Friday, July 2, 2021

पुस्तकाचे नाव :- सर्वोत्तम भूमिपुत्र:गोतम बुध्द

*वाचाल तर वाचाल...११२*

पुस्तकाचे नाव :- सर्वोत्तम भूमिपुत्र:गोतम बुध्द
लेखक :-  डॅा. आ.ह. साळुंखे 
प्रकाशन :- लोकायत प्रकाशन 
किंमत :-   रू. ५८०/-

*जागतिक प्रश्न सोडवण्यासाठी युद्ध नको, तर बुद्ध हवा..!* 
     गोतम बुध्द या ग्रंथात डॅा. आ.ह. साळुंखे यांनी बुध्दांचे जीवनविषयक तत्वज्ञान विशद केले आहे. यात एकूण २१ प्रकरणे आहेत. मानवी जीवन सुखकर होण्याचा उत्तम मार्ग बुध्द तत्वज्ञानातून आपल्याला समजतो. ज्ञानासाठी परंपरेच्या नव्हे तर स्वानुभवाच्या मार्गाने जाऊ या, माझ्या धम्माचे वारसदार व्हा..भौतिक गोष्टींचे नव्हे, सम्मा वाणीखेरीज मनुष्यत्वाचा पूर्ण विकास अशक्य, गृहस्थजीवनाचा आदर..राष्ट्रजीवनाची काळजी, जन्माने वा वर्णाने नव्हे तर शीलाने आणि प्रज्ञेने मनुष्य श्रेष्ठ होतो, मी लाकडे जाळण्याऐवजी  आंतरिक ज्योती उजळवितो, मुलगी जन्मली म्हणून उदास होऊ नका, भिक्खूंनो, बहुजनांच्या हितासुखासाठी चालत रहा, नाव घ्या न घ्या, तथागत आपल्या हृदयाच्या स्पंदनात आहेतच अशा प्रकरणातून आपल्याला बुध्द तत्वज्ञान दर्शन होते. 
    तथागत गौतम बुद्धाचे मूळ नाव सिद्धार्थ होते. अशक्य कार्य सिद्धीस नेणारा म्हणजे सिद्धार्थ होय.कारुण्य, प्रेम, शांती व अहिंसा हे त्यांचे जीवनतत्व होते.
       सिद्धार्थला सर्व प्रकारचे शिक्षण देण्यात आले. त्यांचा विवाह यशोधरेबरोबर झाला.त्यांना राहुल नावाचा मुलगा होता. ऐश्वर्य त्यांच्या पायात लोळत होते.परंतु मानवी जीवनात असणाऱ्या दुःखाने ते अस्वस्थ होते.दुःख नष्ट होऊन सर्वांना सुख मिळावे, या उदात्त हेतूने त्यांनी गृहत्याग करण्याचा निर्णय घेतला. ऐन तारुण्यात म्हणजे तिशीत असताना त्यांनी आनंददायी जीवनाचा त्याग केला.ते कपिलवस्तूवरून राजगृह आणि नंतर गया येथे आले.तेथे ज्ञानार्जन केले.कठोर कष्ट घेतले.वेद, उपनिषद वाचली.त्यातील निरर्थकता त्यांनी ओळखली.त्यांना सर्वोच्च ज्ञान प्राप्त झाले. ते आता बुद्ध झाले.पण ते एकांतात थांबले नाहीत.ते लोकांत जाऊन बोध करू लागले. 
    सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी पहिले प्रवचन वाराणशी जवळील सारनाथ येथे केले. बुद्धाने सांगितलेले तत्वज्ञान पुढीलप्रमाणे आहे.
*"जीवन हे दुःखमय आहे,त्यामागे तृष्णा आहे,पण दुःखाचे निराकरण होऊ शकते,तो मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग आहे."*  पूर्वजन्म- पुनर्जन्म, कर्मविपाक या अज्ञानी बाबी नाकारून त्यांनी मानवाला आत्मविश्वास दिला. अत्यंत साध्या सोप्या लोकभाषेत म्हणजे पाली भाषेत त्यांनी बोध केला.त्यांनी वेदप्रामाण्य नाकारले. त्यांनी ऐश्वर्यसंपन्न जीवनाचा त्याग करून लोककल्याणासाठी आयुष्याची अखंड ५० वर्षे गावोगावी परिभ्रमण केले.त्यांच्या विचाराने जनसमुदाय प्रभावित झाला.अनेक राजांनी बुद्धांचा विचार अंगिकारला.
      बुध्द म्हणतात,*"जीवंत माणसांचा विचार करा,स्वर्ग,नरक,पूर्वजन्म,पुनर्जन्म,आत्मा या थोतांडात अडकू नका.,"*
        मुलगी सुद्धा शारीरिकदृष्ट्या,मानसिकदृष्ट्या आणि बौद्धिकदृष्ट्या सामर्थ्यशाली असून ती देखील वंशवर्धक आहे असे सांगून अडीच हजार वर्षांपूर्वी मुलींना वंशाचा दिवा मानून त्यांना  स्वातंत्र्य देणारे बुद्ध होते.ज्या काळात मुलगाच जन्माला(पुत्रकामेष्टी) आला पाहिजे, असे वैदिक(ब्राम्हणी) परंपरा सांगत होती.त्या काळात बुद्ध मुलगी देखील मुलाप्रमाणेच वंशाचा दिवा आहे, असे आग्रहाने सांगत होते.त्यांनी स्त्री-पुरुष भेदभाव नाकारला. आनंदशी झालेल्या विचारमंथनातून त्यांनी महिलांना संघगणात प्रवेश दिला.त्यांना ज्ञानार्जनाचा अधिकार दिला.
    मानव हीच एक जात आहे.त्यामुळे माणसांनी माणसांशी विवाह करणे, हा आंतरजातीय विवाह नव्हे,तर तो एकजातीय विवाह ठरतो. बुद्धाने धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजेच *अत्त दीप भव* हा सिद्धांत सांगितला. बुद्धाचा धम्म हा निसर्गवादी, बुद्धिप्रामाण्यवादी आहे, त्यात विकृतीला थारा नाही. 
   तथागत गौतम बुद्ध हे समता, बुद्धिप्रामाण्यवाद,महिलांचे स्वातंत्र्य सन्मान,अहिंसा,सत्य,अस्तेय,असंग्रह,नैतिकता सांगतात. हिंसेने प्रश्न सुटत नसतात, तर वाढत असतात.सत्याने वागले तर मनस्ताप होत नाही.गरजेपेक्षा जास्त धनसंचय झाला तर प्रबोधनाऐवजी संपत्ती वाचविण्यासाठी शत्रूला शरण जावे लागते.त्यामुळे अतिरिक्त अनाधिकृत संपत्ती शरणांगत बनविते.क्रांतीला अडथळा ठरते.त्यामुळे या नितीमूल्यांचे पालन करण्याचा आग्रह बुद्ध धरतात.
*सर्वोत्तम भूमिपुत्र:गोतम बुध्द*हा ग्रंथ आपल्या संग्रही हवाच असा..!! 



*परस्परांना पुस्तके भेट द्या. वाचन चळवळ जोपासा* 

-ॲड.शैलजा मोळक 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know