Sunday, June 27, 2021

जेव्हा_चांगल्या_लोकांच्या_बाबतीत_वाईट_गोष्टी_घडतात

#जेव्हा_चांगल्या_लोकांच्या_बाबतीत_वाईट_गोष्टी_घडतात

                लेखक : हेराँल्ड कुशनर
                प्रकाशक : जयको पब्लिकेशन

लेखकाविषयी:
हेराँल्ड कुशनर हे वर्ल्ड बेस्ट सेलर लेखक असून ते मँच्युसेट येथे सन्माननीय रब्बाय (ज्यू धर्मगुरू, शिक्षक काउन्सेलर) 
आयुष्यातील अवघड घटनांना कसे सामोरे जायचे हयाबद्दल त्यांनी विपुल लेखन केले आहे.

पुस्तकाविषयी
लेखक कित्येक जणांचे सांत्वन आणि समुपदेशन करायचे पण त्यांच्या आयुष्यात दुर्दैवी घटना घडली त्यांच्या मुलाला आरोनला प्राजेरिया (लवकर वयस्क बनवून मृत्यू देणारा रोग )झाला. त्यामुळे तो दिवसेंदिवस जर्जर होऊन मरणाच्या वाटेवर जात होता. त्याला त्रासात पाहून वडिलांच्या काळजाला पीळ पडत होता.
शेवटी तो वयाच्या चौदाव्या वर्षी हे जग सोडून गेला. पण त्या मधल्या काळात त्यांनी जे अनुभवले त्यावरून हे पुस्तक लिहिले.

पुस्तकाचे सार : 
सर्वप्रथम वाईट गोष्टी काय काय घडू शकतात ते समजून घेऊया 
1.  आजारपण आणि मृत्यू
आपले किंवा प्रियजनांना झालेले आजार मग ते दुर्धर, अनुवांशिक ,बरे होणारे,जीवनशैलीचे कसेही असू शकतात
आणि त्या आजारपणांमुळे स्वतःला किंवा कुटुंबाला भोगावा लागणारा त्रास किंवा अपमृत्यू
2 . अपघात आणि दुर्घटना (भूकंप, पूर इत्यादी ) यांचा बळी ठरणे
3. घटस्फोट
4. गरिबी
5. नोकरी न मिळणे किंवा गमावणे
6. व्यवसायधंद्यातील अपयश

लेखकाच्या मते या वेगवेगळ्या अवस्थेमागची कारणे जेव्हा आपण शोधतो तेव्हा बर्याचदा माणूस स्वतः च कारणीभूत असतो, पण तो दोष परमेश्वराला देत असतो.
परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केल्यानंतर निसर्गनियम ठरवले तसेच मानवाला संपूर्ण स्वातंत्र्य दिले त्यामुळे परमेश्वर नियम आणि स्वातंत्र्यात बाधा आणत नाही 
आपल्या धर्मशास्त्राने माणसाने नैतिक आचरण करावे हयासाठी पापपुण्याच्या संकल्पना आणल्या आहेत.
पण त्यामुळे आपण चांगले वागलो की पुण्यकर्मामुळे आपल्याला देवाने बक्षीस द्यावे असे वाटते पण घडते भलतेच आपल्यासोबत वाईट घडते म्हणून मात्र माणसे दुखावली जातात. 
माणसात न्यूनगंड निर्माण होतो, माणूस स्वतः चा तिरस्कार करतो आणि त्याचबरोबर परमेश्वराचाही तिरस्कार करू लागतो.
कारण जेव्हा कुणीही सोबत नसते तेव्हा देवच आपला सोबती वाटतो पण जेव्हा परमेश्वरच दुरावतो तेव्हा माणसाला अगदी असहाय्य वाटते आणि याचे पर्यावसान नैराश्य आणि शेवटचा आत्महत्येचा पर्यायही स्वीकारला जातो.
पण एवढे होऊनही हयामागची कारणे किंवा आपण कुठे चुकलो का हे मात्र शोधले जात नाही. 
कधीकधी चुका हया नकळत अजाणतेपणी,अज्ञानामुळे होतात तर कधी  आपल्या मनाच्या इच्छेमुळे...
कधी चुका धर्माने निषिध्द ठरवलेल्या गोष्टी (काम, क्रोध, मोह , मत्सर, अहंकार , आळशीपणा, अधाशीपणा ) यामुळे झालेल्या असतात 
कधी कधी कितीही शोधले तरी चूक कुणाची हेच समजत नाही
 त्यामुळे
➡️आपण स्वतःला क्षमा करायला हवी 
➡️ दुखापासून दूर न पळता दुखाचा सामना करायला हवा.
➡️ सदासर्वकाळ आपण आनंदी राहू शकत नाही हे सत्य स्वीकारा
➡️ गोष्टीमागचे कारण नाही समजले तर निरर्थक त्रागा नको.
➡️ माझ्याच बाबतीत का  असे वाटून स्वतःला दुख करून घेऊ  नये 
➡️ आपल्याला दुख झालेय म्हणून इतरांना दुखवू नये
➡️ दुख करूणेतूनच माणूस सृजनशील होतो हे ध्यानात घ्यावे 
➡️ जे स्वतःला दुखावणे थांबवतात त्यांनाच देव मदत करतो
➡️ वाईट घटनांना आपल्या आयुष्याचा एक भाग समजा
➡️ वाईट घटना म्हणजे संपूर्ण आयुष्य नाहीत. 
➡️जे झाले त्यातून धडा घेत आयुष्यात पुढे जात राहणेच श्रेयस्कर 
➡️ घडलेल्या घटनांपेक्षा आपला प्रतिसाद भविष्यकाळ ठरवतो
➡️ परमेश्वर आपल्या आयुष्यातील वाईट घटना थांबवू शकत नाही ➡️ जे घडते आपण निवडलेले असते किंवा तशी अंतप्रेरणा असते ➡️परमेश्वर आपले दुख हलके करण्याला मदत करू शकतो,
➡️ परमेश्वर आपल्याला मानसिक दृष्टीने खंबीर बनवू शकतो 
➡️ परमेश्वर इतर लोकांना आपले दुख हलके करण्याची प्रेरणा देऊ शकतो.
➡️ गतकाळातील स्मृती तर धुवून काढणे तर आपल्याला शक्य नसते पण आपण विचार प्रक्रियेतून, आत्मचिकित्सेतून ,स्पष्ट अवधान राखून आपले मन दुखापासून मुक्त ठेवू शकतो
➡️ कधीकधी दोष आपला नसतो तर परिस्थितीचा असतो तिथे आपल्याला निवडीचा पर्यायच उपलब्ध नसतो तेव्हा जे होईल ते हसत हसत ते दुखणे सहन करण्याशिवाय आपल्या हाती काहीच नसते
➡️ आपले अंतकरण वैर द्वेष हिंसा हयापासून मुक्त ठेवायचे असेल तर निर्हेतूक खरे प्रेम ईश्वरावर आणि आपल्या जिवलगांवर करू शकतो 
प्रेम आणि चांगुलपणा हे सद्गुण ह्दयात असलेला मनुष्य आपल्या कृत्यांसाठी परमेश्वराला दोषी मानत नाही.
➡️आपल्या अंतकरणातील प्रेम आणि चांगुलपणा हेच आपल्याला सद्गुण आणि सद्बुद्धी देतात त्यामुळे नकारात्मक गोष्टींना बळी न पडता परमेश्वरावर विश्वास ठेवा

समाप्त
Nilesh Shinde 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know