Saturday, January 22, 2022

: मृत्यूचे महाचुंबन घेणारा महाकवी 'साने गुरुजी'.

वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य 

पुस्तक क्रमांक : 83.

पुस्तकाचे नाव : मृत्यूचे महाचुंबन घेणारा महाकवी  'साने गुरुजी'.

लेखक  : आचार्य अत्रे.

वाङमय प्रकार : चरित्र.

पृष्ठसंख्या  : 141.

स्वागतमूल्य : 130₹.

प्रकाशन संस्था : पार्श्व
                       पब्लिकेशन.

पुस्तक परिचयकर्ता : मनोज अग्रवाल.

  सदरील पुस्तक हे आचार्य अत्रे यांनी सानेगुरुजी यांच्याबद्दल लिहिलेले विविध लेख आहेत .साने गुरुजी यांच्या महानतेबद्दल लिहिलेल्या लेखांचा संग्रह म्हणजेच मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी साने गुरुजी हे पुस्तक होय .आचार्य अत्रे यांचे ज्याप्रमाणे वक्तृत्वावर विशेष  प्रभुत्व होते अगदी त्याचप्रमाणे त्यांचे लेखनावरही विशेष प्रभुत्व होते .लेखनात त्यांचा विशेष हातखंडा होता हे त्यांनी लिहिलेल्या विविध लेखांच्या माध्यमातून आपल्या  लक्षात येते.  सदरील पुस्तक हे एकूण तीन विभागांमध्ये विभागले गेले आहे .

विभाग पहिला  

पहिल्या विभागामध्ये एकूण चार प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे .श्यामची आई चित्रकथा ,साने गुरुजींच्या जन्मभूमीत, चित्रीकरणाला प्रारंभ, महाराष्ट्रात मातृप्रेमाचा महापूर अशी ही चार प्रकरणे आहेत .ज्याप्रमाणे ऊन आणि थंडीमुळे फुलांचा विकास होतो अगदी त्याप्रमाणेच आईच्या रागामुळे आणि  अनुरागामुळे मुलांचा विकास होत असतो हा उच्चकोटीचा विचार या प्रकरणात दिलेला आहे .नाशिकच्या तुरूंगामध्ये असताना श्यामने मित्रांना सांगितलेली आईची आणि वडिलांची गोष्ट येथे नमूद करण्यात आले आहे .सानेगुरुजी यांनी लिहिलेल्या श्यामची आई हे पुस्तक वाचल्यानंतर त्याला रुपेरी पडद्यावर आणण्याचे अत्रे यांनी ठरवले होते आणि मग ते त्यांच्या गावी जाऊनच आपल्याला चांगल्या रीतीने समजेल म्हणून  आचार्य अत्रे साने गुरुजींच्या गावी गेले आणि त्यांनी प्रत्यक्ष त्यांचं गाव बघून नंतरच या चित्रपटाची आखणी केली .जयप्रकाश नारायण यांच्या शुभहस्ते ज्योती स्टुडिओमध्ये चित्रीकरणाला प्रारंभ झाला .श्यामची आई हा चित्रपट महाराष्ट्रात एवढा प्रसिद्ध झाला  की जणू महाराष्ट्रात मातृप्रेमाचा महापूर वाहू लागला  या शब्दामध्ये आचार्य अत्रे यांनी या चित्रपटाची स्तुती केलेली आहे .अतिशय सुंदर मांडणी या चित्रपटाची होती.

विभाग दुसरा 

दुसऱ्या विभागात सानेगुरुजींचा वैकुंठवास ,मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी,  साने गुरुजींचे सुवासिक स्मरण या प्रकरणांचा समावेश करण्यात आलेला आहे .साने गुरुजी यांचा स्वभाव प्रेमळ होता .ते कोणालाही दुखावत नसत.समाजातील काही लोकांनी या स्वभावाचा गैरफायदा घेतला .अशा जगात राहणे नको असा निर्णय सानेगुरुजींनी घेतला आणि त्यांनी झोपेच्या सोनोरील नावाच्या गोळ्या खाऊन स्वत:ला संपवले .ही बातमी ऐकून महाराष्ट्रातील लोकांना खूप दुःख झाले .जातीयता, प्रांतीयता नष्ट करण्यासाठी गुरुजींनी खूप प्रयत्न केले .सानेगुरुजींनी शेवटच्या पत्रात नमूद केले होते की मला देवाघरच बोलावणं आलं आहे.

विभाग तिसरा  

तिसऱ्या विभागात सानेगुरुजींचे उपोषण  ,खान्देशात सानेगुरुजी समवेत , गुरुजींच्या जीवनाचे काव्य या प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे .साने गुरुजी उपोषणाला बसले असताना त्यांना वाचवण्यासाठी अत्रे यांनी भाषणात लोकांना नम्र, भावनिक आवाहन केले होते.साने गुरुजी यांच्यासोबत व्यतीत केलेले क्षण येथे अत्रे यांनी व्यक्त केले आहेत. साने गुरुजी खूप हळवे होते असे अत्रे लिहितात.ते मायाळू, कनवाळू मनाचे होते असे वर्णन आचार्य अत्रे यांनी साने गुरुजी यांचे केले आहे.

   साने गुरुजी एकदा जळगावला गेले असताना त्यांना काही मुले जेवण्यासाठी बोलावण्यास आली. गुरुजी जेवायला गेले. जेवण करून परतल्यावर आणखी काही मुले जेवण्यासाठी बोलावण्यास आली. साने गुरुजी म्हणाले,"बाळांनो ,माझे आताच जेवण झाले. आता मला जेवण्याचा आग्रह करू नका."त्यावेळी मुले रडू लागली. साने गुरुजी देखील रडू लागले.नन्तर ते त्या मुलांसोबत जेवायला गेले. एवढे महानपण साने गुरुजींच्या अंगी होते.

    हे पुस्तक वाचताना अनेकदा साने गुरुजी यांचे निरागस व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर तरळते.अनेकदा आपले डोळे भरून येतात. सहनशीलता महान पणाचे द्योतक आहे, हे आपल्याला पटते. साने गुरुजींना सलाम!
एक महान मातृहृदयी व्यक्तिमत्त्व म्हणजे साने गुरुजी होते.

 साने गुरुजी, आचार्य अत्रे यांना विनम्र अभिवादन!!

  मनःपूर्वक धन्यवाद..!

   मनोज अग्रवाल, औरंगाबाद.

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know