WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

NEW ARRIVAL 2024-2025

* NEW ARRIVAL 2024-2025 * natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural
natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural

Sunday, October 24, 2021

उचल्या

'मार्तंडा, लक्षुमनाला चोऱ्या कराया शिकव, शाळा शिकून आपण काय करणार हाव?' शेजारचे लोक लक्ष्मणच्या बापाला सांगायचे. 

लक्ष्मणलाही शाळा नको वाटायची. शाळेतली पोरं त्याला 'लछमनताता, खेकड्याची आमटी खाता!' म्हणून चिडवत. शाळा सोडली तर 'कुठंही जत्रंला फिरता येईल, चोऱ्या करता येईल, चांगलं राहता येईल, चांगलं खाता येईल' असं लक्ष्मणला वाटे. 

पण तो चोरी करायला भ्यायचा कारण पकडलं गेल्यावर पोलिसांच्या माराची भीती राहायची. 

संतराम आणि तुकाराम माणिकला, म्हणजे लक्ष्मणच्या मोठ्या भावाला, घेऊन नदीवर गेले. भर दुपारची वेळ. वाळू प्रचंड तापलेली. अनवाणी माणिकला वाळूवरून चालता येईना. 

संतरामने अचानक माणिकला उचलून वाळूवर टाकलं. तुकारामने त्याचे कपडे उतरवले. उघड्या-नागड्या माणिकला तापलेल्या वाळूत त्यांनी रेंगसू रेंगसू घेतलं. माणिकच्या अंगावर लाथा-बुक्क्यांचा मार पडत होता. ते कमी होतं म्हणून दोघांनी माणिकच्या तोंडात व गांडीत मिरचीची पूड टाकली. मार खाऊन बेजार झालेला माणिक चड्डीत हागल्या-मुतल्यावरच त्याची सुटका झाली. 

तसे संतराम आणि तुकाराम माणिकचे नातेवाईक. त्यांनीच माणिकला चोरी करायला शिकवलेलं. आताची मारहाण सरावासाठी होती. अशा माराची सवय लागल्यावर कोणताही उचल्या पोलिसांपुढे तोंड उघडत नसे. 

घरचे लोक इतके मारायचे की त्या मारहाणीपुढे पोलिसांचा मार काहीच वाटत नसे. 

आणि हे उचले चोरी तरी कशाची करत? किरकोळ वस्तूंची. पोटाची खळगी भरण्यासाठी. आणि तेवढीच चोरी त्यांना पचायची. मोठी चोरी केली तर गावच्या पोलीस पाटलापासून शहराच्या पोलिसांपर्यंत सर्वांना वाटा द्यावा लागे आणि उचल्यांच्या हातात काही येत नसे. 

उचल्यांनी कधी चोरी लपवायचा प्रयत्न केला तर पोलीस खोपटात येऊन 'लाज लपवण्यासाठी घातलेल्या हातभर कपड्यातल्या आईमाईपासून अंगावर एकही कपडा नसलेल्या उघड्या-नागड्या लेकरापर्यंत' सर्वांना बेदम मारत. 

लक्ष्मणचा बाबा चामलेच्या मळ्यात काम करायचा. शिकल्या-सवरल्या लोकात राहून त्याला शाळेचं महत्त्व समजलं होतं. इतर पोरांसारखं लक्ष्मण 'तिरगायला जाऊ नये' म्हणून बाबाने त्याला शाळेत घातलं. 

'पुस्तक न् वही नीट संबाळ न्हायतर मारीन,' पुस्तक, वही व पेन पोराच्या हातात टेकवताना बापाने धमकावलं. 

लक्ष्मणच्या घरी खायची आबाळ. बाबाला चामलेच्या घरून भाकर येई. ती भाकर खाण्यासाठी कधी कधी लक्ष्मण चामलेच्या मळ्यात जाई 

'पुस्तक चांगलं ठिवलास का? दाखव.' म्हणून बाबाने वही बघितली. लक्ष्मणने वहीत लिहिलेलं बघून बाबाने त्याला जोड्याने मारलं. 'वही लिहिण्यासाठी असते' एवढंही त्या बिचाऱ्याला माहीत नव्हतं. 

पाथरूटाचं पोरगं शाळेत जाऊ लागल्यावर इतर पोरं त्याला त्रास देणारच. लांडग्यांच्या कळपात शेळी शिरल्यागत लक्ष्मण शाळेत राहू लागला. उचल्याचं पोर म्हणून इतर पोरं त्याला खडे फेकून मारत. 

पुढे परिस्थितीमुळे लक्ष्मणला शाळा सोडावी लागली आणि अठरा वय होण्याआधीच तो गिरणीत जाऊ लागला. तिथे १२५ दिवस फुकट काम केल्यावर 'दोरे चिकटवायला शिकलेल्या' लक्ष्मणला साठ रुपये पगार चालू झाला. पण नोकरी सुखाची नव्हती. क्षुल्लक चुकांसाठी सुपरवायझर लक्ष्मणची कातडी फोकाने सोलून काढी. 

कामदार झाल्यावर घरच्यांनी लक्ष्मणच्या लग्नाचं मनावर घेतलं. इथे लक्ष्मणने जावळीच्या आत्याची मुलगी न करता कवठ्याची मुलगी केल्यावर त्याच्या घरच्यांनीच लक्ष्मण व छबूबाईच्या संसारात बिब्बा घातला. नवरा-बायकोची भांडणं लावली. लक्ष्मणच्या मनात छबूच्या चारित्र्याविषयी संशय निर्माण केला. 

लक्ष्मणचे मोठे भाऊ चोर्‍यामाऱ्या करून कसंबसं पोट भरत. लग्न झाल्यावर ते लहान भावंडाकडे बघेनात. धाकट्या हारचंदाला अधूनमधून फेफरं येत असल्याने तो चोरी करायला भ्यायचा. 

ज्याला कमवता येत नाही त्याची किंमत शून्य. म्हणूनच हारचंदाचे भाऊ व भाभ्या त्याची हिडीसफिडीस करू लागले. हारचंदाला कुणी सांभाळीना. 

हारचंदाची दया येऊन लक्ष्मणने त्याला स्वतःच्या घरी आणलं पण भावाला एक वेळचं जेवन देणंही त्याला शक्य होईना. लक्ष्मणने हारचंदाला किरकोळ कामं करायला सांगितली पण तो काम करायचं सोडून भीक मागू लागला. 

'आपला भाऊ भीक मागतो' याची लाज वाटू लागल्याने लक्ष्मण त्याला घरातून हाकलून द्यायची भाषा करू लागला. 

लक्ष्मण हाकलून देईल या भीतीने एका पावसाच्या रात्री हारचंदा दाराला आतून कडी लावून बसला. त्यावेळी लक्ष्मणची बायकोही बाहेर होती. कितीतरी आवाज दिले तरी हारचंदा दार उघडीना. 

'जा कुठं बी, मर. भीक मागून खा. उद्या लातुरात दिसू नकोस. नाही तर पोलिसला धरुन देईन,' हारचंदाने दार उघडताच पिसाळलेल्या लक्ष्मणने त्याला घरातून अक्षरशः हाकलून दिला. 

गरीबीमुळे सख्ख्या भावाला घरातून हाकलून दिल्याची बोच लागल्यावर लक्ष्मणने हारचंदाचा खूप शोध घेतला. हारचंदाला ठिकठिकाणी, वर्षानुवर्षे शोधला पण तो सापडला नाही. हारचंदा बेवारश्यासारखा मेला असावा. 

लक्ष्मण लहानपण नेहमी आठवे. 

'तू लई शाळा शिक. मोठा कामदार बन' लक्ष्मणचा बाबा म्हणायचा. पण गरीबाच्या पोराला कसली शाळा न् कसलं काम. लक्ष्मणची ना शाळा पूर्ण झाली ना शिक्षण; ना नोकरी नीट झाली ना धंदा. 

आपलं आयुष्य वाया गेलं असलं तरी आपल्याला त्याची जाण आहे पण 'अज्ञानातच सुख' समजणाऱ्या आपल्या समाजबांधवांना जागं करण्यासाठी लक्ष्मण लढा उभारायचं ठरवतो आणि स्वतःचं आयुष्य त्यासाठी वाहून घेतो. 

- विजय निंबाळकर, लोहगाव - पुणे 

#लक्ष्मणगायकवाड #उचल्या #श्रीविद्याप्रकाशन

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know