Saturday, October 23, 2021

पुस्तकाचे नांव--सर्कसबरोबर चाळीस वर्षे

वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
 परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
 पुस्तक क्रमांक-६४
 पुस्तकाचे नांव--सर्कसबरोबर चाळीस वर्षे
 लेखकाचे नांव--बंडोपंत देवल
शब्दांकन-शशी पटवर्धन
प्रकाशक-मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-फेब्रुवारी १९८२/प्रथमावृत्ती
एकूण पृष्ठ संख्या-१९१
वाङमय प्रकार ( कथा, कादंबरी, ललित ई.)--चरित्र गाथा
मूल्य--३०₹
📖📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚६४|| सर्कसबरोबर चाळीस वर्षे
             लेखक-बंडोपंत देवल 
           शब्दांकन-शशी पटवर्धन
----------------------------------------------
'सर्कस' या खेळाचे बालपणी फार कुतूहल होते.अद्भुत दुनियेतील साहस,धाडस अन् थरारक कसरती डोळे दिपवतात.वेगळे कल्पनेच्या पलीकडील विश्र्वातील मनाला भुरळ घालणारे कसरतीचे आकर्षक खेळ दाखवून मनोरंजन करतात. पाळीव आणि जंगली श्वापदांचे खेळ बघताना आनंद द्विगुणित होतो. प्राण्यांंच्या गोल रिंगणात  रिंगमास्तरच्या चाबकाच्या इशाऱ्यावरील मनमोहीत करणारे खेळ.एकाचवेळी हजारो माणसांना खिळवून ठेवणारा मनोरंजक,साहसी नजरबंदी करणारा करमणूक करणारा रिंगणातील खेळ ''सर्कस'' यातील बालपणी विदुषकाचे खेळ फार धमालकरायचे.मनापासून रसिक प्रेक्षक टाळ्यांच्यागजरात दाद द्यायचे.

  माणसं आणि जंगली प्राणी यांच्या एकत्रित कसरतींतून अफलातून मनोरंजन केलं जायचं, प्रत्येक सर्कस ही मनोरंजनाचं पूर्ण वर्तुळ पूर्ण व्हायचं.त्यात विनोद असायचा आणि थरारही असायचा.विदुषकाची कला तर सर्कसचा जीव की प्राणच.जंगली प्राण्यांशी  मैत्री आणि रिंगमास्तरांची तालीम बघून कौतुक वाटायचे.एकसारखेच,चमचमणारे कपडे.झुल्यावरील  झोके घेणारे कसरतपटू आणि त्यांच्या त्या आवाक् करणाऱ्या योजनाबद्ध,न चुकणाऱ्या कसरती,साहजिकच प्रत्येक कसरत उत्सुकता निर्माण करायची आणि मग खेळ संपल्यावर कल्पनेपलीकडचा निर्भेळ आनंद मिळायचा. 
सर्कशीत बघितलेल्या अनेक दृश्यांच्या आठवणी चिरकाल स्मरणात राहायच्या.खेळ बघताना मन रममाण होवून जायचे.अद्भुत सर्कस कलाकारीच्या दुनियेचा जीवनप्रवासाचा परिचय आज करतोय. 

शशी पटवर्धन शब्दांकित 'सर्कसबरोबर चाळीस वर्षे'हे पुस्तक वाचताना आत्तापर्यत गावी,वाई, सातारा,कराड आणि पुणे येथील बघितलेले सकाळचे आणि रात्रीच्या विद्युत रोषषणाईतील खेळ नजरे समोर तराळले.हजारो प्रेक्षकांना एकाच वेळी खिळवून ठेवून मनोरंजन करणारे कलाकार.या कलाकारांच्या साहसी प्रात्यक्षिक कसरती मागील त्यांच्या जीवन मानावर या पुस्तकात प्रकाश टाकला आहे.

काशिनाथ सखाराम उर्फ बंडोपंत देवल हे जगविख्यात सर्कसचेमालक 'दि वेस्ट क्लाऊन इन् इंडियन सर्कस' असा उल्लेख अभिमानाने केला जातो.त्यांच्या सर्कसमय विश्र्वातील कसरतींचा सुखदुःखाचा खेळ या पुस्तकात शशी पटवर्धन यांनी मांडला आहे.बंडोपंत देवल यांनी विदूषक,जगलर,अॅनिमल ट्रेनर आणि रिंगमास्टर अशा चौफेर भूमिकांचे दर्शन यातून सगळे घडते.सर्कशीतील कलाकारांचा रिंगणाबाहेरील आयुष्याचा मनोवेधक आलेख.जीवनपटाचा आलेख या पुस्तकात उलगडला आहे. प्रोफेसर विष्णुपंत छत्रे यांनी भारतात पहिली सर्कस सुरू केली.या घटनेला शंभरपेक्षा जास्त वर्षे होऊन गेली.तदनंतर अनेक सर्कशी उभारल्या काहींनी तर परदेशातही नावलौकिक मिळविला आहे.

महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील तासगांव-म्हैसाळ भाग म्हणजे सर्कस कलाकारांची जन्मभूमी. याच भागात सर्कस जन्मली अन् फोफावली.या भागात त्या काळी नामांकित पंधरा एक सर्कशी होत्या त्यातीलच 'देवल सर्कस'

  मिरज तालुक्यातील म्हैसाळ गावचे देवल कुटूंबियांची'देवल सर्कस' जगप्रसिद्ध आहे.यातील बहुतांश कलाकार याच मातीतले.त्यांचा उलगडा लेखमालिकेतून सर्कसबरोबर चाळीस वर्षे कशी अनुभवली याचे वर्णन सहज सुंदर सोप्या भाषेत व्यक्त केले आहे.प्रारंभीच 'प्रो.देवल्स सर्कस'या ब्रॅण्डचे संस्थापक सर्कस सम्राट कै.व्यंकटराव उर्फ बाबासाहेब देवल आणि मालकबंधू दादासाहेब देवल व बंडोपंत देवलयांची छायाचित्रे आहेत.तसेच सर्कशीतील खेळांची कसरती करतानाची कृष्णधवल छायाचित्रे वास्तवता दर्शवून आठवणी उजळवतात.तर समूह फोटो रिंगणाच्या मागील कलाकारांचे चेहरे अधोरेखित करतात.

दररोजचा खेळ संपल्यावर सायबू माहूत मोडक्या तोडक्या हिंदीत अभिमानाने गाणं गुणगुणत असायचा…

मजा करते है,हम यार ,देवल सर्कसवाले
म्हैसाळ हमारी बसती
दूध,दही ज्वाआर बहुत सस्ती
वहॉसे कृष्णानदी बस्ती
उसके पानी पिनेवाले
मजा करते है‌,हम यार देवल सर्कसवाले 
 विजयादशमी सीमोल्लंघन आमच्या सर्कशीचा वर्धापनदिन साजरा करायचो. त्यानिमित्ताने आमचा सर्कशीचा पहिलाखेळ सुरू करुन हंगामाला शुभारंभ व्हायचा. बंडोपंत देवल सर्कसच्या यशाचे गमक उत्तम तंबू,उत्तम व्यवस्था,उत्तम खेळ आणि उत्तम बॅंड यांना देतात. हे असेलतर आपण यशस्वी होतो. कारण बॅंड म्हणजे सर्कशीची बोलकी जाहिरात असते.
ज्या गावात मुक्काम आहे,त्या गावात जाहिरात करण्यासाठी हत्तींची मिरवणूक निघाली की अग्रभागी ज्यूनिअर लोकांचे बॅंडपथक असतं.उद्घाटनाच्या खेळाला पाहुण्यांचे स्वागत व सलामी बॅंडचीच झडायची.प्रेक्षकांची गर्दी जमवायला सर्कसच्या प्रवेशद्वारावर बॅंड पथकच तालासुरात वाजत-गाजत असायचं.
सर्कसच्या जगतातील अनुभव समृद्ध चाळीस वर्षांत खूप शिकायला मिळालं.

विदूषक म्हणजे सर्कशीचा प्राणच असतो.बंडोपंत देवल तनमन अर्पूण विदूषक उभा करायचे.विदूषक केवळ हसवण्यासाठी नसतो.
खेळाचा प्रयोग वेगवान करणं महत्त्वाचं असतं. समयसूचकता, चापल्य, हजरजबाबी आणि खिलाडूवृत्तीने कलाकुशलता दाखवत रसिक प्रेक्षकांना हसवत ठेवावं लागतं.त्यामुळे लेखक मोठ्या जिद्दीने विदूषकी कसरती सादर करायचे.परदेशात युरोपियन सर्कशीत तर जाहिरात पत्रावर विदुषकाचे फोटोंसह नांव छापलेले असते.पोशाख चढवला तोंड रंगवलं की आपण रडणं सुध्दा प्रेम त्यांना हसायला लावतं.इतकी ताकद विदुषी कलाकारात असते.त्यामुळे माझी.ओळख इतर कामांपेक्षा 
विदूषक म्हणूनच सर्वपरिचित होती.हे ते आवर्जून सांगतात.

सर्कशीतीलशिकारखाना,हत्ती,घोडे,वाघ, सिंह,कुत्री, विविध रंगांचे पक्षी यांच्या कडून अनेक नवेनवे खेळ व कसरती बसवतात.अनेक सुखदुःखाच्या,आनंदाच्या भरात. उन्हाळ्यपावसाळ्याचे वर्णंन खुमासदार शैलीत वास्तवतेला भावस्पर्शी करुन केलेले आहे.
पडद्यामागच्या कलाकारांची ओळख या पुस्तकाने अधोरेखित होते. साहसी खेळांची वर्णने व त्यावरील प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया वाचताना सर्कसचे ममत्व लक्षात येते.अतिशय सूक्ष्मपणे सर्व बाबींचे वैशिष्ट्यासह लेखन उठावदार दिसते.

या आत्मचरित्र गाथेची सुरवात मुक्काम देवल सर्कस पपासून होऊन समारोप कृतार्थ कृतज्ञ मी!ने झालाय.बालपणात बघितलेला खेळ सवंगड्यात खेळत खेळत सर्कशीत जाण्याचं मनाने ठरविलेले प्रत्यक्षात उतरत असताना घडलेल्या प्रसंगाचे वर्णन वाचताना लेखक नामवंत कसे झाले याची प्रचिती येते.

अकराव्या वर्षी सर्कशीत,घरची आठवण आली तरी रडायचं नाही,ब्रम्हदेश-सिंगापूर-सिलोन परदेशात जाणं,समुद्रातून कार्गो बोटीतला थरारक प्रवास आणि गमतीजमतींचे यथार्थ वर्णन केले आहे.
पुणे येथे मुक्काम असताना लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या हस्ते बाबासाहेब देवांना सन्मानित करुन सत्कार केला होता.त्यांनी कलाकारांचे खेळ पाहून प्रशंसा केली होती."सर्कस ही अस्सल स्वदेशी कला आहे. हिंदुस्थानी लोक परदेशातही कला सादर करीत आहे.याचा अभिमान बाळगणे महत्त्वाचे आहे".असे गौरवोद्गार काढून बाबासाहेब देवल यांना सर्कससिंह किताब देवून गौरविण्यात आले होते.संकटांचा महापूर कोसळत होता.सर्कसची वाताहत झाली.ताराबाई सर्कशीत नोकरी पत्करली.चौदा महिने अज्ञातवासात काढले.मग आम्ही मालक झालो. म्हैसूरच्या दरबारात दसऱ्याला खेळ सादर केला.

 आगीच्या तावडीतून सुटका, संकटांचा काळ ,गांधार देशात देवल सर्कसचे खेळ,अपशकून,मिरजेला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सहवास, काठेवाडीत दादासाहेबांचं आजारपण, दुसरे महायुद्ध आणि सर्कस,सर्वस्वाची होळी, कडाक्याच्या महागाईत खेळांचं उत्पन्न घटत गेलं.सिनेमामुळं प्रेक्षकांची रुची बदलली.मगनिवृत्ती घेतली.देवल सर्कसची अखेर. सर्कसच्या जगात आणि मराठी सर्कसची पीछेहाट अशा लेखांमधून "सर्कसबरोबर चाळीस वर्षे" प्रवासाचा उलगडा होतो.सर्कस जगतातील वास्तव सुखदुःखाचे घटनाप्रसंग वर्णन करण्याचे कसब बंडोपंत देवल आणि शशी पटवर्धन यांनी कसरतींचे शिवधनुष्य लीलया लेखणीबध्द केले आहे.

मराठी सर्कसचा इतिहास दस्ताऐवज  पुस्तक रुपाने वाचक रसिक प्रेक्षकांना रसास्वाद घेण्यासाठी शशी पटवर्धन यांनी शब्दांंकित केली आहे.बंडोपंत देवल व कुटूंबियांच्या गप्पा आणि चर्चेतून अनेक पैलूंचा उलगडा होत गेला.तेच लिहिते करण्याचा स्तुत्य प्रयत्न झालेला आहे.या पुस्तकाचे रसग्रहण करताना वाचक अद्भुतरम्य सर्कशीच्या दुनियेत रमून जातील.

परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
-----------------------------------------------

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know