शब्दांची नवलाई – शब्दांचे अंतरंग उलगडून दाखवणारा बालकवितासंग्रह
किंवा
मराठी, भाषा, शब्द आणि व्याकरण पक्के करणारा कवितासंग्रह
एकनाथ आव्हाड हे एक उत्तम शिक्षक आहेत. मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकवताना त्यांनी सर्वस्तरातील मुलांचे अंतरंग जाणून घेतले. करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभुशी तयाचे असे साने गुरुजी म्हणतात. त्याकाळी आजी – आजोबा मुलांना गोष्टी सांगून त्यांचे मनोरंजन करीत व त्यांच्यावर सहजतेने सुसंस्कार करीत. संध्याकाळी परवचा म्हणून घेत आणि मुलांचे अनायासचे पाठांतर होई. आता आजी आजोबा दूर गावाकडे व नातवंडे शहरामध्ये असे दोन ध्रुवावर दोघे आपण अशी परिस्थिती आहे.
अशा परिस्थितीत मुलांना आपली संस्कृती, आपले शब्दसामर्थ्य पटवून द्यायला हवे. हल्ली मुले अगदी स्वल्प भाषा (शॉर्टकट) वापरतात. त्यांना त्यांच्याच शब्दात सांगितले तर पटते. तेदेखील एखाद्या शिक्षकाने सांगितले तर ते त्यांच्या मनावर ठसते. शहरातील घरात आता आई बाबा क्वचितच असतात. परंतु आई किंवा वडील जर शिक्षकी पेशात असतील तर ते सहज बोलता बोलता मुलांना शब्द, शब्दांचे अर्थ, म्हणी आणि वाक्प्रचार वापरून त्यांची ओळख करून देत असतात. मुलांना गप्पागोष्टीतून ज्ञान दिले तर ते त्यांच्या मनावर ठसते, ही खुबी एकनाथ आव्हाड सरांच्या कवितेत आहे. ‘आई म्हणते’ या पहिल्याच कवितेत आई सहज असा सदुपदेश कसा करते याची वानगीदाखल उदाहरणे दिली आहेत. तोंडदेखले बोलू नये, मोठी माणसे बोलत असतान लहानांनी तोंड खुपसू नये, तोंडसुख घेणे म्हणजे फडाफडा बोलणे टाळावे, वायफळ बडबड करून तोंडची वाफ दवडू नये, तोंडाला पाने पुसू नयेत, तोंडघशी पाडू नये तोंडाला तोंड देऊ नये असे अनेक वाक्प्रचार आव्हाड सर अगदी सोप्या पद्धतीने या कवितेत सांगतात.
दुसरी कविता ‘आमच्या बाई’ ही आहे. या कवितेत त्यांनी बाईंच्या तोंडून एकाच शब्दाचे अनेक अर्थ सांगितले आहेत. समानार्थी शब्द सांगा असा प्रश्न सोडवायला ही कविता नक्कीच मदत करील. या कवितेत अरण्य किंवा जंगलाला विपीन, पाण्याला अंबू असे प्रचलित नसलेले शब्द आल्याने ज्ञानात भर पडते.
आमचे बाबा किती वाक्प्रचार वापरतात ते सांगत ‘वाक्प्रचाराची गंमत’ या कवितेत वाक्प्रचार म्हणजे शरीराच्या अवयवाच्या उपमांतून आलेले भाषेचे सौंदर्य असे सांगितले आहे. घर डोक्यावर घेणे, डोळ्यांत धूळ फेकणे, कुणाचे कान फुंकणे बर नाही, असे सांगत ते सहज उपदेश करतात.
‘समूहाचे गाणे’ कवितेतून त्यांनी भाजीची जुडी, आंब्याची अढी, उसाची मोळी, करवंदांची जाळी, मडक्याची उतरंड, भाकरीची चवड असे अनेक शब्द सांगून समूहदर्शक शब्दांचा अभ्यास ही कविता करून घेते.
असावे घरकुल अपुले छान असे आपण नेहमी म्हणतो. सुगरण, घुबड, पोपट, मुंगी, मधमाशी, घरातील कोळी, कोंबडी, घोडा, चिमणी, हत्ती अशा सर्वांच्या घरे कोणकोणती हे या कवितेतून कळते.
‘अनुभवांच्या खाणीं’मधून एकेक म्हणीचा अर्थ सांगितला आहे. म्हणींचे पाठांतर सहजतेने या कवितेच्या वाचनाने होऊन जाते. म्हणी म्हणजे अनुभवांच्या खाणी. आपल्या पूर्वजांनी आलेल्या अनुभवावरूनच या म्हणी तयार केल्या असे ही कविता शिकवते.
‘आम्ही दोघे भाऊ’, ‘नादमयता’, ‘खेळ आला रंगात’, ‘चिन्हांचा खेळ’, ‘ उत्स्फूर्त उद्गार’, ‘की ची करामत’ आदी कवितांतून ते नवनवीन विशेष नामांची माहिती देतात. व्याकरण आणि भाषेचा हसत खेळत अभ्यास करायला हा संग्रह नक्कीच मदत करील.
‘शब्दांची नवलाई’ या कवितेतून कर म्हणजे हात व कर म्हणजे टॅक्स, जलद म्हणजे ढग व लवकर, चरण म्हणजे कवितेची ओळ व पाय, कात, चिरंजीव अशा काही शब्दांचे दोन दोन अर्थ या कवितेतून समजतात.
‘नावात बरंच काही’ या कवितेतून साहित्यिकांची टोपण नावे दिली आहेत. ‘बोल बहु अनमोल’ या कवितेतून प्रसिद्ध व्यक्तींची घोषवाक्येच दिली आहेत. उदा. जय जवान जय किसान, लेखण्या मोडा बंदुका घ्या, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, अशी अनेक वाक्ये या कवितेच्या वाचनाने सहजच पाठ होत जातात.
यांशिवाय ‘अलंकार’, या कवितेतून गुळाचा गणपती, घरकोंबडा, भगीरथ प्रयत्न, चौदावे रत्न आदी शब्द तर ‘प्रकाशगाणे’मधून एकाच अर्थाचे अनेक शब्द भेटतात. उदा. अंधार, राग, काळजी, आकाश, हित, मित्र, देव, आनंद या शब्दांना पर्यायी शब्द ही कविता देते.
मैत्री कशी असावी तर ‘मधासारखी गोड’ असे एक कविता शिकवते. ‘आईस पत्र’ ही कविता पत्र कसे लिहायला हवे हे सोप्या पद्धतीने सांगते. आजकाल पत्रलेखन हा शब्द परीक्षेत पाच मार्कांसाठीच असतो. व्यवहारातून तो बाद होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर ही कविता खूप महत्त्वपूर्ण वाटते आणि त्यातून आपले आपल्या नातेवाईकांशी असलेले संबंध दृढ कसे करावेत याचा मार्ग दाखवते.
‘शब्दांचा साठा’ या कवितेते विविध प्राण्यांचे आवाज किंवा त्यांच्या ओरडण्याचे संबोधन काय याची माहिती देते. ‘गमतीची गोष्ट’ ही कविता अगदी सहजतेने सर्वनाम कसे वापरावे, याचा बोध देते.
एकंदरीत या संग्रहातील सर्वच २७ कवितांतून शब्द, व्याकरण, भाषा यांचा हसत खेळत अभ्यास होतो.
आव्हाड सरांची सोपी, सुटसुटीत भाषा, शब्दांची गुंफण करण्याची विशिष्ट शैली या मुळे रंजनातून शिक्षण सहजसाध्य असते. त्यासाठी घोकंपट्टी करण्याची गरज नाही. या कविता पाठ केल्या किंवा रोजच म्हटल्या तर मुलांची मराठी भाषा निश्चितच समृद्ध होईल.
-------
परीक्षण – प्रकाश रामचंद्र क्षीरसागर (९०११०८२२९९)
शब्दांची नवलाई
एकनाथ आव्हाड
पृष्ठे , मूल्य १५० रुपये
प्रकाशक
राजीव दत्तात्रय बर्वे
दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
शनिवार पेठ, पुणे
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know