलुपत्यंlचा असतो ' या सूत्रावर त्यांची नितांत श्रद्धा होती .त्यांनी आपल्या परदेशी धोरणात सहा तत्वांचा पुरस्कार केला.
*मानवी हक्क अधिकार
*लोकशाहीचा पुरस्कार
* आंतरराष्ट्रीय कायद्या बद्दल आदर
*प्रभावी शस्तास्त्रे नियंत्रण
*अहिंसेद्वारे जागतिक शांतता
*एकमेकांवर अवलंबून असलेल्या देशाशी आर्थिक सहकार
    शिक्षण हे स्वातंत्र्यासाठी सर्वात मोठे साधन आहे याची जाणीव त्यांना झाली.तुरुंगात त्यांनी शिक्षण घेतले.उत्तमोत्तम साहित्याच्या सहवासाने त्यांची वैचारिक जडणघडण झाली.' शिकायचे ,जुळवून घ्यायचे नि विकास करायचा' हे त्यांच्या जगण्याचे सूत्र बनले . कैद्यापासून ते राष्ट्र प्रमुख बनलेले ,त्यांच्या देशाचे नैतिक केंद्र झालेले,वर्ण द्वेषातून फाळणी होऊ घातलेल्या देशाची एकजूट करणारे ते एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते आणि जगातील नेत्यांचे स्फूर्तीदाते होते .अपार क्षमाशील वृत्ती मुळे स्वभावात आलेले मार्दव आणि मनमोकळा स्वभाव यामुळे ते सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले.इतरांना क्षमा करून कटुता,राग,द्वेष,यापासून मुक्ती मिळवणे हे ' निरामय सुखी जीवनाचे रहस्य ' असते हे त्यांनी आपल्या वागणुकीतून दाखवून दिले.खिलाडू वृत्ती ही त्यांची एक महत्वपूर्ण खुबी होती .
   ६ डिसेंबर २०१३ रोजी या महापुरुषाचे  महानिर्वाण झाले .'आपण किती जगलो ही काही जीवनाची सांगता नाही,तर इतरांच्या आयुष्यात आपण किती बदल घडवून आणला यात ,जीवनाची इती वृत्ती सामावलेली असते ' किती महान संदेश देणारा हा एक महा पुरुष.
प्रत्येकाने आवर्जून वाचावे ,बोध घ्यावा ,असे हे एक परिपूर्ण असे पुस्तक.....
***************************
संगीता वाईकर.नागपूर.

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know