Friday, July 9, 2021

पुस्तकाचे नाव -कर हर मैदान फ़तेह

पुस्तक क्रमांक-📗97..🖋️ 
पुस्तकाचे नाव -कर हर मैदान फ़तेह
लेखक - विश्वास नांगरे पाटील

जिद्द+ चिकाटी+आत्मविश्वास= यश (विश्वास नांगरे पाटील)

"मन मे है विश्वास" हे पुस्तक विश्वास नांगरे पाटील यांचे आय.पी.एस अधिकारी होण्यासाठी अत्यंत खडतर केलेला अभ्यास,प्रवास नवयुवकांना मार्गदर्शक असा असलेला आपण सर्वांनी पाहिला, अनुभवला. तसेच आय.पी.एस अधिकारी झाल्यानंतर आत्तापर्यंतच्या
 23 वर्षाच्या सेवेमध्ये आणि प्रशिक्षणामध्ये त्यांना आलेले सर्व अनुभव "कर हर मैदान फ़तेह"या पुस्तकात अत्यंत समर्पक शब्दात, दिशादर्शक पद्धतीने मांडलेला आहे. तो निश्चितच स्पर्धा परीक्षांकडे वळलेल्या विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभाप्रमाणे ठरेल तसेच काहींना आपला मार्ग स्पर्धा परीक्षेकडे वळवण्यासाठीही
प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.

"कर हर मैदान फ़तेह " हे पुस्तक मला वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य, संयोजिका आदरणीय प्रतिभाताई लोखंडे यांच्याकडून वाचनसाखळीतील पुस्तक परीक्षण वरील सर्वाधिक कमेन्ट देऊन समूहावर लेखन करणार्‍यांना प्रोत्साहित केल्याबद्दल मिळालेली ही सस्नेह भेट.
          "इन मुठीयों मे चांद तारे भर के" 
                 आसमा की हद से गुजर के'
          हो जा तू भीड से जुदा,भीड से जुदा
                               रे बंदेया, 
                  कर हर मैदान फ़तेह

"चला हवा येऊ द्या" या निलेश साबळे यांच्या कार्यक्रमात काही दिवसापूर्वी प्रमुख अतिथी म्हणून विश्वास नांगरे पाटील हे उपस्थित असताना त्यांनी "कर हर मैदान फ़तेह" या नवीन पुस्तकाची माहिती दिली व एक-दोन पाने ही त्या कार्यक्रमात वाचून दाखवली. तेव्हापासून त्या पुस्तक वाचनाची ओढ मनामध्ये लागली असतानाच हे पुस्तक हातामध्ये बक्षीस स्वरूपात पडले, आणि वाचन करत असताना स्वतःला हरवून गेलो.

"कर हर मैदान फ़तेह" या पुस्तकामध्ये जे विद्यार्थी उत्कृष्ट दर्जाची शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक प्रगती साधणारे प्रशिक्षण घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी या पुस्तकातून बहुमोल असे मार्गदर्शन होणार आहे.

यशाच्या मार्गामध्ये कधीच आपली परिस्थिती आड येत नाही. हे सांगत असताना स्मशानातील एका काम करणाऱ्या कुटुंबातील मुलीला स्मशानातील जळणाऱ्या प्रेताच्या उजेडावर अभ्यास करून 98.5 टक्के गुण मिळाले तेव्हा तिच्या आईला हा आकडा किती असतो हेही माहीत नव्हते. आणि इकडे काही मुले सर्व गोष्टी असतानाही विनाकारण परिस्थितीला दोष देऊन आत्महत्यासारखे निर्णय घेतात. स्वातंत्र्याच्या काळानंतरही अशा काही गोष्टी घडतात याची मनापासून चिंता वाटत असल्याचे या ठिकाणी त्यांना जाणवते.

सांगली जिल्ह्यातील "कोकरूड" गावात त्यांचा जन्म झाला आय.पी.एस मध्ये निवड झाल्यानंतर 23 वर्ष अतुलनीय कार्य करत असताना त्यांना आलेले वेगवेगळे अनुभव, त्यावर केलेली उपाय योजना, जीवनाचा मार्ग,ट्रेनिंग काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग घेत असताना आलेले अनुभव, मिळालेली शिस्त, शत्रूंचा पाठलाग करत असतानाचे अंगावर शहारे आणणारे वर्णन,  फिल्डवर काम करत असताना आपल्या समोर वेगवेगळ्या प्रकारची संकटे,आव्हाने वेगवेगळ्या प्रकारची माणसे आंदोलन करत असताना आपणाला दिसून येत असतात. त्यावेळेस कशा प्रकारे आपण त्यांना सामोरे जायचे आणि परिस्थिती कशी हाताळायची याचे अत्यंत सुंदर असे उदाहरण त्यांनी या पुस्तकात दिले आहे. यामध्ये ताज हॉटेलमधील उदाहरण असेल, नाशिकमधील आंदोलने असतील असे कितीतरी प्रसंग निश्चितच नवीन पिढीला, अधिकारी वर्गाला दिशादर्शक ठरणारे आहेत.

प्रशिक्षण काळामध्ये विश्वास नांगरे पाटील यांच्या बरोबर कित्येक आय.पी.एस अधिकारी प्रशिक्षण घेत होते. त्यावेळी त्यांच्यामध्येही एक एक प्रशिक्षण मध्ये टॉप करण्याची धडपड चाललेली होती. त्यावेळी त्यांनी रूपकुंड ट्रेक एक चित्तथरारक अनुभव याठिकाणी मांडला तो अनुभव वाचताना अंगावर शहारे आलेले  दिसून येतात.

कोणतेही कार्य करत असताना आपल्याकडे प्रखर ध्येयशक्ती हवी.If we rest,we rust. आपण थांबलो आराम करायला लागलो तर गंज चढतो. त्यामुळे कोणतेही कार्य करत असताना आपल्या मार्गात अनेक मोहाचे प्रसंग येत असतात, परंतु त्याला बाजूला सारून आपण यशाचे शिखर गाठायचे असते. कधी आपण छोटे व्हायचे आणि कधी मोठेही. समयसूचकता  आपल्या अंगी असली पाहिजे. कधी मृदु व्हायचे व कधी कठोर याची जाण आपल्याला असली पाहिजे. प्रत्येक प्रसंगाला आपण प्रतिष्ठेचा प्रश्न बनवू नये. आपण जेव्हा मी पणा सोडतो तेव्हा ध्येयप्राप्ती असणारी आपली दृष्टी विचारीत होते, आणि आपण पुढे सरकत जातो. रोज अभ्यासपूर्वक जीवनामध्ये एक तरी प्रगतीचे क्षेत्र निवडून त्यात टॉपला जाण्याचे उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवले पाहिजे आणि ते प्राप्त करण्यासाठी जीवाचे रान व रात्रीचा दिवस करीन ही प्रबळ इच्छाशक्ती मनामध्ये ठेवली पाहिजे.

तुमच्या शरीरापेक्षा तुमच्या इच्छाशक्तीची, उमेदीची उंची अधिक महत्वाची असते.शरीराचे खुजेपण कुठलीही उंची गाठायला कमी पडू शकत नाही.त्यामुळे प्रशिक्षण घेत असताना बरेच अनुभव त्या ठिकाणी आले.

"कर हर मैदान फ़तेह" या पुस्तकांमध्ये अनेक कथाही त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये ससा कासवाची गोष्ट, टोपीवाला व माकड यांची गोष्ट. खरंतर या गोष्टी काळानुरूप कशा बदलत गेल्या तसेच आपणही बदलत गेले पाहिजे. असे त्यांनी सांगताना "पोलव्हाल्ट" सारखी आसमान भरारी ही आपण घेतलीच पाहिजे.

"नवी पिढी आणि आरोग्य" याविषयी बोलताना नांगरे पाटील यांनी आपल्या आतापर्यंत सेवेमध्ये कित्येक वाममार्गाला गेलेल्या नवीन पिढ्यांची याठिकाणी उदाहरणे दिलेली आहेत. त्यामुळे त्यांनी या कालावधीमध्ये बरेच महाविद्यालयांमध्ये, शाळेमध्ये जाऊन मुलांसाठी प्रेरणादायी व्याख्याने दिलेली दिसून येतात त्यांच्यासाठी वाद-विवाद स्पर्धा सुद्धा बरेच ठिकाणी आयोजित केलेल्या दिसून येतात.अलीकडे वयाच्या तिशीतच वजन वाढल्याने रक्तदाब, मधुमेह, कर्करोग अशा विकारांनी युवा पीडी पोखरलेली दिसून येते. त्यांनी मात्र जीवनशैली बदलण्यासाठी 21/90 चा फार्मूला वापरा,असे सांगितले आहे. एखाद्या नवीन गोष्टीचा ध्यास घेतला की 21 दिवसात सवय लागते आणि 90 दिवसात तीच आपली लाइफस्टाइल होऊन जाते. आज नांगरे पाटील यांचं वय 47 वर्ष असतानाही 42 किलोमीटर सलग न थकता ते मॅरेथॉन करू शकतात. तसेच त्याच वेळेस त्यांनी त्यांच्या बॅचमेटचे
 "कृष्णप्रकाश" यांचेही अत्यंत सुंदर उदाहरण दिलेले आहे. उसेन बोल्ट ऑलिम्पिकचे ट्रॅकवर किती वेळ  धावला असेल तर फक्त अडीच मिनिटे परंतु यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य घालवलेले दिसते. तूप खाऊन लगेच रुप येत नाही. त्यामुळे योग्य आहार,योग्य व्यायाम आणि योग्य विश्रांती हीच खरी आरोग्याची त्रिसूत्री आहे.

विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या संपूर्ण सेवेसाठी आयुष्याचे तीन भाग बनवले होते. एक तृतीयांश स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी, एक तृतीयांश आपल्या प्रोेफेशनसाठी आणि एक-तृतीयांश समाजासाठी. त्यासाठी त्यांनी आपली पत्नी आणि मुले यांच्या सोबतच रनिंग, सायकल, स्विमिंग जिम सुरू केले त्यामुळे कुटुंबाचा सहवास आपोआप त्यांना मिळू लागला,आणि त्यांच्या पत्नीही एक दिवस 21 किलोमीटरची अर्धमॅरेथॉन ही पूर्ण केलेली दिसून येते. अत्यंत बारकावे  पाहून त्यांनी त्याचा आपल्या जीवनशैलीमध्ये सातत्याने वापर केलेला दिसून येतो.

डॉल्बीमुक्त गणेशोत्सव यावेळेस प्रत्येक ठिकाणी तरुण वर्गांची, तरुण मंडळांची बैठका घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून जास्तीत जास्त चांगल्या प्रमाणात समजवण्याचा ते नेहमी प्रयत्न करत असत. कोणतेही आंदोलन असेल, कोणतेही सार्वजनिक उत्सव असेल, तरुण पिढीचे रक्त सळसळत असते. त्यामुळे त्यांच्याकडून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. त्यामुळे त्यांना जर अटक झाली तर त्यांच्या संपूर्ण आयुष्यावरती व त्यांच्या करिअरवर पाणी फिरणार असते. या सगळ्या बारीकसारीक गोष्टी ते तरुणांना सांगत असत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेने  24 तास डुट्या केल्या, त्यांच्याविषयी ते मोलाचे सांगतात, लॉकडाउन,संचारबंदी अमलात आणण्याची मुख्य जबाबदारी पोलिसावर देण्यात आलेली होती.पोलिसांनाही जबाबदारी पार पाडताना या रोगाची लागण होण्याचा धोका ही तितकाच होता. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त साहित्य, संरक्षण यंत्रणा कशी उपयोगी करून कशी पुरवता येईल यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेले दिसून येतात.

विश्वास नागरे पाटील यांनी आपल्या सेवेमध्ये,
 कार्य मूल्यांकन पद्धती, झिरो पेंडन्सी, निर्भया पथक यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेले दिसून येतात. आपण ज्या ठिकाणी कार्य करत असतो त्या ठिकाणी जास्तीत जास्त आधुनिकतेचा वापर कसा केला जाईल हे त्यांनी सांगितलेले निश्चितच नवीन अधिकारी वर्गासाठी फायद्याचे ठरणार आहे.

आपले दैनंदिन जीवन जगत असताना आयुष्य सहज आणि सोपं नसते.खूप अडथळे आपल्याला येत असतात,तसेच निर्माण केलेले दिसून येतात. पण ते मात्र आपण पचवायला  शिकले पाहिजे. अभिनेता सुशांत यास काय कमी होते, अशी कितीतरी उदाहरणे आहेत पण आलेल्या संकटांना ही  आपण ठणकावून सांगावे "आता ये बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर!"त्यामुळे लहान मुलांना बाहेरचे जगही कळाले पाहिजे.त्यांना मैदानावर खेळू द्यावे, त्यांचे गुडघे फुटले पाहिजे तरच अचानक रक्त पाहिले की,त्यांना चक्कर येणार नाही.न्यूनगंड, भयगंड,उदासीन आणि सुस्ती या सगळ्या गोष्टीला बाजूला सारून मुलांचे व आपले आयुष्य सुंदर बनवले पाहिजे.

मोबाईल, नाती आणि मनाचे आरोग्य याविषयी त्यांनी तुकाराम महाराजांचे 'मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण!' हे अत्यंत उत्तम असे उदाहरण दिले आहे.हल्लीची पिढी ही खूप खोडकर,खट्याळ, हुशार असलेल्याचे दिसून येते. त्यांना गप्प बसण्यासाठी कित्येकदा त्यांच्या हातात मोबाईल दिला जातो. आणि मग पब्जी, ब्ल्यू व्हेल यासारख्या कितीतरी घातक गेममुळे मुले एकलकोंडी होऊन बदललेली दिसून येतात. मोबाईल नावाचा भस्मासुर की जो पालकच त्यांना देत असतात.बारावीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत मुले अंदाजे 20,000 तास इंटरनेट वापरत असतात असे त्यांचे म्हणणे आहे. इंटरनेट वापरत असताना इतरही काही वेबसाईट ते उघडत असतात आणि त्यामुळे मनामध्ये विकृती निर्माण झालेली दिसून येते.आज-काल ऑफिसमधून, बाहेरील कामावरून घरी आल्या-आल्या बहुतांश आई-वडील मोबाईलवर सर्रास फेसबुक, व्हॉट्सऍप, ट्विटर, टेलिग्राम वापरत असतात आणि मुलेही वापरत असतात.परंतु त्यावर सर्वांचे योग्य नियंत्रण असणे गरजेचे आहे.नाहीतर 45 वर्षे असणारी व्यक्तीही तीस वर्षाचा डीपी अथवा फोटो ठेवून समोरच्याला वेडसर बनवण्याचा प्रयत्न करत असते, जवळीकता वाढवत असते. यासाठी "युवा संवाद" हे नांगरे पाटील यांनी अत्यंत सुंदर असे पाऊल त्याठिकाणी उचलले.

"अपघात आणि आपण" यामध्ये अपघात असण्याचे प्रमाण जर पाहिले तर आता वाहनांची संख्या झपाट्याने वाढल्याचे दिसून येते.कारण मुलगा नववी,दहावीला गेला की त्याच्याकडे लगेच गाडी असते. त्या गाडीवर ट्रिपल सीटवर त्याचे मित्र जाताना आपणास दिसून येतात.
चौदा-पंधरा वर्षाच्या मुलाला ट्यूशनला जायला मोटरसायकल असते परंतु त्याचे स्पिड मात्र आपल्या हातात नसते.

शेवटी "दीक्षांत परेड" याविषयी त्यांनी माहिती दिली. केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री.विद्यासागर राव हे दीक्षांत समारंभाचे मुख्य अतिथी होते. यावेळेस सर्व आय.पी.एस अधिकाऱ्यांच्या घरातील सदस्य त्या ठिकाणी उपस्थित असतात.तो दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि नव्या उमेदीचा त्याठिकाणी असतो.संपूर्ण नसानसात या ठिकाणी कार्य करण्याची उर्मी संचारलेली दिसून येते. त्यावेळेस सेवेत सुरू होण्याचा पहिला दिवस जितका महत्त्वाचा असतो तितकाच सेवानिवृत्तीचा दिवस महत्त्वाचा असल्याचे त्या ठिकाणी सांगण्यात आले.

अशाप्रकारे "कर हर मैदान फ़तेह" हे विश्वास नांगरे पाटील यांचे दुसरे पुस्तक म्हणजेच त्यांच्या जीवनाचा पूर्वार्ध हा नवीन पिढीला , पालकांना, अधिकाऱ्यांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन देणारे दिसून येते. हे पुस्तक सर्वांनी आवश्य वाचावे.
 पृष्ठसंख्या 228
 मूल्य 299 
अभिप्राय शब्दांकन-
                    सिंधुसूत...🖋️

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know