Wednesday, July 7, 2021

पुस्तकाचे नाव-स्टीफन हॉकिंग

*पुस्तक क्रमांक-📗95.🖋️
पुस्तकाचे नाव-स्टीफन हॉकिंग 
लेखक -डॉ.द.व्य.जहागिरदार

स्वतःच्या अपंगत्वावर मात करून एक वेगळं अस्तित्व निर्माण केल्यामुळे जगातल्या लाखो लोकांचे स्फूर्तीस्थान म्हणून" स्टीफन हॉकिंग"यांच्याकडे पाहिले जाते.कष्टाने जगण्याची हिंमत त्यांनी दाखवून दिली.त्यांच्या एकूणच आयुष्याचा थक्क करायला लावणारा प्रवास या पुस्तकात लेखकाने अत्यंत समर्पक शब्दात करून दिलेला आहे.

"स्टीफन हॉकिंग" यांचा जन्म 1942 मध्ये इंग्लंड या ठिकाणी झाला. त्यांचे आई-वडील हे उच्चशिक्षित होते. स्टीफन यांना खेळामध्ये तसा जास्त रस नव्हता. स्टिफन 12 वर्षाचे असताना त्यांच्या दोन मित्रांनी आपापसात पैज लावली होती की,तो आयुष्यात काहीही करू शकणार नाही.परंतु दुसऱ्या मित्राला हे मान्य नव्हतं.वर्गामध्ये  पहिल्या 5 मध्येही स्टिफन याचा नंबर नसायचा.मात्र घड्याळ,रेडिओ कसे काम करतात हे पाहण्याचा त्यांचा उत्साह दांडगा होता. 8-9 वर्ष वयाचे असतानाच आपण भविष्यात काहीतरी मोठे शास्त्रज्ञ व्हावे.असे त्यांना मनापासून वाटायचे.विज्ञानामुळे आपल्याला सत्य समजेल.नुसते घड्याळ, रेडिओ बाबतच नाही तर आजूबाजूच्या सर्व वस्तूबाबत देखील माहिती मिळावी असे त्यांना वाटायचे.त्यांना पुस्तक वाचण्याची जास्त आवड नसायची,परंतू पुस्तकाच्या मजकुरातील चुका शोधून काढण्यात त्यांना आनंद वाटायचा. ऑक्सफर्डच्या तिसऱ्या वर्षीचा खास विषय म्हणून त्यांनी "कॉस्मोलॉजी" या विषयाची निवड केली.विश्वाच्या उत्पत्तीचे व घटनेचे हे शास्त्र. 
विश्व कुठून आले? कसे निर्माण झाले?असे प्रश्न या क्षेत्रात निर्माण केले. म्हणूनच पीएचडी करण्यासाठी केंब्रिज विद्यापीठात त्यांनी अर्ज केला.आणि 1962 मध्ये त्या विद्यापीठात आले. 

 "स्टीफन" यांना वयाच्या 20 व्या वर्षीच असाध्यअशा "मोटर न्यूरॉन डिसीज" रोगाने गाठले .या रोगामुळे शरीरातले स्नायूवरचे नियंत्रण निघून जाते.स्नायूंची नैसर्गिक हालचाल करणारा मेंदूचा भाग निकामी होऊ लागतो. अशक्तपणा,अडखळत बोलणे आणि बोलताना त्रास होणे. आणि हळूहळू चालणे-बोलणे वगैरे सगळंच बंद होऊन जाते.दुरुस्त न होणारा आणि मरण जवळ आणणारा हा आजार, स्टिफन यांना झाल्याची बातमी त्यांच्यासाठी खूप धक्कादायक होती. मलाच या रोगाने का गाठले? असे त्यांना वाटायचे. पुढील काळात माझी परिस्थिती दयनीय होईल असे प्रश्न त्यांना पडायचे. पीएचडीचे संशोधन चालू ठेवावे मध्येच खंडित करू नये असे डॉक्टरांचे म्हणणे होते.परंतु स्वतःच्या अंगी असणारा प्रचंड आत्मविश्वास काहीतरी करून दाखवण्याची अफाट ऊर्जा मनामध्ये असल्यामुळे स्टिफन जास्तीत जास्त 2 ते 3 वर्ष जगतील अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात करत ते 76 वर्षे जगले.

स्टीफन हे केंब्रिज विद्यापीठात रोज सकाळी 11वाजता यायचे आणि आल्यानंतर त्या ठिकाणी संशोधक बरोबर चर्चा,मुलाखती, सेमीनार हे चालू असायचे, त्यांच्या शारीरिक प्रकृतीमुळे एक परिचारिका त्यांच्यासोबत नेहमी असायची ती त्यांच्या केसांचा भांग पाडणे, चष्मा पुसून देणे तोंडावर, मानेवर आलेली लाल पुसणे अशी कामे त्यांना करावी लागत.परंतु त्यांच्याबरोबर राहणे म्हणजे तेथील विद्यार्थ्यांना व परिचारिकांना एक प्रकारचे बक्षीस वाटायचे.

"स्टीफन हॉकिंग" यांना कुबड्या वर चालणे ही ज्यावेळी शक्य झाले नाही त्यावेळेस ते आपल्या विभागात व्हीलचेअरवर बसून जात. पायावर चालणे त्यांना अगदी अशक्य झाले होते.तरीही ते जास्तीत जास्त संशोधनात वेळ घालवत होते.स्टीफन हॉकिंग यांच्याकडे पाहिले की अपंगत्व ही जीवनातील किती क्षुल्लक गोष्ट आहे, हे आपल्या लक्षात येते.त्यांना आजारी म्हणणे देखील चुकीचे होते.

1974 मध्ये वयाच्या केवळ 32 व्या वर्षी स्टीफन हॉकिंग हे रॉयल सोसायटीचे सन्माननीय सभासद म्हणून निवडून गेले. ते FRS झाले. त्या कार्यक्रमाला प्रत्येक सभासदाला सन्मानपूर्वक निमंत्रण देऊन त्यांची प्रतिष्ठापना करतात त्यावेळी एका रजिस्टरवर सही करावी लागते. या रजिस्टरच्या सुरुवातीच्या पानावर न्यूटनची सही आहे. परंपरेप्रमाणे प्रेक्षक गृहातून सभासद स्टेजवर येऊन सही करतात. स्टीफन हॉकिंग च्या बाबतीत मात्र अपवाद करण्यात आला. तेथील अध्यक्ष हे स्वतः रजिस्टर घेऊन स्टीफन हॉकिंग यांच्या जवळ गेले. त्यांना सही करायला बराच वेळ लागला होता. ज्यावेळेस स्टीफन हॉकिंग यांनी सही करून डोके वर केले त्या वेळेस सर्व मान्यवरांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.संशोधन क्षेत्रात संपूर्ण जगतात हॉकिंग यांची कीर्ती खूपच वाढली. सहा सन्माननीय डॉक्टरेट, अमेरिकेतील मानाचं अल्बर्ट आईन्स्टाईन पारितोषिक मिळाले. एलिजाबेथ राणीने त्यांना  "Commander of the British Empire CBE" हे मानाचे बिरुद त्यांच्या नावानंतर लावण्याची परवानगी दिली.

"स्टीफन हॉकिंग" हे व्याख्याने देत असताना त्यांचे सहाय्यक त्यांची व्हीलचेअर ढकलत स्टेजवर आणत.व्हीलचेअरच्या एका हाताखाली संगणक पक्का केलेला असायचा. त्यामध्ये व्याख्यानाची सि.डी. टाकण्यात येते. श्रोत्यांना स्टीफन हॉकिंग धीर गंभीर वाटतात, स्थिर बसलेले दिसतात. पण व्याख्यान चालू असताना त्यांच्या पापण्यांची हालचाल होते, नाजुकसे हास्य त्यांच्या चेहऱ्यावर उमलते. त्या ठिकाणी दोन नर्सेस त्यांच्यावर लक्ष ठेवून उभ्या असतात त्यांना मदत लागेल तेव्हा येऊन मदत करत.व्याख्यानानंतर श्रोत्यांना प्रश्न विचारावे अशी ते विनंती करत. व्याख्यानाच्या दरम्यान त्यांची लाळ पुसणे, चष्मा स्वच्छ करणे, केस मागे नेणे ही कामे त्या नर्सेस करत.

स्टेफिन यांनी 1988 मध्ये"A Brief History of Time" हे पुस्तक लिहिले त्यावेळी त्यांची अपेक्षा एकच होती की, माझे पुस्तक हे शहरातील सर्व ठिकाणी वाचायला उपलब्ध व्हावे. आणि खरोखरच हे पुस्तक प्रचंड प्रसिद्ध झाले, जवळपास 30 भाषेत हे पुस्तक अनुवादित झाले. आणि त्याच्या लाखो प्रती सर्वत्र विक्रीत झाल्या. सर्वांचे या पुस्तकावरचे अपार प्रेम,ओथंबून  येणारी पत्रे, मुलाखती, टीव्हीवरील सहभाग वाढू लागले. त्यामुळे स्टिफन हे आणखीन जगभर प्रसिद्ध झाले.परंतु माणसाला जीवनात यश जसे मिळू लागते तसं माणूस आपल्या घरातील मंडळी पासून दूर होत जात असतो. तसेच काही त्यांच्या कुटुंबाबाबतीत झाले, कारण त्यांची पत्नी जेन यांनी जीवनाच्या प्रत्येक प्रवासात स्टिफन यांच्याबरोबर मोलाचं योगदान दिले तसेच मुलांचे शिक्षण, त्यांची सर्व व्यवस्था ती पाहत असत. स्टिफन यांच्यात असाध्य रोगामुळे चिडचिडपणा निर्माण व्हायचा तरीही जेन त्यांची अत्यंत चांगल्या प्रकारे काळजी घेत. परंतु दोघांमध्ये घटस्फोट झाला आणि दोघेही विभक्त राहू लागले.स्टिफन यांची पत्नी जेन यांनी 1999 मध्ये"Music to move the starts My life with stephen" पुस्तक लिहिलं ते जवळपास 610 पानांचं त्यामध्ये जेन ने संपूर्ण घडामोडी या पुस्तकात लिहिल्या आहेत. मात्र या गोष्टीच्या दोन्ही बाजू पडताळणे गरजेचे आहे असे काही लोकांचे मत होते.

स्टीफन हॉकिंग यांचा भक्कमपणा, प्रचंड आत्मविश्वास, जबरदस्त व्यक्तिमत्व ,हे त्यांचे वैशिष्ट्य. ते सहसा तडजोड करत नाहीत, आपल्या मतावर ठाम असत. विनोदाची त्यांची वृत्ती, सहज प्रवृत्ती आहे. त्यांचे खूप हितचिंतक आहेत. तसेच त्यांना खूप मित्र आहेत.अपार प्रतिभेचा,अचाट बुद्धिमत्ता असलेला स्टीफन हॉकिंग यांनी अवकाशाची पोकळी रिकामी नाही. कृष्णविवर कृष्ण नाहीत.असे वरवर पाहता अर्थहीन वाटणाऱ्या सिद्धांतांचे जनक. तसेच महास्फोट निर्मितीमुळे विश्वाची सुरुवात खऱ्या काळात झाली आहे, परंतु त्याच बरोबर दुसऱ्या प्रकारचा काळ आहे तो काल्पनिक आहे व तो खरे काळाची काटकोनात आहे. थोडक्यात म्हणजे विश्वाची निर्मिती ही पदार्थ विज्ञानाच्या नियमाने निश्चित करता येते परमेश्वराने लहरी प्रवृत्तीने विश्व निर्मिती केली,आणि विश्व अशा लहरी प्रकारे पुढे जात आहे. असे म्हणता येणार नाही. परमेश्‍वराचे अस्तित्व आहे का नाही याबद्दल हे सिद्धांत कोणतीही टिप्पणी करत नाही.ते तेवढेच म्हणत 'तो लहरी नाही, मनमानी करणारा नाही. ज्या माणसाला पाहताना आपल्याला कणव येते,काळजी वाटते.तो माणूस काळ आणि अवकाश यांच्या सीमारेषा कशा असाव्यात,पण प्रत्यक्षात नाहीत हे दाखवून देतो संपूर्ण विश्वाला एकाच सत्याच्या सर्वकष सिद्धांताने एका सूत्रात मांडणारे दुसरे आईन्स्टाईन? दुसरे न्यूटन?

"स्टीफन हॉकिंग" या पुस्तकातून दुर्धर आजारावर मात करत असताना केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर असाध्य ते साध्य होऊ शकते हे आपणास दिसून येते.जीवन सरळ, साधे, सोपे नसते आपल्या परिस्थितीत सुंदर जगायचा आपण प्रयत्न करायला हवा.हा खूप मोलाचा संदेश या पुस्तकातून मिळतो. तसेच अजून खूप काही या पुस्तकामध्ये वर्णन केले आहे ते वाचण्यासाठी आपण सर्वांनी आवश्य हे पुस्तक वाचावे. 
*पृष्ठसंख्या -70* 
*अभिप्राय शब्दांकन*
          Ganesh Tambe 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know